रँबो, आर्त्यूर : (२० ऑक्टोबर १८५४−१० नोव्हेंबर १८८९). थोर प्रतिभावंत फ्रेंच कवी. फ्रान्समधील शार्लव्हील ह्या गावी जन्मला. तो सहा वर्षांचा असतानाच त्याचे आईवडील परस्परांपासून विभक्त झाले आणि शिस्तप्रिय आई त्याचा सांभाळ करू लागली. शार्लव्हील येथील शाळेत त्याने काही शिक्षण घेतले. असामान्य बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी म्हणून शाळेत त्याची ख्याती होती. तथापि १८७० च्या जुलैमध्ये फ्रँको−प्रशियन युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचे औपचारिक शिक्षण संपुष्टात आले. बंडखोर, क्रांतिकारक विचारांनी तो भारावून गेला आणि आपल्या आईच्या शिस्तीविरुद्ध बंड पुकारून पॅरिसला आला. हा प्रवास विनातिकीट केल्यामुळे त्याला अटक झाली आणि काही दिवस तुरुंगात काढावे लागले. त्यानंतर उत्तर फ्रान्स आणि बेल्जियममध्ये त्याने भ्रमंती केली. पोलिसांच्या मदतीने त्याच्या आईने त्याला घरी आणले परंतु तो पुन्हा पॅरिसला पळून गेला आणि १८७१ च्या मार्चमध्ये घरी परतला.
रँबोच्या कवित्वशक्तीचा प्रत्यय त्याच्या बालपणापासूनच येऊ लागला होता. लॅटिनमध्येही तो काव्यरचना करीत असे. उपर्युक्त गृहत्यागाच्या काळात त्याने त्याच्या काही मौलिक कविता रचिल्या. घरी परतल्यानंतर तत्त्वज्ञान, गूढविद्या, यातुविद्या ह्यांसारख्या विषयांवरील अनेक ग्रंथ त्याने वाचून काढले धर्म आणि नीती ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारले पावित्र्यविडंबक म्हणता येतील अशा कविता लिहिल्या आपली काव्यविषयक भूमिका निश्चित केली.
कवी हा द्रष्टा आहे त्याच्या स्वर हा चिरंतनाचा स्वर आहे सांकेतिक व्यक्तिमत्वाच्या चौकटीत स्वतःला कोंडून न घेता स्वर त्याने आपल्या कवितेतून उमटविला पाहिजे शिव आणि अशिव ह्यांच्या पलीकडे कवीने जायला हवे ज्याची अभिव्यक्ती अशक्य, त्याचा आविष्कार त्याने घडविला पाहिजे. हे दुर्घट कार्य करण्यासाठी प्रयोगशील वृत्तीने अशिवाचा आणि स्वतःच साधलेल्या भ्रमावस्थेचा उत्कट अनुभव घेऊन त्याने आपली सर्जनशीलता विकसित केली पाहिजे अशी त्याची धारणा होती.
विख्यात फ्रेंच कवी ⇨पॉल व्हर्लेअन (१८४४−९६) ह्याला रँबोने आपल्या काही कविता पाठविल्या (१८७१). त्या कवितांनी प्रभावित होऊन व्हर्लेअनने रँबोला आपल्या भेटीस, पॅरिसला बोलावून घेतले. ह्या निमंत्रणामुळे उल्हसित झालेल्या रँबोने ‘ल बातो ईव्ह्र’ (इं. शी. ड्रंकन बोट) ही आपली उत्कृष्ट कविता लिहिली. ह्या कवितेत रँबोची असामान्य प्रतिभा व त्याची बंडखोरी ह्यांचा प्रत्यय येतो. पॅरिसमध्ये रँबोला अन्य कवी भेटले. रँबोच्या कवितांचे त्यांनी कौतुक केले परंतु त्याचा उद्दामपणा त्यांना आवडला नाही. त्याची आणि व्हर्लेअनची मात्र मैत्री जमली. ह्या दोघांनी इंग्लंड आणि बेल्जियममध्ये एकत्र मुशाफिरीही केली परंतु त्यांची भांडणेही होत. एका भांडणात व्हर्लेअनने रँबोवर गोळी झाडली त्याबद्दल त्याला तुरुंगवासही घडला.
