रूडकी : भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या सहारनपूर जिल्ह्यातील रूडकी तालुक्याचे मुख्य ठिकाण व कँटोनमेंट. लोकसंख्या नगरपरिषद ६१,९१४ कँटोनमेंट १७,२३१ (१९८१). सहारनपूरच्या आग्नेयीस ३५ किमी. व हरद्वारच्या नैर्ऋत्येस ३२ किमी. अंतरावर रूडकी आहे. अंबाल-सहारनपूर-लक्सॉर हा लोहमार्ग फाटा रूटकीवरून जात असून सहारनपूर व हरद्वार यांच्याशी हे रस्त्यानेही जोडलेले आहे. रूडकीहून लोहमार्गाने हरद्वारला लक्सॉरमार्ग जाता येते. पूर्वी रूडकी हे परगण्याचे मुख्य ठिकाण होते, असा उल्लेख आईन-इ-अकबरीमध्ये मिळतो. अपर गंगा कालवा येथूनच गेलेला आहे. १८४० च्या सुमारास जेव्हा गंगा कालव्याच्या कामास आरंभ झाला, तेव्हा सोलानी नदीकाठावरील हे एक छोटेसे खेडेगाव होते. १८४५-४६ लोह ओतशाळा तसेच कालवाबांधणी सामग्रीची कर्मशाळा येथे स्थापना झाल्यामुळे रूडकीला महत्त्व प्राप्त झाले. या दोहोंचा विस्तार व त्यांची सुधारणा १८५० मध्ये करम्यात आली. ३० वर्षांपर्यंत येथील कर्मशाळा खाजगी व्यवसाय म्हणून चालविली जातहोती. १८८६ मध्ये काही शासकीय निर्मिती विभाग येथे आणण्यात आले. बेंगॉल सॅपर्स व मायनर्स पथकाचे हे प्रमुख केंद्र होते व त्याच्या मोठमोठ्या कर्मशाळाही येथे होत्या.
स्थानिक तरूणांना अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने १८४७ मध्ये रूडकी येथे टॉमसन अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. हे एक विख्यात अभियांत्रिकी महाविद्यालय असून १९४९ मध्ये याचेच रुडकी विद्यापीठात रुपांतर करण्यात आले. त्यात विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील विविध शाखांचे शिक्षण दिले जाते. शहरात १८६८ मध्ये नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. येथील वस्त्रनिर्मिती उद्योग मोठा आहे. येथील इमारत संशोधन संस्था (स्था. १९४९) व जलसिंचन संशोधन संस्था प्रसिद्ध आहेत. रुडकीच्या आग्नेयीस ११ किमी. वरील मुंहमदपूर गावाजवळ जलविद्युत्निर्मिती केंद्र आहे.
चौधरी, वसंत