बल, नंदकिशोर: (२२ जुलै १८७५- २ जुलै १९२८). एक श्रेष्ठ ओडिया कवी, कादंबरीकार व समीक्षक. जन्म कटक जिल्ह्यातील कुसुपूर या खेडेगावी एका क्षत्रिय कुटुंबात. वडिलांचे नाव भजनानंद जेना व आईचे नाव हिरण्मयी देवी. नंदकिशोर यांचे मूळ नाव रसनंद जेना परंतु त्यांच्या आत्याने त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव नंदकिशोर बल झाले. आरंभीचे शिक्षण कुसुपूर येथे. कटक येथील टाउन स्कूल (सध्याचे भक्तमधू विद्यापीठ) मधून ते प्रवेश परीक्षा पास झाले (१८९७). कटक येथीलच रेव्हेनशॉ कॉलेजमधून ते बी. ए. व कलकत्ता येथील डेव्हिड हेर ट्रेनिंग कॉलेजमधून ते बी. टी झाले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच कोकिळादेवींशी त्यांचा विवाह झाला.

नंदकिशोर यांनी कटक, संबळपूर, बलसोर इ. ठिकाणी शिक्षकाची नोकरी केली. नंतर ते साहाय्यक शाळानिरीक्षक म्हणून काम पाहू लागले व १९०९ मध्ये त्यांची पुरी जिल्ह्याचे शाळानिरीक्षक म्हणून नेमणूक झाली. शेवटी ते बलसोर जिल्हा शाळेचे मुख्याध्यापक झाले व १९२७ मध्ये तेथून सेवानिवृत्त झाले.

नंदकिशोर हे एक थोर समाजसुधारकही होते. समकालीन विद्वान, लेखक, कवी, थोर देशभक्त, शिक्षणतज्ञ यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोनही व्यापक, राष्ट्रीय बनला. त्यांच्या व्यासंगाचे क्षेत्र व्यापक होते. बायबल तसेच शेक्सपिअर, शेली, कीट्स, बायरन, ड्रायडन, पोपप्रभृतींच्या इंग्रजी साहित्याचे परिशीलन त्यांनी केले होते. ते विधवाविवाहाचे पुरस्कर्ते आणि बालविवाहाचे कडवे विरोधक होते. जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढींची त्यांना मनस्वी चीड होती आणि याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यातही उमटलेले दिसते. जातिभेद भारताच्या अवनतीस कारणीभूत असल्याचे त्यांनी आपल्या दीर्घकाव्यांत सूचित केलेले आहे. प्रसिद्ध ओडिया कवी ⇨ मधुसूदन राव यांच्या प्रभावाने त्यांनी ‘ब्राह्मो धर्म’ स्वीकारला. शाळा व महाविद्यालयांतून कोणता अभ्यासक्रम नियोजित करावा, याबाबतच्या चर्चेसाठी नंदकिशोर यांना त्यावेळच्या ओरिसा-बिहारच्या राज्यपालांनी निमंत्रित केले होते. त्यावेळी प्राचीन ओडिया साहित्याचा अभ्यासक्रम त्यांनी सुचविला व त्याला मान्यताही मिळाली. १९२४ मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारने ‘राय साहेब’ हा किताब दिला.

नंदकिशोर हे ‘पल्ली’ कवी म्हणजे ग्रामीण कवी म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. ओरिसाच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण, लोकगीतांच्या लयीत व चालीवर रचलेली भावकाव्ये, त्यांतून होणारे लोकसंस्कृतीचे मनोहर दर्शन ही त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्टये होत. त्यांचे पुढील काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय होत : निरजहरिणी (१९००), वंसत-कोकिळा (१९०१), कृष्णकुमारी (१९०१), कारूचित्र (१९०२), सीताबनवास (१९०९), पल्लीचित्र (१९२५), तरंगिणी (१९२६). प्रभात-संगीत (१९३३), नानाबाया गीत (१९३४-अंगाईगीते), संध्यासंगीत (१९५०) व शमिष्ठा (१९५१) हे त्यांचे काव्यसंग्रह त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाले. कनकलता (१९२६) ही त्यांची ग्रामीण जीवनावरील कादंबरीही उल्लेखनीय आहे.

आपल्या काव्यात त्यांनी लोकगीतांचे छंद, प्रतिमा, शब्दकळा यांचा अत्यंत कलात्मक उपयोग केला आहे. महाकाव्याच्या धर्तीवर काही कथाकाव्येही त्यांनी लिहिली. त्यांवर प्रख्यात ओडिया कवी ⇨राधानाथ राय यांचा प्रभाव आहे. ह्या काव्यांचे विषय पौराणिक व ऐतिहासिक असून त्यात नीतिपर व देशभक्तीपर शिकवण आढळते.

दास, कुंजबिहारी

मिश्र, नरेंद्र (इं.)

कर्णे, निशा (म.)