महापात्र, गोदावरीश : (१८९८−१९६५). आधुनिक ओडिया कवी. कथा-कादंबरीकार, पत्रकार व उपरोधकार. जन्म पुरी जिल्हातील बाणपूरजवळील कुमरंग ससान ह्या गावी. सुरूवातीस ते गोपबंधू दासांनी ओडिया साहित्यात प्रवर्तित केलेल्या सत्यवादी संप्रदायाचे अनुयायी होते नंतर मात्र त्यांनी ओरिसाच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रात हिरिरीने भाग घेतला. एक प्रभावी उपरोधपूर्णविनोदी लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला.

निआनखुंट  ह्या अत्यंत लोकप्रिय मासिकाचे ते केवळ संपादकच नव्हे, तर प्रमुख लेखक, प्रकाशक व वितरकही होते. त्यांच्या ठिकाणी असलेल्या उपरोधपूर्ण लेखनशैलीची जाणीव त्यांना उत्तरायुष्यात झाली. आणि त्यामुळे त्यांचे आधीचे कविता, कथा-कादंबरीप्रकारचे लेखन मागे पडले. त्यांनी काव्य, कथा, कादंबरी, बाल व कुमार वाङ्मय, चरित्र या प्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांचे सु. ५० ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

आधुनिक ओडियातील एक लोकप्रिय विनोदी लेखक म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचा विनोद उपरोध प्रधान व लोकप्रिय असला, त्यांचा विनोदी उपरोधप्रधान व लोकप्रिय असला, तरी त्याला उत्कृष्ण वाङ्मयीन विनोदाचा दर्जा मात्र प्राप्त होऊ शकत नाही कारण त्यात व्यक्तीगत टीका व पूर्वग्रह अधिक प्रमाणात व्यक्त होताना दिसतात. अशा लेखनास तात्कालिक महत्त्व व लोकप्रियता लाभत असली, तरी ते चिरंतन न होता लवकरच विस्मृत होते. त्यांचे निवडक उपरोधपूर्ण लेखन कांटा ओ फूल नावाने संगृहीत आहे.

त्यांच्या काही लघुकथा मात्र आधुनिक ओडियातील उत्कृष्ट कथा म्हणून गणल्या जातात. मूं दिने मंत्री ठिलि (१९४५), एवे मध्यबंचिचि (दुसरी आवृ. १९४६), श्रुतिसंचयन (१९६५) हे त्यांचे कथासंग्रह विशेष उल्लेखनीय होत. त्यांनी काही देशभक्तिपर गीतेही लिहिली असून ती ओरिसात सर्वतोमुखी आहेत. त्यांतील ज्वलंत देशप्रेम, उदात्त भावना, झपाटणारी लय इ. गुणविशेष लक्षणीय आहेत. बाणपुर (१९१८), चिठि (१९३६), रूपरेखा (१९३६), हे मोर कलम (१९५१) हे त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय होत. कपिलेंद्र देव (१९३०), खारवेल (१९३१) व रामचंद्र मंज (१९३१) ही त्यांनी लिहिलेली चरित्रे होत.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.)

सुर्वे, भा. ग. (म.)