उप-उत्पादन : एखाद्या वस्तूच्या उत्पादनानंतर त्या प्रक्रियेतून टाकाऊ व निरुपयोगी म्हणून राहिलेल्या अवशेषांवर आणखी काही प्रक्रिया करून, ज्या वस्तूंचे उत्पादन केले जाते, त्यांना उप-उत्पादित वस्तू (बाय प्रॉडक्ट्स) असे म्हणतात. उदा., तेलशुद्धीकरण कारखान्यात पेट्रोल हे प्रमुख उत्पादन व इतर विविध रासायनिक द्रव्ये ह्या उप-उत्पादित वस्तू होत. त्याचप्रमाणे साखर कारखान्यात साखर निर्मितीनंतर टाकाऊ म्हणून राहिलेल्या मळीतून मद्यार्काचे उप-उत्पादन करता येते.

एकूण उत्पादन परिव्ययाची विभागणी प्रमुख उत्पादित वस्तू व उप उत्पादित वस्तू यांच्या दरम्यान कशी करावी, हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. उप-उत्पादित वस्तूच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, हा प्रमुख उत्पादित वस्तूच्या उत्पादन-प्रक्रियेनंतर राहिलेला टाकाऊ व निरुपयोगी माल असल्यामुळे ह्या मालाचे उप-उत्पादित वस्तूच्या उत्पादन-परिव्ययात किती मूल्य धरावे, असा प्रश्न असतो. या मालाचे मूल्य जितक्या प्रमाणात उप-उत्पादित वस्तूवर टाकता येईल, तेवढ्या प्रमाणात प्रमुख उत्पादित वस्तूवरील उत्पादन-परिव्यय कमी होईल व उप उत्पादित वस्तूचा उत्पादन-परिव्यय वाढेल. ही शक्यता बाजारात या विविध वस्तूंसाठी असणारी मागणीची तीव्रता किती आहे, यावर अवलंबून राहील. कारखानदाराची अपेक्षा साहजिकच प्रमुख उत्पादित वस्तू व उप उत्पादित वस्तू यांच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेतून एकूण उत्पादन-परिव्यय भागावा व शक्य तितका अधिक नफा सुटावा, अशीच असणार. एकूण उत्पादन परिव्ययाचे अवधान ठेवून त्या परिव्ययाची प्रमुख व उप-उत्पादित वस्तूवरील विभागणी, तो याच व्यावहारिक दृष्टिकोनातून करीत असतो.

प्रमुख उत्पादित वस्तू व उप-उत्पादित वस्तू यांच्या किंमती परस्परावलंबी असतात. प्रमुख वस्तूची मागणी वाढली असता तिची किंमत वाढते व तिचा पुरवठा वाढतो, परंतु त्याबरोबरच उप-उत्पादित वस्तूचेही उत्पादन-परिमाण वाढून तिचाही पुरवठा वाढतो आणि त्या प्रमाणात मागणी वाढलेली नसल्यामुळे उप-उत्पादित वस्तूची किंमत घसरते. उदा., ज्वारीची किंमत वाढल्यामुळे ज्वारीचे उत्पादन वाढल्यास त्याबरोबर उप-उत्पादित होणाऱ्या कडब्याला असलेली मागणी जर वाढली नाही, तर कडब्याचा पुरवठा वाढल्यामुळे त्याची किंमत घसरेल.

सुर्वे, गो. चिं.