पटनाइक, गोपालकृष्ण : (१७८२–१८६२). ओरिसातील एक वैष्णव संत व कवी. त्याचा जन्म गंजाम जिल्ह्यातील पर्लाकिमिडी या गावी एका फडणवीस कुटुंबात झाला. आजही त्यावे वंशज या गावी राहत आहेत. गोपालकृष्ण पटनाइकाचे ज्या घरात वास्तव्य होते, ते घर स्मारकवास्तू बनले आहे. तेथे नियमितपणे त्याचे वंशज व अनुयायी उपासना करतात. लहानपणापासूनच तो ओडिया भाषेत गीतरचना करू लागला. संगीताचेही त्याला चांगले ज्ञान होते. श्रेष्ठ गीतकार व वैष्णव संत म्हणून त्याला अनुयायांत आदराचे स्थान प्राप्त झाले. कृष्णभक्तीकडे आकृष्ट होऊन त्याने राधाकृष्ण प्रेमावर तसेच कृष्णाच्या बाललीलांवर शेकडो गीते रचली. त्याची ही गीते रागरागिणींत बांधलेली आहेत. त्याच्या गीतांत शृंगारिकता कमी आहे पण त्यांतील भावगीतपरता व संवेदनात्मकता विशेष लक्षणीय आहे. प्रेमभावनेच्या विविध छटा व बारकावे त्याने मोठ्या कलात्मकतेने व मोजक्या शब्दांत चित्रित केले आहेत. यशोदेच्या हृदयातील वात्सल्यभावनेचा हृद्य आविष्कारही त्यांत पहावयास मिळतो. त्याने शेकडो गीते रचली होती तथापि त्यांतील फारच थोडी आज उपलब्ध आहेत. पारंपरिक ओडिया गीतरचनेत अभावाने जाणवणारी उत्स्फूर्तता त्याच्या ह्या गीतांत प्रकर्षाने प्रत्ययास येते. भावनेची खोली, भाषेचे माधुर्य, भावाभिव्यक्तीची उत्कटता व भावानुकूल संगीत यांमुळे त्याची गीते ओरिसात लोकप्रिय आहेत. ⇨ कविसूर्य बलदेव रथ (१७८९–१८४५) व ⇨ अभिमन्यू सामंतसिंहार (१७५७-१८०७) ह्या ओरिसातील वैष्णव कवींच्या रचनेशीच त्याच्या रचनेची तुलना होऊ शकते. म्हणूनच वैष्णव साहित्यात एक श्रेष्ठ कवी म्हणून गोपालकृष्णाचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)