राइट, विल्बर : (१६ एप्रिल १८६७—३० मे १९१२) 

राइट, ऑर्व्हिल : (१९ ऑगस्ट १८७१—३० जानेवारी १९४८). विमानविद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू. त्यांनी १९०३ मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी शक्तिचलित, अविरत व नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि १९०५ मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे व उडविण्याचे महत्कार्य केले.

विल्बर यांचा जन्म इंडियानातील मिलव्हिलजवळ, तर ऑर्व्हिल यांचा ओहायओतील डेटन येथे झाला. दोघांचेही शिक्षण जरी उच्च माध्यमिक शाळेपलीकडे गेले नाही, तरी त्यांनी स्वतःच त्या काळच्या तंत्रविद्याविषयक साहित्याचा व गणिताचा अभ्यास केला. वर्तमानपत्राची घडी घालणाऱ्या यंत्राचा अभिकल्प (आराखडा) तयार करून व एक मोठे मुद्रणालय उभारून त्यांनी प्रारंभीच आपले यांत्रिक कौशल्य दाखवून दिले. बरीच वर्षे मुद्रणव्यवसाय केल्यानंतर त्यांनी १८९२ मध्ये सायकलींची विक्री आणि दुरुस्ती करणाऱ्या राइट सायकल कंपनीची स्थापना केली व पुढील १० वर्षे सायकलीचे अभिकल्प, उत्पादन व विक्री यशस्वीपणे केली.

ओटो लीलिएंटाल या जर्मन संशोधकांनी उड्डाणविषयक केलेल्या प्रयोगासंबंधी व १८९६ मध्ये ग्लायडिंगमधील अपघातात झालेल्या त्यांच्या मृत्यूसंबंधी वाचल्यानंतर राइट बंधूंनी विमानविद्येचा सखोल अभ्यास करण्याचे ठरविले. लीलिएंटाल यांनी उड्डाणासाठी हँगग्लायडरचा उपयोग केलेला होता आणि त्याचे नियंत्रण शरीराला इष्ट त्या दिशेने हेलकावा देऊन गुरुत्वमध्याचे (ज्यातून गुरुत्वाकर्षणाची परिणामी प्रेरणा कार्य करते त्या बिंदूचे) स्थान बदलून साध्य केले होते. राइट बंधूंनी या पद्धतीऐवजी दृढ द्विपंखी विमान वापरावयाचे ठरविले. बझर्ड पक्षी उडताना हवेत आपला समतोल कसा साधतो याचे निरीक्षण केल्यावर विल्बर यांना असे कळून आले की, विमान यशस्वीपणे उडण्यासाठी तीन अक्षांवर त्याचे कार्य होणे आवश्यक आहे. पक्ष्याप्रमाणे उडणाऱ्या यंत्राच्याही बाबतीत एका वा दुसऱ्या बाजूला तिरपे होणे, वर चढणे वा खाली उतरणे, उजव्या वा डाव्या बाजूस वळणे आणि आवश्यकतेप्रमाणे एकाच वेळी या क्रियांपैकी दोन वा सर्व क्रिया करता येणे आवश्यक आहे. राइट बंधूंना उड्डाण नियंत्रण मूलभूत महत्त्वाचे असल्याची खात्री झालेली होती. बझर्ड पक्षी आपल्या दोलन गतीचे नियंत्रण पंखांना पीळ देऊन करतात असे त्यांना आढळले. १८९९ मध्ये त्यांनी तयार केलेल्या द्विपंखी पतंगाला बसविलेले पंख यांत्रिक रीत्या पिळवटता येतील अशी त्यात व्यवस्था केलेली होती. यामुळे एका बाजूचे उत्थापन जास्त व दुसरीचे त्याच वेळी कमी होऊन यान तिरपे होण्याकरिता वळविणे किंवा वाऱ्याने विक्षोभित झालेले असल्यास दोलनाने पुन्हा योग्य पातळीत आणणे त्यांना शक्य झाले.  

नॉर्थ कॅरोलायनातील किटी हॉक येथे १९०० व १९०१ मध्ये केलेल्या प्रत्यक्ष प्रयोगांवरून व तात्पुरत्या ग्लयडिंग चाचण्यांवरून त्यांना असे आढळून आले की, त्या काळी उपलब्ध असलेली बहुतेक सर्व वायुगतिकीय (वायूच्या सापेक्ष गतिमान असणाऱ्या वस्तूंवर क्रिया करणाऱ्या प्रेरणांविषयीची) माहिती चुकीची होती. म्हणून त्यांनी एक लहान⇨वातविवर उभारून त्यात १९०१ साली अनेक नमुनेदार वातपर्णाच्या [⟶ वायुयामिकी] चाचण्या घेतल्या आणि त्यावरून विश्वसनीय वायुगतिकीय माहिती मिळविली.

