रागमालिका : रागात्मक संगीतामध्ये ‘रागमालिका’ हा एक अत्यंत रसपूर्ण गानप्रकार आहे. प्रत्येक टप्प्याला एका रागामधून दुसऱ्या नवीन रागात जाण्याने श्रोत्यांच्या चित्तवृत्ती आरंभापासून अखेरपर्यंत बांधून ठेवता येतात. कर्नाटक वा दाक्षिणात्य संगीतामध्ये असलेल्या रचनांत रागमालिकांच्या रचना दीर्घतम आहेत. त्यांमध्ये ज्या गाण्यासाठी सु. दहाच मिनिटे पुरतील अशा रागमालिकाही आहेत, की ज्या गाण्याला जवळजवळ दोन तास लागतात. या ७२−मेळी रागमालिकाही आहेत, तशाच महावैद्यनाथ अय्यरकृत ७२−मेळी रागमालिकेविषयी एक लक्षणीय गोष्ट अशी की, तिची ‘धातु’ (स्वरावली) रचण्याला आठ दिवस लागले. संगीतरचनेच्या इतिहासामध्ये ही घटना जवळजवळ अद्वितीय म्हटली पाहिजे.
रागमालिका ही संज्ञा अन्वर्थक आहे. कारण रागमालिका म्हणजे विशिष्ट ‘रागांची माळ’. रागमालिकेमधील विविध रागांची निवड आणि त्यांचा क्रम यांची योजना सौंदर्यतत्त्वावर केली जाते. मध्ययुगीन काळात ह्या रत्नखचित, लखलखत्या गानप्रकाराला ‘रागकदम्बकम्’ अशी संज्ञा होती. रागमालिकांच्या ‘धातु-मातु’ मध्ये (‘धातु’ म्हणजे स्वरावली ‘मातु’ म्हणजे साहित्य) कमालीचे कलापूर्ण असे आलंकारिक आकृतिबंध आढळून येतात. रागमालिका ह्या कल्पनेचा प्रभाव ‘वर्ण’, ‘जतिस्वर’, ‘दरु’ आणि ‘पल्लवि’ याही प्रकारांवर कसा पडला आहे, ते ‘नवमालिका-वर्ण’, ‘धनरागमालिका-वर्ण’, ‘दिनराग-मालिका-वर्ण’ इत्यादिंवरुन कळून येते.
एखाद्या रचनेच्या वेगवेगळ्या भागांची वेगवेगळ्या रागांत गुंफण करून किती वैचित्र्य साधता येते, ह्याची रागमालिका ही लक्षणीय उदाहरणे होत. ⇨वर्णम् किंवा ⇨कृति यांप्रमाणे रागमालिका ही एक बांधीव रचना असते. ‘रागमालिका-वर्ण’ (यात ‘पदवर्ण’ व ‘तानवर्ण’ यांचेही प्रकार समाविष्ट आहेत), ‘रागमालिका-किर्तने’, ‘गीते’ तसेच रागमालिका प्रकारांनुसार केलेल्या ⇨स्वरजति हीही उपलब्ध आहेत. मात्र ‘मनोधर्म संगीता’त येणारी ‘ रागमालिका ‘ ही संज्ञा पल्लवीच्या शेवटी-शेवटी भिन्नभन्न रागांत जे साखळीसारखे ‘कल्पनास्वर’ गातात, त्यांची सूचक आहे. याशिवाय, गायक ज्यावेळी श्लोक,पद्ये, विरुत्तम् आणि तेवारम्ची कडवी किंवा तिरुत्तानडगम् वेगवेगळ्या रागांमध्ये गातो, तेव्हा तो ‘रागमालिका’ गातो, असे म्हणतात. एखाद्या कार्यक्रमाच्या शेवटी-शेवटी कलावंत जेव्हा निरनिराळ्या रागांमधले छोटेखानी आलाप सादर करतो, तेव्हा त्यांनाही ‘रागमालिका’ म्हणतात.
