रिचमंड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी व्हर्जिनिया राज्याच्या राजधानीचे ठिकाण, नदीबंदर व महत्त्वाचे व्यापारकेंद्र. लोकसंख्या २,१९,२१४ (१९८०). हे वॉशिंग्टन डी. सी. च्या दक्षिणेस १६० किमी. वर असून जेम्स नदीच्या दोन्ही काठांवर वसले आहे. जलप्रपात-रेषेच्या प्रदेशात असल्याने जेम्स नदीतून सलगपणे पश्चिमेस होणाऱ्या वाहतुकीचे हे अंतिम स्थानक आहे. हे लोगमार्ग, हवाईमार्ग व जलमार्ग यांनी देशातील अन्य शहरांशी जोडलेले आहे.

ब्रिटिश वसाहतकऱ्यांनी १६०७ मध्ये व्हर्जिनियाच्या पूर्व किनाऱ्यावरील जेम्सटाउन येथे पहिली वसाहत केली. दोनच आठवड्यांत कॅप्टन क्रिस्तोफर न्यूपोर्ट व जॉन स्मिथ यांनी जेम्स नदीतून उगमाकडे, नदीप्रवाहातील उंच प्रपातापर्यंत प्रवास केला व वसाहतीच्या दृष्टीने हे ठिकाण योग्य असल्याचे सांगितले. पुढे १६०९ मध्ये कॅप्टन फ्रान्सिस वेस्टने त्या ठिकाणी एक किल्ला बांधला. परंतु अमेरिकन इंडियनांच्या त्रासामुळे १६३७ पर्यंत येथे वसाहत होऊ शकली नाही. त्यानंतर टॉमस स्टेगने येथे एक व्यापारी ठाणे उभारले. अमेरिकन इंडियनांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्यावर १६४४ मध्ये येथे व्यापारी ठाण्याच्या संरक्षणासाठी ‘फोर्ट चार्ल्स’ हा किल्ला बांधण्यात आला व त्याभोवती तसेच नदीच्या दोन्ही काठांवर कायम वसाहत स्थापण्यात आली. त्यानंतर विल्यम बर्ड याने तंबाखू व फर यांच्या व्यापाराच्या दृष्टीने वसाहतीचा विकास केला. १७३३ मध्ये दुसऱ्या विल्यम बर्डने सांप्रतच्या शहराच्या आराखडा तयार करून इंग्लंडमधील टेम्स नदीवरील रिचमंड शहरावरून यालाही तेच नाव दिले. १७७२ मध्ये रिचमंडला शहराचा दर्जा मिळाला आणि १७७९ मध्ये व्हर्जिनियाची राजधानी विल्यम्सबर्गहून रिचमंडला हलविण्यात आली. १७७५ मध्ये अमेरिकन राज्यक्रांतीच्या सभा येथे झाल्याने ब्रिटिश सैन्याचा अधिकारी बेनडिक्ट आर्नल्डने हे शहर जाळले व १७८१ मध्ये ब्रिटिश आधिपत्याखाली आणले. त्यानंतर शहराची पुन्हा उभारणी करण्यात आली. १८०७ मध्ये एरन बर या अमेरिकनाने येथेच बंड केले. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात रिचमंड ही अमेरिकन संघराज्याची राजधानी होती. १८६२ च्या द्वीपकल्पीय संघर्षामध्ये शहराचे खूपच नुकसान झाले. त्यानंतर १८६५ मध्ये संघराज्याच्या सैन्याने माघार घेताना शहराची मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. येथील ‘रिचमंड नॅशनल बॅटलफील्ड पार्क’ ही प्रसिद्ध युद्धभूमी जतन करून ठेवण्यात आली आहे. युद्धनंतर मात्र शहरात पुन्हा सुधारणा होऊन शहराची औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या खूपच प्रगती झाली.

शहरात अनेक उद्योगधंद्यांचा विकास झाला असला, तरी तंबाखू उत्पादनांबाबत रिचमंड आग्रेसर आहे. अनेक प्रकारच्या प्रसिद्ध सिगारेटी, चिलमीसाठी लागणारी तंबाखू, यांशिवाय ॲल्युमिनिमचे पत्रे, कागद, कार्डबोर्ड, जहाजांसाठी मालवाहू पेटारे, यंत्रसामग्री इ. निर्मितीउद्योगही येथे आहेत. रसायन उद्योग, विविध प्रकारचे रंग, खते, औषधे, फर्निचर, छपाईसाठी लागणारी यंत्रसामग्री तयार करणे, अन्नप्रक्रिया इ. विविध उद्योगही येथे चालतात. शहरात रिचमंड तसेच इतर विद्यापीठे, व्हर्जिनिया वैद्यक महाविद्यालय, रिचमंड व्यवसाय मार्गदर्शन संस्था इ. उच्च शैक्षणिक सुविधाही आहेत. शहरात राज्य विधानभवन, ओल्ड स्टोन हाऊस, सेंट जॉन चर्च, संग्रहालय इ. जुन्या प्रसिद्ध वास्तू आहेत.

चौंडे, मा. ल.