रीड, वॉल्टर : (१३ सप्टेंबर १८५१−२३ नोव्हेबर १९०२). अमेरिकन लष्करी वैद्य व सूक्ष्मजंतवैज्ञानिक. ⇨पीतज्वरावरील संशोधनात्मक कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध.

रीड यांचा जन्म बेल्‌रॉई (व्हर्जिनया) येथे झाला. व्हर्जिनिया विद्यापीठात शिक्षण घेऊन १८६९ मध्ये एम्. डी. पदवी मिळाल्यानंतर त्यांना न्यूयॉर्क येथील बेल्व्ह्यू हॉस्पिटलच्या वैद्यकीय शाळेत प्रवेश मिळाला व १८७० मध्ये त्यांनी तेथील एम्. डी पदवी संपादन केली. काही वर्षे न्यूयॉर्क इन्फंटस हॉस्पिटल, ब्रुकलिनमधील किंग्ज काउंटी हॉस्पिटल, ब्रुकलिन बोर्ड ऑफ हेल्थ इ. ठिकाणी नोकरी केल्यानंतर १८७५ मध्ये ते अमेरिकन सैन्यात लेफ्टनंट या हुद्यावर भरती झाले. १८७५ ते १८९३ या काळात सैन्यातील निरनिराळ्या जागी नोकरी झाल्यानंतर बढती मिळून त्यांना मेजरचा हुद्दा मिळाला आणि वॉशिंगटन येथे नव्याने स्थापन झालेल्या आर्मी मेडिकल कॉलेजात सूक्ष्मजंतुविज्ञान व निदानीय सूक्ष्मदर्शनशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याच वेळी ते लष्करी वैद्यकीय संग्रहालयाचे अभिरक्षकही होते.

इ. स. १८९८ मध्ये स्पेन व अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू होताच रीड यांनी स्वेच्छेने त्यात भाग घेण्याची तयारी दर्शविली परंतु त्याच वेळी अमेरिकन सैनिक छावण्यांतून आंत्रज्वराची (टायफॉइड ज्वराची) जोरदार साथ पसरली. तिच्या कारणांच्या चौकशी समितीवर त्यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. साथीमध्ये दररोज कित्येक नवे रोगी आढळत व मृत्युप्रमाण सतत वाढत होते. १९०४ मध्ये म्हणजे रीड यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेल्या या समितीच्या अहवालात आंत्रज्वरासंबंधीच्या अनेक बाबी उजेडात आल्या. समितीने पाण्यापेक्षा माश्या व मानवी विष्ठा रोग झाल्यावर किंवा न होताही रोगवाहक असतो, असेही समितीने सिद्ध केले. समितीने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे साथ आटोक्यात आली.

इ. स. १९०० मध्ये पीतज्वराची करणे आणि प्रसाराची पद्धती शोधण्याकरिता नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदावर रीड यांची नेमणूक झाली. क्यूबातील अमेरिकन सैन्यात या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. अमेरिकेतही प्रतिवर्षी रोग उद्‌भवून तो मिसिसिपीच्या खोऱ्यात फैलावत असे. या रोगाबद्दल काही अनुमाने काढण्यात आली होती. रीड यांनी जेव्हा या कामास प्रारंभ केला तेव्हा रोगाचे कारण अज्ञात होते. १८९७ मध्ये जुझेप्पे सानारेली या इटालियन वैद्यांनी व इतर शास्त्रज्ञांनी काही सूक्ष्मजंतू पीतज्वरास कारणीभूत असल्याचे प्रतिपादिले होते. रीड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी केलेल्या संशोधनानंतर या सूक्ष्मजंतूंचा हा सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी केलेल्या संशोधनानंतर या सूक्ष्मजंतूंचा व पीतज्वराचा संबंध नसल्याचे दिसून आले. यानंतर लवकरच हाव्हॅनामध्ये पीतज्वराची जोरदार साथ उद्‌भवली आणि रीड व त्यांच्या सहकाऱ्यांना तिकडे पाठविण्यात आले.

तेथे गेल्यानंतर त्यांनी डासांच्या रोगवाहकतेसंबंधी संशोधन सुरू केले. कार्लोस ह्वान फिनली या शास्त्रांज्ञानी स्टेगोमिया फॅसिएटा (नंतर ईडिस ईजिप्ता) असे वर्गीकरण केलेल्या जातीचे डास रोगवाहक आहेत, असा सिद्धांत १८८१ मध्येच मांडला होता. रीड व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रायोगिक (प्रयोगाकरता मुद्दाम उत्पन्न केलेल्या) बावीस पीतज्वराच्या रुग्णांचा अभ्यास केला. त्यांपैकी चौदा रुग्णांत डासांच्या चाव्यांपासून, सहांत संसर्गित रक्ताच्या अंतःक्षेपणापासून (इंजेक्शनापासून) आणि दोघांत नित्यंदित (गाळलेल्या) रक्ताच्या अंतःक्षेपणापासून रोगोत्पादन केले होते. निस्यंदित रक्तापासूनही रोग उद्‌भवतो. यावरून रोग व्हायरसजन्य असल्याचे सिद्ध झाले. सात सैनिकांना संसर्गित अंथरूण-पांघरूण वापरावयास लावून केलेल्या प्रयोगांती रोग संक्रमणी पदार्थातून फैलावत नाही, हेही सिद्ध झाले. हे प्रयोग चालू असतानाच समितीचे एक सभासद जे. डब्ल्यू. लासीर यांना संसर्गित डास चावून पीतज्वर झाला व त्यातच ते मरण पावले. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या रोगाच्या स्वानुभावाच्या नोंदींचा रीड व इतरांना रोगासंबंधी उपयुक्त माहिती मिळण्यास उपयोग झाला.

रीड व त्यांच्यां सहकाऱ्यांनी पीतज्वराचे कारण अतिसूक्ष्म सूक्ष्मजीव किंवा निस्यंदनक्षम व्हायरस असून ते मानवात विशिष्ट डासांच्या (ईडिस ईजिप्तास) चाव्यातून रक्तात प्रविष्ट होतात व रोग होतो, हे निर्विवाद सिद्ध केले. रोगाचा परिपाक काल (संसर्ग झाल्यापासून ते रोगाची लक्षणे उद्‌भवतेपर्यंतचा काल) तीन ते सहा दिवसांचा असल्याचे आणि एकदा रोग होऊन गेल्यास त्याबद्दल रोगप्रतिकारकक्षमता निर्माण होते, हेही त्यांच्या प्रयोगावरून समजले. या संशोधन प्रयोगांची एकूण परिस्थिती विशेषेकरून डासामधील रोगकारकांचा अभ्यास, हे शास्त्रीय संशोधनातील एक दैदीप्यमान उदाहरण आहे.

रीड यांच्या कार्याचे आर्थिक महत्त्वही फार मोठे होते. त्यांच्या संशोधनामुळे अमेरिका, मेक्सिको, वेस्ट इंडिज, पनामा कालवा या भागांतील पीतज्वराचे बहुशः उच्चाटन करता आले. हाव्हॅनात दीडशे वर्षे धुमाकूळ घालणाऱ्या या रोगाला केवळ तीनच महिन्यांत पायबंद घालता आला. पीतज्वर, आंत्रज्वर व इतर विषयांवरील रीड यांचे संशोधनत्मक अहवाल व नोंदी सुप्रसिद्ध आहेत. हार्व्हर्ड विद्यापीठाने त्यांना सन्माननीय एस्. ए. पदवीचा बहुमान दिला. वॉशिंग्टन येथील लष्करी रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ते वॉशिंग्टन येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं.