रावी नदी : भारताच्या पंजाब राज्यातील प्रमुख पाच नद्यांपैकी एक नदी. लांबी ७२५ किमी. जलवाहनक्षेत्र ५,९५७ चौ. किमी. रावी नदीला प्राचीन ग्रंथांत ऐरावती अथवा इरावती तसेच परुष्णी, हैमावती, हिड्राओटस (ग्रीक) इ. नावे असल्याचे दिसून येते. इरानामक सरोवरातून हिचा उगम झाल्याचा कालिका पुराणात उल्लेख आढळतो. ऋग्वेदात हिचा परुष्णी या नावाने अनेकदा उल्लेख आला असून ⇨दाशराज्ञ युद्ध याच नदीकाठी झाल्याचे म्हटले आहे. पिशेल या जर्मन भारतविद्यावंताच्या मते परुसू म्हणजे लोकरीचा बारीक भुगा व त्यावरून परुष्णी हे नाव आले असावे.

हिमाचल प्रदेश राज्यातील कांग्रा जिल्ह्याच्या ईशान्य भागात धवलधार पर्वताच्या हिमाच्छादित बारा बंगहाल श्रेणीत रावी नदी उगम पावते. हिमाचल प्रदेशात उत्तरेस पीर पंजाल व दक्षिणेस धवलधार यांच्या दरम्यान रावी नदीचे खोरे असून येथे ती साधारण पश्चिमवाहिनी आहे. चंबा जिल्ह्यात धवलधार श्रेणी ओलांडून ती नैर्ऋत्यवाहिनी होते. त्यानंतर ती हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीर तसेच जम्मू काश्मीर व पंजाब या राज्यांच्या सरहद्दींवरून पंजाबच्या उत्तर भागातील गुरदासपूर जिल्ह्यात जाते. तेथून पुढे पंजाब राज्य (भारत) व पाकिस्तान सरहद्दीवरून काही अंतर वाहत जाऊन ती पाकिस्तानात प्रवेश करते. पाकिस्तानातील लाहोरजवळून वाहत गेल्यावर पुढे अहमदपूरच्या दक्षिणेस ती चिनाब नदीला जाऊन मिळते. मंगमरी जिल्ह्यात तिला वायव्येकडून दीग ही उपनदी येऊन मिळते. दीग नदी भारताच्या जम्मू भागात उगम पावते. रावीच्या दोन्ही काठांवर तीन किमी. पर्यंत पूरमैदानांचा विस्तार आढळतो. रावी नदी शाहपूरपासून मैदानी प्रदेशात प्रवेशते, तरी तिच्या दोन्ही बाजूंना उंच कडे आहेत. सपाट मैदानी प्रदेशातही हिचा प्रवाहमार्ग बराच अरुंद व नागमोडी आहे. केवळ मुलतान जिल्ह्यात कुचलंबा ते सराई सिधू यांदरम्यानच २० किमी. लांबीचा प्रवाह अगदी सरळ आहे. येथूनच रावीपासून सिधनाई कालवा काढलेला आहे. पाकिस्तानात लोअर बारी दुआब हा एक प्रमुख कालवा या नदीपासून काढलेला आहे (१९१७). भारतात माधोपूर येथे रावीपासून अपर बारी दुआब हा एक मोठा कालवा काढलेला आहे (१७७८-७९). त्याचा भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना जलसिंचनाच्या दृष्टीने उपयोग होतो. रावी नदीच्या पाणीवाटप संदर्भात भारत आणि पाकिस्तान यांदरम्यान १९६० मध्ये एक करार झालेला आहे. हिमाचल प्रदेश राज्यात रावी नदीवर काक्री, हिब्रा, बाला, कुराण, चारोर व खुजारा हे जलविद्युतनिर्मिती प्रकल्प आहेत.

चौधरी, वसंत