आधुनिक मुद्रण तंत्र
अक्षरजुळणी :यांत्रिक अक्षरजुळणी व हाताने केलेली अक्षरजुळणी : विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अक्षरांच्या खिळ्यांची जुळणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात हाताने केली जात होती व थोड्याशा प्रमाणात यांत्रिक अक्षरजुळणी होत असे. वर्तमानपत्रांचे स्तंभ किंवा पुस्तकांची पाने यांची योजनाही बहुतेक सर्व हाताने होत असे. अजूनही जेथे खिळ्यांची जुळणी केली जाते तेथे या तंत्राचा उपयोग केला जातो.
हाती जुळणीसाठी अक्षराच्या एका नमुण्याचा एक संच तयार केलेला असतो. तो एका लाकडी पेटीत ठेवलेला असतो व अशा पेटीला प्रत्येक अक्षरासाठी वेगळा कप्पा केलेला असतो. जी अक्षरे जास्त प्रमाणात लागतात (उदा., स्वर) त्यांचे कप्पे हाताला जवळ पडतील असे तयार केलेले असतात. देवनागरी अक्षरजुळणासाठी बाराखडीतील प्रत्येक अक्षरासाठी वेगळा कप्पा किंवा मूळ अक्षरासाठी एक कप्पा आणि काना, मात्रा, वेलांटी वगैंरेंसाठी वेगळे कप्पे करून त्या खुणा अक्षरांनतर जोडल्या जातात. रिकाम्या रहाणाऱ्या अक्षरावरील जागा किंवा खालील जागा लहान आकारमानाच्या पट्ट्यांनी भरून काढल्या जातात. त्या पट्ट्यांना ‘डिग्री’ असे नाव आहे व त्यांची आकारमाने जरूरीप्रमाणए लहानमोठी असतात. डिग्री अक्षरे हा अक्षरांचा एक प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारत अखंड अक्षरे असतात त्यामुळे अक्षराच्या वरील आणि खालील बाजू त्या खिळ्यातच समाविष्ट असते व ती डिग्रीने भरून काढावी लागत नाही. अशी अखंड अक्षरजुळणी जास्त वेगाने होते, मात्र या अक्षराचे वळण डोळ्यांना डिग्री पद्धतीच्या वळणापेक्षा चांगले दिसत नाही. इंग्रजी अक्षरे लहान (स्मॉल) व मोठी (कॅपिटल) अशी असल्याने त्यांना दोन वेगळ्या पेट्या लागतात पण एकंदर अक्षरसंख्या कमी असल्याने यासाठी लागणाऱ्या पेट्या वेगळ्या प्रकारच्या असतात.
हाती अक्षरजुळणीसाठी कर्मचाऱ्याला अशा पेटीसमोर उभे राहून डाव्या हातात अक्षरे जुळवण्यासाठी एक धातूची दोन बाजूंनी बंद असलेली पट्टी (स्टिक) घेऊन उभे रहावे लागते. या पट्टीची तिसरी बाजू ओळीच्या कमीजास्त लांबीप्रमाणे पक्की करून बंद करावी लागते. चौथी बाजू मात्र मोकळी ठेवली जाते आणि तेथून अक्षरे त्या पट्टीवर उभी ठेवली जातात. दर दोन शब्दांमध्ये कमी उंचीच्या शिशाची पट्टी ठेवली जाते. दर दोन ओळींमध्ये विभागणीसाठी ओळीच्या लांबीप्रमाणे शिशाची पट्टी टाकली जाते. ओळींची अशी विभागणी आवश्यक असते कारण अक्षरांचे खिळे एकमेकांत मिसळण्याची शक्यता असते. एका वेळी साधारण १० ओळी जुळवून झाल्यावर त्या सर्व ओळी काढून दुसऱ्या एका पत्र्याच्या तीन बाजू बंद असलेल्या तबकावर (गॅलीवर) ठेवल्या जातात. साधारण चार वेळा अशी अक्षरजुळणी केल्यानंतर एका पानाचा मजकूर पूर्ण होतो. ओळीची लांबी अचूकपणे केल्यानंतर पूर्ण करणे हे कौशल्याचे काम असते. पानाचा मजकूर पूर्ण झाल्यावर तो जेव्हा दोऱ्याने बांधला जातो तेव्हा कोणतीही ओळ सैल राहून अक्षराचा खिळा खाली पडू नये म्हणून काळजी घेतली जाते. वर्तमानपत्राच्या अक्षरजुळणीसाठी किंवा फार मोठ्या आकारमानाच्या अक्षरांसाठी काही यांत्रिक जुळणी केली जाते पण त्यातही अर्ध्या भागाची हातानेच जुळणी करावी लागते. त्यातील एका तंत्राला लडलो तंत्र असे म्हणतात. त्यामध्ये मोठी अक्षरे पाडण्यासाठी जे पितळी (किंवा काशाचे) साचे वापरले जातात तेच एका मोठ्या पट्टीवर जुळवून ते साचे ओळीच्या स्वरूपात एका ओतणी यंत्रात ठेवून त्यांवर शिसे दाबले जाते. वर्तमानपत्रातील शीर्षकांची मोठ्या आकारमानातील ओळ या पद्धतीने एकदम तयार मिळते. एलरॉड ओतणी यंत्रही याच पद्धतीच्या कामासाठी वापरले जाते. मात्र या यंत्रातून ओळविभाजक पट्टया किंवा दोन शब्दांतील पट्ट्या या सर्व प्रत्यक्ष छापल्या न जाणाऱ्या गोष्टीही तयार होतात.
