उपेंद्र भंज: (अठरावे शतक). ओडिया साहित्यातील एक थोर कवी. संस्कृत साहित्याच्या उत्तरकाळातील श्रीहर्ष, भारवी, माघ इ. कवींप्रमाणेच त्याने काव्याच्या आत्म्यापेक्षा शैली, प्रतिमा इ. रंगारूपालाच अधिक महत्त्व दिले. त्याने बावन्न ग्रंथ लिहिले असून त्यांपैकी वैदेहिश विलास, कोटिब्रह्मांड सुंदरी, लावण्यवति, प्रेमसुधानिधी  हे उल्लेखनीय होत. वैदेहिश विलास  या बृहद महाकाव्याच्या प्रत्येक ओळीची सुरुवात ह्या अक्षराने होते. तसेच प्रत्येक सर्गातील एकूण श्लोकसंख्येच्या उच्चारातही असेल, अशी श्लोकसंख्या त्याने ठेवली, हे त्याचे वैशिष्ट्य होय. कुमारसंभवाचा आदर्श पुढे ठेवून प्रस्तुत महाकाव्यात त्याने राम-सीता ह्या इष्ट देवतांची चरित्रे मोठ्या कलात्मकरीत्या रेखाटली आहेत.

त्याच्या इतर ग्रंथांत काल्पनिक प्रेमकथा असून त्या त्याने श्रवणमधुर व लोकप्रिय छंदात लिहिल्या आहेत. आपल्या अद्भुतरम्य काव्यासाठी त्याने राजपुत्र-राजकन्यांना नायक-नायिका केले असून मानवी जीवनातील प्रणयाचा भाग त्यात सुस्पष्टपणे चित्रित केला आहे. रीती काव्याचा तो उद्गाता नसूनही, त्याला रीतीकाव्याचा जनक मानले जाते. संस्कृत काव्यात रचली गेली नसतील एवढी चित्रकाव्ये त्याने रचली आहेत. त्याने आपले स्वतःचे काव्यशास्त्र व स्वतःची अशी खास शब्दकळा निर्माण केली आहे. त्याच्या काव्याचे तंत्र व घाट यांचे भक्तिभावाने अनुकरण करणारे कवी आजही ओडिया साहित्यात आढळतात म्हणूनच ओडिया साहित्यात आजही त्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) शिरोडकर, द. स. (म.)