रंजन, जैव: सजीवांनी आपल्या शरीरात रंगाला कारणीभूत असलेले पदार्थ  ( रंगद्रव्ये ,  रंजक) निर्माण करणे व ते शरीरभर विविध प्रकारे दाखविणे या प्रक्रियेला जैव रंजन ही संज्ञा वापरतात. प्राणी व वनस्पती यांमध्ये आढळणारे निरनिराळे रंग ,  त्यांत होणारे बदल ,  त्यांना कारणीभूत असणारी रंगद्रव्ये आणि त्यांचे कार्य यांसंबंधीचे विवेचन येथे अंतर्भूत केले आहे. फार प्राचीन काळापासून सृष्टीतील विविध रंग व रंगसंगती यांनी मनुष्यप्राणी आकर्षित झाला असून त्यांसंबंधी त्याला कुतूहल निर्माण झाले आहे. रंजनातील सौंदर्यामुळे तो आनंदित होतो ,  तर काही रंगसंगतींमुळे तो कधी भयग्रस्त ,  तर कधी चकित किंवा दुःखितही होतो. निसर्गातील भिन्न रंगांची मूळची मांडणी सामान्यपणे काहीशी अस्ताव्यस्त असते  परंतु मनुष्याने आपली कल्पकता वापरून त्यात शिस्त ,  नेटकेपणा व सौंदर्य यांचा अंतर्भाव करून अथवा प्राधान्य देऊन उद्याने ,  उपवने ,  वने ,  मळे ,  शेते ,  हिरवळी ,  कुरणे इ. उपयुक्त व सोयीस्कर  ( सुधारित) घटक बनविले आहेत. जीववैज्ञानिकांना सजीवांच्या रंगधारणेबद्दल व त्यांच्या यंत्रणेबद्दल विशेष कुतूहल वाटत आले असून त्या दृष्टीने बरेच संशोधन झाले आहे व अद्याप चालू आहे. एकूण रंगासंबंधीचे शास्त्रशुद्ध व निश्चित ज्ञान फार उपयुक्त ठरले आहे आणि ते रंगविज्ञान  ( क्रोमॅटॉलॉजी) या शाखेत अंतर्भूत केले जाते. कृषी ,  वैद्यक ,  विविध कला ,  उद्योग ,  काही लष्करी कारवाया इत्यादींत त्याचा उपयोग केला जातो. वैद्यांना शरीरातील ऊतके  ( समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचे-पेशींचे-समूह) व विविध द्रव्यपदार्थ यांचा रंग लक्षात घेऊन चयापचयातील  ( शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतील) गुणदोष ओळखण्यास मदत होते व त्यांवरून ते रोगचिकित्सा व रोगनिदान करतात. पिके तयार होण्याचे ऋतू व फळांचे मोसम ओळखण्यास फुलांफळांचे रंग शेतकरी व बागाइतदार यांना मार्गदर्शक होतात. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या व्यक्तीतील रंगांवरून व त्यात दिसून येणाया फरकांवरून ⇨आनुवंशिकीच्या अभ्यासकांना सजीवांतील जीवरासायनिक प्रक्रियांचा व त्यांच्या अनुहरणाचा  ( पूर्वजांपासून प्राप्त होण्याच्या प्रक्रियेचा) बोध होतो. पुढील विवेचनात जीवसृष्टीतील रंगांची व्याप्ती हा प्रमुख विषय असून त्याची विभागणी  ( १) प्राण्यांचे रंग व  ( २) वनस्पतींचे रंग अशा दोन भागांत केली आहे.

 प्राण्यांचे रंग  

  जगाच्या सर्व कटिबंधांतील प्राण्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे रंग असतात  पण उष्ण कटिबंधातील प्राण्यांत विविध रंगांची जी विपुलता दिसते तशी इतर कटिबंधांतील प्राण्यांत आढळत नाही.  

   जीवविज्ञानाच्या अभ्यासकाला प्राण्यांच्या रंगांविषयी विशेष आस्था वाटते कारण रंजन हे निसर्गाच्या विशाल ⇨अनुकूलन योजनेचा एक भाग असल्यामुळे तो तसा आहे असे मानले ,  तरच त्यांपैकी पुष्कळशा रंगांचा नीट अर्थबोध होतो  परंतु सगळेच रंग काही अनुकूली नसतात आणि कधीकधी उपयुक्ततेच्या दृष्टीने काही रंगांच्या अस्तित्वाचे कारण सांगता येत नाही म्हणून रंगांच्या उत्पत्तीच्या साधनांचा आधी विचार करणे आवश्यक आहे.

   रंगाची उत्पत्ती : कोणतीही वस्तू रंगीत दिसण्याची कारणे रासायनिक व भौतिक अशी दोन प्रकारची असतात.  

   रासायनिक रंग : एखाद्या वस्तूवर प्रकाशकिरण पडल्यानंतर त्या वस्तूकडून आपल्याकडे जे किरण परावर्तित होतात  ( परत फेकले जातात) त्यांना अनुसरून त्या वस्तूच्या रंगाची संवेदना आपणास होते.

 वस्तूवर पडलेला पांढरा प्रकाश जसाच्या तसा परावर्तित झाला ,  तर ती वस्तू पांढरी दिसते. याच्या उलट वस्तूवर पडलेले सर्व प्रकाशकिरण शोषले गेले ,  तर वस्तू काळी दिसते. वस्तूवर पडलेल्या प्रकाशात असलेल्या घटक रंगांपैकी फक्त काहींचेच शोषण केले गेले ,  तर उरलेले परावर्तित होतात  उदा. ,  पिवळ्या व निळ्या रंगांचे किरण समप्रमाणात असले म्हणजे पांढऱ्या रंगाची संवेदना होते. म्हणून पांढरा प्रकाश वस्तूवर पडल्यावर त्या वस्तूने जर पिवळे किरण शोषून घेतले ,  तर ही वस्तू निळी दिसेल. वस्तू कोणत्या रंगाच्या किरणांचे शोषण करील हे तिच्या रासायनिक संघटनेवर अवलंबून असते.

   प्राण्याच्या शरीराच्या जवळजवळ सर्व भागांत रंगद्रव्ये आढळतात  ती शरीराच्या पृष्ठभागावरच असतात असे नाही ,  तर अगदी खोल भागातही असतात. काही प्रकारांत ऊतक ज्या रासायनिक पदार्थांचे बनलेले असते त्या पदार्थाच्या केवळ प्रकाश शोषणाच्या क्षमतेमुळे रंग उत्पन्न झालेला असतो  उदा. ,  हीमोग्लोबिन या लोहाच्या संयुगामुळे पृष्ठवंशी  ( पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या आणि काही कृमींच्या रक्ताला लाल रंग येतो किंवा हीमोसायानीन या तांब्याच्या संयुगामुळे ऑक्टोपसाच्या व पुष्कळ क्रस्टेशियन  ( कवचधारी) प्राण्यांच्या रक्ताला निळा रंग येतो. ही दोन्ही रंगद्रव्ये रक्ताची ऑक्सिजनवाहक माध्यमे असल्यामुळे त्यांचे कार्य श्वसन हे असते. ज्या प्राण्यांत ही रंगद्रव्ये असतात ,  त्यांच्या दृष्टीने या रंगद्रव्यांचे इतर काही महत्त्व नसते.  

