रूआंडा : मध्य आफ्रिकेतील एक खंडांतर्गत प्रजासत्ताक देश. लोकसंख्या ६३,२४,००० (१९८६ अंदाज) क्षेत्रफळ २६,३३८ चौ. किमी. ईशान्य−नैर्ऋत्य लांबी २४८ किमी. व आग्नेय−वायव्य रूंदी १६६ किमी. विषुववृत्ताच्या जवळच दक्षिणेस असलेल्या रूआंडाचा अक्षवृत्तीय विस्तार १° ४’ ते २° ५०’ दक्षिण व रेखावृत्तीय विस्तार २८° ५१’ ते ३०° ५५’ पूर्व यांदरम्यान आहे. रूआंडाच्या पश्चिमेस झाईरे, उत्तरेस युगांडा, पूर्वेस टांझानिया व दक्षिणेस बुरूंडी हे देश असून सरहद्दीची एकूण लांबी ८९३ किमी. आहे. (लोकसंख्या १,५६,६५०−१९८१) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.
भूवर्णन : रूआंडाची बहुतांश भूमी १,००० मी. पेक्षा अधिक उंचीची असून प्रदेश पर्वतीय, खोल दऱ्या-खोऱ्यांचा व पठारी स्परूपाचा आहे. देशाच्या पश्चिम भागात असलेल्या पर्वतश्रेणीमुळे नाईल व काँगो या नद्यांची खोरे एकमेकींपासून अलग झालेली आहेत. या पर्वतश्रेणीची उंची पश्चिमेकडे एकदम कमी झालेली दिसते, तर पूर्वेकडे ती हळूहळू कमी होत गेलेली आहे. पर्वतश्रेणीच्या पश्चिमेकडील पायथ्याशी एका मोठ्या खचदरीमध्ये किवू सरोवर आहे. पूर्वेकडे ही श्रेणी पठारी प्रदेशात विलिन झालेली दिसते. या पठारी प्रदेशाचा उतार कागेरा नदीकडील चिवडयुक्त मैदानी प्रदेशाकडे आहे. या पठारी भागातील गवताळ प्रदेशातच सर्वाधिक लोकवस्ती आढळते. पठाराची मध्यभागातील सरासरी उंची १,७०० मी. असून मैदानी प्रदेशात ती १,३०० मी. पर्यंत कमी झालेली आहे. देशाच्या अगदी आग्नेय भागात बशीच्या आकाराचा खोलगट भाग असून त्यात अनेक छोटीछोटी सरोवर विखुरलेली आहेत. प्राकृतीक दृष्ट्या रूआंडाची भूमी पश्चिमेकडे किवू सरोवर व रूझीझी नदीने, दक्षिणेस लूहूवा व अकार्यारू नद्यांनी, पूर्वेस कागेरा नदीने तर वायव्येस ज्वालामुखी श्रेण्यांनी सीमित केलेली आहे. येथील ज्वालामुखी पर्वतश्रेण्यांची सरासरी उंची सुं ४,२७० मी. च्या दरम्यान आहे. किवू सरोवराच्या उत्तरेस विरूंगा ही ज्वालामुखी पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतील ‘कारीसींबी’ (उंची ४,५०७ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर बहुधा बर्फच्छादीत असते. देशातील अधिक धूप झालेला प्रदेश वगळता बाकीच्या प्रदेशात गाळाची किंवा लाव्हारसापासून तयार झालेली सुपीक मृदा आहे. कथिल व टंगस्टन ही देशातील प्रमुख खनिजे आहेत. त्यांशिवाय पीट, कोलंबाइट-टँटॅलाइट, वैदृर्य व सोने यांचेही थोडेबहुत साठे आहेत. किवू सरोवराजवळ सु. ६०० कोटी घ. मी. एवढे नैसर्गिक वायूचे साठे असावेत, असा अंदाज आहे (१९८०).
देशाच्या पश्चिम सरहद्दीवरील, झाईरे व रूआंडा यांमध्ये विभागले गेलेले सस.पासून १,४६० मी. उंचीवरील किवू (क्षेत्रफळ २,६९४ चौ. किमी.) हे देशातील सर्वांत मोठे सरोवर आहे. या सरोवरातून रूझीझी नदी उगम पावत असून ती रूआंडा सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन टांगानिका सरोवराला मिळते. या नदीमुळेच किवू सरोवराचे पाणी टांगानिका सरोवरात जाते. रूआंडाच्या पूर्व सरहद्दीवरून कागेरा नदी वाहत असून ती ईशान्येस व्हिक्टोरिया सरोवराला मिळते. देशाच्या अंतर्गत भागातील खोल व अरूंद दऱ्यांमधून अनेक लहानलहान नद्या वाहतात. त्यांपैकी मध्य भागातील न्याबाराँग्गो आणि दक्षिणेकडील अकार्यारू या प्रमुख असून कागेरा नदीच्या त्या मुख्य उपनद्या आहेत.
हवामान : देशाचे स्थान विषुववृत्ताला जवळ असूनही अधिक उंचीमुळे येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. वार्षिक सरासरी तपमान २०° से. असले, तरी उंचीनुसार त्यात भिन्नता आढळते. दैनिक सरासरी तपमानकक्षा सहसा २° से. पेक्षा अधिक नसते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११४ सेंमी. असून सर्वाधिक पर्जनयवृष्टी नैर्ऋत्य भागात, तर सर्वांत कमी पूर्व भागात होते. मार्च ते मे व ऑक्टोबर ते डिसेंबर आर्द्र आणि जून ते सप्टेंबर व जानेवारी ते फेब्रुवारी कोरडा असे ऋतू आढळतात. थंड व आल्हाददायक हवामान, सुंदर सरोवर, दऱ्या व हिमाच्छादित पर्वत यांमुळे काही वेळा रूआंडाचा उल्लेख ‘आर्फिकेचे स्वित्झर्लंड’ असा केला जातो.
