मिश्र, गोदावरीश : (२६ ऑक्टोबर १८८६–२६ जुलै १९५६). प्रख्यात ओडिया कवी, नाटककार व देशभक्त. ‘पंडितगोदावरीश’ ह्या नावाने ते ओरिसात प्रख्यात आहेत.पुरी जिल्ह्यातील बनपूरजवळील श्रीनिवासपूर ह्या गावी जन्म. बनपूर व पुरी येथे आरंभीचे शिक्षण घेतल्यावर १९१० मध्ये कटक येथून त्यांनी पदवी घेतली व १९१२ मध्ये अर्थशास्त्र घेऊन कलकत्ता विद्यापीठातून ते एम्. ए. झाले. नंतर त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला पण परीक्षा दिली नाही. १९१६ मध्ये ते बि.टी. झाले. एम्.ए. झाल्यावर ते ⇨ गोपबंधू दास (१८७७–१९२८) यांनी पुरीजवळ स्थापन केलेल्या राष्ट्रीय बाण्याच्या प्रख्यात ‘सत्यवादी विद्यालया’ त अध्यापक म्हणून मासिक केवळ ३० रु. पगारावर रुजू झाले. त्यांच्यावर लहानपणी सशस्त्र क्रांतिकारक चळवळीचा व नंतर गोपबंधू आणि महात्मा गांधींचा प्रभाव पडला. राष्ट्रीय तसेच सामाजिक सुधारणेच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी इंग्लंड, अमेरिकेस जाण्याच्या संधी तर नाकारल्याच पण उपजिल्हाधिकारी म्हणून देऊ केलेले पदही नाकारून सत्यवादी विद्यालयात ते अध्यापन करू लागले. ओरिसा काँग्रेसचे ते एक प्रमुख सदस्य होते तथापि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काँग्रेसचा त्याग करून ओरिसाच्या युद्धकालीन मंत्रिमंडळात ते शिक्षण व अर्थखात्याचे मंत्री म्हणून सहभागी झाले (१९४१–४४). नंतर ते गणतंत्र परिषदेचे नेते बनले. सुमारे ५० वर्षे ओरिसातील विविध संस्थांशी ते जवळून संबंधित होते. १९२०–३० ह्या काळात ते ओरिसाचे एक श्रेष्ठ नेते बनले. समाज ह्या दैनिकाचे ते संपादक होते. त्यांनी गांधीजींचा संदेश त्याद्वारे ओरिसाच्या कानाकोपऱ्यात पसरविला. १९२१ मध्ये ते असहकार चळवळीत सहभागी झाले. १९२४ मध्ये बिहार-ओरिसाच्या विधानपरिषदेवर बनपूर मतदार संघातून ते निवडले गेले. त्यांच्याच प्रयत्नाने ओरिसातील उत्कल विद्यापीठाची स्थापना झाली. प्रथम त्यांनी ‘जन संघ’ पक्षात व नंतर ‘गणतंत्र’ पक्षात प्रवेश केला (१९५५). १९५५ मध्ये त्यांना उत्कल विद्यापीठाने सन्मान्य डी.लिट्. देऊन त्यांचा गौरव केला. १९३४ मध्ये ते लोकमुख पत्राचे संपादक होते. गाढे विद्वान आणि अत्यंत प्रभावी वक्ते म्हणून त्यांचा लौकिक होता. ओडियाशिवाय बंगाली व इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते व ह्या भाषांतील साहित्याचाही त्यांचा सखोल व्यासंग होता.

सामाजिक सुधारणा, स्त्रीशिक्षण, सर्व जातिधर्मीयांचे सहभोजन यांचा त्यांनी सक्रिय पुरस्कार केला. १९२७ मध्ये ओरिसाच्या दौऱ्यावर असताना गांधीजींचे वास्तव्य दोन दिवस गोदावरीश मिश्रांच्या घरी होते.

गोदावरीश यांनी काव्य, भावगीते,नाटक, कथा, कादंबरी, निबंध, चरित्र, आत्मचरित्र इ. प्रकारांत लेखन करून एकवीसवर ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ऐतिहासिक विषयांवरील वीरकाव्ये रचणारे कवी म्हणून ओडिया साहित्यात त्यांना अत्यंत मानाचे स्थान आहे. आलेखिका हे ह्यांचे वीरकाव्य सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यांची भावगीतात्मक कविता साधी व विचारप्रेरक आहे. सामान्य माणसाच्या सुखदुःखास तीत त्यांनी वाचा फोडली आहे. आलेखिका (दुसरी आवृ. १९५२), चयन (दुसरी आवृ.१९५३), चयनिका (१९१७), कलिका (१९२१), किसलय (१९२२), गीतायन (१९५३) ही त्यांची काव्ये व काव्यसंग्रह या दृष्टीने विशेष उल्लेखनीय होत. पुरुषोत्तमदेव (१९१७) आणि मुकुंददेव (१९१७) ही त्यांची त्या काळी ओरिसात अत्यंत गाजलेली अशी ऐतिहासिक नाटके होत. त्यांच्या सर्वच गद्य-पद्य लेखनाची प्रेरणा राष्ट्रीय असून ती त्यांच्या सर्वच लेखनातून आविष्कृत झाली आहे. नेपोलियन (१९२६) हे चरित्र आणि अभागिनी (दुसरी आवृ. १९४९), महाभारत पंचबीर (१९३०), बंदिर माया (१९३५), पिलांक कहानी (१९४६), निर्वासित (१९५०) इ. त्यांच्या कादंबऱ्या व कथासंग्रह होत. त्यांच्या आत्मचरित्रास साहित्य अकादेमीचा पुरस्कार मरणोत्तर प्राप्त झाला आहे (१९६२). त्यांचे सर्वच लेखन संकलित करून गोदावरीशग्रंथावलि नावाने चार खंडांत प्रसिद्ध झाले आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)