रँबोने १८७५ च्या सुमारास काव्यलेखन थांबविले, असे दिसते. त्यानंतर तो जर्मन, अरबी, हिंदी आणि रशियन ह्या भाषा शिकला. त्याने जग पहायचे ठरवले खूप भ्रमंती आणि अनेक उद्योग केले. उदा., एका जर्मन सर्कशीत तो राहिला आणि सायप्रसमध्ये त्याने मजूरीही केली. पुढे तो इथिओपियात गेला. तेथे त्याने काही उद्योग करून पैसा मिळविला. तेथे तो एक चांगला माणूस म्हणून खूप लोकप्रिय झाला.
ह्या त्याच्या देशाबाहेरील भ्रमंतीच्या काळात फ्रान्समध्ये श्रेष्ठ कवी म्हणून त्याचा लौकिक वाढू लागला होता. १८९१ मध्ये त्याला कर्क रोग जडला आणि त्यातच त्याचा मार्से येथे अंत झाला. मृत्यूसमयी त्याने रोमन कॅथलिक धर्माचा स्वीकार केला होता, असे त्याच्या बहिणीने केलेल्या निवेदनावरून दिसते. व्हर्लेअनने त्याच्या काही कविता आणि गद्यकाव्ये प्रसिद्ध केली होती.
‘ल बातो ईव्ह्र’ चा बी. हिल ह्यांनी केलेला इंग्रजी अनुवाद १९५२ मध्ये प्रसिद्ध झाला (द ड्रंकन बोट : ३६ पोएम्स). ‘यून सँझाँ आंनांफॅर’ (१८७३, इं. भा. ए सीझन इन हेल, १९३२) ही रँबाची एक श्रेष्ठ रचना. ह्या गद्यपद्यात्मक रचनेत प्रखर आत्मनिरीक्षण आणि प्रांजळ आत्मनिवेदन आढळते. लेझिल्लयुमिनासियाँ (१८८६, इं. भा. इल्यूमिनेशन्स अँड अदर प्रोज पोएम्स, १९३२) ह्या नावाने त्याची गद्यकाव्ये प्रसिद्ध आहेत.
चमत्कार वाटावा, असे रँबोचे वाङ्मयीन जीवन आहे. अल्पवयात आणि त्यातही सु. पाच वर्षांच्याच कालावधीत त्याने श्रेष्ठ प्रतिभेचा प्रत्यय देणारी काव्यरचना करून काव्यलेखनाचा त्याग केला. पॉल व्हर्लेअन आणि ⇨स्तेफान मालार्भे (१८४२−९८) हे फ्रेंच प्रतीकवादाचे प्रमुख प्रतिनिधी मानले जात असले, तरी प्रतीकवादाचा आरंभकर्ता म्हणून आणि प्रतीकवाद्यांवर सर्वाधिक प्रभाव पाडणारा कवी म्हणून रँबोचे स्थान फ्रेंच साहित्यात दृढमूल झाले आहे. आधुनिक फ्रेंच कवितेवरच नव्हे, तर अन्य यूरोपीय भाषांतील आधुनिक कवितेवरही रँबोचा प्रभाव दिसून येतो. शब्दांच्या आवाहकतेवर रँबोने भर दिला ह्या आवाहकतेच्या आधारे अंतर्मनातील गहन अनुभवांची अभिव्यक्ति त्याने घडवून आणली आणि आपल्या पूर्वसूरींच्या पुढची वाटचाल केली.
रँबोचे संकलित वाङ्मय प्रथम १८९८ मध्ये प्रसिद्ध झाले. ‘बिब्लियॉतॅक द् ला प्लेयाद’ ह्या प्रकाशनसंस्थेने त्याच्या समग्र साहित्याचे प्रकाशन १९४६ साली केले. रँबोच्या वेचक कवितांचे इंग्रजी भाषांतर १९४२ साली झाले (सिलेक्टेड व्हर्स पोएम्स ऑफ आर्त्यूर रँबो, अनुवाद, एन्. कॅमेरून). रँबोचे समग्र साहित्य आणि त्याची काही निवडक पत्रे ह्यांचा इंग्रजी अनुवाद रँबो : कंप्लीट वर्क्स विथ सिलेक्टेड लेटर्स ह्या नावाने १९६६ साली प्रसिद्ध झाला (अनुवादक, वॉलेस फाउली).
संदर्भ : 1. Starkie, Enid, Arthur Rimbaud, New York, 1947.
2. Symons, Arthur, The Symbolist Movement in Literature, New York, 1900.
सरदेसाय, मनोहरराय
“