अक्षरांच्या उंचीचे किंवा ओळीच्या लांबीचे काही आंतरराष्टीय निकष ठरलेले आहेत. अक्षरांच्या खिळ्यांच्या उंचीचाही एक पक्का साचा ठरलेला आहे. खिळ्यांची उंची ०·९१८ इंच (२३·२२ मिमी.) असते. अक्षगच्या उंचीसाठी एका इचाचे ७२ भाग करून प्रत्येक भागाला ‘पॉईट’ असे नाव दिले आहे. असे १२ भाग घेऊन त्याला ‘पासका एम्’ असे नाव दिले आहे. त्यामुळे एका इंचात ६ पायका एम बसतात. पुस्तकाच्या ओळीची लांबी किंवा वर्तमानपत्राच्या एका स्तंभातील ओळीची लांबी अशा पायका एममध्ये दर्शविण्याची पद्धत आहे (उदा., पुसतकाची ओळ २४ किंवा २६ एम आणि वर्तमानपत्रातील स्तंभाची ओळ ११ एम्).
अक्षरजुळणीची पुढची पायरी म्हणजे प्रत्येक सुटे अक्षर यांत्रिक रीतीने नव्याने पाडले जाते आणि त्याच्या शब्द व ओळी आपोआप तयार होतात. अर्थात मुळ मजकूर टंकलेखनासारखा हाताने प्रथम एका कागदाच्या रूंद पट्टीवर जुळवून घ्यावा लागतो व ती पट्टी नंतर दुसऱ्या अक्षरे ओतणाऱ्या यंत्रावर बसवून त्यापासून स्वतंत्र अक्षरे ओळींच्या स्वरूपात पाडली जातात.
या पद्धतीच्या यंत्राचे नाव मोनोटाइप असे आहे व त्याचे दोन भाग असतात. एक अक्षरफलक व दुसरे अक्षरे पाडणारा. प्रथम या यंत्रावर रोमन लिपीतील अक्षरे बसवण्यात आली व नंतर जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अक्षरजुळणी सुरू करण्यात आली. देवनागरीमध्येही या यंत्रावर अक्षरजुळणी प्रथम १९३१ मध्ये सुरु झाली. या अक्षरजुळणीचे मुख्य तत्त्व म्हणजे अक्षराच्या रूंदीप्रमाणे प्रत्येक अक्षराचे माप ठरलेल आहे. रोमन लिपीतील सर्वात अरूंद अक्षर l किंवा i असते त्याची प्रत्येकी ५ पॉईंट अशी रूंदी ठरविण्यात आली आहे तसेच सर्वात रूंद अक्षर W किंवा M असते. त्याची रूंदी प्रत्येकी १८ पॉईंट ठरविली आहे म्हणजे ५ ते १८ पॉईट या मर्यादेत सर्व अक्षरे बसवली आहेत. सबंध ओळींची लांबी व आक्षरांची रूंदी यांचे एक गणित बसवलेले असते. अक्षरफलकावरच कागदाच्या ठराविक रूंदीच्या फितीचे रीळ बसवलेले असते. फलकावरील अक्षराची चावी (बटण) दाबली म्हणजे या यंत्रातील सुई कागदाच्या फितीवर एक वा दोन विवक्षित जागी छिद्रे पाडते. छिद्र पाडण्याची जागा प्रत्येक अक्षराप्रमाणे (वा चिन्हाप्रमाणे) वेगळी असते. कागदाच्या फितीच्या रुंदीत छिद्रांच्या ३१ वेगवेगळ्या रचना शक्य असतात. अक्षरांच्या चाव्या जशा दाबल्या जातात त्याप्रमाणे एक स्वयांचलित संगणक अक्षराच्या पॉईंटप्रमाणे त्यांची बेरीज करतो व ओळ पुर्ण होत आली की, त्याची सूचना यंत्रचालकाला आपोआप दिली जाते. त्याच वेळी दोन शब्दांमधील अंतर सारखे करण्यासाठी ज्या एक-दोन चाव्या दाबाव्या लागतात त्याची योजना यंत्रचालक आधी करू शकतो. कागदाची फीत संपेपर्यंत यंत्रचालक त्यावर अक्षरजुळणी या स्वरूपात करतो.
