परंजोति, व्हिक्टर: (१९०६ – १ फेब्रुवारी १९६७). भारतीय विख्यात संगीतनिर्देशक, रचनाकार व समीक्षक. जन्म मद्रास येथे. मद्रास विद्यापीठाची बी. ए. पदवी त्यांनी मिळवली. यूरोपमधील वेस्टलेक मॉर्गन आणि सर हेन्री वुड ह्यांच्या हाताखाली त्यांचे संगीतशिक्षण झाले. आपले ‘परंजोति कोरस’ घेऊन त्यांनी जेव्हा यूरोप आणि पश्चिम आशिया यांचा दौरा केला, तेव्हा वृंदगायनामध्ये भारताचे प्रथमच अलौकिक नाव झाले आणि भारतीय हौशी गायक है पाश्चात्त्य व्यावसायिक गायकवृंदांपेक्षा कोणत्याही बाबतीत उणे नाहीत, हे सिद्ध झाले. ते कुशल प्रशासक, संघटक, चित्रकार, गायक, नाटककार, लेखक, वक्ते आणि संगीत व नृत्यनाटिका यांचे समीक्षक होते. आपण निर्मिलेल्या संगीतिकांचे संवाद, गीते आणि कविता ते स्वतःच रचीत. त्यांच्या रचना अनेकविध आहेत. त्यांत द सेव्हन्थ नोझ आणि द चंपक अँड द लिली ह्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रचनांमध्ये भारतीय संगीताची सखोल जाणकारी आणि तेजस्विता प्रत्ययाला येते. १९५२ मध्ये त्यांनी ‘बॉम्बे मॉड्रिगल सिंगर्स असोसिएशन’ आणि १९५६ मध्ये ‘बॉम्बे ॲमच्युअर लाइट ऑपेरा सभा’ यांची स्थापना केली. १९३८–४७ ह्या कालावधीत ते मद्रास, कलकत्ता आणि मुंबई या आकाशवाणी केंद्रांचे संचालक आणि दिल्लीस आकाशवाणीचे उपसंचालनाधिकारी होते. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. एक महान सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचा पुरुष, असे त्यांचे वर्णन पाश्चात्त्य संगीत-समीक्षकांनी केले आहे.

मंगरूळकर, अरविंद