रीबो, तेओद्युल अरमाँ : (१८ डिसेंबर १८३९−९ डिसेंबर १९१६). फ्रेंच मानसशास्त्रज्ञ. जन्म गगां येथे. पॅरिसमध्ये वैद्यकशास्त्राची पदवी घेऊन (१८७५) सॉर्बॉन येथे काही काळ प्रायोगिक मानसशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम केले (१८८५−८८). त्यानंतर कॉलेज द फ्रान्समध्ये पहिल्या फ्रेंच मानसशास्त्रीय प्रयोगशाळेचा संचालक म्हणून त्याने काम पाहिले (१८८९−९६). रीबोला फ्रेंच मानसशास्त्राचा संस्थापक म्हणूनही संबोधिले जाते. कारण त्याची मानसशास्त्रावरील प्रसिद्ध झालेली पुस्तके आणि अध्यापक म्हणून लोकमानसावरील त्याचा प्रभाव. यांमुळे फ्रेंच मानसशास्त्राचा चेहरामोहराच बदलला. त्याने या शास्त्रास विशेष दर्जा आणि लोकप्रियता प्राप्त करून दिली. रीबीने तत्त्वज्ञानापासून मानसशास्त्र वेगळे करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने प्रायोगिक मानसशास्त्रीय तत्त्वे (इंग्लंड−जर्मनीत प्रसृत झालेली) फ्रान्समध्ये प्रचलित केली. व्हुंटप्रमाणे तो प्रवर्तक प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ नसला, तरी फ्रान्समध्ये या शास्त्राचा शास्त्रशुद्ध पाया घालण्याचे काम त्यानेच केले. तत्कालीन ब्रिटिश सहकाऱ्यांच्या (हर्बर्ट स्पेन्सर, अलेक्झांडर बेन) मानसशास्त्रीय आणि जीवशास्त्रीय उपपत्तींचा (सिद्धांतां चा) त्याच्यावर बराच प्रभाव होता. तसेच लाइपसिक येथील प्रयोगशाळेत व्हिल्हेल्म व्हुंटने काढलेल्या प्रायोगिक निष्कर्षांनी त्याचे लक्ष वेधून घेतले.
मेंटल इन्हेरिटन्स या त्याच्या पहिल्याच ग्रंथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नोकरीपूर्व काळात त्याने लिहिलेल्या डिसिजिस ऑफ मेमरी (१८८१) व द डिसिजिस ऑफ पर्सनॅलिटी (फ्रेंच १८८५, इ. भा. १८८७) या त्याच्या दोन सुप्रसिद्ध ग्रंथात स्थिर भाव (सेंटिमेंटस) व भावना यांचे विश्लेषण केलेले आढळते. भावनाविषयक कुतूहलातूनच पुढे ‘मनोविश्लेकषण’ हे शास्त्र उदयास आले. स्मृतिविषयीचा रीबोचा नियम प्रसिद्ध आहे. ह्या नियमानुसार वृद्धत्वामध्ये अथवा स्मृतीच्या जैव विकृतीमध्ये (मानसविकृतिविज्ञान) जो ⇨स्मृतिलोप होतो, तो अनुभवांच्या स्मृतिबद्ध होण्याच्या उलट्या क्रमाने होतो. म्हणजे वृद्ध माणसांना ताज्या अनुभवांचे विस्मरण होते व बालपणीचे अनुभव स्मरत असतात. यालाच मनोविकृतिशास्त्रात ‘रिट्रोग्रेड ॲम्नेशिया’ म्हणतात.
आपल्या उत्तरयुष्यात त्याने सामान्य (नॉर्मल) मनोविज्ञान या विषयाकडे अधिक लक्ष देऊन सायकॉलॉजी ऑफ अटेन्शन (१८९०) आणि सायकॉलॉजी ऑफ इमोशन्स (१८९६−९७) हे दोन ग्रंथ लिहिले. या ग्रंथात रीबोने भावनिक अवस्थांच्या शास्त्रशुद्ध रीतीने केलेल्या विश्वेषणामुळे विल्यम मॅकडूगल, अलेक्झांडर बेन इ. शास्त्रज्ञांना वैचारिक साधनसामग्री मिळाली. मॅक्डूगल यांचे ‘प्रायमरी इमोशन्स’ व ‘सेंटिमेंटस’ या विषयांवरील सिद्धांत रीबो याच्या लिखाणावरच आधारित आहेत.
त्याने लिहिलेल्या बहुतेक सर्व पुस्तकांची इंग्रजीत भाषांतरे झाली असून त्यांतील पुढील ग्रंथ मान्यता पावले आहेत: ब्रिटिश सायकॉलॉजिकल सर्व्हे (१८७०), हेरिडिटी : सायकॉलॉजिकल स्टडी ऑफ इट्स फिनॉमेना, लॉज, कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सिस (१८७३, इं. भा, १८७५), द डिसिजिस ऑफ द विल (१८८४), द डिसिजिस ऑफ पर्सनॅलिटी, द इव्हलूशन ऑफ जनरल आयडिआज (१८८९), एसेज ऑन द क्रिएटिव्ह इमॅजिनेशन (१९०६) इत्यादी. रीबो याने Revue Philosophique हे शास्त्रीय मासिक सुरू केले व तो त्याचा पहिला संपादकही होता. ‘भाव−भारित’ (अफेक्टिव्ह) स्मृती या रीबोच्या संकल्पनेचा वापर रशियन शास्त्रज्ञ कॉन्स्टंट्यीन स्टॅनिस्लॅव्हस्की याने आपल्या अध्यापनपद्धतीचा पायाभूत आधार म्हणून केला आहे.
पॅरिस येथे तो निधन पावला.
काळे, श्री. वा.