यंत्राच्या दुसऱ्या भागामध्ये अक्षरे ओतण्याचे काम चालते. अक्षरफलकावर जे कागदाचे रीळ लावलेले असते तेच रीळ तेथून काढून दुसऱ्या यंत्रावर ठराविक जागी लावले जाते. या यंत्राचा मुख्य भाग म्हणजे अक्षरांचे काशाचे साचे बसवलेला ९ सेंमी. X ९ सेंमी. मापाचा एक भाग व एक धातू वितळणारी भट्टी. वर उल्लेखिलेल्या चौकोनी साच्यात रूंदीत १५ व लांबीत १५ असे अक्षरांचे वैयक्तिक साचे असतात. प्रत्येक अक्षरासाठी ५ मिमी. X ५ मिमी. जागा असते. आणि असे २२५ काशाचे साचे वरील मोठ्या साच्यात बसवलेले असतात. कागदाच्या फितीला जी छिद्रे पडलेली असतात त्यांतून हवा दाबली जाते व या दाबलेल्या हवेमुळे जे अक्षर अपेक्षित असते तो साचा वितळवलेले शिशाचे मिश्रण जेथून खालच्या बाजूने दाबले जाते त्याच्यावर येऊन थांबतो. त्या अक्षराच्या साच्यात मिश्रण दाबले जाऊन ते अक्षर तयार होते व पुढे सरकत राहते. जी हवा दाबली जाते ती कागदाच्या छिद्रांतून वर जाते व त्यामुळे मोठ्या साच्यातील हवे असलेले अक्षर निवडले जाऊन साचा ठराविक ठिकाणी येऊन त्यात वितळलेली धातू दाबली जाते. त्या वेळी अक्षर फार गरम असते. पण पुढे थोड्याच वेळात ते गार होऊन कडक होतो. या यंत्रावर ५ ते २४ पॉईंटची अक्षरे पाडता येतात व ओळीची जास्तीत जास्त लांबी ६० पायका एम् (१०″) एवढी ठेवता येते. क्वचित प्रसंगी ४८ पॉईंटची अक्षरेही (कमी वेगात) या यंत्रामध्ये पाडता येतात. मोनोटाइपच्या काही यंत्रांवर २५५ आणि २७२ पर्यंत अक्षरांचे साचे बसविण्याची सोय करता येते. मात्र त्यासाठी ३१० चाव्यांचा फलक वापरावा लागतो.
मोनोटाइप पद्धतीचे फायदे म्हणजे त्याच्या जुळणाची दुरुस्त्या करता येण्यातील सुलभता या होत. वृत्तपत्रांकरिता मात्र ही पद्धती तितकीशी सोयीची नाही कारण यात चल खिळ्यांच्या ओळींची हाताळणी अवघड होते व याखेरीज फितीच्या शेवटच्या टोकापासून खिळे पाडण्यास सुरूवात होत असल्याने सर्व खिळे पाडल्याशिवाय त्यांची जुळणी करणे शक्य होत नाही.
सुट्या अक्षरांनंतर शब्दांची सर्व ओळच यंत्रावर तयार करण्यासाठी यंत्रे उपलब्ध आहेत. या यंत्राची नावे लायनोटाइप किंवा इंटरटाइप अशी आहेत. या यंत्रावर वेगवेगळ्या लांबीच्या पूर्ण ओळी तयार होऊनच बाहेर पडतात. या यंत्रावर प्रथम रोमन अक्षरांच्या ओळी तयार केल्या जात व आता जगातील इतर लिप्यांमध्येही अक्षरे व ओळींची जुळणी होत आहे. यांतील प्रत्येक अक्षरासाठी एक वेगळी मातृका असते व अक्षराच्या रुंदीप्रमाणे तिची जाडी कमीजास्त असते. या प्रत्येक मातृकेच्या जाडीत वरच्या बाजूला एक अक्षर व खालच्या बाजूला तेच अक्षर (तिरके किंवा जाड किंवा मोठे) असे कोरलेले (खोलगट) असते व वाचण्याजोगे असते. एका ओळीत जितकी अक्षरे (व शब्द) असतात त्या सर्व मातृका व दोन शब्दांमधील जागेची पट्टी (वा पट्ट्या) या प्रथम अक्षरफलकावरील चाव्या दाबून यांत्रिक पद्धतीने एकत्र केल्या जातात. शब्दांमधील अंतराची पट्टी पाचरीच्या आकाराची असते व तिची लांबी जवळजवळ १० सेंमी. असते. या सर्व पट्ट्या एकाच वेळी अशा पद्धतीने दाबल्या जातात की, ओळीची लांबी पूर्ण होऊन त्यात मधे जागा राहून सैलपणा राहत नाही व सर्व शब्दांमधील अंतर सारखे राहते. पितळी मातृकेचे आकारमान १९ मिमी. X ३२ मिमी. असते. मातृकेच्या वरील बाजू इंग्रजी व्ही (V) अक्षराच्या आकाराची असते व त्यात १४ खोबणी असतात. प्रत्येक मातृकेच्या वरील खोबणी वेगळ्या आकाराच्या असतात व खालच्या बाजूला दोन पाय असल्यासारखा आकार असतो. सर्व अक्षरे व खुणा मिळून ९० प्रकारच्या मातृका असतात व एकाच अक्षराच्या पुष्कळ मातृका लागतात (जी अक्षरे जास्त प्रमाणात लागतात त्या अक्षरांच्या मातृका जास्त असतात). या सर्व मातृका एका मोठ्या (धातूच्या) पेटीत ठेवलेल्या असतात व प्रत्येक मातृकेच्या प्रकारासाठी वेगळा कप्पा असतो. प्रत्येक कप्प्यात त्या अक्षराच्या मातृका ओळीने एकामागोमाग उभ्या रेषेत असतात.
