केने, फ्रांस्वा : (४ जून १६९४–१६ डिसेंबर १७७४). जगप्रसिद्ध फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ. अर्थशास्त्रातील प्रकृतिवादी संप्रदायाचा अध्वर्यू. केने याचा जन्म पॅरिसजवळील मेते येथे झाल्याची माहिती मिळते. त्याने वैद्यकाचा अभ्यास केला व शस्त्रक्रिया विषयात प्रावीण्य मिळविले. पंधराव्या लुईचा तो वैद्यकीय सल्लागार होता. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत त्याने अर्थशास्त्रावर काहीही लिहिले नाही. त्यानंतरचेही त्याचे बहुतेक लिखाण निनावी आहे.
उत्पादन-कार्यात निसर्गाचे महत्त्व सर्वश्रेष्ठ कल्पून शेतीतील श्रम हेच तेवढे उत्पादक, असे मत त्याने व्यक्त केले. व्यक्तिस्वातंत्र्याचे आणि खाजगी मालमत्तेचे समर्थन करून त्याने अनिर्बंध अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. राष्ट्राच्या सर्व उत्पन्नाचा ओघ शेती-उत्पादनातून निर्माण होतो आणि समाजातील निरनिराळ्या वर्गांच्या हाती पडणारे उत्पन्न शेतमालावर खर्च होऊन तो ओघ शेतकऱ्यांपाशी परत येतो, ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार ओघाची (अर्थाभिसरणाची) कल्पना त्याने टॅब्लो इकॉनॉमिक (१७५८) ह्या ग्रंथात मांडली. केने हा क्रांतदर्शी होता. लेआँ व्हालरा (१८३४ –१९१०) ह्या फ्रेंच अर्थशास्त्रज्ञाने मांडलेल्या समग्र वस्तुमूल्यसिद्धांताचे व आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या उत्पादनघटक सिद्धांताचे मूळ केने याने मांडलेल्या स्थिर आर्थिक समतोल सिद्धांतात सापडते. बचत आणि गुंतवणूक यांसंबंधी त्याच्या व केन्स या सुविख्यात अर्थशास्त्रज्ञाच्या विचारांत साधर्म्य दिसून येते. केने व्हर्साय येथे मरण पावला.
संदर्भ: Hishiyama, Izumi, The Tableau Economique of Quesnay : Its Analysis, Reconstruction and Application, Kyoto, 1950.
भेण्डे, सुभाष
“