उतारपेठ, पुनर्निर्यातीची : परदेशांकडून माल आयात करून तो नजीकच्या देशांना वा प्रदेशांना, जेथून पुन्हा निर्यात केला जातो, असे एखाद्या देशातील ठिकाण वा बंदर. व्यापाराची उतारपेठ होण्यासाठी ते ठिकाण इतर देशांशी दळणवळणाच्या मार्गांनी जोडलेले असले पाहिजे तेथे मालाची साठवण करण्याकरिता योग्य यंत्रणा हवी मालाची आवकजावक करण्यासाठी व्यापाराची संघटना व विक्रीकौशल्य त्या देशाजवळ असले पाहिजे. नवे जलमार्ग व भूप्रदेश ह्यांचा शोध लागल्यापासून देशादेशांतील व्यापार वाढला व त्याचबरोबर उतारपेठांना अतिशय महत्त्व आले. लंडन, रॉटरडॅम, ल हाव्र, सिंगापूर, हाँगकॉंग, बेरूत ह्या मोठ्या उतारपेठा म्हणून नावाजलेल्या आहेत. उदा., यूरोप खंडात आयात होणारा बहुतेक चहा प्रथम लंडन येथे व कॉफी प्रथम ल हाव्र (फ्रान्स) येथे आणली जाते. ज्यावेळी उत्पादक वा ग्राहक-देश परस्परांशी व्यापार करू शकत नाहीत किंवा तसे करण्यास पुरेशी व्यापारी संघटना वा वाहतूकव्यवस्था त्यांच्याजवळ नसते, तेव्हा त्यांना उतारपेठेचा अवलंब करावा लागतो. दुसऱ्या महायुद्धापर्यंत आशिया, आफ्रिका वगैरे खंडांमधील राष्ट्रांच्या आयात-निर्यातीच्या गरजा माफक असल्यामुळे परदेशी उतारपेठांद्वारे ही राष्ट्रे आपल्या वस्तूंची देवघेव करीत असत. परंतु महायुद्धोत्तर काळात ही राष्ट्रे आर्थिक विकास-कार्यात गुंतल्यामुळे त्यांचा व्यापारही वाढत आहे. सध्या सर्व देश दुसऱ्या देशांशी प्रत्यक्ष व्यापार करणे अधिक पसंत करीत असल्याने, उतारपेठांना पूर्वीचे महत्त्व राहिलेले नाही. 

बोद्रें, चिं. रा.