मातृकेच्या वरील व्हीच्या आकारात १४ वेगवेगळ्या खोबणी असतात व त्यांच्या वेगवेगळया रचना वा संयोजने असतात. प्रत्येक प्रकारच्या मातृकेसाठी एक वेगळी रचना वरच्या भागात असते व मातृकांचे काम संपले की, त्या एका लांब दांडीच्या साह्याने यांत्रिक रीतीने उचलल्या जातात आणि वर उल्लेख केलेल्या पेटीच्या मागल्या बाजूला नेल्या जातात. तेथे मळसूत्राच्या तत्त्वावर चालणारी एक आडवी वितरण दांडी असते व त्या दांडीच्या एका बाजूने सर्व मातृका पुढे सरकवल्या जातात. मातृकेच्या वरील खोबणाप्रमाणे विशिष्ट जागी त्या त्या अक्षराची मातृका तिच्या विशिष्ट कप्प्यात सुटून पडते व पुन्हा वापरण्यासाठी तयार राहते. ही सर्व क्रिया पुढील ओळ जुळवण्याच्या आत संपते. वर उल्लेख केलेली पेटी साधारण ४०° कोनात तिरीकी ठेवलेली असते. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाने मातृका नेहमी खालच्या बाजूला येऊन थांबते. या पेटीला वरच्या बाजूला काचेचे किंवा दुसरे पारदर्शक आवरण असल्याने प्रत्येक कप्प्यातील मातृका बाहेरून दिसू शकतात. पेटीचे खालची बाजू सु. ३४ ते ५१ सेंमी. रुंदीची असते. वरची बाजू जास्त रुंद असते.
अक्षरांच्या मातृका साच्यांच्या एका चक्रात धरून ठेवल्या जातात. या यंत्रावरही धातू वितळवणारी भट्टी असते व तीतील शिशाची मिश्रधातू मातृकाच्या अक्षराच्या बाजूला जोरात दाबली जाते व अक्षरांची ओळ तयार होते. ही पूर्ण ओळ बाहेर ढकलली जाते व एका विशिष्ट जागी येऊन पडते. हा क्रम प्रत्येक ओळीच्या बाबतीत सारखाच असतो. काही यंत्रांवर एकाच वेळी अक्षरांच्या एकाऐवजी दोन पेट्या वापरता येतात व त्यामुळे दोन वेगवेगळी अक्षरे वापरता येतात. फक्त थोडासा यांत्रिक फरक करावा लागतो. त्यासाठी फार जास्त वेळ घालवावा लागत नाही. या अक्षरजुळणीमध्ये फक्त एकच दोष आहे. जर जुळणीत एखादी चूक झाली, तर ती दुरुस्त करण्यासाठी सर्व ओळ पुन्हा तयार करावी लागते कारण ही ओळ अखंड असते. अलीकडील काळात या यंत्राच्या रचनेत बरीच सुधारणा झाली आहे. उदा., मातृकांची वितरण व्यवस्था जास्त वेगवान केली गेलेली आहे किंवा धातूची ओळ लवकर थंड व्हावी म्हणून खास व्यवस्था किंवा साच्यांच्या चक्रात जास्त साचे बसवण्याची व्यवस्था वगैरे. या यंत्राचा मुख्य उपयोग वर्तमानपत्रांच्या अक्षरजुळणीसाठी फार मोठ्या प्रमाणावर झाला व अजूनही काही ठिकाणी होत आहे. वर्तमानपत्रातील स्तंभाची रुंदी सु. ५० मिमी. किंवा त्यापेक्षा किंचित कमी असल्याने त्याच्या अक्षरजुळणीसाठी ज्या ओळी तयार केल्या जातात त्या फार लवकर होतात.
अशाच धर्तीचे एक यंत्र काही खास मातृकांच्यासाठी तयार केलेले आहे. यातील मातृका मोठ्या व जाड आकारमानाच्या असतात. त्यांची जुळणी हाताने याच्या खास पट्टीवर केली जाते. एक ओळ तयार झाल्यावर ती बांधून त्याच्या ओतणी यंत्रात सरकवली जाते व त्यात वितळलेली धातू दाबून त्य सर्व अक्षरांची ओळ एकदमच तयार होते. त्यानंतर मातृका काढून घेऊन हातानेच त्यांचे वितरण योग्य जागी केले जाते.
