कालिकत : केरळ राज्याच्या कोझिकोडे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण व महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३,३३,९७९ (१९७१). हे कोचीनच्या उत्तरेस १९२ किमी. व मंगलोरच्या दक्षिणेस २१९ किमी. आहे. कालिकतचे मूळ नाव कोझिकोडे. नवव्या शतकात त्रिवेंद्रमच्या बादशहाने आपल्या नौ–अधिकाऱ्यास कावळ्याचे ओरडणे ऐकू जाईल इतकी या ठिकाणची जागा दिली, म्हणून या ठिकाणास कोळीकोडे –कोझिकोडे, तर कल्लाई  नदीकाठचा कल्लीकोट व त्याभोवतालचे शहर म्हणून कालिकत हे नाव पडले, असे म्हणतात. तामुरी–समातीरी झामोरीन हे येथील प्रमुख असून ते विजापूरच्या आदिलशाहीचे मांडलिक होते. तेराव्या शतकापासूनच कालिकत अरबांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले होते. १४९८ मध्ये वास्को द गामा प्रथम याच बंदरी आला. सोळाव्या – सतराव्या शतकांत येथे पोर्तुगीजांनी व ब्रिटिशांनी वखारी सुरू केल्या. १७६६– ८९ मधील इंग्रज–म्हैसूरकर युद्धांत कालिकतची खूपच हानी झाली १७९२ मध्ये हे ब्रिटिशांकडे आले. जंगलसंपत्ती व कापूस ह्यांनी पृष्ठप्रदेश समृद्ध असल्याने कालिकत नेहमीच भरभराटलेले राहिले. ‘कॅलिको’ हे येथील अत्युत्कृष्ट हातमाग कापडावरून पोर्तुगीजांनी दिलेले नाव होय. येथील लाकडाचा डेपो आजही भारतात मोठ्यापैकी समजला जातो. कापड, होजिअरी, प्लायवुड, लाकूडकाम, दोर, काथ्याच्या वस्तू, चट्या, विद्युत्‌ उपकरणे, कौले, मासेमारी इत्यादींचे उद्योग येथे असून काथ्या, खोबरे, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, जंगलपदार्थ, मासळी इत्यादींची येथून निर्यात होते. १९६८ मध्ये येथे विद्यापीठाची स्थापना झाली असून वनस्पती, सागरविज्ञान, रसायन, अभियांत्रिकी इत्यादींच्या विविध तंत्रसंस्था कालिकतमध्ये आहेत.

शाह, र. रू.