योहानसन (योहान्सेन), व्हिल्हेल्म लूदव्हीग : (३ फेब्रुवारी १८५७–११ नोव्हेंबर १९२७). डॅनिश वनस्पतिवैज्ञानिक आणि आनुवंशिकीविज्ञ. त्यांनी वनस्पतींच्या आनुवंशिकतेविषयी केलेल्या प्रयोगांमुळे ह्यूगो द व्ह्‌रीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताला [जनन कोशिकेतील–पेशींतील–आनुवंशिक घटकांत वा एककांत अचानकपणे होणाऱ्या पृथक बदलांमधून आनुवंशिकतेत बदल घडून येतात असे प्रतिपादणाऱ्या सिद्धांताला ⟶ उत्परिवर्तन] चांगलीच पुष्टी मिळाली. या कल्पनेमुळे नैसर्गिक निवडीच्या मंद प्रक्रियेने नवीन जाती निर्माण झाल्या व चार्ल्स डार्विन यांच्या सिद्धांताविषयी प्रथमतः संशय निर्माण झाला होता.

योहानसन यांचा जन्म कोपनहेगन येथे आणि शिक्षण कोपनहेगन, जर्मनी व फिनलंड येथे झाले. ते डेन्मार्कमधील कृषी संस्थेत आणि कोपनहेगन विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी प्रथम वनस्पतींविषयीच्या क्रियाविज्ञानाशी संबंधित असे संशोधन केले परंतु नंतर त्यांनी केवळ आनुवंशिकतेविषयीचे प्रायोगिक अध्ययन व संशोधन केले आणि ते या विषयातील एक अग्रगण्य अधिकारी व्यक्ती झाले. एका प्रकारच्या घेवड्याच्या (प्रिन्सेस बीन्स) अभ्यास केल्यावर त्यांना पुढील गोष्ट आढळली : एकाच बीजातून क्रमवार निर्माण होणाऱ्या बीजांमध्ये विशुद्ध वंशपरंपरा असते. या वंशपरंपरेत सर्वांचे आनुवंशिक घटक तेच असतात. लहान अथवा मोठ्या आकारमानांच्या घेवड्यांपासून लहान अथवा मोठी झुडपे (वनस्पती निर्माण करता येतात, असे १९०५ च्या सुमारास त्यांनी दाखवून दिले. यावरून त्यांनी पुढील निष्कर्ष काढला : या वनस्पती दृश्य लक्षणांच्या बाबतीत अथवा त्यांच्या सरूपविधांच्या बाबतीत भिन्न असल्या, तरी त्यांचे आनुवंशिक घटक एकसारखे असतात म्हणजे त्यांच्यात सर्वसामान्य जनुकविधा (या लक्षणांच्या संदर्भातील व्यक्तीमधील जीन) टिकून असते. त्यांनी सुचविलेल्या फेनोटाइप (सरूपविधा) व जिनोटाइप (जनुकविधा) या संज्ञा जननविज्ञानात रूढ झाल्या आहेत, तसेच जीन (जनुक) ही संज्ञाही १९०९ मध्ये त्यांनीच प्रथम वापरली [⟶ आनुवंशिकी ]. जनुकविधांमध्ये उत्परिवर्तनाने बदल होऊ शकतो म्हणजे एखादे नवीन जातिलक्षण अचानक, आपोआप आढळते, या द व्ह्‌रीस यांच्या शोधाला यांनी पुष्टी दिली. हे नवे लक्षण प्रथमतः जरी नैसर्गिक निवडीशी संबंधित नसले, तरी नंतर ते नैसर्गिक निवडीशी निगडीत होते, कारण डार्विन यांनी वर्णिल्याप्रमाणे ते नंतरच्या पिढ्यामध्ये टिकून राहते किंवा नाहीसे होते. लिलॅक व इतर वनस्पतींना त्यांच्या नैसर्गिक पक्व कालापूर्वीच ईथरच्या साहाय्याने कृत्रिम रीतीने फुलांचा बहर आणता येतो, असेही योहानसन यांनी दाखवून दिले होते. ते कोपनहेगन येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि. ठाकूर, अ. ना.