छिद्रित फितीच्या साह्याने स्वयंचलित अक्षरजुळणी : कागदाच्या ज्या फितावर प्रकाराप्रमाणे छिद्गे पाडता येतात त्या कागदी फितीचा उपयोग स्वयंचलित अक्षरजुळणीसाठी लायनोटाइप किंवा इंटरटाइप या यंत्रावरही करून घेता येतो. मोनोटाइप या यंत्राच्या अक्षरफलकावर ज्याप्रमाणे कागदाच्या फितीवर प्रथम अक्षराच्या जागेप्रमाणे एका विशिष्ट जागेवर एक किंवा दोन छिद्रे पाडतात त्याच प्रमाणे या पद्धतीतही कागदाच्या एका फितीवर विशिष्ट जागेवर एक किंवा दोन छिद्रे पाडतात त्याचप्रमाणे या पद्धतीतही कागदाच्या एका ठिकाणी छिद्रे पाडली जातात. यातील वैशिष्ट्य असे की, एका ठिकाणी अक्षर फलकावर अक्षरजुळणी चालू केली की, इतर पुष्कळ ठिकाणी किंवा लांबच्या शहरात दूरमुद्रकाच्या (टेलिप्रिंटरच्या) पद्धतीने कागदी
फितींवर छिद्रे पाडून तोच मजकूर एकाच वेळी पाठवता येतो. ही कागदी फीत लायनोटाइप किंवा इंटरटाइप यंत्रावर बसवून स्वयंचलित पद्धतीने मजकुराच्या ओळी जुळण्याची सोय काही यंत्रांवर केली आहे. या पद्धतीला दूरवर्ती अक्षरजुळणी (टेलिटाइपसेटिंग) असे नाव आहे. याच्या कागदी फितीवर सहा परिवाह (अक्षरजुळणीसाठी छिद्रे पाडण्याकरिता उपलब्ध असलेले मार्ग) असतात. त्यामुळे सहा वेगवेगळ्या प्रकारच्या संयोजकांच्या साह्याने अक्षरजुळणी करता येते. कागदाच्या रुंदीमध्ये १ ते ६ वेगवेगळ्या जागी छिद्रे पाडण्याच्या सोयींमुळे ६४ वेगवेगळी संयोजने या पद्धतीत वापरता येतात. साधारणपणे कागदी फितीवर जेव्हा छिद्रे पाडून अक्षरजुळणी केली जाते तेव्हा तोच मजकूर टंकलिखितही केला जातो. त्यामुळे तो मजकूर वाचून तपासता येतो व त्यातील दुरुस्त्याही करता येतात. टेलिपाइप यंत्रावर कागदी फीत जेव्हा एका बाजूने निघून निघून पुढे जाते त्या वेळी ती फीत सहा संवेदकांच्या (छिद्रांतून विद्युत् संपर्क साधणऱ्या प्रयुक्त्यांच्या) खालून पुढे जाते. त्या फितीला जी छिद्रे पाडलेली असतात, त्यांचा अन्वयार्थ संवेदकांकडून लावला जातो व त्यांच्या संवेदना लायनोटाइट यंत्राला पाठवून प्रत्येक ओळीची सुरुवात आणि शेवट यांचे संदेश अथवा इतर सर्व आवश्यक खुणा आपोआप दिल्या जातात आणि यंत्र चालू होऊन त्यातून शब्दांच्या अखंड ओळी बाहेर पडतात.
संगणकाच्या साह्याने कार्यक्रमित अक्षरजुळणी : संगणकाच्या मदतीने कागदी फितीवर प्रथम जी छिद्रे पाडून अक्षरजुळणी केली जाते तेव्हा शब्दांच्या ओळीची लांबी किंवा शब्द तोडावा लागला, तर तो कुठे तोडायचा किंवा तो सर्व शब्दच पुढच्या ओळीत घ्यावयाचा व या सर्व संदर्भात दोन शब्दांमधील अंतर किती ठेवावयाचे याचा निर्णय घेणे व प्रत्यक्ष या सर्व गोष्टी करणे हे आपोआप होते व त्यातून मानवी श्रम पूर्णपणे वगळले जातात. प्रथम छापावयाचा मजकूर एका कागदी फितीवर सरळ टंकलिखित केला जातो. त्यात ओळीची लांबी किंवा इतर तपशीलाकडे लक्ष द्यावे लागत नाही. ही कागदी फीत संगणकाच्या आदान प्रयुक्तीत सरकवली जाते. या प्रयुक्तीद्वारे फितीचे क्रमवीक्षण (क्रमाक्रमाने निरीक्षण) केले जाते आणि ती फितीवरील अक्षरे, चिन्हे, इत्यादींचे विद्युत् संवेदकांच्या मदतीने किंवा प्रकाशविद्युत् घटकांच्या [→ प्रकाशविद्युत्] साह्याने विद्युत् आवेगांच्या (अत्यल्प काळ टिकणाऱ्या स्पंदांच्या) वेगवेगळ्या संयोजनांत रूपांतर करते. संगणक स्वयचलित किंवा अर्धस्वयंचलित रीतीने त्याला मिळालेल्या या कच्च्या माहितीवर संस्करण करून ती एका नव्या कागदी फितीवर छिद्रे पाडणाऱ्या यंत्राकडे (विद्युत् चुंबकीय छिद्राकडे) पाठवतो. त्यासाठी संगणकाला अगोदरच काही विशिष्ट सूचना दिलेल्या असतात व त्याचे काम या सूचनांबरहुकूम अचूक चालते. संगणकाकडून आलेल्या आदेशांनुसार ओळींचा शेवट व गरजेप्रमाणे शब्द तोडणे ही सर्व माहिती विद्युत् चुंबकीय छिद्रक या दुसऱ्या फितीवर छिद्रित करतो.
