राय, रामशंकर : (१८५६ – १९३१). आधुनिक ओडिया-नाटक कादंबरीचे जनक. उत्कलदीपिका या सुप्रसिद्ध वृत्तपत्राच्या संपादकांचे-गौरीशंकर राय यांचे-हे धाकटे बंधू. शिक्षण आर्ट्‌सची पहिली परीक्षा उत्तीर्ण. यांनी काही काळ शिक्षकी पेशा स्वीकारला होता. नंतर थोडे दिवस सरकारी कार्यालयातही काम केले. मात्र त्यांचे त्यापुढील आयुष्य वकिली आणि लेखन यांतच व्यतीत झाले.

रामशंकर राय यांनी उत्कलमधुप या मासिकातून सौदामिनी (अपूर्ण कादंबरी) आणि प्रेमतरी (इंग्रजी कवितांचे अनुवाद) प्रसिद्ध केले होते. प्रथमतः तीन कादंबऱ्या लिहिण्याच्या प्रयत्नांत त्यांच्या हातून बिबासिनी ही एकच कादंबरी पूर्ण होऊ शकली. कादंबरीपेक्षा नाटकांच्या माध्यमातून मात्र त्यांना उत्तम यश मिळाले.

रामशंकरांनी आपले पहिले नाटक कांची-काबेरी (१८८०) प्रसिद्ध केले. तेव्हापासून साहित्यातील एक प्रकार म्हणूनच नव्हे, तर ओरिसातील राष्ट्रीय जीवनाचा एक भाग म्हणून नाटकास मानाचे स्थान प्राप्त झाले. त्या काळी ओरिसात ज्या बंगाली नाटकमंडळ्या बंगाली भाषेतून नाटके सादर करीत असत त्यांना आव्हान म्हणून ओडिया लेखकांनी नाटके लिहिण्यास सुरुवात केली. जनजागृती हा देखील त्यातील एक सुप्त घटक होताच. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, विनोदी, उपहासप्रचुर, अद्भुतरम्य इ. नानाविध विषय कथानके त्यांनी आपल्या नाटकांतून हाताळली. निर्यमक पद्य तसेच गद्य यांचा प्रभावी वापर त्यांनी आपल्या नाटकांद्वारे प्रथमच केला.

त्यांचे पहिले नाटक कांची -काबेरी त्यांनी ओरिसाच्या इतिहासातील एका अद्भुतरम्य गौण प्रसंगाचा उपयोग करून लिहिले. हे नाटक वाङ्मयीन गुणवत्तेचा एक उत्कृष्ट नमुना असून नाट्यशास्त्राच्या सगळ्या नियमांत ते बसते. जनमानसावर या नाट्यकृतीची पकड जवळजवळ तीन दशके होती. त्यांच्या ३० साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या असून ज्या प्रतिकूल परिस्थितीत आणि नवनवीन प्रयोग करून त्यांनी हे विपुल लेखन केले, ते पाहून आजही आश्चर्य वाटते. अनेक नाटके रंगभूमीवर आणून ओडिया रंगभूमीला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. केवळ करमणुकीचे साधन म्हणूनच नव्हे, तर सामाजिक सुधारणेचे आणि राष्ट्रीय भावना जागृत करण्याचे एक प्रभावी साधन म्हणून त्यांनी रंगभूमीचा वापर केला. ओरिसाच्या उज्वल इतिहासावर आधारित नाटके ही त्यांतील स्फूर्तिप्रद दर्शनाने लोकप्रिय ठरली.

रामशंकर ग्रंथाबली (१९३०) मध्ये त्यांच्या बऱ्याचशा साहित्यकृती संकलित करून प्रकाशित करण्यात आल्या. त्यांत कलिकाल (१९०१), युगधर्म (१९०२), कांचनमाली (१९०४), चैतन्यलीला (१९०६), लीलावती (१९१२), बदलोक (१९१३), राम वनवास नाटक (१९१४), विश्वयज्ञ (१९१६), रामाभिषेक (१९१७) इत्यादींचा समावेश आहे.

हिंदू धर्मपरंपरेत शिरलेल्या अनिष्ट रूढी व प्रथा दूर केल्या पाहिजेत, याची जाणीवही त्यांना होती. म्हणूनच त्यांनी ‘सनातन धर्म संरक्षिणी सभे’चे नेतृत्व स्वीकारले. त्या द्वारे हिंदू धर्मात सुधारणा करण्याकडे त्यांचा कल होता. काही उपनिषदांचे भाषांतर आणि धार्मिक निबंध यांवरून त्यांचे धर्मविषयक विचार स्पष्ट होतात.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) कापडी, सुलभा (म.)