पटनाइक, राजकिशोर : (? १९१२– ). आधुनिक ओडिया कथा-कादंबरीकार. जन्म कलकत्ता येथे. शिक्षण पूर्ण केल्यावर ते कटक येथे स्थायिक होऊन वकिली करू लागले. वृत्तपत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या भगिनी बसंतकुमारी पटनाइक यांनीही कथा-कादंबरीलेखन करून ओडिया साहित्य समृद्ध केले. ह्या दोघांच्याही लेखनात प्रभावी व्यक्तिनिष्ठा व आकर्षक स्वतंत्र शैलीचा प्रत्यय येतो. बसंतकुमारी यांच्या लेखनात स्त्रीसुलभ कोमलता, कौटुंबिक जीवनातील बारीकसारीक तपशील व सहजसुलभ अभिव्यक्ती हे गुणविशेष आढळतात. त्यांच्या अमद बाट (म. शी. अनवट वाट) व सभ्यतार साज (१९५१) ह्या कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आणि लोकप्रिय आहेत. त्यांच्या अमद बाटचे नाट्यरूपांतरही झाले आहे.

राजकिशोरांनी विपुल कथा-कादंबरीलेखन केले. त्यांचे हे लेखन पारंपरिक स्वरूपाचे असून ते अत्यंत लोकप्रिय ठरले. तुटा पथर (१९४८) व पथुकि (१९५२) हे कथासंग्रह आणि असरंति (दुसरी आवृ. १९४५), पंजुरी पखी (१९४६), स्वप्न कुहुडी (१९४७), निशाण खुंट (१९५१), राजमहल (१९५१), स्मृतिर मसाणि (१९५१) इ. त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या होत.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)