संगणकासाठी अक्षरजुळणीकरिता एक सर्वसाधारण कार्यक्रम ठरवता येतो व तो अक्षरजुळणीसाठी कधीही वापरता येतो. काही विशिष्ट कार्यक्रमांच्या बाबतीत संगणकाची क्रिया अक्षरजुळणीचे जे यंत्र उपलब्ध असेल त्याला (अक्षरांचा प्रकार, त्यांच्या मातृका किंवा विशिष्ट प्रकारचे यंत्र) किंवा ज्या प्रकारची अक्षरजुळणी करायची असेल त्याला अनुसरून जुळवता येते. ओळीची लांबी किंवा परिच्छेदाच्या सुरुवातीला मोकळी जागा सोडणो वगैरे माहिती संगणकाद्वारे प्रत्यक्षात अमलात आणता येते. शिवाय एखाद्या विशिष्ट प्रकारच्या अक्षरजुळणीसाठी काही खास सूचना कागदाच्या फितीवर छिद्रित करता येतात व अक्षरजुळणी चालू असतानाच त्यात खंड पाडून त्या सूचना कार्यान्वित करता येतात. उपलब्ध असलेल्या अक्षरांच्या प्रकारांतून निवड करणे, ओळीची लांबी किंवा त्यांतील बदल, एका अक्षारच्या प्रकाराकडून दुसऱ्या प्रकाराकडे संक्रमण करणे, ओळीच्या सुरुवातीला किंवा शेवटी समरेषण (एका रेषेत आणण्याची क्रिया) करणे, अलंकारिक मोठ्या अक्षरांसाठी जागा सोडणे इत्यादींसंबंधीच्या सर्व सूचना कागदी फितीवर छिद्रित करता येतात आणि त्यांची कार्यवाही संगणक सर्वसाधारणपणे अथवा विशिष्ट कामासाठी करू शकतो. यानंतर संगणकाचे काम थोडेसे स्वतंत्रपणे चालते. कागदी फितीवर ज्या छिद्रांचे संयोजन वापरलेले असते ते ओळखून संगणक आत्मसात करतो व ज्या काही विशिष्ट संदेश-खुणा या एका कामासाठी वापरलेल्या असतात. त्याही पुढील उपयोगासाठी आत्मसात करतो. प्रत्येक ओळीतील अक्षरांना व इतर खुणांना प्रत्यक्षात किती जागा लागेल व दोन शब्दांमधील अंतर सारखे राखणाऱ्या पाचरीच्या आकाराच्या किती पट्ट्या उपलब्ध आहेत या सर्वांचा आढावा संगणक घेतो. कारण त्याबद्दलची सर्वसाधारण माहिती त्याच्याजवळ अगोदरच उपलब्ध असते व ती त्याच्या स्मरण प्रयुक्तीत साठवून ठेवलेली असते. प्रत्येक ओळ कुठे संपवायची, नवीन ओळ कुठच्या शब्दाने सुरू करता येईल आणि शब्द तोडण्यासाठी कोणची जागा योग्य आहे या सर्व गोष्टी संगणक स्वतंत्रपणे लक्षात घेतो व योग्य ती कार्यवाही प्रत्यक्ष यंत्र चालू करण्याअगोदरच अमलात आणतो. एका ओळीत सुयोग्य रीतीने नऊ शब्द बरोबर बसत असले, तरी ती ओळ तेथेच संपवण्याचा आदेश संगणक देतो. तसे न केल्यास पुढील शब्द अर्धवट तोडावा लागेल. अर्थाच आवश्यक तेथे शब्द अर्धवट तोडलाही जातो पण तो योग्य पद्धतीने तोडला जातो. जर लायनोटाइप किंवा इंटरटाइप यंत्रावर एक तंत्रज्ञ बसवून ही यंत्रे संगणकाला जोडून दिली, तर त्या तंत्रज्ञानाला यंत्राचे काम चालू असताना काही गोष्टींमध्ये बदलही करता येतो आणि मग हे सर्व काम अर्ध-स्वयंचलित समजले जाते. जर संगणकाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मुभा दिली व त्याप्रमाणे त्याचे कार्यक्रमण केले, तर हे काम पूर्णपणे स्वयंचलित होऊ शकते.
संगणक मजकुरातील चुका प्रत्यक्ष अक्षरजुळणीच्या आधी दुरूस्त करतो व नंतर दुसऱ्या कागदी फितीवर दुरुस्त केलेल्या मजकुराची अक्षरजुळणी होते. या दुरुस्तीच्या बऱ्याच पद्धती संभवतात पण त्यांतील महत्त्वाच्या दोन पद्धतींचा उल्लेख येथे केला आहे. शब्दांच्या ओळींचे माप पूर्ण करून नंतर एका कागदी फितीवर पुन्हा छिद्रे पाडून प्राथमिक जुळणी केली जाते व ही फीत जुळणी यंत्राला जोडली की, शब्दांच्या ओळी यांत्रिक रीतीने आपोआप तयार होऊन बाहेर येतात. वर उल्लेख केलेल्या कागदी फितीवर जेव्हा छिद्रे पाडली जातात त्याच वेळी एक मुद्रित प्रत तयार होते व तिच्यातील प्रत्येक ओळीला एक संदर्भ क्रमांक दिला जातो. या मुद्रित प्रतीवर जेव्हा दुरुस्ती केली जाते त्या वेळी त्या त्या ओळीचा संदर्भ क्रमांक घेऊन एका कागदी फितीवर या सर्व दुरुस्त्या एकत्र दाखवून ही फीत संगणकाला दिली जाते. या फितीवरील सर्व दुरुस्त्या मुख्य मजकुरात पूर्ण होऊन त्या मजकुराची अक्षरजुळणी पुढे केली जाते. दुरुस्त्यांमुळे ओळींच्या रचनेमध्ये जो बदल होईल तोही संगणक लक्षात घेतो आणि मजकूर पूर्ण दुरुस्त स्वरूपात जुळून त्याच्या ओळी स्वयंचलित पद्धतीने तयार होतात.
