पंचसखा : ओडिया साहित्याच्या इतिहासात पंधराव्या-सोळाव्या शतकांत होऊन गेलेल्या पाच श्रेष्ठ वैष्णव कवींना अनुलक्षून ‘पंचसखा’ वा ‘पंचशाखा’ वा ‘पंचमहापुरुष’ ही संज्ञा आहे. ह्या पाचही कवींच्या विचारांत व भक्तिविषयक कल्पनेत इतके साम्य होते, की ते कवी एकाच महावृक्षाच्या पाच शाखा असल्याचे लोकांना वाटे. म्हणूनच त्यांना पंचशाखा वा पंचसखा असे नाव प्राप्त झाले. ओरिसातील वैष्णव धर्माचे ते श्रेष्ठ अघ्वर्यू असल्यामुळे पंचमहापुरुष म्हणूनही ते ओळखले जातात. ह्या पाच कवींची नावे अशी : बलराम दास (सु. १४७०–सु. १५४०), जगन्नाथ दास (सु. १४८६– ?), यशोवंत दास (सु. १४९२– ?), अनंत दास (सु. १४९३– ?) अणि अच्युतानंद दास (सु. १४८९–सु. १५६८). हे पाचही जण सिद्धयोगी होते. आपल्या प्रतिभासंपन्न कवित्वाने त्यांनी ओडिया साहित्यात मोलाची भर घातली. चैतन्य महाप्रभू ओरिसात पुरी येथे आले असताना ह्या पाचजणांनी त्यांच्याशी सख्य करून त्यांचे अनुयायित्व पतकरले. चैतन्यांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. सूर्यवंशीय राजा प्रतापरुद्रदेव (कार. १४९५ – १५४०)याने ह्या पाचही जणांची कडक परीक्षा घेतली व त्या परीक्षेस उतरल्यावर त्यांचा यथोचित सन्मानही केला. ह्या पाच कवींनी ओडिया भाषेत विपुल व दर्जेदार काव्यनिर्मिती केली. वैष्णव धर्मास त्यांनी योग व तंत्रमार्गाची जोड दिली. त्यांचा वैष्णव धर्म ज्ञानमिश्रित व योगप्रधान आहे. तो उदार, उदात्त व जातिपंथभेदातीत आहे. सोळाव्या शतकात ओरिसावर वैष्णव धर्म, बौद्ध धर्म (महायान पंथ), नाथ संप्रदाय, योगमार्ग व तंत्रमार्ग यांचा प्रभाव होता. पंचसखाप्रणीत वैष्णव धर्मात त्यातील महत्त्वाच्या विचारांचा समन्वय साधण्यात आला. आजही ओरिसातील वैष्णव धर्मात योग व तंत्रमिश्रित विचारांचा प्रवाह अखंडपणे वाहताना दिसतो.

बलराम दास, जगन्नाथ दास, यशोवंत दास, अनंत दास व अच्युतानंद दास हे अनुक्रमे रामतारक मंत्र, षोडशनाम वा बत्तीस अक्षर मंत्र, पंचाक्षर मंत्र, एकाक्षर मंत्र व अष्टाक्षर मंत्राचे उपासक होते. ह्या पाचही कवींची विपुल ग्रंथरचना असून त्यांतील काही प्रकाशित, काही अप्रकाशित तर काही अनुपलब्ध आहे. ⇨ बलराम दासाचे जगमोहन रामायण व भावसमुद्र हे ग्रंथ, ⇨ जगन्नाथ दासाचे ओडिया भागवत आणि ⇨ अच्युतानंद दासाचे हरिवंश, कैवर्त गीता, गोपालांक उगाल इ. ग्रंथ विशेष महत्त्वाचे असून ते लोकप्रियही आहेत. या तिघांची इतरही बरीच ग्रंथरचना उपलब्ध आहे. बलराम दासाच्या जगमोहन रामायणाचा प्रभाव ओडिया काव्यावर विशेष पडला व नंतरच्या अनेक कवींनी त्याचे अनुकरण केले.

यशोवंत दास हा संस्कृतचा मोठा पंडित होता. हा महान योगी व सिद्धपुरुष होता. त्याने स्वरोदय ह्या मूळ संस्कृत ग्रंथाचा ओडिया भाषेत अनुवाद केला. त्याच्या चरित्राशी अनेक व्याख्यायिका आणि चमत्कार निगडित आहेत. चैतन्य महाप्रभूंपासून त्याने दीक्षा घेतली होती व पुरीच्या जगन्नाथाचा तो परमभक्त होता. त्याचा चौराशी आज्ञा हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. यांशिवाय त्याने प्रेमभक्ती, ब्रह्मगीता, गीतगोविंदचंद्र, गीताराम, काही मालिका इ. ग्रंथ लिहिले. गोविंदचंद्रावरील त्याने लिहिलेली गीते नाथजोगी अद्यापही आवडीने गातात, प्रेमभक्ती व ब्रह्मगीता या ग्रंथांत योगमाहात्म्य वर्णिले आहे. इतर ग्रंथांत प्रामुख्याने भजने असून ती फार लोकप्रिय आहेत.

अनंत दासाचा जन्म पुरी जिल्ह्यात बालेपाटण नावाच्या गावी झाला. मातापिता गौरी व कपिल. अडनाव महांती. याच्याही नावाशी अनेक आख्यायिका व चमत्कार निगडित आहेत. त्याने अनेक भजने, चौतिसा व ‘गल्प’ म्हणजे लहान गोष्टी लिहिल्या असून त्या ओरिसात प्रचलित आहेत. याशिवाय त्याने उदय बाखर, छत बाखर, टीका बाखर, आगत चुंबक मालिका इ. ग्रंथ रचले. त्याचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ हेतूदय भागवत हा असून त्यात त्याचे तात्त्विक विचार आढळतात.

सुर्वे, भा. ग.