   अन्यथा रंगद्रव्ये बाह्य असू शकतात आणि त्यामुळे प्राण्याला जो रंग येईल त्या रंगाचे जीवनसंघर्षात खरेखुरे महत्त्व असू शकेल. अशा प्रकारची रंगद्रव्ये मुख्यतः याच कार्याकरिता असावीत असे दिसते आणि ती ज्या कोशिकांत असतात त्यांच्या विभेदनाने  ( विशिष्ट कार्याकरिता झालेल्या फेरबदलाने) साधी रंगद्रव्ये आणि ⇨व र्णकीलवक अथवा परिवर्तनशील रंगद्रव्य बिंदू तयार होतात. साध्या रंगद्रव्यांमुळे प्राण्याला कायमचा रंग येतो व त्यात तात्पुरते जलद बदल होणे शक्य नसते. याच्या उलट वर्णकीलवकांमुळे प्राण्यांच्या त्वचेवरून झपाट्याने तरंगांप्रमाणे जाणाऱ्या रंगांच्या छटा उत्पन्न होऊ शकतात  उदा. ,  सरडगुहिरा किंवा स्क्विड. वर्णकीलवक या कोशिका असून यांच्यापासून सर्व बाजूंना तंतू गेलेले असून ते त्वचेच्या पृष्ठाशी समांतर असलेल्या पातळीत असतात. शिथिलावस्थेत कोशिकेतील रंगद्रव्य एका ठिकाणी गोळा झालेले व दाट असते आणि त्यामुळे त्याने व्यापिलेली जागा एखाद्या ठिपक्यासारखी दिसते व त्वचा पांडुर दिसते. तथापि ,  तंतूंच्या संकोचनामुळे रंगद्रव्य पृष्ठाच्या बऱ्याच मोठ्या भागावर पसरते आणि त्यामुळे डोळ्यांना स्पष्टपणे दिसते. परिणामी त्वचेस गडदपणा येतो. तपकिरी व हिरवा या दोन भिन्न रंगांच्या वर्णकीलवकांचे दोन संच जर आलटूनपालटून प्रसरण पावले ,  तर त्यामुळे प्राण्याचा सर्वसाधारण रंग ,  जशी स्थिती असेल त्याप्रमाणे तपकिरीपासून हिरवा किंवा हिरव्यापासून तपकिरी होईल. वर्णकीवलक ⇨पोष ग्रंथी च्या द्वारे डोळे व त्वचा यांनी प्रभावित होऊन ,  रंगांचे फेरबदल उत्पन्न करतात  उदा. ,  आफ्रिकी सरडगुहिरे वॲ नोलिस हा अमेरिकी सरडा. या वर्णकीलवकांच्या खाली तर ग्वानिनाचा [ ⟶ प्यूरिने] परावर्ती स्तर असला ,  तर वर्णकीलवकाच्या परिणामात बरीच वाढ होते. अशा तऱ्हेची यंत्रणा माशांमध्ये विशेष प्रभावी असते.


   नैसर्गिक रंगद्रव्यांचे  ( १) नायट्रोजनरहित व  ( २) नायट्रोजनयुक्त असे दोन विभाग करता येतात. नायट्रोजनरहित रंगद्रव्यांपैकी प्राण्यांत व वनस्पतींतही ठळकपणे व विस्तृत प्रमाणात आढळणारी महत्त्वाची रंगद्रव्ये म्हणजे ⇨कॅरोटिनॉइडे ही होत. क्रोमोलिपिडे ,  नॅप्थोक्विनोने व अँथ्रॅक्विनोने [ ⟶ क्विनोने] व फ्लॅव्होनॉइडे ही प्राण्यांत आढळणारी इतर नायट्रोजनरहित रंगद्रव्ये होत. यांपैकी पहिल्याखेरीज बाकीची रंगद्रव्ये ,  तसेच कॅरोटिनॉइडे ही मूलतः प्रथम वनस्पतींत संश्लेषित होतात  ( मूळ घटक द्रव्यांपासून तयार होतात). तथापि कॅरोटिनॉइडांखेरीज इतरांचे प्राण्यांतील वितरण मर्यादित आहे आणि त्यांच्या प्राण्यांतील व वनस्पतींतील शरीरक्रियावैज्ञानिक गुणधर्मासंबंधी फारशी माहितीही उपलब्ध नाही.  

  नायट्रोजनयुक्त विभागात अनेक निरनिराळ्या गटांतील रंगद्रव्यांचा समावेश होतो. टेट्रापायरोलिक रंगद्रव्यांत पॉर्फिरीन वर्गातील रंगद्रव्ये तसेच पित्तरंजके मोडतात. कित्येक प्राण्यांतील लाल व काहीतील निळया रक्तात आढळणाऱ्या हीम संयुगांचा पॉर्फिरीन वर्गातील रंगद्रव्यांत अंतर्भाव होतो ,  तर प्राण्यांच्या अनेक स्रावांत व उत्सर्जित  ( निरुपयोगी म्हणून शरीराबाहेर टाकलेल्या) द्रव्यांत पित्तरंजके असतात. मेलॅनिने ही गडद रंगद्रव्ये त्वचा ,  केस ,  पिसे ,  खवले व काही अंतर्गत पटले यांमध्ये आढळतात. ही रंगद्रव्ये ⇨टायरोसीन व इतर संबंधित ⇨ॲ मिनो अम्ले यांच्या अपघटनातील  ( रेणूचे तुकडे होण्याच्या क्रियेतील) अंत्यद्रव्ये आहेत. कित्येक ⇨प्यूरिने ही निसर्गतः पांढरी वा चंदेरी संयुगे असली ,  तरी त्यांचा खऱ्या रंगद्रव्यांबरोबर समावेश करण्यात येतो कारण कीटक ,  सीलेंटेरेट [ ⟶ सीलेंटेरेटा] ,  मासे ,  सरीसृप  ( सरपटणारे प्राणी) व उभयचर  ( जमिनीवर व पाण्यातही वास्तव्य करणारे प्राणी) यांसारख्या प्राण्यांना एकूण रंग वा रंगाचा आकृतिबंध प्राप्त होण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. याचप्रमाणे टेरिने ही पिरिमिडिनापासून तयार होणारी संयुगे बहुधा पांढरी पण कित्येकदा पिवळी ,  नारिंगी वा लाल रंगांचीही असतात. फ्लाव्हिने सर्व सजीवांमधील ऊतकांत आढळणारी रंगद्रव्ये विशेष महत्त्वाच्या जैव उत्प्रेरकांशी  ( जीवरासायनिक विक्रियेची गती बदलणाऱ्या द्रव्यांशी) संबंधित असल्याचे दिसून आले आहे. काहीशी मर्यादित प्रमाणात आढळणारी इंडिगॉइडे ही प्यूरिने ,  टेरिने व मेलॅनिने याप्रमाणेच चयापचयाची अंत्यद्रव्ये आहेत. अनेक संकीर्ण रंगद्रव्यांच्या रासायनिक संघटनाचे ज्ञान अपूर्ण असून त्यांतील बहुशः नायट्रोजनयुक्त आहेत आणि कित्येक वर्णप्रथिने [ ⟶ प्रथिने] आहेत.  

   भौतिक रंग : वस्तूच्या भौतिक रचनेचाही तिच्या रंगाशी कसा संबंध असतो ,  ते खालील विवेचनावरून लक्षात येईल.