दुसऱ्या एका पद्धतीमध्ये मुद्रित प्रतीची टंकलिखित प्र तयार करता येते किंवा हाच मजकूर एका ऋण किरण नलिकेच्या दृश्यक पडद्यावर दृश्यरूपात वाचता येईल अशी योजना करता येते. हे दृश्यरूप पुढे छापल्या जाणाऱ्या मजकुराप्रमाणे दिसते व त्यावर चुका वाचता येऊन लगेच दुरुस्त्या करता येतात. पडद्यावर जेव्हा ओळी दिसतात त्या वेळी मात्र कागदी फितीवर त्याची जुळणी (छिद्रण) होत नाही. ती जुळणी चुकांची दुरुस्ती झाल्यानंतर होते. संगणकाला एक अक्षरफलक जोडून त्यावर एक तंत्रज्ञ मजकुरातील चुका दुरुस्त करतो व त्याच वेळी ओळीचा संदर्भ क्रमांकही त्याच पद्धतीने दर्शवितो. जर या कांमासाठी दृश्यक पडदा वापरला, तर लगेच त्या पडद्यावर दुरूस्त केलेल्या ओळी दिसतात व त्याची कागदी फीत त्याच वेळी दुरूस्त्यांसहित यंत्रातून बाहेर पडते.
संगणक साधारणपणे टंकलेखनातील चुकांचे प्रकारीकरण करणे आणि दुरूस्त्या व इतर विसंगती सुधारुन घेणे यांसाठी कार्यक्रमित केलेला असतो. उदा., जर प्रथम दोन शब्दांमध्ये जास्त अंतर पडलेले असेल, तर आपोआप हे अंतर संगणक कमी करतो. संगणकाच्या क्षमतेनुसार जुळवलेल्या मजकुराची पाने तयार करणे हे कामही कार्यक्रमित करता येते. त्या कार्यक्रमाचा संबंध चालू कामाशी (मजकुराच्या फितीशी) सरळ संबंधित असलाच पाहिजे असे नाही. पानांची सर्वसाधारण रचना (शीर्षक, मुख्य मजकुर, छायाचित्रे किंवा रेखाचित्रे यांच्या जागा व अकारमान) ध्यानात घेऊन सांकेतिक द्विमान पद्धतीने [→ संगणक] संगणक स्वतःच त्याबाहत संदेश देऊन छिद्रित फितीवर तशा अर्थाच्या सूचना देतो आणि अक्षराचा प्रकार, ओळींची लांबी व ओळींमधील बदल वगैरे गोष्टी घडवून आणतो. अक्षरजुळणीसाठी माहितीचा मोठा साठा आवश्यक असल्याने अलीकडे टेलिटाइपसेटर यंत्रावर सहा परिवाहांच्या ऐवजी सात किंवा आठ परिवाहांची कागदी फीत वापरली जाते.
कागदी फितीवर अक्षरांच्या जागा जेथे अखंडपणे छिद्रित केल्या जातात त्या पद्धतीचा उपयोग मोनोटाइप जुळणीमध्ये जास्त परिणाम कारक दिसून येतो. ओळ कुठे संपवायची वा ओळ संपत आल्याचा इशारा द्यावयाचा किंवा अशाच धर्तीची जी दुसरी कामे करावी लागतात ती संगणक व मोनोटाइप जुळणी तंत्र यांच्या सहकार्याने चांगल्या प्रकाराने होत आली आहेत. मोनोटाइप जुळणीसाठी जी कागदाची रूंद फीत वापरली जाते तीवर अक्षरांच्या छिद्रित खुणा नेहमीच्या अरूंद फितीवरून रूपांतरित केल्या जातात व अशी फित स्वयंचलित पद्धतीने यंत्रावर चालवली जाते आणि अखंड अक्षरजुळणी केली जाते.
छायाक्षरजुळणीसाठी हल्ली संगणकाचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यासाठी मुद्रणाच्या कामाच्या स्वरूपानुसार काही विशिष्ट कार्यक्रम आयोजित केले जातात. संगणकाच्या प्रदान प्रयुक्तीच्या साह्याने छिद्रित कागदी फितीऐवजी विद्युत चुंबकीय फीतही मिळू शकते व तिचा उपयोग पुढील कामासाठी करता येतो. याच टेलिटाइप यंत्राच्या संगणकावर अशीही एक उपादान प्रयुक्ती वापरण्यात येते की, ती कागदाची छिद्रित फीत वाचू शकत नाही पण एका खास टंकलेखन यंत्राने टंकित केलेली अक्षरे मात्र वाचू शकते. ही प्रयुक्ती म्हणजे प्रकाशसेवंदी घटकांचा बनविलेला एक प्रकाशीय क्रमवीक्षक असतो व तोही विशिष्ट आकारातील अक्षरेच वाचू शकतो. हा क्रमवीक्षक अक्षराची उंची, रूंदी व त्याच्या काळ्या रंगाची व्याप्ती यांतील फरकावरून अक्षरे ओळखतो.
शीताक्षरे : (कोल्ड टाइप). हा एक अतिशय साधा व आर्थिक दृष्ट्या काटकसरीचा जुळणीचा प्रकार आहे. या पद्धतीने एका विशिष्ट टंकलेखन यंत्राद्वारे केलेल्या टंकलेखनातील ओळीची लांबी संगणकाच्या साह्याने बरोबर पाहिजे तेवढी राखण्यात येते व त्या ओळीतील प्रत्येक दोन शब्दांमधील अंतरही अचूक सारखे राखता येते. यासेठी लागणारी सर्व आकडेमोड यातील संगणक अगोदरच करून तयार ठेवतो व त्यामुळे ओळीच्या लांबीमध्ये चूक राहत नाही. या प्रकारची आय. बी. एम. कंपनीचे मल्टिपॉईंट, जस्टोरायटर, ऑपटाइप वगैरे यंत्रे या विशिष्ट पद्धतीच्या कामासाठी उपलब्ध आहेत.
