राय, राधानाथ : (१८४८ – १९०८). आधुनिक ओडिया काव्याचे जनक. आधुनिक ओडिया साहित्याचे प्रवर्तन करणारी ‘श्रेष्ठ त्रयी’ म्हणून राधानाथ राय, ⇨फकीरमोहन सेनापति व ⇨मधुसूदन राव यांचा गौरवाने निर्देश केला जातो. उत्तर बलसोर जिल्ह्यातील केदारपूर ह्या गावी राधानाथांचा जन्म एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुंदर राय हे बलसोर येथील न्यायालयात मुन्शी होते. वयाच्या सोळाव्या वर्षी नुकत्याच सुरू झालेल्या कलकत्ता विद्यापीठाची प्रवेश परीक्षा (मॅट्रिक) उत्तीर्ण होणारे राधानाथ हे बलसोर जिल्ह्यातील पहिले विद्यार्थी होत. नंतर ते उच्च शिक्षणासाठी कलकत्त्यास गेले तथापि प्रकृतीच्या कारणास्तव ते पुढील अभ्यासक्रम पूर्ण करू शकले नाहीत. त्यांची प्रकृती यथातथाच होती. नंतर ते आर्ट्‌सची पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे अध्ययन आमरण चालू होते. इंग्रजी, ग्रीक, बंगाली, हिंदी, संस्कृत या भाषा-साहित्यांच्या सखोल अभ्यासाचा संस्कारही त्यांच्यावर झाला होता. नोकरीची सुरुवात त्यांनी बंगालमध्ये शिक्षण खात्यात एक शिक्षक म्हणून केली व शेवटी ते विभागीय शाळा-निरीक्षकाच्या हुद्यापर्यंत पोहोचले. नोकरीनिमित्त त्यांनी बैलगाडीतून खेड्यापाड्यांचा खूप प्रवासही केला. त्यांनी आपले बहुतांश लेखन ह्या प्रवासातच केले. आरंभी त्यांनी बंगालीत काही काव्यरचना केली तथापि नंतर ते ओडियात रचना करू लागले. ओरिसाच्या विपुल प्रवासात घडलेले व्यापक जीवनदर्शन व आलेले अनुभव यांतून त्यांना काव्यरचनेची प्रेरणा मिळाली. ग्रीक व रोमन जीवनदृष्टी, देशभक्ती व कार्यप्रवणता हे पाश्चात्त्य विचार आणि भारतीय धार्मिक भावना, करुणा व अभिजात सौंदर्यदृष्टी या सर्वांचा त्यांच्या विचारांत मनोज्ञ मिलाफ झालेला दिसतो. निसर्गाविषयी त्यांना आत्यंतिक प्रेम होते. त्यामुळेच त्यांचे नायक निसर्गाच्या अंकावर विराजमान झालेले दिसतात.

राधानाथांनी सुरुवातीस अनेक वीरगीतात्मक महाकाव्ये (बॅलड-एपिक्स) रचण्याचा प्रयोग करून पाहिला. प्रख्यात रोमन कवी ⇨ऑव्हिड (इ. स. पू. ४३ – इ. स. १८) याच्या मेटॅमॉर्फसिस ह्या अनेक पुराणकथा असलेल्या प्रख्यात काव्यग्रंथातून त्यांनी आपली कथानके घेतली. प्रेमाकरिता असीम त्याग, यौवनावर क्यूपिडची पडलेली मोहिनी अशांसारखे त्यांचे विषय होते. ओरिसाच्या पारंपरिक इतिहासाची डूबही त्यांनी या परकीय कथानकांना दिली तसेच कोनारक, भुवनेश्वर, कटक, पुरी यांसारख्या ओरिसातील प्रसिद्ध स्थळी ह्या कथा घडल्याचे दाखविले.

महायात्रा ही त्यांची सर्वोत्कृष्ट व स्वतंत्र कृती मानली जाते. महाभारतात वर्णिलेल्या पांडवांच्या स्वर्गारोहणावर-महाप्रयाणावर-हे महाकाव्य आधारलेले आहे. यात त्यांनी भारताला इतिहासाच्या प्रकाशात आणले आहे. पांडवांच्या नजरेतून राधानाथ भारताकडे पाहतात. तीस सर्गांत हे महाकाव्य रचण्याची त्यांची योजना होती तथापि दुर्दैवाने त्याचे केवळ सात सर्गच ते पूर्ण करू शकले. ह्या महाकाव्याच्या प्रमुख प्रेरणा ग्रीक काव्य होमरचे इलिअड, दान्तेची डिव्हाइन कॉमेडी आणि मिल्टनचे पॅरडाइज लॉस्ट ह्या जगप्रसिद्ध कृतींत आहेत. भारतीय इतिहासाच्या माध्यमाद्वारे आर्यांचे कलियुगात झालेले अधःपतन दाखवून करुण रसाची निष्पत्ती करणे, हे महायात्रा काव्याचे प्रधान उद्दिष्ट आहे. इस्लामी आक्रमण व त्यांची सत्ता, पानिपतची लढाई इ. प्रसंग त्यात त्यांनी गोवले. ओरिसाच्या मातीत खोलवर पाळेमुळे रुजवूनच हे महान महाकाव्य त्यांनी लिहिले. निर्यमक रचनेचे वैचित्र्य, चित्रमयी वर्णनशैली, वेधक शब्दयोजना, कल्पनेची उत्तुंग झेप, निसर्गचित्रणातील मौलिकता इ. गुणांचा कलात्मक संगम या काव्यात झालेला आहे.