   कित्येक वस्तूंचे पृष्ठभाग अत्यंत पातळ ,  थोडेफार पारदर्शक व एकावर एक रचलेल्या वेगवेगळ्या थरांचे बनलेले असतात. अशा पृष्ठभागावर प्रकाशकिरण पडले म्हणजे ते या वेगवेगळ्या थरांवरून अंशतः परावर्तित होतात. अशा प्रकारे परावर्तित झालेल्या किरणांचा संकलित परिणाम होऊन त्या वस्तूचा ठिकठिकाणच्या रंग ठरतो. साचलेल्या पाण्याच्या पृष्ठावर तरंगत असलेल्या तेलाच्या तवंगावर दिसणारे रंग हे याचे एक उदाहरण आहे. या आविष्काराला व्यतिकरण म्हणतात. [ ⟶ प्रकाशकी] .

   काही वस्तूंच्या पृष्ठावर एकमेकींत अत्यंत सूक्ष्म अंतर असलेल्या समांतर रेषा असतात. यावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगांत विभाजन होते  त्यामुळे वस्तूकडे पाहण्याच्या कोनानुसार निरनिराळे रंग दिसतात. अशा तऱ्हेच्या रंगांना कारणीभूत झालेल्या तत्त्वाला विवर्तन म्हणतात [ ⟶ प्रकाशकी] .  काही वस्तूंवर अशा रेषांचे एकापेक्षा अधिक गट ,  एकमेकांशी काही अंशांचा कोन करतील अशा तऱ्हेने अस्तित्वात असतात. त्यामुळे रंगांत आणखीनच विविधता येते.  

  एखाद्या भुंगेऱ्याचे नक्षीकाम असलेले पंख किंवा बारीक खवले असलेले फुलपाखराचे पंख किंवा सूर्यपक्ष्याच्या गळ्यावरील पिसे यांवर प्रकाश पडला ,  तर निरनिराळ्या ठिकाणांवरून त्यांचे निरनिराळे रंग दिसतात. इंद्रधनुष्याप्रमाणे रंगांची एक श्रेणी न दिसता सामान्यतः एका ठिकाणावरून पाहिले असता एकच रंग दिसतो आणि दृष्टीचा कोण बदलला म्हणजे निराळाच रंग दिसतो. दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या मॉर्फो या फुलपाखरात निळ्यापासून जांभळ्यापर्यंत रंग दिसून येतात आणि लाल गळ्याचा सूर्यपक्षी अथवा काही कबूतरांचा गळा यांचा झगझगीत धातवीय तांबडा रंग बदलून चकचकीत हिरवा होतो. मॉर्फो फुलपाखराच्या खवल्यांचे सूक्ष्मदर्शकाखाली जर निरीक्षण केले ,  तर त्यांवर सूक्ष्म रेषांचे दोन स्वतंत्र संच आढळतात आणि ते एकमेकांशी काटकोन करणारे असतात  यावरून सदरहू फुलपाखरात रंगांची श्रेणी न दिसता एका वेळी एकच रंग का दिसतो याचा खुलासा होतो  त्यांच्या परस्परांशी होणाऱ्या व्यतिकरणामुळे हे घडून येते. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या खवल्यांचा रंग हिरवा किंवा निळा नसून तपकिरी असतो.  

  रंगांचे जैविक महत्त्व : जीवविज्ञानदृष्ट्या रंगांचा निरनिराळ्या सदरांखाली विचार करता येईल.

  बिनमहत्त्वाचे रंग : काही रंग असे आहेत की ,  ज्यांना निवडीच्या दृष्टीने विशेष किंमत नसली ,  तरी वेगळ्या परिस्थितीतील काही पूर्वजांना कदाचित ते अतिशय महत्त्वाचे असणे शक्य आहे  अशा रंगांना ‘उदासीन रंग ’ असे नाव दिलेले आहे. फार खोल समुद्रात राहाणाऱ्या माशांच्या शरीराचा अथवा त्यांच्या काही पक्ष-अरांचा  ( परातील काट्यांचा) किंवा काही स्पर्श-प्रवर्धांचा  ( स्पर्शज्ञानाकरिता उपयोगी पडणाऱ्या विस्तारित शरीरभागांचा) झगझगीत शेंदरी रंग हा अशाच प्रकारचा रंग आहे. हे रंग आनुवंशिकतेने एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात आणि खोल समुद्राच्या गडद अंधारात ते दिसत नसल्यामुळे त्यापासून कोणत्याही तऱ्हेची हानी होत नाही आणि म्हणूनच त्यांचे विलोपन होत नाही.  

   केस ,  पिसे ,  त्वचा किंवा डोळ्यातील कनीनिका  ( मध्यभागी छिद्र असलेला पडदेवजा भाग) यांच्यातील रंगाच्या पूर्ण अभावाला विवर्णता म्हणतात. शुद्ध विवर्ण प्राण्याच्या कनीनिकेमधून रक्ताचा रंग दिसत असल्यामुळे त्यांचे डोळे गुलाबी दिसतात  हे त्यांचे वैशिष्ट्य समजले जाते. केस व पिसे पांढरी दिसतात याचे कारण हे की ,  या संरचनांमध्ये असणाऱ्या लहान मोकळ्या जागा रंगद्रव्याच्या कणिकांनी भरलेल्या असण्याऐवजी हवेने भरलेल्या असतात आणि त्यांच्यावर पडलेले सगळे प्रकाशकिरण परावर्तित होतात. [ ⟶ केस  पीस] .

  अतिकृष्णता ही विवर्णतेच्या उलट असते ,  कारण त्वचेत रंगद्रव्याच्या अभावाच्या ऐवजी काळया मेलॅनिनाचा भरपूर पुरवठा असतो  त्याने प्रकाशकिरण शोषले जातात व त्यामुळे सबंध प्राण्याला पूर्णपणे काळा रंग येतो. विवर्णता व अतिकृष्णता या दोहोंतही प्राण्याच्या शरीरावर रंग-चिन्हे स्पष्टपणे दिसणे शक्य असते  पण ती किनखाबाच्या कापडावरील वेलबुट्टीप्रमाणे म्हणजे त्याच रंगाची ,  फिकट किंवा गडद असतात  उदा. ,  रंगहीन मोराचा पिसारा पांढरा स्वच्छ असतो  पण साध्या रंगीत मोराप्रमाणे शेपटीच्या पिसाऱ्यातील प्रत्येक पिसावर डोळ्याची स्पष्ट खूण असते  पण ती पांढऱ्याच रंगाची असते. त्याचप्रमाणे काळ्या चित्याच्या अंगावर स्पष्ट काळे ठिपके असतात.

   विवर्ण किंवा अतिकृष्ण प्राणी नेहमीच्या नमुन्याबरहुकूम रंग असलेल्या संततीमध्ये उत्परिवर्तनाने  ( आनुवंशिक लक्षणात बदल घडून आल्याने) निर्माण होतात. ही जननिक परिवर्तने असतात हे उघड आहे ,  कारण ही उत्परिवर्तने वंशागमक्षम असतात. एवढेच नव्हे ,  तर त्यांच्या उत्पत्तीचे प्रमाण मेंडेल नियमांना अनुसरून असते [ ⟶ आनुवंशिकी] .  विवर्ण पक्ष्यांचे व सस्तन प्राण्यांचे कित्येक विभेद  ( स्पष्टपणे भिन्न आकार-वैज्ञानिक आणि/किंवा शरीरक्रियावैज्ञानिक लक्षणे असलेले एखाद्या प्राणि-जातीचे प्रकार) पाळीव रूपांमध्ये कायमचे स्थिर झालेले आहेत. उदा. ,  पांढरे उंदीर ,  ससे ,  कोंबड्या व कबूतरे  चंदेरी खोकड ही सामान्य लाल खोकडाची व्हल्पिस फ्लव्हस कृष्णवर्णी जात असून ती जरी जंगली संततीत तुरळक उत्पन्न होत असली ,  तरी व्यापारी दृष्टीने फायदेशीर असल्यामुळे पाळीव प्रकारांमध्ये हल्ली ती कायम झालेली आहे  एवढेच नव्हे ,  तर तिचे कित्येक वेगवेगळे विभेद आहेत [ ⟶ फर − २] .  असे उत्परिवर्ती प्राणी निसर्गात सामान्यतः आढळणाऱ्या पांढऱ्या  ( उदा. ,  बर्फाच्छादित उत्तर-ध्रुव प्रदेशात आढळणाऱ्या विविध पांढऱ्या जाती) अथवा काळ्या जातींहून वेगळे मानले पाहिजेत. रंगद्रव्याच्या अभावाच्या विविध प्रमाणांना अनुसरून प्राण्यांमध्ये रंगांच्या विविध पायऱ्या  ( स्वच्छ पांढऱ्यापासून ,  काळे डाग पडलेल्या अथवा दुरंगी  विविध छटांच्या आणि नाममात्र पांढरा रंग असणाऱ्यापर्यंत सगळ्या) आढळतात.