वनस्पती व प्राणी : देशाचा बराचसा भाग सॅव्हाना गवताळ प्रदेशाखाली असल्याने अरण्यांखालील क्षेत्र बरेच कमी आहे. केवळ १०% क्षेत्र अरण्यव्यास असून ते मुख्यतः पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेशात आढळते. तेथे विषुववृत्तीय प्रकारची अरण्ये आहेत. युकॅलिप्टस, बाभूळ व तेलमाड या वृक्षांचे येथे आधिक्य आहे. वायव्येकडील जास्त उंचीच्या ज्वालामुखी प्रदेशात बांबूची वन आहे. सॅव्हाना गवताळ प्रदेश मुख्यतः ईशान्य भागात आहे. कुरणांच्या प्रदेशात गुरे, शेळ्या व मेंढ्या पाळल्या जातात. आफ्रिकेतील विषुववृत्तीय देशांपैकी हा सर्वाधिक जंगलतोड व भूप्रदेशाचे खनन झालेला देश आहे. पूर्वी येथे विपुल प्राणिसंपदा होती परंतु वाढती लोकसंख्या व जंगलतोड यांमुळे प्राण्यांची संख्या खूपच कमी झालेली दिसते. देशात हत्ती, पाणघोडा, चित्ता, कोल्हा, तरस, रानडुक्कर, रानरेडे, हरिण, सुसर, मगर तसेच गिनी फाउल, तितर, बदक, लावा इ. प्राणी व पक्षी आढळतात. कागेरा राष्ट्रीय उद्यान व ईशान्य भागातील मूतारे शिकारक्षेत्रात प्राण्यांच्या विविध जाती पहावयास मिळतात.
इतिहास व राजकीय स्थिती : शिकार आणि फळे-कंदमुळे गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या पिग्मी लोकसमूहातील ट्वा हे या प्रदेशातील मूळ रहिवासी आहेत. इ. स. सातव्या ते दहाव्या शतकांत बांतू भाषा बोलणारे हृतू लोक या भागात येऊन स्थायिक झाले. ते बहुधा झाईरे नदी खोऱ्यातून आले असावेत. त्यांनी येथे शेती व्यवसाय सुरू केला. चौदाव्या व पंधराव्या शतकात पशुपालन करणाऱ्या नायलोटिक लोकांपैकी तूत्सी लोक उत्तरेकडून या प्रदेशात आले. त्यांनी येथे छोट्याछोट्या परंतु स्वतंत्र अशा अनेक टोळ्यांची स्थापना केली. पंधराव्या शतकाच्या परंतु स्वतंत्र अशा अनेक टोळ्यांची स्थापना केली. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात रुगांझू पहिला ब्विंबा याच्या नेतृत्वाखाली त्यांपैकी काही टोळ्यांनी एकत्र येऊन किगालीजवळ एका राज्याची स्थापना केली. सोळाव्या शतकात तूत्सी राजवंशाने आपल्या राज्यविस्ताराच्या प्रक्रियेस सुरुवात केली. किगेरी चौथा रवाबुगिरू या तूत्सी नेत्याच्या खंबीर नेतृत्वाखाली एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत हा राज्यविस्तार चालू होता. राज्यविस्ताराच्या सफलतेमुळे राजकीय दृष्ट्या तूत्सी अधिक संघटित बनले. हूतू लोकांची जमिनीवरील मालकी हळूहळू तूत्सी लोकांकडे हस्तांतरित होऊ लागली. या संपूर्ण राज्याचा तूत्सी नेता म्वामी हा सर्वोच्च अधिकारी व राजा बनला. राज्यातील लोक त्याचा खूप आदर राखीत. आर्थिक, राजकीय व सामाजिक दृष्ट्या तूत्सी लोकांचे हूतू लोकांवर पूर्णपणे वर्चस्व निर्माण झाले होते. लोकांचे समाजातील स्थान हे त्यांच्याकडील प्राणिसंपत्तीवर ठरत असे. गुरांची मालकी मुख्यतः तूत्सी लोकांकडे होती. हूतू लोक शेती करून धान्योत्पादन करीत परंतु त्यांना शासनव्यवस्थेत स्थान नव्हते. तूत्सी लोकांचा शारीरिक श्रमात प्रत्यक्ष सहभाग नव्हता मात्र एकमेकांत सामाजिक संबंध होते. सामान्यपणे तूत्सी मुले व हूतू मुली यांच्यात विवाहसंबंध होत. किन्या रुआडा ही हूतू भाषा तूत्सी लोकांनी स्वीकारली होती.
