मर्फी, विल्यम पॅरी : (६ फेब्रुवारी १८९२− ). अमेरिकन वैद्य पांडुरोगा वरील यकृत चिकित्सेच्या शोधाकरिता त्यांना जॉर्ज हायट व्हिपलजॉर्ज रिचर्ड्‌स मायनट यांच्याबरोबर १९३४ चे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

मर्फी यांचा जन्म स्टोटन (विस्कॉन्सिन राज्य) येथे झाला. त्यांनी ऑरेगन विद्यापीठाची ही ए.बी. पदवी १९१४ मध्ये व हार्व्हर्ड विद्यापीठाची एम्‌. डी. ही पदवी १९२० मध्ये मिळविली. वैद्यकीय शिक्षण घेण्यापूर्वी ऑरेगन येथील माध्यमिक शाळेत गणित व भैतिकी हे विषय ते शिकवीत होते. १९२०−२२ या काळात त्यांनी प्रॉव्हिडन्स येथील ऱ्‍होड आयलंड रूग्णालयात काम केले. १९२३ मध्ये त्यानी ब्रुकलिन येथे खाजगी व्यवसाय सुरू केला. बॉस्टन येथील पीटर ब्रेंट ब्रिगम रूग्णालयात साहाय्यक निवासी वैद्य (१९२२−२३) व नंतर क्रमशः वैद्यकातील कनिष्ठ सहाध्यायी (१९२३−२८), सहाध्यायी (१९२८−३५), वरिष्ठ सहाध्यायी आणि रक्तविज्ञानाचे सल्लागार (१९३५−५८) म्हणून काम केल्यावर १९५८ नंतर गुणश्री वैद्य म्हणून ते काम करीत आहेत. हार्व्हर्ड विद्यापीठातही ते वैद्यक विभागात साहाय्यक (१९२३−२८), अध्यापक (१९२८ −३५), सहाध्यायी (१९३५−४८), व्याख्याते (१९४८−५८) व १९५८ नंतर गुणश्री व्याख्याते म्हणून काम करीत आहेत.

त्यांनी मधुमेह व रक्तविज्ञान या विषयांत संशोधन केले. १९२६ मध्ये मायनट व त्यांनी मिळून मारक पांडुरोग या असाध्य गणल्या गेलेल्या रोगावर यकृतयुक्त आहार घेण्याचा इलाज यशस्वी ठरल्याचे प्रसिद्ध केले. १९१८ मध्ये व्हिपल यांनी कुत्र्यावर केलेल्या प्रयोगावरूनच त्यांना ही कल्पना सुचली. रोजच्या आहारात सु. २५० ग्रॅ. यकृत खाणे रोग्यांना आवडत नसे म्हणून यकृतापासून अर्क तयार करण्याची कल्पना त्यांना सुचली. तोंडाने यकृत खाण्यास देण्यापेक्षा यकृत-अर्क शरीरात अंतःक्षेपणाद्वारे (इंजेक्शनाद्वारे) दिल्यास तो ३० ते ५० पटींनी अधिक प्रभावी असल्याचेही निदर्शनास आले. या यकृत-अर्काच्या संशोधनावरूनच पुढे १९४८ मध्ये ब१२ जीवनसत्वाच्या सुलभ चिकित्सात्मक उपयोगाचा शोध लागला.

नोबेल पारितोषिककाव्यतिरिक्त त्यांना एडिंबरो विद्यापीठाचे कॅमरन पारितेषिक (१९३०), अमेरिकन मेडिकल ॲसोसिएशनचे ब्राँझ पारितोषिक, ह्यूमेन सोसायटीचे सुवर्णपदक, गस्टेव्हस आडॉल्फस कॉलेजची मानसेवी डी.एस्सी. पदवी, विशेष कामगिरी पुरस्कार (बॉस्टन, १९६५), पीटर ब्रेंट ब्रिगम रूग्णानलयामधील ५० वर्षे सेवेचा पुरस्कार (१९७५) इ. सन्मान मिळाले.

मर्फी यांनी ॲनिमिया इन प्रॅक्टिस : पर्निशिअस ॲनिमिया (१९३९) हे पुस्तक लिहिले. शिवाय विविध नियतकालिकांतून रक्तविज्ञानावर लेख लिहिले.

भालेराव, य.त्र्यं.