   बहुमूल्य रंग : ज्या रंगांमुळे शरीरक्रियात्मक गरज स्पष्टपणे भागविली जाते त्यांना बहुमूल्य रंग हे नाव दिलेले असून त्यांच्या उपयोगाच्या अनुरोधाने त्यांचे खाली दिल्याप्रमाणे वर्गीकरण केले जाते  :  

( १) संवादी रंग  : ( अ) संरक्षक  ( ज्या प्राण्यांची शिकार होते त्याचे) , ( आ) आक्रमक  ( शिकाऱ्याचे) ( २) मोही रंग ( ३) भयसूचक रंग ( ४) अनुकारी रंग ( ५) इशारा देणारे रंग व ओळख  : ( अ) चिन्हे किंवा खुणा ( ६) संभ्रमकारी रंग ( ७) लैंगिक रंग.  

संवादी वा गोपक रंजन :  जेव्हा प्राण्याचा रंग त्याच्या परिस्थितीशी अशा प्रकारे जुळणारा असतो की ,  प्राण्याच्या पार्श्वभूमीशी तो एकजीव होऊन त्याचा ठळकपणा नाहीसा होतो व त्यामुळे तो प्राणी आपल्या शत्रूंच्या नजरेत भरत नाही किंवा भक्ष्याकरिता टपून बसतो तेव्हा भक्ष्याच्या नजरेस येत नाही तेव्हा अशा रंगाला संवादी किंवा गोपक रंजन म्हणतात. पहिल्या प्रकाराला संरक्षक रंजन हे नाव दिलेले आहे. याचे उदाहरण उत्तरध्रुवीय खोकड हे त्याचे उदाहरण म्हणून देता येईल. तथापि खोलात शिरल्यावर असे स्पष्ट दिसून येईल की ,  दोन्ही प्रकार संरक्षकच आहेत ,  कारण सशाला एखाद्या प्राण्याचे भक्ष्य म्हणून बळी पडण्यापासून संरक्षण मिळणे जितके आवश्यक आहे तितकेच उपासमारीपासून बचाव होणे आवश्यक आहे.

   एकाच जातीमध्ये रंगाचे बदल दोन पद्धतींनी होऊ शकतात. पहिल्या प्रकारातील रंगांना स्थानीय रंग व दुसऱ्यातील रंगांना ऋतुनिष्ट रंग म्हणतात. पहिल्या प्रकारातील प्राण्यांच्या जाती विविध रंगांची क्षेत्रे असणाऱ्या मोठ्या भूभागावर पसरलेल्या असतात  त्यामुळे या जातींचे तलस्थ रंग जर संवादी असतील ,  तर या क्षेत्रांच्या निरनिराळ्या रंगांशी जुळण्याकरिता ते देखील बदलणे आवश्यक आहे. कित्येक टोळांचे मागचे पंख चकचकीत लाल अथवा पिवळ्या रंगाचे असतात ,  परंतु त्यांचे बाकीचे शरीर आणि पुढचे पंख जमिनीशी जुळणाऱ्या रंगाचे असतात  हे टोळ स्वस्थ बसले असताना त्यांचे मागचे पंख पुढच्या पंखांखाली झाकलेले असतात. कुरंग  ( गॅझेल) हा प्राणी मरु-अनुकूलनाचे एक विस्मयजनक उदाहरण आहे. मोठाल्या वालुकामय प्रदेशात हे प्राणी पांढऱ्या रंगाचे असतात ,  तर ज्वालामुखी पर्वतातून बाहेर पडलेल्या लाव्हा रसाने आच्छादिलेल्या प्रदेशात त्यांचा रंग गडद करडा असतो. हरिणपदी या वेलीवर आढळणाऱ्या एका जातीच्या पतंगाचा  ( हॉकमॉथ) सुरवंट पूर्ण वाढ झाल्यावर वेलीसारखा हिरव्या रंगाचा अथवा वेलीखालच्या जमिनीसारखा तपकिरी रंगाचा असतो. याचे अनुकूलन अशा प्रकारे दुहेरी असते आणि दोन्ही दशा सारख्याच प्रमाणात संरक्षक असतात  तथापि तपकिरी रंग वस्तुतः हिरव्या रंगापेक्षा जास्त प्रमाणात संरक्षक असतो ,  असे दोन गोष्टींवरून आपल्याला दिसून येईल. पहिली गोष्ट ही की ,  सुरवंटाच्या बाल्य दशेतील पहिल्या चार अवस्था हिरव्या रंगाच्या असतात आणि फक्त शेवटच्या अवस्थेतच तो तपकिरी रंगाचा होतो  तरी पण कधीकधी ही शेवटची अवस्था देखील हिरव्या रंगाचीच असते. यावरून असे म्हणता येईल की ,  तपकिरी रंग हे सापेक्षतया अगदी अलीकडील किंवा आधुनिक अनुकूलन असावे आणि मूळ हिरव्या रंगापेक्षा ते जर जास्त परिणामकारक नसते ,  तर कदाचित उत्पन्नही झाले नसते. दुसरी गोष्ट अशी की ,  हल्ली हिरव्या रंगाच्या सुरवंटांची संख्या तपकिरी रंगाच्या सुरवंटांपेक्षा पुष्कळच कमी दिसून येते  याचा गर्भित अर्थ असाच की ,  जीवन संघर्षात हिरव्या सुरवंटांपेक्षा तपकिरी सुरवंट बहुधा टिकाव धरून जिवंत राहतात.  