रिचर्ड बर्टन याच्याबरोबर १८५८ मध्ये टांगानिका सरोवराकडे आलेला जॉन स्पीक हा या भागाचे समन्वेषण करणारा पहिला यूरोपीय होय. टांगानिका सरोवरापासूनच तो नाईलचे उगमस्थान शोधण्यासाठी उत्तरेकडे वळला होता. इ. स. १८७१ मध्ये स्टॅनली व लिव्हिंगस्टन हे बुजुंबुरा (सांप्रतची बुरुंडीची राजधानी) येथे आले. यांनी रुझीझी नदीखोऱ्यातील प्रदेशाचे समन्वेषण केले. इ. स. १८८४-८५ मधील बर्लिन परिषदेपासून पूर्व आफ्रिकेतील जर्मन प्रभावक्षेत्र रुआंडा−बुरूंडीपर्यंत वाढविण्यात आले. १८९४ मध्ये जर्मन लेफ्टनंट फोन गॉट्झन याने किबू सरोवराचा शोध लावला. १८९९ मध्ये कोणत्याही विरोधाशिवाय म्वामीने जर्मनांना येथे आपली सत्ता प्रस्थापित करू दिली. स्थानिक कायदे व रुढींना अनुसरून परंपरागत स्थानिक नेतृत्वाद्वारे या प्रदेशावर जर्मन राज्यकारभार करू लागले. पहिल्या महायुद्धात १९१६ मध्ये हा प्रदेश बेल्जियमने काबीज केला. १९२३ मद्ये राष्ट्रसंघाने रुआंडा-ऊरुंडीची (बुरुंडी) महादेश म्हणून घोषणा केली. १९२५ मध्ये रुआंडाऊरुंडी महादेश व बेल्जियन काँगो (सांप्रतचा झाईरे) यांच्यात मिळून एक प्रशासकीय संघटना स्थापन केली. बेल्जियमच्या देखरेखीखाली संपूर्ण रुआंडावर तूत्सी राज्य प्रस्थापित झाले होते. इ. स. १९४६ मध्ये बेल्जियन प्रशासनाखाली रुआंडा-ऊरंडी हा संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश बनला. दुसऱ्या. महायुद्धानंतरच्या काळात या भागातील सामाजिक व राजकीय विषमता नष्ट करण्याची जोरदार मागणी हूतू लोकांनी केली. नोव्हेंबर १९५९ मध्ये हूतू लोकांनी क्रांती सुरू केली, ती पुढे काही वर्षे चालू राहिली. तीत अनेक तूत्सी मारले गेले किंवा शेजारच्या प्रदेशांत पळून गेले. बेल्जियन अधिकारी व रोमन कॅथलिक मिशनऱ्यांनी अशा खडतर व अशांततेच्या काळात हूतू लोकांना सक्रिय पाठिंबा दिला. ऑक्टोबर १९६० मध्ये रुआंडात पारमेहूतू (मूव्हमेंट डेमॉक्रॅटिक रिपब्लिकन) पक्षातील सदस्यांचे प्रजासत्ताक पद्धतीचे हंगामी शासन स्थापन केले. त्याच वर्षी जानेवारी महिन्यात पारमेहूतू नेत्यांनी ग्वामी सत्तेऐवजी प्रजासत्ताक राज्यपद्धती अंमलात आणण्याची घोषणा केली. सप्टेंबर १९६१ मध्ये सार्वमताने येथील राजसत्ताक पद्धती संपुष्टात आणून तेथे प्रजासत्ताक पद्धती आणण्याचा निर्णय घेण्यात आला. रुआंडा व ऊरुंडी यांनी संयुक्त रीत्या स्वातंत्र्य स्वीकारावे असा संयुक्त राष्ट्रांनी जोरदार आग्रह धरला होता परंतु हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारण्यात आला. २७ जून १९६२ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने केलेल्या ठरावानुसार रुआंडा व बुरुंडी (ऊरुंडी) यांना स्वतंत्र राज्ये म्हणून मान्यता दिली आणि १ जुलै १९६२ रोजी रुआंडा हा स्वतंत्र देश बनला. डिसेंबर १९६३ मध्ये हूतू व तूत्सी यांच्यात तीव्र दंगल उसळली. तीत फार मोठी कत्तल होऊन अंदाजे २०,००० लोक मारले गेले. त्यांत १२,००० तूत्सी लोक होते. १९५९−६४ या काळात सु. दीड लाख तूत्सी शेजारच्या देशांत पळून गेले.
ग्रेग्वार कायीबंदे या देशाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाची १९६९ मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली. त्यावेळी पारमेहतू या सत्ताधारी पक्षाने विधानसभेतील आपल्या ४७ जागा कायम राखल्या. १९७२ च्या अखेरीस हूतू व तूत्सी यांच्यातील तणाव पुन्हा उफाळून आला व तो फेब्रुवारी १९७३ पर्यंत टिकला. जुलैमध्ये रुआंडाचे संरक्षणमंत्री व लष्करप्रमुख मेजर जनरल ज्यूव्हनेल हव्यारिमाना यांनी राष्ट्राध्यक्ष कायीबंदे यांच्या विरोधात रक्तहीन क्रांती घडवून आणली आणि दुसऱ्या प्रजासत्ताकाची घोषणा करून देशात लष्करी सत्ता आणली. ऑगस्टमध्ये हव्यारिमाना हे राष्ट्राध्यक्ष बनले व त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रिमंडळ अधिकारावर आले. जुलै १९७५ मध्ये मूव्हमेंट रिव्होल्यूशनरी नॅशनल पोअर ले डेव्हलपमेंट (एम्आर्एनडी) या नवीन पक्षाचे सरकार अधिकारावर आले. डिसेंबर १९७८ मध्ये सार्वमताने नवीन संविधान स्वीकारण्यात आले. त्यानुसार पुढील पाच वर्षांत १९७३ मध्ये हव्यारिमाना यांनी हाती घेतलेली सत्ता व देशातील लष्करी राजवट संपुष्टात आणावयाची होती. नवीन संविधानानुसार पूर्वीच्या राष्ट्रीय संसदेऐवजी ‘नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल’ या एकसदनी कायदेमंडळाची रचना करण्यात आली. सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने पाच वर्षांसाठी या कायदेमंडळाची निवडणूक होते. डिसेंबर १९८३ मध्ये हव्यारिमाना हेच पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. हव्यारिमाना हे उत्तरेकडील गिसेन्ये येथील रहिवासी असल्याने त्यांनी शासनात व प्रशासनात उत्तर प्रांतीयांनाच अधिक प्रतिनिधित्व दिले. त्यामुळे १९८५ मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक वाद निर्माण झाला.
