मोझली (मॉस्ली), हेन्री ग्विन-जेफ्रिझ : (२३ नोव्हेंबर (१८८७–१० ऑगस्ट १९१५). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. त्यांनी मूलद्रव्याचे प्रमुख गुणधर्म त्याच्या अणुभारावर नव्हे तर त्याच्या अणुक्रमांकावर अवलंबून असतात असे प्रायोगिक रीत्या दाखवून दिले, तसेच अणुक्रमांक व अणुकेंद्राचा विद्युत् भार यांतील संबंध प्रस्थापित केला. अणुक्रमांक हा अणुकेंद्रातील प्रोटॉनांच्या संख्येबरोबर म्हणजेच अणुकेंद्राच्या धन विद्युत् भाराबरोबर असतो. मोझली यांच्या या कार्यामुळे मेंडेलेव्ह यांच्या ⇨ आवर्त सारणीत महत्त्वाच्या सुधारणा झाल्या आणि मूलद्रव्यांचे नव्याने व अधिक समाधानकारकपणे वर्गीकरण करणे शक्य झाले.
मोझली यांचा जन्म इंग्लंडमधील वेमथ येथे झाला. ऑक्सफर्ड येथील ट्रिनिटी कॉलेजातून पदवीधर झाल्यावर १९१० मध्ये मँचेस्टर विद्यापीठातील अर्नेस्ट रदरफर्ड यांच्या प्रयोगशाळेत भौतिकीचे अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. पहिल्या महायुद्धास प्रारंभ होईपर्यंत (१९१४) तेथे काम केल्यावर ते सैन्यात दाखल झाले व रॉयल एंजिनिअर्समध्ये त्यांची नेमणूक झाली.
प्रारंभी मोझली यांनी किरणोत्सर्ग व रेडियमाचे बीटा प्रारण [→ किरणोत्सर्ग] यांसंबंधी संशोधन केले. नंतर त्यांनी आपले लक्ष मूलद्रव्यांच्या क्षःकिरण वर्णटपांच्या (इलेक्ट्रानांच्या भडिमारामुळे उत्सर्जित होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण क्ष-किरणांच्या) अभ्यासाकडे वळविले. यासंबंधी केलेल्या प्रयोगांत त्यांना क्ष-किरण वर्णपटातील वैशिष्ट्यपूर्ण रेषा व त्यांच्या संगत कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या पूर्ण आवर्तनांची संख्या) यांत संबंध असल्याचे दिसून आले. १९१३ मध्ये त्यांनी एका निबंधाद्वारे या कंप्रता पूर्णांकांच्या वर्गाच्या प्रमाणात असल्याचे आणि हे पूर्णांक अणुक्रमांक व एक स्थिरांक यांच्या बेरजेबरोबर असल्याचे प्रस्थापित केले.
अणुक्रमांकासंबंधीचा हा शोध ‘मोझली नियम’ या नावाने प्रसिद्ध असून अणुसंबंधीच्या ज्ञानाच्या प्रगतीतील तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. १९१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या एक निबंधाद्वारे त्यांनी ॲल्युमिनियम व सोने यांच्या दरम्यान तीन अज्ञात मूलद्रव्ये असल्याचा निष्कर्ष काढला होता. याखेरीज युरेनियमापर्यंत युरेनियमासह एकूण फक्त १२ मूलद्रव्ये असल्याचा निष्कर्षही त्यांनी मांडला होता.
महायुद्धात तुर्कस्तानातील गलिपलीच्या मोहिमेत सूल्व्हा उपसागराच्या लढाईत वयाच्या केवळ सत्ताविसाव्या वर्षी त्यांचा अंत झाला.
भदे, व. ग.