   पुष्कळ पक्षी  ( उदा. ,  टार्मिगन) आणि सस्तन प्राणी [ ⟶ उदा. ,  उत्तरध्रुवीय खोकड ,  रंग बदलणारा ससा  ( लेपिस टिमिडस ) आणि वीझल] ऋतुमानाप्रमाणे रंग बदलतात. उन्हाळ्यात त्यांचा रंग एक असतो ,  तर हिवाळ्यात तो बदलून वेगळाच होतो. उन्हाळ्यात जमिनीच्या अथवा खडकाच्या विविध तपकिरी छटांशी आणि हिवाळ्यात जमिनीवरील बर्फाच्या आच्छादनाशी तो जुळणारा असतो. उन्हाळ्यात वाढणारे तापमान आणि हिवाळ्यात वाढणारी थंडी ही वैयक्तिक रंगांचे बदल घडवून आणणारी तात्कालिक उद्दीपने असू शकतील  पण तापमानातील फरक हे मूळ अनुकूलनाला प्रत्यक्ष कारणीभूत होत असतील ,  असे मानता येत नाही. कारण यूरोपीय ससा हिवाळ्यात देखील आपला रंग बदलत नाही. याच्या उलट रंग बदलणारा ससा दक्षिण स्वीडनमध्ये हवामान अतिशय थंड असले ,  तरी सबंध हिवाळाभर तपकिरी रंगाचा असतो. सशाची हीच जात आल्प्स पर्वताच्या उंच भागात सहा ते सात महिने व दक्षिण नॉर्वेमध्ये नऊ महिने पांढरी असते आणि ग्रीनलंडच्या उत्तर भागात ती नेहमीच पांढऱ्या रंगाची असते. कारण तेथील बर्फ क्वचितच वितळते. लेमिंग हा कृंतक  ( भक्ष्य कुरतडून खाणारा) प्राणीदेखील हिवाळ्यात रंग बदलून पांढरा होतो  परंतु प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की ,  लेमिंग हिवाळ्यात एखाद्या खोलीत बंदिस्त ठेवला ,  तर तो आपला रंग बदलत नाही  पण त्याला खोलीच्या बाहेर आणून थंडीत उघड्यावर ठेवला ,  तर त्याचा रंग पांढरा होतो  थंडीमुळे त्वचा उद्दीपित होऊन तिच्यावर पांढरे केस उगवतात.  

   प्राणिसमूहाचे मानक रंग : प्राणी ज्या जीवनविषयक विविध परिस्थितींत आढळतात. त्यांपैकी प्रत्येक परिस्थिती तिच्यात राहणाऱ्या प्राण्यांवर काही निश्चित पद्धतींनी आपला ठसा उमटविते  यामुळे या प्राण्यांच्या सर्वसाधारण स्वरूपावरून त्यांच्या निवासस्थानाविषयी बहुधा सहज तर्क करता येतो आणि रंगांच्या बाबतीत तर हे विशेषच खरे असल्याचे दिसून येते. उदा. ,  कुरंग ,  उंट व सिंह यांच्यासारखे रुक्ष प्रदेशात राहणारे प्राणी बहुतकरून जरद्या  ( सोनेरी वा पिवळसर) अथवा करड्या रंगाचे असतात  सपाट अथवा मैदानी प्रदेशात राहणारे प्राणी वाळलेल्या गवताच्या रंगाचे असतात  जंगलात राहणारे प्राणी पुष्कळदा वाघ किंवा झीब्रा यांच्यासारखे पट्टेदार असतात. पशुसंग्रहालयात हे रंगांचे पट्टे जरी ठळकपणे उठून दिसत असले ,  तरी ते सूर्यप्रकाशाचे पट्टे आणि जंगलातील उंच वाढलेल्या गवतावरील कवडसे व सावल्या यांच्याशी जुळणारे असतात. उलटपक्षी ,  झीब्रा उघड्यावर जसजसा दूर जातो तसतसे त्याचे पट्टे अस्पष्ट किंवा अंधुक होत जाऊन तो एकसारख्या करड्या रंगाचा दिसतो. − अरण्यात राहणारे प्राणी बहुधा ठिपकेदार असतात आणि हे ठिपके पानांमधून पडणाऱ्या कवडशांशी जुळणारे असतात. चित्ता ,  जॅगुआर ,  पिंगट मृग  ( हा चितळाएवढा असून शिंगे चपटी असतात) आणि बोआ  ( एक प्रकारचा अजगर) ही अशा प्रकारची उदाहरणे होत. टॅपीर व सिंह यांचे बच्चे ठिपकेदार असतात  पण प्रौढ प्राण्यांचा रंग एकसारखा असतो ,  कदाचित याचे काही तरी परंपरागत महत्त्व असणे शक्य आहे. अरण्यातील पुष्कळ कीटकांचा रंग हुबेहूब पानांच्या हिरव्या रंगासारखा असतो. समशीतोष्या प्रदेशातील पक्ष्यांचे रंग क्वचितच असे असतात  परंतु उष्ण कटिबंधातील सतत हिरव्यागार असणाऱ्या अरण्यांत वेगवेगळ्या आणि एकमेकांशी काही संबंध नसलेल्या कुलांतील हिरव्या रंगाचे पक्षी मुबलक असतात.


   उत्तरध्रुवीय प्राणी पांढरे असतात  पण सील व वॉलरस यांच्यासारखे जलीय प्राणी याला अपवाद आहेत ,  तरी पण यांच्यापैकी काही अगदी बाल्यावस्थेत पांढऱ्या रंगाचे असतात  परंतु ध्रुवीय अस्वल जर तपकिरी किंवा काळ्या रंगाचे असते ,  तर त्याची नेहमी उपासमार झाली असती आणि याच्या उलट एखादा पांढरा प्राणी बर्फाळ प्रदेश सोडून दुसरीकडे गेला ,  तर त्याचीही हीच अवस्था होईल.  

    समुद्र व हवा यांत राहणाऱ्या आक्रमक वृत्तीच्या वा भटक्या असलेल्या प्राण्यांचे रंग सारखेच असतात. पुष्कळ समुद्री पक्ष्यांची वरची बाजू पोलादी करड्या किंवा निळ्या रंगाची व खालची पांढऱ्या रंगाची असते. यामुळे वरून पाहिले असता त्याचा रंग समुद्राच्या रंगाशी जुळणारा आणि खालून पाहिले असता आकाशाच्या रंगाशी जुळणारा असतो. गल  ( कुरव) व टर्न  ( कुररी) हे अशा प्रकारची रंगव्यवस्था असणारे पक्षी आहेत. निळा-मासा आणि मॅकरेल यांच्यासारख्या पुष्कळ माशांची रंगव्यवस्था ते जलीय प्राणी असले ,  तरी याच कारणामुळे वरच्यासारखीच असते. ग्लॉकस या तलप्लावी  ( सागराच्या मध्यम खोलीत व पृष्ठभागावरील पाण्यात राहणाऱ्या) गोगलगाईचे उदाहरण कुतुहलजनक आहे. पोटाकडचा भाग वर करून समुद्राच्या पृष्ठावर ती तरंगत असते. हिची रंगव्यवस्था वर दिलेल्या उदाहरणाच्या अगदी उलट असते म्हणजे तिच्या खालच्या  ( पोटाकडच्या) भागाचा रंग निळा आणि वरच्या भागाचा रुपेरी पांढरा असतो. गोगलगाईच्या शरीररचनेच्या दृष्टीने हे रंग जरी उलटे असले ,  तरी तिच्या सवयीच्या दृष्टीने ते स्वाभाविकच असतात.

  निशाचर प्राण्यांचे रंग त्यांना उपयोगी पडतील असेच ठिपकेदार तपकिरी अथवा करडे असतात. अशा प्रकारची रंगव्यवस्था रानमांजर किंवा घुबड यांत दिसून येते. शिकारीच्या पाळतीवर असताना असे प्राणी भक्ष्याला ओळखू येत नाहीत.