देशाची कार्यकारी सत्ता राष्ट्राध्यक्षाच्या हातात असते. नेमणूक केलेल्या मंत्रिमंडळाच्या साहाय्याने तो देशाचा राज्यकारभार सांभाळतो. तो देशाचा प्रमुख असतोच. त्याशिवाय ‘एम्आर्एनडी’ या राजकीय पक्षाचाही तो अध्यक्ष असतो. दर पाच वर्षांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते. ही निवडणूक लढविण्यासाठी व्यक्तीचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे लागते. अकार्यक्षमता किंवा मृत्यूमुळे जर राष्ट्राध्यक्षपद रुकामे झाले तर ‘एमआरएनडी’ पक्षाचा महासचिव राष्ट्राध्यक्षपदावर येतो त्यानंतर ९० दिवसांत नवीन राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक घ्यावी लागेल. कोणाही व्यक्तीला मंत्रिपदावर घेण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार राष्ट्राध्याक्षांना असतो. वैधानिक अधिकार राष्ट्राध्यक्ष व नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल यांना संयुक्तपणे असतात. नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिलमध्ये ७० सभासद असतात. राज्यकारभाराच्या सोयीसाठी देशाची विभागणी १० प्रांतांमध्ये व १४३ कम्यूनमध्ये केलेली आहे. प्रत्येक विभागाचा कारभार राष्ट्राध्यक्षाने नेमलेल्या गव्हर्नर निर्वाचित परिषदेकडून केला जातो. डिसेंबर १९७८ मध्ये सार्वत्रिकरीत्या आलेल्या नवीन संविधानानुसार ऱूआंड हा एकपक्षीय देश म्हणून घोषित करण्यात आला आहे.
रूआंडाच्या सशस्त्र दलाची स्थापना १९६० मध्ये झालेली असून १९८५ मध्ये त्यातील सैन्यबळ ५,१५० होते. पोलीसदलातील संख्या १,२०० होती. १९८४ मधील संरक्षणावरील अंदाजे खर्च २९९ लाख अमेरिका डॉलर होता.
आर्थिक स्थिती : आफ्रिकेतील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या राष्ट्रांपैकी हे एक राष्ट्र आहे. रूआंडाची भौगोलिक परिस्थिती ही त्याच्या आर्थिक विकासास विशेष अनुकूल नाही. खंडांतर्गत स्थान, पर्वतीय व ओबडधोबड भूमी, नैसर्गिक साधनसंपत्तीची कमी उपलब्धत, शेतीचे अल्प प्रमाण, केवळ शेती व पशुपाललन व्यवसायांवर आधारित अर्थव्यवस्था, लोकसंख्येचा अतिरिक्त भार यांमुळे देश मागासलेला राहिला आहे. देशातील सु. ९०% लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे. १९८० मधील १०,७९,९१० लाख रूआंडा फ्रँक एवढ्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी ४५·८% शेती, पशुपालन, अरण्योद्योग व मासेमारी व्यवसायांपासून १५·३% निर्मिती उद्योगांतून १४·७% ठोक व किरकोळ व्यापारापासून व २४·२% इतर क्षेत्रांमधून मिळाले. देशातील १० लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली होते (१९८०). निर्वाह शेतीचे प्रमाण अधिक आहे. दुष्काळ, जमिनीची धूप व तिच्यातून परंपरागत पद्धतीने सततची घेतली जाणारी पिके यांमुळे बऱ्याच प्रदेशांतील कृषिउत्पादनाचे प्रमाण घटले आहे. १९२८-२९ आणि १९४३-४४ मध्ये या प्रदेशात पडलेले दुष्काळ विशेष तीव्र स्वरूपाचे होते. या दुष्काळांमध्ये अनुक्रमे ४ लाख व ३ लाख लोक स्थलांतरित झाले.
देशात प्रमुख्याने कॉफी, चहा व कीटक्षोद तसेच मका, ज्वारी, बटाटे, रताळी, टॅपिओका, गोरीडू, आर्वी इ. पिकांचे उत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : मका १२१, ज्वारी २४०, बटाटे २७०, रताळी ९२०, टॅपिओका ३४८, गोराडू ९, आर्वी ३५ (१९८३) , भूईमूग १५, केळी १,९८२, कॉफी ३०, चहा ८. नगदी पिकांपैकी कॉफी हे सर्वांत मुख्य पीक आहे. १९७० पासून चहा उत्पादनावरही आधिक भर दिलेला आहे. १९८० पासून कीटक्षोद उत्पादनातही बरीच प्रगती झालेली आहे. देशाच्या निर्यातीपासून मिळाणाऱ्या१ एकूण उत्पन्नापैकी ७१·४% कॉफीच्या निर्यातपासून (१९८५), १७·६% चहाच्या निर्यातीपासून व ९·५ % कीटक्षोदाच्या निर्यातीपासून मिळत होते (१९८४), केळी उत्पादनाचा उपयोग प्रामुख्याने वीर तयार करण्यासाठी केला जातो. १९७७ पासून दलदलयुक्त मैदानी प्रदेशात भाताची लागवड करण्यात येऊ लागली आहे . तसेच ऊसलागवडीस नव्याने सुरुवात झाली आहे. दक्षिण रूआंडातील आस्ट्रीडा (बूतारे) येथे रूआंडा कृषिविज्ञाम संस्थेचे प्रधान कार्यालय तसेच रूआंडा राष्ट्रीय विद्यापीठ आहे. १९८६ मध्ये फ्रान्सशी झालेल्या एका करारानुसार आस्ट्रीडा येथील प्रमुख तांदूळ उत्पादन विकास प्रकल्पासाठी ३० वर्षे मुदतीचे ४,६५० लाख रूआंडा फ्रँक एवढे कर्ज फ्रान्सकडून मिळणार होते. याच वर्षी कृषिविकास कार्यविकास कार्यक्रमासाठी जागतिक बँकेकडून १२७ लाख डॉलर मंजूर केले आहेत. त्याचा लाभ ५०,००० अल्पभूधारकांना होईल अशी अपेक्षा आहे. किगाली येथे रूआंडा, बुरूंडी व टांझानिया यांच्या कागेरा नदीखोरे संयुक्त विकास संघटनेचे प्रधान कार्यालय आहे.
