रहाटगाडगे : पाणी उपसण्यासाठी ‘नोरिया’ या नावाने रहाटगाडग्याचा वापर मध्यपूर्वेत फार पूर्वीपासून होत आलेला आहे [⟶ तंत्रविद्या]. रहाटगाडगे चालविण्यासाठी पर्शियात गाढवे, मध्यपूर्वेतील लोखंडी रहाटगाडगेइतर बऱ्याच देशांत उंट, भारत व आग्नेय आशियातील देशांत रेडे व बैल आणि ग्रीस, इटली इ. दक्षिण यूरोपातील देशांत घोडे अशा निरनिराळ्या जनावरांचा उपयोग केला जातो.

भारताच्या समुद्रकिनाऱ्यालगत घाटाखालील प्रदेशात ९ मी. पर्यंत खोल विहिरीतून पाणी उचलण्यासाठी रहाटगाडग्यांचा उपयोग करतात. पूर्वापार वापरात असलेली रहाटगाडगी लाकडी आहेत. अशा रहाटगाडग्यात लाकडी चक्राकार मातीच्या पोहऱ्यांच्या (गाडग्यांच्या) निरंत माळा चढलेल्या असतात. त्या माळांमधील पोहऱ्यांतून वर आलेले पाणी एका पन्हळीत पडते. तेथून ते एका हौदात जाते व हौदातील पाणी पाटाने शेतात नेले जाते. या रहाटगाडग्यातील लाकडी सामान वरचेवर दुरुस्त करावे लागते. ते पाण्याने भिजत असल्याने कुजते. त्यामुळे दर तीन वर्षांनी ते बदलावे लागते. दैनंदिन वापरात तसेच पाण्याच्या पातळीनुसार माळेची लांबी कमीजास्त करताना मातीचे पोहरे फुटतात व ते बदलावे लागतात. या सर्व कारणांमुळे लाकडी रहाटगाडग्यांचा वापर कमी झालेला आहे. लाकडी रहाटगाडग्याने ८-९ मी. उंचीवर ताशी ५,००० लि. पाणी उचलता येते.

विसाव्या शतकात लोखंडी रहाटगाडगी प्रचारात येऊ लागली. यातील चक्रे, पोहरे, माळा व पन्हळ हे लोखंडी पट्ट्या व जाड पत्रे यांचे बनविलेले असतात. त्यामुळे त्यांची फूटतूट फारच कमी होते. चक्राच्या दातांना वरचेवर वंगण दिल्यास व सर्व भागांना दरसाल एकदा रंग दिल्यास लोखंडी रहाटगाडगे १० वर्षांपर्यंत टिकते. याने दर ताशी १०,००० ते १२,००० लि. पाणी ८-९ मी. उंचीपर्यंत उचलता येते.

मातीच्या अगर पत्र्याच्या प्रत्येक पोहऱ्यास खाली ६ ते १० मिमी. व्यासाचे एक छिद्र पाडलेले असते. पाण्याने भरलेल्या प्रत्येक पोहऱ्यातून या छिद्रावाटे सतत पाणी गळत राहते. त्यामुळे दिवसाकाठचे रहाटगाडग्याचे काम संपल्यावर भरलेल्या सर्व पोहऱ्यांतील पाणी हळूहळू गळून जाते आणि यंत्रणेतील माळा, चक्रे, आस इ. सर्व भागांवरील ताण कमी होतो. त्याचप्रमाणे पत्र्याचे पोहरे पाणी पूर्णपणे गळून गेल्यामुळे गंजत नाहीत. छिद्रामुळे हे जरी फायदे होतात, तरी रहाटगाडग्याचे काम चालू असताना उचललेले पाणी सतत गळत रहाते व त्या प्रमाणात जनावरांनी केलेली मेहनत फुकट जाते.

रहाटगाडग्याच्या यंत्रणेस गती देण्याकरिता जनावरांना विहिरीजवळील सपाट जागी गोल फिरावे लागते. त्यामुळे जनावरांना मोटेच्या कामात मोट विहिरीत उतरताना, भरताना अगर ओतताना जशी थोडी विश्रांती प्रत्येक फेऱ्यास मिळते तशी रहाटगाडग्याच्या कामात मिळत नाही. तसेच धावेवरून खाली जाताना जनावराच्या वजनाचा फायदा मोटेच्या कामात जसा मिळतो तसा रहाटगाडग्याच्या कामात सपाट जागी फिरावे लागत असल्यामुळे मिळत नाही. या कारणांमुळे मोटेपेक्षा रहाटगाडग्याच्या कामात जनावर लवकर थकते.

रहाटगाडग्यांचे निरनिराळे भाग लोखंडाचे असल्याने त्यांच्या किंमती सतत वाढत राहिल्या आहेत, तसेच डीझेलवर व विजेवर चालणाऱ्या पंपांचे प्रसार वाढत आहे, त्यामुळे रहाटगाडग्यांचा वापर दिवसानुदिवस कमी होत चालला आहे.

सोमण, ना. श्री.