यलोस्टोन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक नदी, याच नावाचे सरोवर व देशातील सर्वांत मोठे राष्ट्रीय उद्यान. वायोमिंग, माँटॅना व नॉर्थ डकोटा राज्यांतून वाहणारी ही मिसूरीची प्रमुख उपनदी आहे. यलोस्टोन नदी वायोमिंग राज्यातील ॲबसारका पर्वतश्रेणीत उगम पावते. लांबी १,०८० किमी. जलवाहन क्षेत्र १,८१,३०० चौ. किमी. ही नदी उत्तरेस यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानातील यलोस्टोन सरोवरातून वाहत जाते किंबहुना या नदीमुळेच यलोस्टोन सरोवराची निर्मिती झाली आहे. वायोमिंग राज्याच्या वायव्य भागात, यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानातील पठारी प्रदेशात सस.पासून २,३५६ मी. उंचीवर यलोस्टोन सरोवर निर्माण झालेले असून उत्तर अमेरिकेतील सर्वाधिक उंचीवरील हे सर्वांत मोठे सरोवर आहे. सरोवराची लांबी ३२ किमी. रुंदी २३ किमी. कमाल खोली ९१ मी., पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ३६० चौ. किमी. व काठाची एकूण लांबी १७७ किमी. आहे. सरोवरात तुतारीसारखा आवाज करणारे हंस आणि कॅनडियन हंसी हे दुर्मिळ पक्षी व ट्राउट मासे आढळतात.

यलोस्टोन सरोवरातून उत्तरेच्या दिशेस बाहेर पडून अपर फॉल्स (उंची ३३ मी.) व लोअर फॉल्स (९४ मी.) या दोन प्रेक्षणीय धबधब्यांवरून दरीत झेपावणारी ही नदी यलोस्टोनच्या ग्रँड कॅन्यनमध्ये प्रवेश करते. ग्रँड कॅन्यनच्या उत्तर टोकाशी ४० मी. उंचीचा ‘टॉवर फॉल्स’ आहे. ग्रँड कॅन्यनची लांबी ३८ किमी. व खोली सामान्यतः सु. ३०० मी. असून काही ठिकाणी ती ६१० मी.पर्यंत आढळते. ग्रँड कॅन्यनमधील उभ्या तटाच्या पिवळ्या रंगाच्या खडकांवरूनच येथील उद्यानाला ‘यलोस्टोन’ हे नाव देण्यात आले आहे. गार्डनर (माँटॅना) येथे राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडून नदी उत्तरेस लिव्हिंग्स्टनकडे वाहत जाते. लिव्हिंग्स्टन येथून ईशान्यवाहिनी होऊन बिलिंग्झ, माइल्झ सिटी व ग्लेंडाइव्ह या शहरांजवळून पुढे गेल्यावर माँटॅना राज्याची सरहद्द ओलांडून नॉर्थ डकोटा राज्यात ब्यूफोर्डजवळ ती मिसूरी नदीला मिळते. गार्डनरपर्यंत नदी खूपच खडबडीत भागातून जात असल्याने तीतून जलवाहतूक होऊ शकत नाही. गार्डनरपासून मिसूरी संगमापर्यंत नदीच्या काठावर नदीला समांतर असे रस्ते व लोहमार्ग आहेत. यलोस्टोनला बहुतेक उपनद्या दक्षिणेकडून येऊन मिळतात. लमार, क्लार्कफोर्क, बिगहॉर्न, टंग व पाउडर ह्या यलोस्टोनच्या प्रमुख उपनद्या आहेत. सृष्टिसौंदर्याने नटलेल्या यलोस्टोन नदीचे खोरे जलसिंचनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. नदीवर जलसिंचन प्रकल्प उभारले असून त्यांपासून नदीचे बहुतांश खोरे ओलिताखाली आणले आहे.

यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान हे देशातील सर्वांत मोठे, जुने व रमणीय उद्यान असून ते वायोमिंग (वायव्य भाग), माँटॅना (दक्षिण भाग) व आयडाहो (पूर्व भाग) या तीन राज्यांत विस्तारलेले आहे. क्षेत्रफळ ८,९८,३५३ हेक्टर असून त्यांपैकी सर्वांत जास्त क्षेत्र वायोमिंग राज्यात आहे. सुमारे ५ कोटी वर्षांपूर्वीपासून लाव्हारसाचे संचयन होऊन निर्माण झालेल्या एका विस्तृत अशा पठारी प्रदेशावर हे राष्ट्रीय उद्यान आहे. हे पठार गॅलटिन, बेअरटूथ व ॲबसारका पर्वतांनी व जॅक्सन होल उच्च भूमीने वेढलेले असून यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानाच्या सभोवती कस्टर, गॅलटिन, शोशोनी, टीटॉन, टारघी व बीव्हरहेड ही राष्ट्रीय अरण्ये आहेत. या राष्ट्रीय उद्यान प्रदेशाची सरासरी उंची २,१३४ ते २,४३८ मी. असून ईगल (उंची ३,४६२ मी.) व इलेक्ट्रिक (३,३५० मी.) ही त्यातील सर्वाधिक उंचीची शिखरे आहेत. उद्यानाचे जलवाहन प्रामुख्याने यलोस्टोन नदीने केलेले आहे. पश्चिम भागातून मॅडिसन व गॅलटिन ह्या नद्या वाहतात.

पॅसिफिक सफरीवरून परतताना १८०६ मध्ये जॉन कॉल्टर याने ल्यूइस व क्लार्क यांच्यापासून वेगळे होऊन यलोस्टोन नदीचे व तेथील प्रदेशाचे समन्वेषण केले. या उद्यानातील गायझर व गरम पाण्याचे झरे पाहणारा तो पहिला यूरोपीय होय. जॉन कॉल्टर याच्या साथीने मॅन्युएल लीसा या इंडियन व्यापाऱ्याने बिग्‌हॉर्न नदीच्या मुखाजवळ यलोस्टोन नदीवर पहिल्या व्यापारी ठाण्याची स्थापना केली (१८०७). १८७० मध्ये नाथॅन्येल पी. लाँगफर्ड, हेन्‍री डी. वॉशबर्न, लेफ्ट. गस्टाव्हस डोआने यांनी व त्यांच्या गटाने या भागाची पाहणी केली. त्यांना या ठिकाणी आढळलेल्या कॅन्यन, सरोवरे, गायझर, गरम पाण्याचे झरे व इतर अनेक निसर्गसुंदर बाबींमुळे हा प्रदेश खाजगी मालकीचा न ठेवता तो सार्वजनिक उपयोगासाठी ठेवण्यात यावा, अशी त्यांनी शिफारस केली. तीवरून काँग्रेसने विधिवत्‌ १ मार्च १८७२ रोजी ह्या प्रदेशाची खाजगी मालकी संपुष्टात आणून देशातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून यलोस्टोनची स्थापना केली.

खडबडीत पर्वतीय व पठारी प्रदेश, त्यांवरील विदारित लाव्हा आच्छादन, हिरवीगार अरण्ये व त्यांतील वेगवेगळे प्राणी, पक्षी, अश्मीभूत अरण्ये, काळ्या काचेसारखे लाव्हारसाचे आच्छादन असलेला ॲब्सिडीअन पर्वत, पठारावरून यलोस्टोन नदीने खोदलेली सुंदर दरी, तिच्यावरील अपर, लोअर व टॉवर हे प्रेक्षणीय धबधबे, ल्यूइस व शोशोन यांसारखी लखलखणारी निसर्गसुंदर सरोवरे, प्रसिद्ध ग्रँड कॅन्यन, इतर भूगर्भशास्त्रीय रचना इ. वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी या उद्यानात आढळतात. याहीपेक्षा येथे आढळणारे सु. १०,००० गरम पाण्याचे झरे, सु. २०० गायझर, गायझरांच्या खनिजमिश्रित पाण्याच्या बाष्पीभवनामुळे तयार झालेल्या विविधरंगी पायऱ्यांनी युक्त अशा निसर्गरम्य गच्च्या, चिखली ज्वालामुखी, बाष्प-विवरे व तत्संबंधित बाबी ही येथील विशेष आकर्षणे आहेत. ओल्ड फेथफुल, गेंट, गेंटिस, डेझी, रिव्हरसाइड, ग्रँड व ग्रेट फौंटन हे येथील उल्लेखनीय गायझर असून नॉरिस, मॅमथ, लोअर, मिडवे, अपर, हार्ट लेक व शोशोन ह्या सात प्रमुख गायझर द्रोणी आहेत. मॅमथ हॉट स्प्रिंग्ज येथील पायऱ्यापायऱ्यांच्या गच्च्या विशेष प्रेक्षणीय आहेत. येथील बऱ्याच गायझरांचे पाणी ३० मी.पर्यंत वर उडते. ओल्ड फेथफुल या प्रसिद्ध गायझरमधील बाष्प व उकळत्या पाण्याचे कारंजे सामान्यतः दर ३३ ते ९३ मिनिटांनी किंवा सरासरी ६४·५ मिनिटांच्या अंतरांनी हवेत ३० मी. उंचीपर्यंत व कधीकधी ६० मी. उंचीपर्यंतही उडत असतात. वेगवेगळ्या गायझरांच्या पाण्यात वेगवेगळ्या खनिज द्रव्यांचा अंश असतो. मॅमथ गायझरच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटचा अंश जास्त असतो. वेगवेगळ्या गायझरांमधील पाण्याच्या वेगवेगळ्या तपमानामुळे गायझरांभोवती विविध प्रकारचे शेवाळे वाढलेले आढळते. जगातील कुठल्याही प्रदेशापेक्षा गायझर व उष्ण पाण्याच्या झऱ्यांची संख्या येथे जास्त आहे.