लोकांचे समाजातील स्थान हे त्यांच्याकडे असलेल्या प्राण्यांच्या संख्येवर ठरत असल्याने स्वतःकडे गुरांची संख्या अधिकाधिक ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र त्यामुळे कमी दर्जाच्या गुरांची संख्या अधिक आढळते. १९८५ मध्ये राज्यातील पशुधन व पशुधन उत्पादन पुढीलप्रमाणे होते−पशुधन (संख्या हजारांमध्ये) : गुरे ६६०, डुकरे १००, मेंढ्या ३३०, शेळ्या ९७० पशुधन उत्पादने (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : गोमांस १३, शेळीचे मांस ४, इतर प्रकारचे मांस १२, गाईचे दूध ७२, शेळीचे दूध १३, कोंबड्यांची अंडी १·३, गुरांची कातडी २·१, रूआंडा दरवर्षी सु. १६,००० गायीची तसेच काही प्रमाणवर चामड्यांची निर्यात करतो. मधमाशापालन हासुद्धा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. केवळ स्थानिक उपयोगासाठी नद्या व सरोवरांत मासेमारी केली जाते. १९८० मध्ये एकूण १,२०० टन मासे पकडण्यात आले.
देशातील अरण्ये आर्थिक दृष्ट्या विशेष महत्त्वाची नसल्याने व्यापारी दृष्ट्या अरण्योद्योगाचा विकास झालेला नाही. अरण्यांखालील क्षेत्रही पूर्वीपेक्षा बरेच कमी झालेले आहे. इंधन व इमारत बांधकाम या स्थानिक गरजांसाठीच अरण्यांचा अधिक उपयोग केला जातो. अरण्यांखालील क्षेत्र १,६७,००० हे, होते (१९८०). त्यापैकी २७,००० हे. क्षेत्रात गेल्या दोन दशकांत जमिनीची धूप रोखण्यासाठी वृक्षलागवड केलेली आहे. राष्ट्रीय उद्यानांखालील क्षेत्र ३,२५,००० हे. होते. १९८४ मध्ये ५४,६,००० घ. मी इतके लाकडाच्या ओंडक्याचे उत्पादन झाले. त्यांपैकी ५२,३९,००० घ. मी. इंधनासाठीचे लाकूड होते.
रूआंडातील बहुतांश ऊर्जा जलनिर्मित आहे. राष्ट्रीय विद्युत्शक्ती पुरवठा यंत्रणा ही झाईरेतील मुरूरू केंद्राशी जोडण्यात आल्यापासून देशातील बहुतेक औष्णिक विद्युत् केंद्र बंद करण्यात आली (१९७९). या केंद्राकडून रूआंडातील निम्म्यापेक्षा आधिक वीज पुरविली जाते. रूहेंग्गेरी येथे १२ मेवॉ. क्षमतेचा मुकुंग्वा जलविद्युत् प्रकल्प, तर बुरूंडी, झाईरे यांच्या मदतीने रूआंडा−झाईरे सरहद्दीवर ४० मेवॉ. क्षमतेचा रूझीझी−२ हा जलविद्युत् प्रकल्प उभारला जात आहे. १९८४ मध्ये देसात ९३,९८० हजार किवॉ. ता. वीज तयार झाली.
उच्च दर्जाच्या खनिजांचा अभाव व भांडवलाची कमतरता यांमुळे खाणकाम व्यवसाय मर्यादित राहिला आहे. कथिल हे प्रमुख खनिज उत्पादन असून कॉफीखालोखाल निर्यातीत कथिलाचा क्रमांक लागतो. त्याशिवाय टंगस्टन, सोने, टँटॅलाइट व वैदूर्य यांचेही साठे आहेत. नैसर्गिक वायू उत्पादनासही सुरुवात झाली आहे. किवू सरोवरात सापडलेला नैसर्गिक वायूचा साठा सु.६०० कोटी घ. मी. एवढा असून तो जगातील मोठ्या साठ्यांपैकी एक असावा, असा अंदाज आहे. १९८४ मध्ये मुख्य खनिजांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (उत्पादन मे. टनांमध्ये): कथिल १,५६१ कोलंबाइट-टँटॅलाइट ५२ वैदूर्य ४४ टंगस्टन ४८२. किवू सरोवरातून प्रतिवर्षी नैसर्गिक वायूचे उत्पादन दहा लक्ष घ. मी. होते. बहुतेक सर्व खनिजतेल उत्पादने कन्या व टांझानियाकडून आयात केली जातात. १९८१ मध्ये एकूण ४५,००० टन खनिजतेल उत्पादने आयात करण्यात आली. किगाली येथे रूआंडा भूशास्त्रीय सेवासंस्था असून कथिल खाणकाम कंपन्यांची प्रधान कार्यालये तेथेच आहेत.
