राष्ट्रीय इमारत संघटना : दुसऱ्या महायुद्धानंतर राहण्यासाठी घरांचा प्रश्न सर्व जगभर बिकट झाला. भारतामध्ये वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे त्याचे स्वरूप अधिकच गंभीर झाले. कारण ग्रामीण भागात रोजगारी मिळण्याची शक्यता फार कमी असल्यामुळे तेथील जनता सतत वाढत्या प्रमाणात शहरांमध्ये येऊ लागली. या सर्वांना योग्य प्रकारची घरे पुरविणे खाजगी यंत्रणेच्या आवाक्याबाहेर होते. म्हणून नियोजन आयोगाने या प्रश्नात लक्ष घालून पंचवार्षिक योजनेमध्ये स्वस्त दरात मजबूत व टिकाऊ घरे बांधण्यासाठी या विषयात निरनिराळ्या विश्वविद्यालयांत आणि इतर संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधनाचा समन्वय घडविला जावा व त्यांनी लावलेल्या शोधांचा शासन व खाजगी क्षेत्र या दोहोंतर्फे उपयोग केला जावा, या हेतूंनी एका मध्यवर्ती संघटनेची शिफारस केली.

या शिफारशीला अनुसरून १९५४ मध्ये राष्ट्रीय इमारत संघटना प्रस्थापित झाली. तिची प्रमुख कार्ये दोन प्रकारची आहेत : (१) स्वस्त, चांगली आणि लवकर बांधकामे व्हावीत व त्याबरोबर दुर्मिळ बांधकाम साहित्य आणि मनुष्यबळ यांत काटकसर व्हावी, यासाठी उपाय सुचविणे व (२) बांधकामे आणि बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तूंसंबंधीची आकडेवारी गोळा करणे.

पहिल्या प्रकारची कार्ये पार पाडण्यासाठी संघटनेने या विषयात संशोधन करणाऱ्या संस्थांतर्फे अनेक प्रकारचे संशोधनकार्य पुरस्कृत केले. संघटनेच्या प्रायोगिक गृहनिर्माण योजनांमध्ये अशा संशोधनातील निष्कर्षांचा प्रत्यक्षात उपयोग करून बांधकामाचा खर्च कमी करण्यात संघटनेने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. संघटनेच्या प्रयोगशाळांतून तयार झालेले ५३ प्रकारचे बांधकामसाहित्य व तंत्र केंद्र आणि राज्य शासने, तसेच गृहनिर्माण मंडळे आणि इतर संस्था यांनी पुरस्कृत केलेल्या ४० प्रायोगिक प्रकल्पांत वापरले गेले आहे. संघटनेच्या आतापर्यंतच्या कार्यांचे थोडक्यात वर्णन पुढीलप्रमाणे आहे : संघटनेने (१) घरांसाठी आणि इमारतींसाठी किमान विनिर्देश तयार केले आहेत. (२) शाळा आरोग्य केंद्रे इत्यादींसारख्या पुनरावृत्ती होत राहणाऱ्या इमारतींसाठी लागणाऱ्या बांधकाम वस्तू व जागा यांकरिता प्रमाणके तयार केली आहेत (३) घरांच्या आणि इमारतींच्या बांधकामाचे शास्त्रीयीकरण व्हावे, या दृष्टीने बांधकाम उद्योगामध्ये मानकीकरण करण्यासाठी आणि इमारतींच्या समुच्चयामध्ये निरनिराळ्या उद्देशांसाठी बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये समन्वय साधावा म्हणून कार्य केले आहे. त्याचप्रमाणे खर्च कमी करण्यासाठी व घरे आणि इमारतींच्या बांधकामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी बांधकाम तंत्रात लावल्या गेलेल्या शोधांची टिपणे संघटना ठेवते, त्यांविषयी माहिती प्रसृत करते आणि पारंपरिक व नव्या प्रकारच्या बांधकाम साहित्याच्या उत्पादनास उत्तेजन देते.

संघटनेच्या वल्लभ विद्यानगर (आणंद), बंगलोर, कलकत्ता, चंडीगढ, श्रीनगर, त्रिवेंद्रम, वाराणसी, जोधपूर, सिमला, रांची, मद्रास आणि गौहाती येथे ग्रामीण गृहनिर्माण व खेड्यांचे नियोजन या विषयांत संशोधन, प्रशिक्षण व प्रसारकार्य यांसाठी १२ ग्रामीण गृहनिर्माण शाखा आहेत. ही संघटना ‘एस्कॅप’करिता संयुक्त राष्ट्रांचे विभागीय गृहनिर्माण केंद्र या स्वरूपात कार्य करते.

पहा : गृहनिवसन, कामगारांचे.

पेंढारकर, वि. गो.