उद्यानाचे सु. ९०% क्षेत्र अरण्यमय आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे पाइन, सेजब्रश व रॅबिट ब्रश, अल्पाइन व डग्लस फर, ॲस्पेन, स्प्रूस, जुनिपर, रानफुले, कॉटनवुड, ओल्डर, विलो इ. वृक्षांच्या जाती आढळतात. प्राण्यांसाठीचे हे जगप्रसिद्ध अभयारण्य असून त्यात एल्क, हरिण, अस्वल, कॉयोट, गवा, स्कंक, बीव्हर, सांबर इ. प्राणी आढळतात. उद्यानात काही प्राण्यांची संख्या (विशेषत: एल्क व गवा) जेव्हा प्रमाणापेक्षा अधिक वाढताना आढळते, तेव्हा त्यांची शिकार करून त्यांना सापळ्यांमध्ये पकडून वा त्यांचे दुसरीकडे स्थलांतर करून त्यांची संख्या कमी केली जाते. पक्ष्यांच्या सु. २०० जाती येथे आढळतात. त्यांत पिसे नसलेले गरूड, ऑस्प्रे, पाणकोळी, कॅलिफोर्नियन गल, कॅनडियन हंस इ. पक्ष्यांच्या महत्त्वाच्या जाती आहेत. सरोवरात आढळणारा व तुतारीसारखा आवाज करणारा हंस आणि कॅनडियन हंसी ह्या दुर्मिळ पक्ष्यांचे जाणीवपूर्वक संरक्षण केले जाते. जलाशयांमध्ये भरपूर मासे सापडतात, त्यांत ट्राउट मासे अधिक आहेत. येथे शिकारीला बंदी असली, तरी मासेमारीस मात्र परवानगी आहे.

उद्यानभागात ८०० किमी.पेक्षा अधिक लांबीचे रस्ते व १,६१० किमी.पेक्षा अधिक लांबीच्या पाऊलवाटा आहेत. उद्यानात येण्याचे मुख्य पाच मार्ग आहेत. त्यांपैकी दोन वायोमिंग राज्यातून आणि तीन माँटॅना राज्यातून आहेत. हे सर्व रस्ते उद्यानातील महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांना (पॉइंट्स) जोडणाऱ्या ग्रँड लूप (२३० किमी.) मार्गाला येऊन मिळतात. हिवाळ्यात उद्यानाचा बराचसा भाग हिमाच्छादित असतो, तेव्हा वाहतुकीसाठी बर्फावरून चालणाऱ्या गाड्यांचा उपयोग केला जातो. जॉन डी. रॉकफेलर याने १९७२ मध्ये यलोस्टोन व दक्षिणेकडील ग्रँड टीटॉन राष्ट्रीय उद्यान यांना जोडणारा १२९ किमी. लांबीचा ‘मिमॉरिअल पार्क वे’ हा रस्ता बांधलेला आहे. उद्यानातील सरोवरांत नौकाविहाराच्या सोयी उपलब्ध आहेत. मॅमथ हॉट स्प्रिंग्ज, मॅडिसन जंक्शन, नॉरिस जंक्शन, ओल्ड फेथफुल, वेस्ट थंब, फिशिंग ब्रिज, कॅन्यन या प्रमुख व इतर अनेक ठिकाणी सर्व सुविधांनी युक्त अशा छावणीच्या जागा आहेत. अधिकृत छावणीच्या ठिकाणांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी छावणी उभारावयाची असल्यास उद्यान अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. १९१६ मध्ये स्थापन झालेल्या ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ विभागाकडून या उद्यानाची व्यवस्था पाहिली जाते. दरवर्षी २० लाखांपेक्षा अधिक पर्यटक या उद्यानाला भेट देऊन जातात.

चौधरी, वसंत.