रूआंडात निर्मिति उद्योगांचा विकास विशेष झालेला नाही. निर्मिति उद्योगांतील उत्पादनांचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा केवळ १८% आहे. (१९८१). निर्मितीउद्योगांत दोन टक्क्यांपेक्षाही कमी लोकसंख्या गुंतलेली आहे. बहुतांश निर्मिती व प्रक्रिया उद्योग हस्तव्यवसाय प्रकारचे असून, त्यात मातीची भांडी, वेताच्या किंवा गवताच्या टोपल्या, विटा, कौले, पादत्राणे, कीटकनाशक इत्यादींचा समावेश होतो. मोठ्या उद्योगांत साखरनिर्मीती, चहा व कॉफी प्रक्रिया, सिगारेटी, साबण, मद्य, बीर, सौम्य पेये, वस्त्रे, धातु-उत्पादने रेडिओ, संच जुळविणे, रसायने, अभियांत्रिकी, काडेपेट्या, रंग औषधे, लाकडी सामान, कीटक्षोद प्रक्रिया या उद्योगांचा समावेश होतो. रूआंडातील पहिला धातुप्रक्रिया (कथिल प्रगलन) कारखाना १९८१ मध्ये कारूरूमा येथे स्थापन करण्यात आला. त्यानंतर किगाली येथे टंगस्टन व लोह ओतशाळा स्थापन करण्यात आल्या. कथिल उत्पादनासाठीची तांत्रिक मदत व खाणकाम साहित्य १९८५ मध्ये ‘यूरोपीय आर्थिक संघा’ने (ईईसी) देण्याचे आश्वासन दिले आहे. १९८३ मध्ये देशात काही प्रमुख उत्पादने पुढीलप्रमाणे झाली : बीर ७७,१३८·८ हजार बाटल्या, लिंबाचे सरबत व खनिज जल ४१,५७६ हजार बाटल्या, साखर २,११२ मे. टन, साबण ८,०६२·३ मे. टन, प्लॅस्टिक पादत्राणे ३२८·२ हजार जोड.
रूआंडाचा व्यापार मुख्यतः केन्या, बेल्जियम , ‘ईईसी’ अंतर्गत देश, जपान व संयुक्त संस्थानांशी चालतो. देश खंडांतर्गत असल्याने ९०% आयात-निर्यात मालाची वाहतूक मोंबासा (केन्या या देशांतून) चालते. १९८४-८५ मध्ये युगांडातील यादवी युद्धामुळे या मार्गाने होणारी वाहतूक थांबली. त्यामुळे देशाची आयात-निर्यात हवाई मार्गाने करावी लागली. किगाली हे देशांतर्गत व्यापारचे प्रमुख केंद्र असून काही अंशी तेथून आंतरराष्ट्रीय व्यापारही चालतो. रूआंडा कॉफी, चहा, कथिल, कीटक्षोद व क्विनीन यांचा निर्यात, अन्नधान्य, कापड, खनिज तेल उत्पादने, वाहतूक साधने, यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य इत्यादींची आयात करतो. १९८३ मध्ये रूआंडाने एकूण २,५४,५४० लाख रूआंडा फ्रँक किंमतीची आयात व १,१४,०५० लाख रूआंडा फ्रँक किंमतीची निर्यात केली. १९७५ ते १९८० अखेर देशाचा व्यापार अनुकूल संतुलनाचा होता. १९८१ पासून मात्र तो प्रतिकूल संतुलनाचा आहे. स्थानिक व्यापारात मुख्यतः बेल्जियन, ग्रीक तसेच आशियाईंचे वर्चस्व दिसते.
रूआंडा फ्रँक हे देशाचे अधिकृत चलन असून १०० सेंटीमचा १ रूआंडा फ्रँक होतो. १, २, ५, १०, २० आणि ५० फ्रँकची नाणी, तर १०० ५०० १,००० व ५,००० फ्रँकच्या नोटा चलनात आहेत. १ स्टर्लिंग पौंड = १२४·८० रूआंडा फ्रँक व १ अमेरिकी डॉलर = ८४·१८ रूआंडा फ्रँक असा विनियम दर होता (३१ डिसेंबर १९८६).
इ. स. १९२२ पासून १९६० पर्यंत म्हणजेच झार्झरेच्या (बेल्जियन काँगो) स्वातंत्र्यापर्यंत रूआंडा व बुरूंडीची चलनपद्धती आणि बँक व्यवसाय काँगो प्रजासत्ताकाशी निगडित होता, जुलै १९६२ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर रूआंडा व बुरूंडीने एका समाईक मध्यवर्ती बँक म्हणून ‘नॅशनल ऑफ द रिपब्लिक ऑफ रूआंडा’ची स्थापना करण्यात आली. त्याशिवाय रूआंडात कमर्शिअल बँक इ. बँका आहेत. देशात रोखे बाजार नाही. विमाविषयक सेवा पुरविण्यासाठी १९८७ मध्येरूआंडन राष्ट्रीय विमा कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. देशात औद्यौगिक व व्यापारी नफ्यावर २०% ते ४५% प्रत्यक्ष कर आकारला जातो. आयात आणि निर्यात शुल्क व सीमा शुल्कापासून सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. देशातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण फारच कमी आहे.
