बाजार निर्देशांक : वस्तूच्या अथवा सेवेच्या मागणीशी संबंधित घटकाविषयीची प्रतिशत-रूपात किंवा अन्य गणितीय परिभाषेत व्यक्त होणारी आकडेवारी. उदा.,१९७२ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात व्यक्तिगत सेवांसाठी होणाऱ्या खर्चाचा निर्देशांक १६५ होता (आधारवर्ष १९६॰ = १॰॰). हा निर्देशांक स्थिर किंमतीत व्यक्त झालेला असल्याने, १९६॰ ते १९७२ यांदरम्यान सेवांवरील खर्चात ६५ टक्के वाढ झाल्याची माहिती त्यावरून मिळते. बाजार निर्देशांकांमुळे लोकसंख्येतील वाढ, उत्पन्न, व्यक्तिगत सेवांवर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण इ. मागणीला प्रभावित करणाऱ्या घटकांचे स्वरूप स्पष्ट होऊ शकते. ह्या घटकांचे स्वरूप विविध असते. उदा., तीन वर्षे किंवा त्यांहून अधिक जुन्या मोटारगाडयांची संख्या, हा मोटारींच्या रबरी धावांसाठी असणाऱ्या मागणीचा एक घटक, बाजार-निर्देशांकाच्या रूपाने व्यक्त होऊ शकतो. काही वेळा बाजार-निर्देशांकात एकाहून अधिक घटकांचाही विचार होतो. बाजार-निर्देशंकावरून संबंधित वस्तू किंवा सेवेसाठी असणाऱ्या संभाव्य मागणीची कल्पना येत असल्याने, भविष्यातील उत्पादन व विक्रीविषयक व्यवहारांचे नियोजन करताना त्यांची मदत होते, तसेच पूर्वकृतींचेही मूल्यमापन करता येते. योग्य बाजार-निर्देशांकांच्या साहाय्याने विक्रीचे प्रदेशवार अंश ठरविणे, तसेच विवक्षित प्रमाणात जाहिरातखर्चात केलेली वाढ, लोकसंख्येतील वाढ यांचा विक्रीवर काय परिणाम होईल, याविषयी पूर्वानुमान करणे शक्य होते. बाजार-निर्देशांकांची विश्वासार्हता त्यांच्या उपयोजनांनुसार कमीअधिक असते. पूर्वी केलेल्या कामगिरीचे मोजमाप बाजार-निर्देशांकांच्या साहाय्याने अधिक विश्वासार्हतेने होऊ शकते, परंतु त्यावरही अनेक मर्यादा पडतात. विक्रीची प्रदेशवार विभागणी दर्शविणारे बाजार-निर्देशांक हे अधिक अचूक असतात, तर त्यामानाने एकूण विक्रीचा अंदाज दर्शविणारे निर्देशांक हे कमी अचूक असतात. पूर्वानुमानाचे एक साधन म्हणून बाजार-निर्देशांकांचा वापर करावयाचा झाल्यास, गताकाळात निदर्शनास आलेल्या मागणी व तिच्या घटकांमधील संबंधांचे भविष्यकालीन बहिर्वेशन अनुस्यूत असते. बाजारनिर्देशांकातील चलांच्या भविष्यातील वर्तनाबाबतच्या चुकीच्या निर्धारणामुळे पूर्वानुमानात दोष उत्पन्न होऊ शकतात.

हातेकर, र. दे.