रायबरेली : उत्तर प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९०,४४२ (१९८१). हे साई नदीच्या तीरावर वसले असून लखनौच्या आग्नेयीस ७७ किमी. तसेच अलाहाबादच्या वायव्येस १५० किमी. वर असून आसपासच्या शहरांशी रस्त्यांनी जोडलेले आहे. रायबरेली उत्तर रेल्वेच्या रुंदमापी मार्गावरील प्रस्थानक असून लखनौ-हावडा लोहमार्गावरील एक स्थानक आहे. भार लोकांनी याची स्थापना केल्यामुळे त्यांच्या नावावरूनच यास रायबरेली हे नाव पडले असावे. ‘भरौली’ वा ‘बरौली’ असाही याचा उल्लेख आढळतो.

एक खुद्द रायबरेली व दुसरा सुभेदार जहान खानने स्थापन केलेले जहानाबाद असे रायबरेलीचे दोन भाग पाडण्यात आले आहेत. जौनपूरच्या इब्राहिम शहाने पंधराव्या शतकात हे जिंकले. शहाने रायबरेलीचे नाव बदलून ‘हुसैनाबाद’ ठेवले, परंतु ते फार दिवस प्रचारात आले नाही. सुलतान इब्राहिम शहाने येथे १४१७ मध्ये भव्य व मजबूत किल्ला बांधला. याच्या आवारात शुजाउद्दौलाच्या काळातील बऱ्याच इमारती आहेत. येथे एक शिलालेख असून त्यावर कोरीव लेख आहे.

जौनपूर राजाच्या खत्री खजिनदारांनी वसविलेल्या खत्रौनी खुर्द व खत्रौनी कलान हिंदूंनी वसविलेल्या जौनपुरी, खलीस व सुर्जीपूर अशा पेठा येथे आहेत.

येथील नगरपालिका १८६७ पासून कार्यान्वित आहेत. १८९३ मध्ये या परिसरात रेल्वेवाहतूक सुरू झाली आणि हे व्यापारी दृष्ट्याही जिल्ह्यातील एक महत्त्वाचे केंद्र बनले.

सुलतान इब्राहिम शहाने प्रथम बांधलेली व आलमगीरने पुनर्बांधणी केलेली जामा मशीद (१६७२), नवाब जहान खानने बांधलेली मशीद (१६३१), शहा आलमने मक्केच्या काबा मशिदीची उभारलेली प्रतिकृती आणि शहा आलमच्या मुलाने बांधलेली दैरा उपनगरातील मशीद अशा चार सुंदर मशिदी येथे आहेत. किल्ल्याच्या दरवाज्यापाशी मकदूम सय्यद जाफ्री या प्रसिद्ध फकीराची कबर आहे.

रायबरेलीपासून तीन किमी. अंतरावर अद्ययावत यंत्रसामग्रीने सुसज्ज अशी ‘रायबरेली टेक्स्टाइल मिल्स’ ही कापडगिरणी आहे. रायबरेलीमध्ये शेतीअवजारे, यंत्रसामग्री व यंत्रे यांची दुरुस्ती, लोखंड व पोलाद वस्तू (लोखंडी कपाटे, तिजोऱ्या, घडवंच्या), लोखंडी दारे व जाळ्या-चौकटी, जस्तलेपित लोखंडी पत्र्यांच्या पेट्या, हौद व पिंपे, लाकडी वस्तू, विजेच्या वस्तू, बॅटऱ्या, प्लॅस्टिक वस्तू, पादत्राणे, तेले व साबण, मेवामिठाई, आइसक्रीम व कँडी, आयुर्वेदीय औषधे इ. विविध वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने आहेत. चांगल्या प्रतीच्या मलमलीचेही येथे उत्पादन करण्यात येते.

रायबरेलीमध्ये तीन महाविद्यालये तसेच संस्कृत पाठशाळा, मूक-बधिर शाळा आणि २२ कनिष्ठ मूलोद्योग शाळा आहेत. येथे चार ग्रंथालये असून त्यापैंकी ‘रंधवा पुस्तकालय’ आणि ‘शारदा सदन पुस्तकालय’ ही प्रसिद्ध आहेत. आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी यांच्या स्मरणार्थ द्विवेदी स्मारक संघाने बांधलेले ‘द्विवेदी भवन’ येथेच आहे. येथे तीन प्रमुख इस्पितळे असून दोन चित्रपटगृहेही आहेत. जहानाबादमध्ये रंगमहाल (राजवाडा) व जहान खानचा मकबरा प्रसिद्ध आहे.

खंडकर, प्रेमलता