वाहतूकमार्गांच्या व साधनांच्या अभावामुळेच देशाचा आर्थिक व सामाजिक विकास मर्यादित राहिला आहे. रूआंडामध्ये लोहमार्ग नाहीत मात्र १९८४ मध्ये केलेल्या नियोजनानुसार युगांडा, रूआंडा व बुरूंडीमधून जाणारा व टांझानियातील किगोमा−दारेसलाम लोहमार्गाला तयार करण्याची योजना आखली आहे. देशात १२,०७० किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी २·२०५ किमी. मुख्य रस्ते व १,८५५ किमी. लांबीचे दुय्यम रस्ते आहेत (१९८५). किवू सरोवरातून झाईरेशी अंतर्गत जलवाहतूक केली जाते. गिसेन्ये, कीबुये व स्यांगूगू ही रूआंडातील किवू सरोवराच्या तीरावरील प्रमुख बंदरे आहेत. किगाली व कामेंबे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून आस्ट्रीड, गाबीरो, रूहेंग्गेरी व गिसेन्ये येथे अंतर्गत वाहतुकीचे विमानतळ आहेत. दूरध्वनी सेवेचा अत्यंत मर्यादित विकास झालेला आहे. रूआंडा आकाशवाणीवरून फ्रेंच, स्वाहिली व किन्या रूआंडा भाषांमधून कार्यक्रम प्रसारित केले जातात. देशात सु. २,५०,००० रेडिओ संच होते, मात्र अद्याप येथे दूरचित्रवाणी सेवा नाही (१९८६). शासनाच्या माहिती व पर्यटन खात्याकडून फ्रेंच भाषेमधून एक दैनिक वृत्तपत्र प्रकाशित केले जाते.
लोक व समाजजीवन : रूआंडा हा आफ्रिका खंडातील सर्वाधक लोकसंख्येची घनता (दर चौ. किमी. स. २१९) असलेला देश आहे (१९८३). दर हजारी जन्मप्रमाण ५१ व मृत्यूप्रमाण २२ आहे. देशातील फक्त ३·८% लोकसंख्या नागरी असून या लोकसंख्येच्या वाढीचा दर ७% आहे (१९८०). दुष्काळ व बेकारी यांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक रूआंडनांनी शेजारच्या झाईरे, युगांडा व टांझानिया या देशांकडे स्थलांतर केले. १९६० च्या मध्यास सु. ४,००,००० रूआंडन युगांडाचे कायमचे रहिवासी बनले. १९८२ व १९८३ मध्ये सु. १०,००० मूळ रूआंडनांना युगांडा मधून हाकलून दिले. त्यांपैकी बरेचसे पुन्हा रूआंडात परतले. १९८१ मध्ये बुरूंडीतून सु. १०,००० व इतर ८,००० निर्वासित रूआंडात येऊन स्थायिक झाले. देशातील कृषी विभागावरील लोकसंख्येचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी शासनाकडून देशांतर्गत स्थलांतरास प्रोत्साहन दिले जात आहे.
देशात प्रामुख्याने हूतू, तूत्सी व ट्वा (बाट्वा) ह्या तीन वंशांचे लोक आढळतात. एकूण लोकसंख्येत ९०% हेतू (बांतू गटातील), ९% तूत्सी व १% ट्वा (पिग्मी गटातील) लोक आहेत. हूतू हे प्रामुख्याने शेतकरी आहेत. तूत्सी लोक लढवय्ये व लांब शिंगांची गुरे पाळणारे असून पूर्वी एकूण लोकसंख्येत ते १४% होते. परंतु त्यांतील बरेचसे निर्वासित म्हणून म्हणून विशेषतः १९५९ मधील नागरी तंट्यात शेजारच्या देशात पळून गेले. ह्या तूत्सींनी पंधराव्या शतकापूर्वी रूआंडात स्थलांतर केले होते. ट्वा हे मुख्यतः शिकारी व कुंभारकाम करणारे असून ते झाईरेतील पिग्मी लोकांपैकी आहेत. हेच येथील मूळ रहिवासी असावेत. १९८० मध्ये देशात सु. ३,००० आशियाई होते त्यात मुख्यतः भारतीय, पाकिस्तानी व अरब होते. याशिवाय येथे २,००० यूरोपीय असून त्यांतील सु. ६०% बेल्जियन आहेत. देशातील ६८% रूआंडन ख्रिश्चन धर्मीय असून त्यांतील ५६% रोमन कॅथलिक व १२% प्रॉटेस्टंट पंथीय आहेत. परंपरागत आफ्रिकी धर्माचे २३% इस्लाम धर्मीय ९% आहेत (१९८३). तसेच काही बहाई व हिंदु धर्मीयही आहेत. बांतू भाषा गटातील किन्या रूआंडा तसेच फ्रेंच ह्या येथील प्रमुख आणि अधिकृत भाषा आहेत. स्वाहिली या स्थानिक बोलीभाषेचा वापर सर्वत्र आढळत असला, तरी अरबी प्रभाव असलेल्या भागात तिचा वापर जास्त केला जातो.
