ब्रजनाथ बडनेजा : (१७३०-१७९५). प्रख्यात ओडिया कवी व आद्य विनोदी गद्यलेखक. त्याचा जन्म एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. केओंझार व घेनकानाल येथील राजघराण्यांच्या आश्रयास तो होता. त्याचे ओडियाव्यतिरिक्त इतरही चारपाच प्रादेशिक भाषांवर चांगले प्रभुत्व होते व साहित्यप्रमाणेच इतर कलांतही तो पारंगत होता.

ओडिया भाषेत त्याने अंबिका-विलास, समर-तरंग, श्यामा-रासोत्सव, केलिकलानिधी, विचक्षणा, राजांक छलोक्ति इ. काव्यग्रंथ चतुर-विनोद हा गद्य कथाग्रंथ तसेच हिंदीत गुंडिचाविजय हा काव्यग्रंथ लिहिला. त्याचे लहानमोठे एकूण तेरा ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांपैकी चतुर-विनोद हा सर्वांत महत्त्वाचा मानला जातो.

ओडियात गद्यकथा सर्वप्रथम लिहिण्याचा मान ब्रजनाथाकडेच जातो. नीतिबोधाबरोबरच मनोरंजन करणे हा हेतू त्याच्या चतुर-विनोदमध्ये दिसून येतो. राजा व त्याचे दरबारी लोक यांचे मनोरंजन करण्यासाठी ‘गल्पसागर’ (कथासागर) या नावाने ओळखला जाणारा कथाकारांचा एक वर्ग त्या काळी अस्तित्वात होता. शृंगारिक आशय व नाट्यात्मक अभिव्यक्ती त्याच्या कथांत असे. ब्रजनाथाने ह्या गल्पसागरशैलीचा आपल्या चतुर-विनोदमध्ये चांगलाच उपयोग करून घेतला. त्याची शैली प्रायः व्यंगात्मक-उपहासात्मक व विनोदी आहे. सूक्ष्म निरीक्षण व मानवी स्वभावाचे तसेच दरबारी रीतिरिवाजांचे अचूक ज्ञान यांचा प्रत्यय त्याच्या ह्या ग्रंथात येतो. राजे व त्यांचे पुरोहित यांचाही त्यात पुरेपुर उपहास केलेला आढळतो. हा ग्रंथ हास, रस, नीती व प्रीती अशा चार विनोदांत (भागांत) विभागला असून प्रत्येक भागात अनेक कथा गोवलेल्या आहेत. ह्या सर्वच कथांना एक व्यापक अशा कथाचौकट आहे. ह्या चौकटीचे कथासूत्र असे : एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या तरूण मुलीवर एका राजपुत्राचे प्रेम असते. ती मुलगीही राजपुत्रास प्रतिसाद देते व एका रात्री त्याला गुप्तपणे घरी बोलावते. पण राजपुत्र येतो, त्यावेळी ती एका धार्मिक व्रतात गुंतलेली असते आणि त्या निमित्ताने तिला जागरण करावे लागते. राजपुत्रही नाइलाजाने ह्या जागरणात सहभागी होतो व तिला जागे ठेवण्यासाठी रात्रभर एकेक कथा सांगत असतो. ह्या कथा प्रायः शृंगारिक आहेत. त्यांतील भाषा जनभाषेसारखी असल्याने त्या विशेष लोकप्रिय आहेत. उत्कंठा, अनपेक्षित शेवट, वास्तव समाजदर्शन इ. दृष्टींनी त्या कथा वैशिष्टयपूर्ण आहेत.

  अंबिका-विलास हे शिव-पार्वतीविवाहावरील सर्गबद्ध महाकाव्य होय तथापि ह्या काव्याचे कर्तृत्व विवाद्य मानले जाते. केओंझारचा राजा वीरभद्र भंज याने ते रचल्याची भणिता त्यात असल्याने ते ह्या राजाचे असावे असे काही अभ्यासक मानतात परंतु काव्यांतर्गत पुराव्यावरून ते ब्रजनाथाचेच असल्याचे मायाधर मानसिंहासारखे अभ्यासक मानतात. कारण आश्रयदात्याच्या नावे आपली कृती उल्लेखण्याची पद्धत त्या काळी रूढ होती. पूर्वोत्तर ओडिया काव्यांहून हे काव्य त्यातील सामाजिक वास्तवाचे दर्शन व त्यामागील कथेचा पुरोगामी दृष्टीकन याबाबतींत वैशिष्टयपूर्ण आहे.

समर-तरंग हे आकारने लहान परंतु गुणांनी श्रेष्ठ असे ऐतिहासिक युद्धकाव्य असून त्यात कटकचे मराठेराजे, नागपूरकर खंडोजी ऊर्फ चिमणाबापू भोसले व धेनकानालचा राजा यांच्यातील युद्धाचे वर्णन आढळते. धेनकानालचा राजा त्रिलोचन महेंद्र बहाद्दूर हा ह्या  ह्या लढाईत राजास हार खावी लागून आपली राजधानीही सोडावी लागली होती. कवीने डावपेचाचा एक भाग म्हणून ही घटना काव्यात वर्णिली आहे. काव्यातील लढायांची तसेच पायदळ,घोडदळ, तोफखाना, सैनिकांच्या भावभावना, हृदयद्रावक संहार व विध्वंस इत्यादींची वर्णने परिणामकारक उतरली आहेत.

ज्या काळात इतर कवी राधा-कृष्णांची सांकेतीक साचेबंद प्रेमकविता लिहिण्यात मश्गूल होते, तेव्हा ब्रजनाथाने परंपरा मोडून समकालीन युद्ध-प्रसंगावर आपले वास्तववादी काव्य लिहिले हे त्याचे वैशिष्टय. उपेंद्र भंज व त्याच्या सहकाऱ्यांनी ज्या वृत्तांत आपली राधा-कृष्णाची प्रेमकाव्ये लिहिली, त्याच वृत्तांत आपली समर्थपणे सरस असे हे युद्धकाव्य ब्रजनाथाने लिहिले.

मायाधार मानसिंह यांच्या मते केवळ ब्रजनाथाच्या काळातच नव्हे, तर एकूण ओडिया साहित्यातही ब्रजनाथाची निर्मिती वैशिष्टयपूर्ण वा पुरोगामी आहे. समीक्षकांकडून मात्र आजवर ब्रजनाथाची उपेक्षाच झाली. अलीकडे मात्र त्याच्या साहित्याचे यथोचित पुनर्मूल्यमापन होत आहे. आधुनिकतेची बीजे त्याच्या साहित्यात पुरेपुर असल्याचे दिसून येते. त्याने विविध व मौलिक शैली यशस्वीपणे हाताळल्या. ओडिया साहित्यात त्याला महत्त्वपूर्ण व मानाचे स्थान आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)