   भयसूचक अथवा प्रगट करणारे रंग :  विषारी प्राणी व रुचीला बेचव लागणारे प्राणी अशा दोन्ही प्रकारच्या प्राण्यांच्या शरीराचे ठळक तांबडे व पिवळे रंग हे या प्रकारचे होत. प्रवाल सर्प ,  तुंबसर  ( मोठी विषारी गांधील माशी) ,  पट्टेदार सॅलॅमँडर ,  गिला मॉन्स्टर आणि पुष्कळ सुरवंट व फुलपाखरे ही याची उदाहरणे होत. वेळेवरच त्यांची ओळख पटली ,  तर या प्राण्यांना वस्तुतः हल्ला होण्याची भीती नसते आणि म्हणूनच त्यांच्या अपायकारक प्रकृतिधर्माची विशेष स्पष्टपणे प्रसिद्धी होणे आवश्यक असते. एखाद्या ओंगळ फुलपाखराला एखाद्या पक्ष्याने मारून नंतर खाल्ले नाही ,  तर त्यात फुलपाखराच्या दृष्टीने काहीच फायदा नसतो  मृत्यू टाळणे हीच खरी महत्त्वाची गोष्ट असते. प्राणघातक इजा होण्याच्या पूर्वीच त्याच्या गुणधर्मांची एकदम ओळख पटणे आवश्यक असते. कोणत्या फुलपाखराच्या वाटेस जावयाचे नाही हे प्रत्येक पक्ष्याच्या मनावर बिंबविण्याकरिता काही फुलपाखरांचा बळी पडणे कदाचित आवश्यकही असेल  उलटपक्षी ,  वंशागत उपजत बुद्धीमुळेही पक्षी भडक रंगांच्या प्राण्यांच्या वाटेस जात नसेल. काही झाले तरी ,  बहुतेक सगळ्या हिंस्र प्राण्यांना त्यांच्या परिसराच्या क्षेत्रात असणाऱ्या भयसूचक रंग असलेल्या प्राण्यांची ओळख पटते व ते त्यांच्या वाटेस जात नाहीत  पण अपरिचित शत्रूला टाळणे हे कटू अनुभव घेऊनच त्यांना शिकावे लागले. प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की ,  भुकेलेल्या प्राण्यांना एकदा किंवा दोनदा फसवून जर भडक रंग असलेले बेचव सुरवंट खायला दिले ,  तर अनुभव घेऊन ते निवड करायला शिकतात आणि बव्हंशी रंगावरूनच ते ही निवड करतात. सापेक्षतया जड बुध्दीच्या माशांच्या बाबतीतही हेच दिसून येते.  

   भयसूचक रंजन हा जरी नैसर्गिक निवडीचा परिणाम असणे शक्य असले ,  तरी क्षेप्यद्रवातील रंगद्रव्याच्या मुबलक प्रमाणामुळे प्राणी एकाच वेळी दिसायला ठळक व खायला बेचव होणे शक्य असते ,  असे सुचविले गेले आहे  पण यामुळे अनुकारी रंजनाचा  ( अनुकारी रंगामुळे स्वादिष्ट किंवा खाण्यास योग्य असलेला कीटक जास्त ठळक दिसतो आणि म्हणून शत्रूपासून त्याचा बचाव होतो) उलगडा होत नाही  त्याचप्रमाणे संरक्षणाची आयुधे असणाऱ्या भक्षणीय  ( खाण्याला योग्य) प्राण्यांमध्ये भयसूचक रंजन का उत्पन्न व्हावे याचादेखील यामुळे पुरेसा उलगडा होत नाही.  

   कधीकधी भयसूचक रंजनाच्या बरोबरच प्राणी आपल्या शरीराचा असा डौल आणतो की ,  त्यामुळे भयसूचक रंगाचा परिणाम वाढतो किंवा बळावतो  कदाचित शत्रूच्या उरात धडकी भरावी म्हणून ही योजना असावी. नागाचे फणा काढणे ही याचे उदाहरण म्हणून देता येईल. मानेच्या भागातील बरगड्या पसरल्यामुळे फणा तयार होऊन तिच्या वरच्या पृष्ठावर १० चा आकडा स्पष्टपणे दिसतो. स्मेरिंथस या छोट्या पतंगाच्या मागच्या पंखांवर डोळ्यासारखे दिसणारे मोठे ठिपके असतात  हा कीटक स्वस्थ बसलेला असताना मागची पंखांची जोडी पुढच्या पंखांच्या जोडीने झाकलेली असल्यामुळे हे ‘डोळे’ दिसत नाहीत  पण याला छेडल्यानंतर ,  वटारलेल्या डोळ्यांसारखे दिसणारे हे मोठे ठिपके ठळकपणे दिसतील अशा तऱ्हेने तो आपले पंख उभारतो  त्यांच्यावर झडप घालणाऱ्या प्राण्यावर या वटारलेल्या डोळ्यांचा खात्रीने परिणाम होत असला पाहिजे.  

   अनुकारी रंजन :  एखाद्या प्राण्याच्या इतर कोणत्याही सजीव अथवा निर्जीव पदार्थाशी असणाऱ्या रंगाच्या साम्याला अनुकारी रंजन हे नाव दिलेले आहे. हे रंजन गोपक किंवा छद्मी अथवा भयसूचक असू शकते.  ( अनुकारी रंजनाविषयी अधिक माहिती ‘अनुकृति’ या नोंदीखाली पहावी).  

   इशारा देणारी चिन्हे :  संघचारी अथवा कळप करून राहणारे प्राणी संकटाच्या प्रसंगी एकमेकांना मदत करीत असल्यामुळे त्यांना या इशाऱ्याच्या चिन्हांचे फार महत्त्व आहे  काही मृगांच्या शेपटीचे खालचे पृष्ठ पांढऱ्या रंगाचे असते. यांचे कळप चरत असताना त्यांपैकी एखाद्याला जर संकटाचा संशय आला किंवा धोक्याचा सुगावा लागला ,  तर तो आपली शेपटी धोक्याच्या निशाणाप्रमाणे उंच करतो. यामुळे त्याच्या शेपटीची खालची पांढरी बाजू कळपातील सगळ्यांच्या नजरेस पडते व हा धोक्याचा इशारा आहे हे समजून सगळा कळप पळून एखाद्या सुरक्षित जागी जातो. लेपिस सिल्व्हॅटिकस या सशाची शेपटी काळोखात चमकते ,  त्यामुळे त्याची पिल्ले त्याच्या मागोमाग जाऊन सुरक्षित ठिकाणी पोहचू शकतात.

  ओळख चिन्हे :  एकाच जातीच्या प्राण्यांची एकमेकांना ओळख पटण्याकरिता या चिन्हांचा उपयोग होतो. ओहोळांमधून नेहमी आढळणारा साल्व्हेलिनस फाँटिनॅलिस हा ट्राउट मासा ,  त्याच्या बाजूवर असणाऱ्या तांबड्या व नारिंगी रंगांच्या ठिपक्यांमुळे फार सुंदर दिसतो. सर्वसाधारणपणे संवादी रंजनाचा नियम त्याला लागू पडत असल्यामुळे सावट पडलेल्या डबक्यात जर हा मासा असला ,  तर वर असणाऱ्या शत्रूला तो दिसत नाही. कारण याची पाठ काळपट रंगाची असते. त्याचप्रमाणे त्याचा खालचा भाग फिकट रंगाचा असल्यामुळे खालून पहाणाऱ्याला तो दिसत नाही  परंतु त्याच्याच पातळीत असणाऱ्या त्याच्या जातीच्या माशांना त्याच्या बाजूवर असलेले ठिपके स्पष्टपणे दिसतात. पुष्कळ कीटकांवर अशाच प्रकारच्या ओळख खुणा असतात आणि पुष्कळदा हे कीटक उडत असतानाच  ( उदा. ,  पुष्कळ फुलपाखरे व पतंग) त्या दृष्टीस पडतात. कारण या प्राण्यांचे रंग कितीही संरक्षक असले ,  तरी साधारणपणे या वेळी ते उपयोगी पडत नाहीत. अशा परिस्थितीत संवादी रंग प्राण्याच्या उघड्या भागावर असतात. पतंग स्वस्थ बसलेला असताना पंख पसरलेले असून पंखांची मागची जोडी पुढच्या जोडीने झाकलेली असते. म्हणून पुढच्या पंखांच्या वरच्या पृष्ठाचे रंग संवादी असतात. फुलपाखरू विश्रांती घेत स्वस्थ बसलेले असताना त्याचे पंख  ( पुढची व मागची जोडी) मिटलेले आणि ताठ उभे असतात  चारही पंखांची खालची पृष्ठे उघडी असतात व त्यांचे रंग संवादी असतात.