रुआंडाच्या संविधानानुसार स्त्री-पुरूष यांना समान नागरिकत्व बहाल केलेले असले, तरी मालमत्तेच्या बाबतीत तसेच रोजगार, शिक्षण व इतर काही क्षेत्रांतही स्त्रियांना बरोबरीने वागविले जात नाही. गर्भपात बेकायदेशीर ठरविण्यात आला आहे. प्रमूतिमान ६·९ असून ते आफ्रिकेत सर्वाधिक आहे (१९७०). सरासरी आयुर्मान ४६ वर्षांचे आहे. दर हजारी बालमृत्युप्रमाण १०७ आहे (१९८०). अपघात, कुटुंब भत्ता व निवृत्ती वेतन या योजना देशात लागू केलेल्या आहेत. सर्व पगारदार लोकांना सामाजिक सुरक्षितता योजनेमध्ये सहभागी व्हावे लागते. शासनाकडून तसेच धर्मप्रसारकांकडून सामाजिक व वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात. आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी अलीकडे शासनाकडून विशेष प्रयत्नर केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटना, एफ्एओ, युनिसेफ, संयुक्त राष्ट्रे या संघटनांकडून तसेच बेल्जियम, फ्रान्स, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांकडून आरोग्यविषयक सुधारणांसाठी मोठी मदत केली जात आहे. अपपोषण हा देशातील अत्यंत महत्त्वाचा असा आरोग्यविषयक प्रश्न आहे. न्यूमोनिया, क्षयरोग, गोवर, डांग्या खोकला, आमांश, मलेरिया, निद्रारोग हे येथील लोकांमध्ये आढळणारे मुख्य आजार आहेत. देशात २३२ रुग्णालये, ७,८८२ खाटा व १८२ डॉक्टर होते (१९८१).
देशात १९५० पर्यंत सार्वजनिक शाळा नव्हत्या. तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय फक्त रोमन कॅथलिक धर्मप्रसारकांनी १९२९ मध्ये आस्ट्रीडा येथे स्थापन केलेल्या शाळेतच होती. रुआंडाच्या स्वातंत्र्यानंतर मात्र शिक्षणावर विशेष खर्च करून शिक्षण प्रसार कार्यक्रमावर अधिक भर दिला आहे. आजही देशाच्या अर्थसंकल्पातील सर्वाधिक खर्चाची तरतूद शिक्षणासाठी केलेली दिसते. १९८४ मधील देशाच्या अर्थसंकल्पात २७·५% खर्चाची तरतूद शिक्षणासाठी होती. शाळासुधार कार्यक्रमाची आखणी १९७९ व १९८५ मध्ये करण्यात आली. ७ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी आठ-वर्षीय प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केलेले आहे. प्राथमिक शिक्षणाची सुविधा शासनाकडून तसेच धर्मप्रसारकांकडून पुरविली जाते. १९८४-८५ मध्ये ७,९०,१९८ विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत होते. माध्यमिक शाळेत ४५,१५८ विद्यार्थी असून त्यांपैकी ३०,७८८ कृषी व व्यावसायिक शिक्षण घेत होते. आस्ट्रीडा येथे राष्ट्रीय विद्यापीठ (स्थापना १९६३) असून त्यात १,५७७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्याशिवाय उच्च शिक्षण देणाऱ्या दोन खाजगी संस्था आहेत. किगाली येथे तंत्रविद्या महाविद्यालय (स्था. १९५६) आहे. परदेशांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६०३ असून ते मुख्यतः बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स व रशियात शिक्षण घेत आहेत (१९८२−८३). राष्ट्रीय विद्यापीठातील ग्रंथालय सर्वांत मोठे असून त्यात ६५,००० ग्रंथ आहेत. किगाली येथील सार्वजनक ग्रंथालयात १०,००० ग्रंथ आहेत. आस्ट्रीडा येथील वस्तुसंग्रहालयात देशाच्या सांस्कृतिक क्रमविकासासंबंधीचा संग्रह आहे. त्याशिवाय काब्गे येथे मानवजातिविज्ञानविषयक व किगाली येथे भूशास्त्रविषयक वस्तुसंग्रहालय आहे.
महत्त्वाची स्थळे : किगाली हे देशाच्या राजधानीचे ठिकाण व देशातील सर्वांत मोठे शहर असून प्रशासकीय, राजकीय व आर्थिक दृष्ट्याही ते महत्त्वाचे आहे. राजधानी म्हणून किगाली तसे नवीनच आहे. कारण १९१९−६२ या काळात रुआंडा−ऊरुंडी ह्या बेल्जियमच्या विश्वस्त प्रांताची राजधानी बुजुंबुरा (सांप्रतची बुरुंडीची राजधानी) ही होती. त्यावेळी एक प्रादेशिक केंद्र म्हणूनच किगाली महत्त्वाचे होते. जर्मन प्रशासनाखाली असताना (१८९५ नंतर) किगालीला व्यापारदृष्ट्या महत्त्व होते. मात्र १९६२ मध्ये रुआंडा स्वतंत्र झाल्यावर, देशाच्या मध्यवर्ती भागात सस. पासून १,५४० मी. उंचीवर वसलेले किगाली हे देशाच्या राजधानीचे ठिकाण बनले. एकूण चार टेकड्यांवर या शहराचा विस्तार आहे. विषुववृत्तापासून दक्षिणेस केवळ २४० किमी. असूनही अधिक उंचीवरील स्थानामुळे किगालीचे हवामान आल्हाददायक आहे. शहराच्या आग्नेय भागात मुख्यतः कारखाने व ईशान्य भागात निवासस्थाने आढळतात. आस्ट्रीडा (लोक. २५,८००−१९८० अंदाज) हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आणि प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. याशिवाय रुर्हेग्गेरी (१६,०२५) व गिसेन्ये (१२,४३६) ही देशातील इतर महत्त्वाची नगरे आहेत. रुआंडा शासन पर्यटन व्यवसायाच्या विकासाचा विशेष प्रयत्न करीत आहे. राष्ट्रीय उद्याने, किवू सरोवर व निसर्गसुंदर पर्वतश्रेण्या ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. १९८४ मध्ये देशातील राष्ट्रीय उद्यानांना सु. २०,००० पर्यटक भेट देऊन गेले व त्यांच्यापासून देशाला ४०० लक्ष रुआंडा फ्रँकचे उत्पन्न मिळाले (चित्रपत्र ११).
चौधरी, वसंत
“