मुळात ‘रागमालिका’ या सुंदर गानप्रकाराची घडण ⇨पल्लवि, ⇨अनुपल्लवि आणि अनेक ⇨चरण यांनी झालेली असते. चरणांची लांबी सारखी असते. अनुपल्लवीचा राग पल्लवीप्रमाणे तरी असतो, किंवा वेगळाही असतो. तो पल्लवीप्रमाणेच असला, तर पल्लवी आणि अनुपल्लवी यांची दोहोंमिळून असलेली लांबी चरणाएवढी दिसून येते. कधीकधी अनुपल्लवी गाळतात. सर्व भागांचे राग वेगवेगळे असतात आणि त्या त्या रागाचे नाव (त्याला ‘रागमुद्रा’ म्हणतात) रचनेच्या ‘साहित्या’त अशा कौशल्याने गुंफलेले असते, की एकूण अर्थाशी ते एकजीव होऊन जावे. यासाठी रागमालिकांच्या रचनाकारांनी रागनामांची जी तोड-जोड केलेली आढळून येते, तीत त्यांचे मोठे चातुर्य प्रत्ययास येते.
पल्लवी, अनुपल्लवी आणि चरण यांच्या मागोमाग त्या त्या रागांमधील योग्य असे ‘चिट्टस्वर’ (सरगमी) येतात.यानंतर लगेच पल्लवी ज्या रागात असते. त्या रागातील छोटेखानी पूरक स्वर येतात. यामुळे एकीकडे अनुपल्लवी-स्वर आणि चरण-स्वर यांची जशी सांधे-मोड होते, तसाच दुसरीकडे पल्लवी-स्वरांचा दुवा जोडला जातो आणि त्यायोगे चरणरागातून पल्लवीरागात जाण्याची मिलावट सुभगपणाने साधता येते. पल्लवीरागातील सरगमीच्या दुव्यामुळे पल्लवीरागात परत येणे सोपे होते. रचनेच्या अखेरीस सर्व रागांतील स्वरांची पूर्ण मालिका येते. मात्र ती पूर्ण आवर्तनाची वा अर्ध-आवर्तनाची, पण ‘विलोमक्रमा’ने (उलट क्रमाने) येणारी अशी असते. शेवटी गाइल्या जाणाऱ्या या बहुरंगी सरगमीने सर्व रचनेचे सौंदर्य पराकाष्ठेचे वाढते. ‘विलोम-चिट्टस्वरा’ मुळे रागमालिकेच्या मंडलाला पूर्णता येते. रागमालिकांमध्ये ज्या प्रदीर्घ ताना असतात, त्यांचे वेगवेगळे भाग असून प्रत्येक भागाला स्वतंत्र अस्तित्व असते.
रागमालिकेचे साहित्य प्रायः भक्तिपर असते. तथापि प्रेमविषयक, आश्रयदात्याच्या स्तुतीने भरलेले किंवा संगीतशास्त्राच्या एखाद्या अंगासंबंधीही असते. उदा.,’मूर्च्छना-कारक-मेळ रागमालिका’ हा एक लक्षणप्रबंध असून, आधारस्वर बदलून ७२ मेळांतल्या प्रत्येक मेळाची मूर्च्छना कशी साधता येते, ते त्यात नामक्रमानुसार वर्णिलेले आहे.
रागक्रम : रागमालिकेत येणाऱ्या रागांचा क्रम कसा असावा, यासंबंधी काही सर्वसाधारण तत्त्वे पाळली जातात. अशा काही रागमालिका आहेत की, ज्यांत रागक्रम अगोदरच पक्का ठरवून दिलेला असतो, मग त्यात रचनाकाराने सौंदर्यविचाराचा काही प्रश्न विचारावयाचा नाही. उदा., ७२ मेळकर्त्यांच्या रागमालिकेच्या बाबतीत असा प्रकार आहे. तसेच ‘दिनरागमालिका-वर्ण’ आणि मूर्च्छना-कारक-मेळ रागमालिका’ या दोहोंच्या घडणीमध्येच रागक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य असते, त्यावेळी पुढील विचार ध्यानी ठेवतात : (१) भावदृष्ट्या आणि रसदृष्ट्या रागक्रमामध्ये स्वाभाविकता असावी. (२) एका रागातून दुसऱ्या रागात जातान तुटकपणा किंवा खटका जाणवू नये. वस्तुतः तुटकपणा जाणवू नये, याच कारणास्तव रागमालिकेच्या प्रत्येक विभागाच्या अखेरीस पूरक स्वरगुच्छाची योजना असते. या ‘मकुटस्वरा’ला कधीकधी ‘पल्लविस्वर’ म्हणतात. (३) ज्या रागांना एक वा अनेक साधारण स्वर असतात आणि जे राग सदृश वा संबद्ध रस निर्माण करू शकतात, ते एकापाठोपाठ येणे हे योग्य असते.