त्यांच्या चिलिका ह्या ओरिसातील सुंदर सरोवरावर रचलेल्या खंडकाव्याची नायिका ‘चिल्का’ (चिलिका) सरोवराची ‘प्रकृती’च आहे आणि विविध कथा तिच्याभोवती त्यांनी केंद्रित केल्या आहेत. खंडकाव्य रचण्यात त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची झेप प्रत्ययास येते.

त्यांच्या आरंभीच्या काव्यांतील लहानसे पण नितांत सुंदर असे काव्य चंद्रभागा हे होय. याचे मूळ कथाबीज अपोलो आणि डॅफ्नी यांच्या कथेत असले, तरी त्याला अपूर्व असे भारतीय रूप देण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते. कोनारकचे सूर्यमंदिर व त्याच्या जवळून एके काळी वाहणारी चंद्रभागा नदी यांवर हे काव्य आधारलेले आहे. त्यांचे उषा काव्य मूलतः ॲटलांटा आणि तीन सुवर्ण सफरचंदे यांवर तर केदारगौरी हे काव्य पायरॅमस व थिस्बी या ग्रीक पुराणकथेतील युगुलावर बेतले असेल, तरी त्यांना संपूर्णतया भारतीय रूप त्यांनी दिले आहे.

त्यांच्या सुसंस्कृत, वरवर शांत, संयमी अशा मनात तत्कालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीबाबतचा दावानल खदखदत होता, त्याचा काव्यरूप आविष्कार त्यांच्या दरबार ह्या काव्यात झालेला दिसून येतो. मानव्याची केली गेलेली अप्रतिष्ठा, माणसावर होणारा अन्याय, त्याची पिळवणूक यांबाबतची सात्त्विक चीड ह्या काव्यात दाहक उपरोध, तीव्र निषेध व कठोर प्रहारांनी त्यांनी व्यक्त केली आहे. तत्कालीन राजे-महाराजे, ढोंगी लब्धप्रतिष्ठित यांच्यावर त्यांनी त्यात कठोर प्रहार केले आहेत. राजदरबारातील सामंत चंद्रशेखर सिंह ह्या गरीब, आजारी पण प्रतिभाशाली ज्योतिर्विदाच्या ठायी त्यांनी दरबारमध्ये आपला आदरभाव व्यक्त केला आहे.

राधानाथांनी पत्रे, प्रवासवर्णने, लघुनिबंध इ. स्वरूपाचे गद्यलेखनही केले असून त्यांच्या स्वतंत्र, पारदर्शी आणि सूक्ष्म अवलोकनशक्तीवर आधारित गद्यशैलीचे प्रतिबिंब त्यात दिसते. विवेकी हा ग्रंथ त्यांच्या गद्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. ते चांगले अनुवादकही होते. मेघदूत तसेच तुलसी रामायणाच्या काही भागाचा त्यांनी केलेला अनुवाद फारच सरस आहे.

राधानाथ यांची काव्यप्रतिभा मूलतः वर्णनपर कथा-काव्याची आहे. उत्तर मध्ययुगीन आणि आधुनिक अशा ओडिया साहित्यातील संक्रमणकाळात ते उदयास आले. आधुनिक ⇨उपेंद्र भंज म्हणून समीक्षक त्यांचा गौरवाने निर्देश करतात. राधानाथांनी स्वतः आपण उपेंद्र भंजांचे अनुयायी व चाहते असल्याचे जाहीरपणे मान्यही केले. ओडिया काव्यक्षेत्रावर त्यांचा प्रभाव सु. ५० वर्षे टिकून होता व नंतरचे अनेक कवी त्यांचे अनुकरणही करते होते. त्यांना अफाट लोकप्रियता लाभली. त्यांचे काव्य तारुण्यसुलभ अशा प्रेमाने भारलेले व भावगीतात्मक आहे. त्यातील कथानके सर्वस्वी नवीन, स्वच्छंदतावादी वळणाची असून ते स्कॉट व टेनिसनच्या काव्यासारखे आहे. परकीय कथानकांना त्यांनी ज्या कौशल्याने ओरिसाच्या भूमीत आणि संस्कृतीत रुजवले, त्यात त्यांच्या प्रतिभेचे सामर्थ्य दिसून येते. त्यांनी ओरिसातील पर्वत, नद्या, नगरे, तलाव, अरण्ये इत्यादींना आपल्या काव्याचे अविभाज्य अंग बनवून आपल्या प्रतिभास्पर्शाने चिरंतन केले. आजही अनेकांच्या ओठांवर राधानाथांच्या काव्यातील सुंदर ओळी घोळताना दिसतात. ओरिसाचा श्रेष्ठ राष्ट्रीय कवी म्हणून त्याकाळी त्यांचा गौरव करण्यात आला.

राधानाथ ग्रंथावली (१९०२ दुसरी आवृ. १९१३) मध्ये त्यांच्या सर्व रचना संकलित करून प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यांत मेघदूत बेणिसंहार इ. अनुवाद केदारगौरी, चंद्रभागा, नंदिकेश्वरी, उमा, पार्बती, चिलिका, महायात्रा (ओडियातील आद्य निर्यमक रचना), ययातिकेदारी, तुलसी-स्तबक, उर्वशी, दरबार, दशरथवियोग, सावित्रीचरित, महेंद्रगिरी इ. काव्यरचना तसेच इतर स्फुट रचनांचाही अंतर्भाव आहे.

राधानाथांचे चरित्र तसेच त्यांच्या साहित्याची चिकित्सा असलेला सु. १,००० पृष्ठांचा राधानाथ जीबनी हा ग्रंथ दुर्गाचरण राय यांनी रचून १९४१ मध्ये प्रकाशित केला आहे. ओडियातील आधुनिक काव्याचे प्रवर्तन करणारा युगप्रवर्तक कवी, म्हणून राधानाथांचे ओडिया साहित्यातील स्थान चिरंतन महत्त्वाचे आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)