   संभ्रमकारी रंजन :  पुष्कळ प्राण्यांत  ( उदा. ,  पतंग व फुलपाखरे) ओळख रंग अत्यंत स्पष्ट असल्यामुळे ,  उडत असताना ,  आपल्याला ते फार दूरपर्यंत सहज दिसू शकतात. असा कीटक एखाद्या ठिकाणी एकदम बसल्यावर त्याचा झगझगीत रंग तात्काळ नाहीसा होतो आणि तो कीटक कोठे आहे ते आपल्याला कळत नाही  कारण बसलेल्या कीटकाच्या उघड्या भागाचे रंग तो ज्या ठिकाणी बसतो त्याच्याशी जुळणारे असतात. कीटक उडत असताना आपण त्याच्या संवादी रंगांवरच जर दृष्टी केंद्रित केली असती ,  तर तो बसल्यावर आपल्याला लवकर ओळखू आला असता  पण झगझगीत रंगाचे एकदम नाहीसे होणे मनुष्याला गोंधळात पाडते कारण तो झगझगीत रंगाचा कीटक शोधीत असतो आणि त्याच्या बदललेल्या रंगाकडे दुर्लक्ष करतो  या कीटकांचा पाठलाग करणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत देखील हेच घडत असले पाहिजे. अशा प्रकारचे रंजन केवळ कीटकांपुरतेच मर्यादित नाही  काही काळसर रंगाच्या सरड्यांच्या शेपटीची खालची बाजू झगझगीत रंगाची असते. हे सरडे धावत असताना त्यांची शेपटी वर उचललेली असल्यामुळे तिची खालची चकचकीत बाजू आपल्याला दिसते  परंतु ज्या क्षणी ते थांबवून मातीत किंवा वाळूत दबा धरून बसतात ,  तेव्हा शेपटी खाली करतात  शेपटीच्या वरच्या बाजूचा व एकंदर शरीराचा रंग मातीशी किंवा वाळूशी इतका जुळणारा असतो की ,  धावताना थांबल्याबरोबर ते पूर्णपणे नाहीसे होतात.

   लैंगिक रंग :  पक्षी व इतर प्राण्यांचे नर मादीपेक्षा पुष्कळदा जास्त ठळक रंगाचे असतात  मोर हे याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मोराचा  ( नराचा) रंग जितका भपकेदार असतो तितकाच लांडोरीचा मळकट किंवा फिकट असतो. अशी आणखी बरीच उदाहरणे देता येतील. नरांचा रंग ठळक का असावा किंवा त्यांचे रंग उठून का दिसावेत याचे कारण जरी स्पष्टपणे कळलेले नसले. तरी मादीचा रंग संरक्षक असणे प्रजातीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे  मादीने घरट्यात अंडी घातलेली असली किंवा ती जर संभाव्य माता असली ,  तर हे महत्त्व जास्तच वाढते. लैंगिक परिपक्वता न आलेल्या तरुण नरांचे रंगदेखील संरक्षक असतात व म्हणून पुष्कळदा अपक्व तरुण नर व मादी यांतला फरक ,  प्रत्यक्ष शारीरिक परीक्षणाखेरीज कळणे फार कठीण जाते.

   मृग ,  सिंह व प्यूमा यांच्या बच्च्यांच्या अंगावर ठिपके असतात ,  हे बहुतेकांना माहीतच आहे. ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या टॅपिराच्या पिल्लाच्या अंगावरील पट्टे अव्यवस्थित असतात  तसेच रानडुकराच्या पिल्लाच्या अंगावरचेही असतात. ज्याच्यापासून आज अस्तित्वात असलेली सगळी पाळीव कोंबडी उत्पन्न झाली त्या रानकोंबड्याचा  ( प्रौढ) रंग बव्हंशी लढाऊ  ( झुंजणाऱ्या) कोंबड्यांच्या रंगासारखाच असतो. उलटपक्षी ,  नुकतीच जन्मलेली कोंबडीची पिल्ले बहुतेक सगळ्या पाळीव जातींप्रमाणे पिवळ्या किंवा गडद रंगाची असण्याऐवजी त्यांच्या पाठीवर दोन लांब काळे पट्टे असतात. सर्व जातींच्या पिल्लांमध्ये आढळणारे अशा प्रकारचे रंग संरक्षणाच्या व पिल्ले ज्या परिस्थितीत वाढत असतात त्या परिस्थितीच्या दृष्टीने प्रौढांच्या रंगापेक्षाही जास्त महत्त्वाचे होत ,  यात संशय नाही.

   पतंग किंवा फुलपाखरे यांच्यासारख्या वरच्या दर्जाच्या कीटकांमध्ये अंडे ,  डिंभ  ( अळ्या) ,  कोश आणि प्रौढ कीटक यांच्यापैकी प्रत्येकात निकट परिस्थितीच्या गरजेप्रमाणे तिच्याशी जुळणारे संरक्षक रंजन असते आणि ते प्रत्येक अनुक्रमिक अवस्थेत स्पष्टपणे वेगवेगळे असते. या रंगांमुळे प्रत्येक अवस्थेला टिकून राहाण्यात म्हणजेच जगण्याच्या कामी निःसंशय मदत होत असली पाहिजे.  

    रंजनाची जैविक कारणे : काही प्रकारचे रंजन प्राण्यांच्या शरीरात असलेल्या रासायनिक द्रव्यावर अवलंबून असते आणि प्राण्याच्या शरीराचा रंग केवळ या रासायनिक द्रव्याच्या प्रकाश शोषणक्षमतेमुळेच उत्पन्न होतो. लोहाच्या ऑक्साइडाचा रंग तांबडा असतो म्हणून सगळ्या पृष्ठवंशी प्राण्यांच्या रक्ताचा रंगही लाल असतो व तांब्याच्या ऑक्साइडाचा रंग निळसर हिरवा असल्यामुळे ऑक्टोपसाच्या रक्ताचा रंगही तोच असतो. पुष्कळ प्राण्यांच्या आंतरिक अंगाचा रंग ,  प्राणी ज्या प्रकारचे अन्न खातो त्याच्या गुणधर्मामुळे सर्वस्वी उत्पन्न झालेला असतो. अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स राज्यातील काही ओढ्यांत फारच थोडे क्रस्टेशियन प्राणी आहेत ,  म्हणून या ओढ्यांत राहणाऱ्या ट्राउट माशांच्या अन्नात हे प्राणी फारसे नसतात ,  यामुळे या ट्राउट माशांचे मांस अगदी फिकट रंगाचे असते  पण इतर ठिकाणच्या सरोवरांत क्रस्टेशियन प्राणी मुबलक असल्यामुळे तेथे राहणाऱ्या ट्राउट माशांच्या अन्नात यांचे भरपूर प्रमाण असते म्हणून या माशांचे मांस गडद गुलाबी रंगाचे असते. गारपाइक माशाची हाडे हिरव्या रंगाची असतात कारण काही शरीरक्रियात्मक परिस्थितींत हिरव्या व्हिव्हिऍनाइट या द्रव्याचे हाडांमध्ये निक्षेपण  ( साचण्याची क्रिया) होते. रंगद्रव्ये ही मुख्यतः अपशिष्ट उत्पाद ,  संचित द्रव्य अथवा प्राण्यांच्या चयापचय क्रियेमुळे उत्पन्न झालेले उपोत्पाद असतात आणि पुष्कळदा त्यांच्यामुळे उत्पन्न झालेल्या रंगांना प्राण्याच्या दृष्टीने काही महत्त्व नसते.  

