रेडिंग – १ : ग्रेट ब्रिटनमधील बर्कशरचे मुख्य ठिकाण व एक महत्त्वाचे औद्योगिक शहर. लोकसंख्या १,२३,७३१ (१९८१). केनेटटेम्स नद्यांच्या संगमाजवळ, केनेट नदीकाठावर वसलेले रेडिंग लंडनच्या पश्चिमेस ६१ किमी. वर आहे. ८७१ मध्ये येथे डॅनिश तळ होता. फॉर्कविअर्ड स्व्हेइनने १००६ मध्ये हे शहर जाळले. ११२१ मध्ये पहिल्या हेन्रीने बेनिडिक्टाइन ॲबेची येथे स्थापना केली. त्याच्या अवशेषांसभोवती पुढे सार्वजनिक उद्यानाचा विकास करण्यात आला. बाराव्या ते सोळाव्या शतकांत ॲबे व नव्याने उदयास आलेला व्यापारी संघ यांच्या सत्ताधिकारासाठी बरेच तंटे झाले. सतराव्या शतकाच्या मध्यातील इंग्लिश यादवी युद्धात या शहराची बरीच हानी झाली. १२५३ मध्ये तिसऱ्या हेन्रीने रेडिंगला नगराचा दर्जा दिला. १६३९ मध्ये त्याचे शहरात रूपांतर झाले.
यंत्रसामग्री, बेकरी उत्पादने, कृषी अवजारे, इलेक्ट्रॉनिकी साहित्य, बीर, लोहधातू उत्पादने, दारू गाळणे, छपाई, बोटी बांधणे इ. उद्योगधंदे शहरात चालतात. येथील पशुधन व धान्यव्यापार मोठा आहे. १८९२ मध्ये येथे महाविद्यालयाची स्थापना झाली आणि १९२६ मध्ये त्याचेच रेडिंग विद्यापीठात रूपांतर करण्यात आले. मुख्यतः शेती, उद्यानविज्ञान व दुग्धव्यवसायासंबंधीचे येथे संशोधन चालते. रेडिंग हे लोहमार्गाचे प्रस्थानक आहे. ब्रिटिश ग्रामीण जीवनविषयक वस्तुसंग्रहालय शहरात आहे. शहरातील सेंट लॉरेन्स चर्चमध्ये आर्चबिशप लॉड यांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यात आली. रेडिंग येथील तुरुंगातील अनुभव प्रसिद्ध आयरिश कवी व नाटककार ऑस्कर वाइल्ड याने बॅलड ऑफ रेडिंग जेलद्वारे प्रसिद्ध केले (१८९८).
चौधरी, वसंत