रागमालिकेमधील जे राग सौंदर्यदृष्ट्या एकापाठोपाठ एक असे येऊ शकतात, त्यांना ‘मित्रराग’ म्हणतात.
रागमालिकेच्या रचनेत किमान चार राग असले पाहिजेत. मात्र अधिकात अधिक किती राग यावेत, हे रचनाकार ज्या विषयाची निवड करील त्यावर पुष्कळदा अवलंबून असते. उदा., ‘पक्षमालिका’ रचनेत पंधरा राग असणार तर ‘नक्षत्रमालिका’ रचनेत सत्तावीस राग असणार इत्यादी.
रागमालिका या सुंदर आणि रसपूर्ण रचना असतात. यांमध्ये उच्च अभिरुचीचे मनोरंजन तर असतेच पण ‘लक्ष्य’ म्हणूनही त्यांचे महत्त्व लक्षणीय आहे. रागनामांच्या व्युत्पत्तीविषयी असलेल्या शंकांचे अनेकदा रागमालिकांमध्ये आलेल्या रागांच्या नावांवरुन निरसन होते. उदा., ⇨मुथ्थुस्वामी दीक्षितरकृत ‘चतुर्दश-रागमालिका’ या रचनेत ‘साम गान विनुतम्’ असे जे शब्द आलेले आहेत, त्यांवरुन ‘श्याम’ हे रागाचे नाव नसून ‘साम’ हेच रागाचे मूळ नाव आहे, हे आपल्याला कळते. ‘प्रताप-चिन्तामणि’ यांसारख्या काही अनवट रागांचे मूळ स्वरूप काही रागमालिकांवरुनच आपल्या ध्यानी येते.
उत्तर हिंदुस्थानी संगीतामध्ये या गानप्रकाराला ‘रागसागर’ अशी संज्ञा आहे.
तालमालिका : ‘तालमालिका’ ही अशा प्रकारची रचना होय, की ज्यामधील निरनिराळे विभाग वेगवेगळ्या तालांमध्ये बांधलेले असतात, परंतु संपूर्ण रचनेचा राग मात्र एकच असतो. रागमालिकांप्रमाणेच तालमालिकांमध्येदेखील एक प्रकारची स्वभाविकता असावी लागते. तालमालिकांच्या साहित्यामध्ये ‘तालमुद्रा’ (तालसंज्ञा) असली पाहिजे. रागमालिका आणि तालमालिका यांमध्ये एक भेद असा की, रागमालिकेध्ये राग बदलतात, पण ताल मात्र तोच राहतो तर तालमालिकेमध्ये ताल बदलतात, पण राग मात्र तोच राहतो.
रागतालमालिका : ‘रागतालमालिका’ ही ‘रागमालिका’ आणि ‘तालमालिका’ यांच्या एकजीव संयोगाने केलेली रचना होय.त्यातील प्रत्येक विभाग हा वेगळ्या रागात आणि वेगळ्या तालात तर असतोच पण त्या प्रत्येक विभागाच्या साहित्यात ‘रागमुद्रा’ (रागसंज्ञा) आणि ‘तालमुद्रा’ (तालसंज्ञा) गुंफलेली असते. रागतालमालिका ही एक पराकाष्ठेची बिकट प्रकारची रचना होय आणि ज्या रचनाकारांना नवनिर्मितीक्षम प्रशेची उपजत देणगी असते आणि अद्वितीय कौशल्य सहजसाध्य असते, त्यांनाच ह्या रचनेला हात घालणे शक्य आहे.दाक्षिणात्य संगीतामध्ये अशा प्रकारच्या एका अतिभव्य रागतालमालिकेचे महान उदाहरण उपलब्ध आहे. रामस्वामी दीक्षितर यांनी १०८ राग आणि ताल यांची एक प्रदीर्घ रागतालमालिका (‘नाटकादि विद्यालय’ या शब्दांनी सुरू होणारी) बांधलेली आहे. ‘श्रीविलास’, ‘श्रीरंगप्रबन्धम्’ आणि ‘उमातिलक’ हे रागतालमालिकेचे उपप्रकार होत.
सांबमूर्ति, पी.(इं.) मंगरुळकर, अरविंद (म.)