रिचर्ड्‌स, थीओडोर विल्यम : (३१ जानेवारी १८६८−२ एप्रिल १९२८). अमेरिकन भौतिकीय रसायनशास्त्रज्ञ. १९१४ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. अणुभार, ऊष्मारसायनशास्त्र, विद्युत् रसायनशास्त्र इ. विषयांवरील त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे.

पेनसिल्व्हेनियामधील जर्मनटाऊन येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे आधीचे शिक्षण घरीच झाले. हॅव्हरफर्ड महाविद्यालयातून त्यांनी १८८५ मध्ये बी. एससी. पदवी मिळविली. १८८५ मध्ये पार्सन्स कुक यांच्या हाताखाली काम करण्यास ते हार्व्हर्ड विद्यापीठात गेले व तेथे त्यांनी १८८६ मध्ये पदवी मिळवली. कुक यांनी हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे अणुभार नक्की करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले. ऑक्सिजनाचा अणुभार या विषयावरील रिचर्ड्‌स यांनी एक मुद्देसूद निबंध लिहून १८८८ मध्ये पीएच. डी. पदवी मिळवली. पदवीनंतर लगेच त्यांनी बाष्पीय घनतेचा अभ्यासास सुरुवात केली. त्यांना एक वर्षांची हार्व्हर्ड प्रवासी शिष्यवृत्ती मिळावी. त्या काळात जर्मनीत संशोधनाचा अनुभव घेऊन ते हार्व्हर्डला परतले आणि १९०१ मध्ये ते अध्यापक झाले. १९१३ मध्ये ते बुलकट गिब्ज मेमोरियल या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेचे प्रकार झाले.

मूलद्रव्यांचे अणुभार निश्चित करणे हे त्यांचे प्रमुख संशोधन कार्य होते. त्याकरिता लागणारी उपकरणे त्यांनी तयार केली. नेफेलोमीटर (गढळूता माफक) हे उपकरण त्यांनी तयार केल्यामुळे अचूक वजने घेता येवू लागली. त्यांनी ऑक्सिजन, तांबे, जस्त, लोह, कोबाल्ट, बेरियम, स्ट्रँशियम इ. जवळजवळ पन्नास मूलद्रव्यांचे अणुभार निश्चित केले. या अचूक अणुभारांना ‘हार्व्हर्ड व्हॅल्यू’ हे नाव मिळाले. याच संदर्भात त्यांचे दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे किरणात्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) मूलद्रव्यांचे अणुभार काढणे, हे होय. १९१४ मध्ये त्यांनी असे सिद्ध केले की, किरणोत्सर्गी खनिजांपासून (युरेनियमापासून) मिळालेल्या शिशाचा अणुभार २०६·०० इतका व सर्वसाधारण खनिज साठ्यापासून मिळाणाऱ्या शिशाचा अणुभार २०७·२ इतका आहे म्हणजे एकाच मूलद्रव्यांचे अणुभार वेगवेगळे असू शकतात, असे सिद्ध केले. त्यातूनच (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्यांच्या प्रकारांच्या) कल्पनेला मूर्त स्वरूप आले. संशोधनाशिवाय त्यांची ऊष्मारसायनशास्त्र, विद्युत् रसायनशास्त्र इ. भौतिकीय गुणधर्मांवर रसायनशास्त्र दृष्ट्या संशोधन केले. ते संख्यात्कक विश्लेषणाचे अध्वर्यू होते.

रासायनिक मूलद्रव्याच्या अणुभारांचे अचूक निश्चितीकरण केल्याबद्दल त्यांना १९१४ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांना यूरोप व अमेरिकेतील प्रमुख विद्यापीठांनी सन्माननीय पदव्या अर्णण केल्या. १९१० मध्ये डेव्ही, १९९१ मध्ये फॅराडे, १९१२ मध्ये विलर्ड व १९१४ मध्ये फ्रँक्लिन अशी विविध पदके त्यांना मिळाली.

ते केंब्रिज येथे मृत्यू पावले.

जमदाडे, जे. वि.