या सर्व अभ्यासावरून तीन ग्लायडर तयार करून व किटी हॉकजवळ १९०० ते १९०२ या काळात त्यांची उड्डाणे करून राइट बंधूंनी योग्य उड्डाण नियंत्रण साध्य केले. याकरिता त्यांनी शेवटच्या ग्लायडरमध्ये वर-खाली नियंत्रणासाठी अग्रीय उत्थापक (समायोजनक्षम पृष्ठभाग), उजव्या डाव्या बाजूस वळण्यासाठी मागील बाजूस उभे सुकाणू आणि दोलन यंत्रणासाठी पंखांना सर्पिलाकार पीळ देणारी यंत्रणा अशी योजना केलेली होती. अशा प्रकारे त्यांनी साध्य केलेली त्रिअक्षीय नियंत्रण पद्धती ही त्यांची वायुगतिकीतील व व्यवहार्य विमानोड्डाणातील महत्त्वाची कामगिरी होती. या पद्धतीचे त्यांनी १९०६ मध्ये एकस्व (पेटंट) मिळविले व तेव्हापासून ती सर्व विमानांत वापरण्यात येत आहे. १९०३ मध्ये त्यांनी पहिले शक्तिचलित विमान तयार केले आणि त्याकरिता त्यांनी वापरलेले १२ अश्वशक्तीचे एंजिन व प्रचालक (पंखा) यांचा अभिकल्प आणि उत्पादन त्यांनीच केलेले होते. प्रचालकाकरिता त्यांनी स्वतः विकसित केलेले सिद्धांत आधारभूत धरलेले होते. या विमानाने १७ डिसेंबर १९०३ रोजी किलडेव्हिल हिल्सनजीक चार यशस्वी उड्डाणे केली. त्यांतील पहिल्या उड्डाणात ऑर्व्हिल हे चालक होते व त्यांनी १२ सेकंदात सु. ३६ मी. अंतर कापले. शेवटच्या सर्वांत जास्त काळ झालेल्या उड्डाणात विल्बर हे चालक होते व त्यांनी ५९ सेकंदांत सु. २५५ मी. अंतर कापले. ‘किटी हॉक’ याच लोकप्रिय नावाने ओळखण्यात येणारे हे विमान पुढे १७ डिसेंबर १९४८ रोजी वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्यात आले.

राइट बंधूंनी आपल्या विमानात व ते चालविण्याच्या आपल्या कौशल्यात सुधारणा करण्याकरिता पुढील पाच वर्षे खर्च केली. १९०५ मध्ये त्यांनी बांधलेले तिसरे विमान हे जगातील पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान ठरले. हे विमान वळणे, वर्तुळाकार फेरी मारणे व इंग्रजी आठाच्या आकारात उड्डाण करणे या हालचाली करू शकत असे आणि एका वेळी सु. अर्धा तास हवेत राहू शकत असे. त्याच वर्षी त्यांनी आपले एकस्व व संकलित केलेली वैज्ञानिक माहिती अमेरिकेच्या युद्ध खात्याला देऊ केली पण तिचा स्वीकार झाला नाही. विमानाचा पहिला उपयोग युद्धात होण्याची खात्री पटल्याने राइट बंधूंनी परेदशी बाजारात आपल्या विमानासाठी ग्राहक शोधण्यास सुरुवात केली. अनेक नकारांनंतर १९०८ मध्ये फ्रान्समधील व्यापारी संस्थांनी व अमेरिकेच्या सरकारने त्यांच्याकडून विमाने घेण्याचे करार केले. त्याच वर्षी फ्रान्समध्ये राइट कंपनीची स्थापना झाली. दोन्ही देशांत प्रात्यक्षिक चाचण्या दाखविण्यासाठी ऑर्व्हिल यांनी अमेरिकेत व विल्बर यांनी फ्रान्समध्ये उड्डाणे केली. यामुळे राइट बंधूंच्या विमानोड्डाणाबद्दलच्या सर्व शंका दूर होऊन अमेरिका व यूरोप या दोन्ही खंडांतून त्यांच्यावर सन्मानांचा व स्तुतीचा वर्षाव झाला. १९०९ मध्ये ऑर्व्हिल यांनी फोर्ट मायर येथे आपल्या ‘राइट ए’ या नवीन विमानाचे यशस्वी उड्डाण केले व त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या लष्कराचे कंत्राट मिळून त्यांचे विमान जगातील पहिले लष्करी विमान ठरले. १९०९ सालाच्या अखेरीस अमेरिकन राइट कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर राइट बंधूंनी आपले लक्ष इतरांना उड्डाणाचे तंत्र शिकविण्याकडे व राइट कंपनीचा कारभार पहाण्याकडे वळविले.

सुधारित राइट विमाने १९१० व १९११ मध्येही प्रचारात आली व त्यांचे उड्डाणही उत्तम होत असे परंतु त्यानंतर यूरोपीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना मागे टाकले. बिल्वर हे डेटन येथे आंत्रज्वराने (टायफॉइडने) मृत्यू पावले. ऑर्व्हिल यांनी १९१५ मध्ये राइट कंपनीतून आपले अंग काढून घेतले. आपले उर्वरित आयुष्य त्यांनी मुख्यत्वे विमानविद्येतील संशोधनाकरिता खर्च केले. विमानविद्येच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले (१९१५ –४८). ते डेटन येथे मृत्यू पावले.

संदर्भ : 1. Mcfarland, M. W., Ed. The Papers of Wilbur and Orville Wright, 2 Vols., New York,

       1953.

    2. Kelly, F. C. The Wright Brothers, New York, 1943.                      

                                      

भदे, व. ग.