   रंगांना संरक्षक अथवा भयसूचक महत्त्व असण्याखेरीज इतर वास्तविक मूल्ये असू शकतात  तंत्रिका तंत्राच्या  ( मज्जासंस्थेच्या) अंतांगांशी कधीकधी संबद्ध असणारे निश्चित स्थानीकृत रंजकद्रव्याचे असलेले बिंदू हे याचे उदाहरण म्हणून देता येईल. या बिंदूतील रंगद्रव्य प्रकाश शोषून घेऊन अप्रत्यक्षपणे तंत्रिकेचे उद्दीपन करतो आणि अशा प्रकारे प्रकाशग्राहक अंगाचे कार्य करतो. सगळ्या डोळ्यांची मूळ योजना हीच असते  परंतु काही प्रकारांत साहाय्यक अंगे उत्पन्न होतात  हे खरे डोळे नसतात. परंतु त्यांचा प्रकाशग्राहक म्हणून उपयोग होतो. [ ⟶ डोळा] .

   फर किंवा पिसे यांत आढळणारे रंगद्रव्य उष्णता शोषून घेते किंवा त्याच्यावरून उष्णतेचे परावर्तन होते आणि यामुळे संवादी रंजनाच्या कार्याच्या भरीला याचाही प्राण्याला उपयोग होतो. याचे उदाहरण ओसाड प्रदेशातील प्राण्यांचे वेगवेगळे फिकट करडे रंग हे होय. निग्रो आणि इतर काळ्या माणसांमध्ये असलेले काळे रंगद्रव्य माणसाच्या स्वास्थ्याला अपायकारक असलेल्या प्रकाशाच्या जंबुपार  ( दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांना अपारदर्शक असते  म्हणून उष्ण प्रदेशात राहणाऱ्या गोऱ्या माणसांपेक्षा काळ्या माणसांना ऊष्माघात होण्याची शक्यता कमी असते.

   बाह्य रंगदीप्ती उत्पन्न करणाऱ्या रेखांकनाची किंवा तत्सम संरचनात्मक लक्षणांची तरंगांच्या खुणांशी अथवा शंख किंवा शिंपांवरील वृद्धिरेषांसारख्या वाढीच्या  ( वृद्धीच्या) लयबद्धतेशी तुलना करण्यात आलेली आहे आणि रंगाची मांडणी संकेंद्री  ( एकच केंद्र असलेल्या) रेषांसारखी किंवा एकमेकींना छेदून जाणाऱ्या शलाकांसारखी असली ,  तर त्याबाबतीतही हेच लागू असणे संभवनीय आहे.


    रंजनाचे मूल्य : पुष्कळ वेळा प्राण्यांच्या रंजनाला खरेखुरे मोल असते आणि जीवनसंघर्षात टिकाव धरून जिवंत राहण्याच्या कामी रंगाचा महत्त्वाचा भाग असतो. तथापि प्रत्येक उदाहरणात तो कार्यप्रवर्तक असतोच असे नाही  कारण उच्च प्राण्यांच्या हालचालीचा पल्ला इतका विस्तृत असतो व ते एकसारखे इतक्या वेगवेगळ्या भूप्रदेशांवरून आणि विविध परिस्थितींतून जात असतात की ,  गोपक रंजनाची योजना करण्याचे काम अतिशय कठीण होते. प्राणिसंग्रहोद्यानात अत्यंत ठळकपणे दिसून येणारा प्राणी झीब्रा हाच असावा असे वाटते. प्रश्न असा उत्पन्न होतो की ,  झिब्याच्या या प्रकारच्या रंजनाला  ( पट्ट्यांना) गोपक रंग अथवा ओळख खुणा म्हणून किती महत्त्व आहे ,  या बाबतीत उलटसुलट पुरावे दिले गेले आहेत. काही निरीक्षकांच्या मताने झिब्र्याच्या विशिष्ट रंजनामुळे पुढील तीन परिस्थितींत तो दिसेनासा होतो  :  उघड्या मैदानात भर दुपारी काही अंतरावर ,  तिन्ही सांजा किंवा चांदण्या रात्री अगदी जवळ असला तरी आणि झुडपांच्या दाट जाळीत असताना. याच्या उलट एका सुप्रसिद्ध निरीक्षकाने लिहिले आहे की ,  ‘मी हजारो झीब्रे वेगवेगळ्या परिस्थितींत पाहिले ’ आहेत ,  पण केव्हाही भर दुपारी उघड्या मैदानात ,  कितीही अंतरावर शरीराच्या रंजनामुळे झीब्रा अदृश्य झाल्याचे मला दिसून आले नाही ’ .  या निरीक्षकाने हे मान्य केले आहे की ,  बऱ्याच लांब अंतरावर असलेल्या झिब्र्याचे पट्टे दिसत नाहीत  पण त्याच्या एकसारख्या होणाऱ्या हालचाली आणि शेपटी जोराने इकडून तिकडे फिरविण्याची त्याची सवय यामुळे चंद्रप्रकाशात देखील तो ओळखू येतो. शिवाय ,  सिंह मुख्यतः वासावरूनच रात्री झिब्र्याची शिकार करतात किंवा झिब्र्याच्या पाणी पिण्याच्या जागी दबा धरून बसतात. या सगळ्या उलटसुलट पुराव्याचा निष्कर्ष हाच की ,  झिब्र्याला या पट्ट्यांचा गोपनासाठी विशेषसा उपयोग होत नाही.  

या पट्ट्यांच्या ओळख खुणा म्हणून होणाऱ्या उपयोगाच्या बाबतीत ई. सेलूस या निरीक्षकाने मत असे आहे की ,  त्या दृष्टीने देखील त्यांचा फारसा उपयोग होत नाही. प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की ,  झीब्रे इतके तीक्ष्ण दृष्टीचे व तल्लख बुद्धीचे असतात की ,  आपल्या जातीच्या व्यक्ती कोणत्या व इतर जातीच्या कोणत्या हे त्यांना चटकन कळते.  

तथापि ,  रंग जर संकट काळी पक्ष्याचे अथवा प्राण्याचे ,  त्याच्या स्वतःच्याच नव्हे ,  तर सर्व प्रजातीच्या दृष्टीने  ( उदा. ,  विणीच्या अथवा अंडी उबविण्याच्या काळात) संरक्षण करणारा असला व इतर वेळी त्याच्यापासून मिळणारे संरक्षण अपुरे पडत असले ,  तरी त्याचे महत्त्व पूर्णपणे सिद्ध होते.

रंगाच्या उत्पत्तीचे आद्य कारण काहीही असो पण गोपन ,  भयसूचन किंवा इतर कोणत्याही कारणांकरिता झालेल्या त्याच्या अनुकूलनाची अंतिम पूर्तता नैसर्गिक निवडीच्या क्रियेने झाली असली पाहिजे.   

 कर्वे ,  ज. नी.