छायाक्षरजुळणी : या जुळणीमध्ये एका प्रकाशसंवेदी, सामान्यतः पारदर्शक अशा फिल्मवर प्रथम जरूरीप्रमाणे सम अथवा व्यस्त अशा स्वरूपात मजकूर तयार करून घेता येतो. सम वा व्यस्त पद्धतीच्या पारदर्शक मातृका अशा फिल्मवर ठेवून त्यांच्यावर प्रकाशक्रिया केली म्हणजे सम वा व्यस्त प्रतीच्या स्वरूपात फिल्मवर मजकूर तयार होतो व या फिल्मचा उपयोग मुद्रणासाठी पत्रे तयार करण्यासाठी केला जातो.
मानवी श्रमाने छायाक्षरजुळणी : या जुळणी तंत्राकरिता मानवी श्रमाने वापरण्याजोगी लहान आकारमानाची बरीच यंत्रे उपलब्ध आहेत. या यंत्रांवर लहान स्वरूपाचा मजकूर किंवा शीर्षकाच्या ओळी तयार करता येतात आणि स्वयंचलित नसली, तरीही यंत्रे बऱ्याच वेगाने काम करू शकतात. अशा यंत्रांपैकी खाली दिलेली यंत्रे जास्त उपयोगी ठरतात.
डॅनटाइप या नावाच्या यंत्रात प्लॅस्टिकच्या पारदर्शक मातृका वापरून त्यांच्यापासून जुळणीच्या पट्टीवर सलग मजकूर जुळविण्यात येतो. त्याचा यंत्रातील प्रकाशसंवेदी फिल्मशी सरळ संपर्क करून त्यापासून सम किंवा व्यस्त प्रत तयार करण्यात येतो. टायप्रो नावाच्या यंत्रात एका व्यस्त फिल्मवरील अक्षरांचा व चिन्हांचा उपयोग करण्यात येतो. या व्यस्त फिल्मची पुढे-मागे अशी हालचाल होऊन इष्ट अक्षर वा चिन्ह प्रकाशसंवेदी फिल्मच्या संपर्कात आणता येते. हेडलायनर या यंत्रामध्ये अक्षरे व इतर चिन्हे व्यस्त स्वरूपाची असतात. प्लॅस्टिकच्या एका चकतीवर ती कोरलेली असतात. या चकतीच्या स्थानाने नियंत्रण बाहेरच्या बाजूने करून अक्षराची वा चिन्हाची जागा ठरविता येते. फिल्मवर सरळ संपर्काने प्रकाशक्रिया केली जाते. हॅडेगो या यंत्रांमध्ये प्लॅस्टिकच्या मातृकांची जुळणी-पट्टीवर जुळणी करण्यात येतो. या अक्षरांची प्रकाशक्रिया एका विशिष्ट भिंगामधून केली जाते व त्या वेळी अक्षरांचे आकारमान लहान किंवा मोठे करण्याची सोय या यंत्रामध्ये केलेली आहे. यात ३५० मातृकांचा एक असे फक्त दोन वेगळे संच वापरतात आणि त्यांतील एक २० पॉईट व दुसरा ४८ पॉईट या आकारमानाचा असतो. या दोन्ही संचांच्या साह्याने ८ पासून ११० पर्यत कोणत्याही पॉईंटचे अक्षर मिळते व त्याप्रमाणे अक्षरजुळणी करता येते. स्टारलेटोग्राफ हे यंत्र साधारणपणे छायाचित्राच्या वर्धक यंत्रांप्रमाणे [→ छायाचित्रण] असते व त्याचा उपयोग फक्त अंधाऱ्या खोलीत करता येतो. एका अर्धदृढ प्लॅस्टिकच्या पट्टीवर अक्षरे कोरलेली असतात व त्यांतून प्रकाश पलीकडे जाऊ शकतो. या पट्टीवरील अक्षरे हव्या त्या जागी आणून नंतर त्यामधून खालील फिल्मवर प्रकाशक्रिया केली जाते. फिल्मवर परिणाम न करणाऱ्या लाल रंगाच्या प्रकाशात प्रथम अक्षर वाचून त्याची जागा ठरवली जाते व नंतर पांढऱ्या प्रकाशाने फिल्मवर प्रकाशक्रिया केली जाते. लेटरफॉट हे यंत्रही सर्वसाधारणपणे चित्रवर्धक यंत्राप्रमाणेच काम करते. मात्र त्याची प्रतीमा ज्या पृष्ठावर पडते तो पृष्ठभाग खालून प्रकाशित केलेला असतो. प्रथम ओळीतील सर्व मजकूर या प्रकाशित पृष्ठभागावर वर्धकामधून प्रक्षेपित केला जातो. त्या वेळी खाली प्रकाशसंवेदी फिल्म ठेवलेली नसते. नंतर प्रकाशसंवेदी फिल्म ओळीच्या प्रकाशित प्रतिमेवर ठेवली जाते. ही ओळ पारदर्शक असल्याने फिल्मवर उमटत नाही. अक्षरांच्या छपाईचे काम दोन लागोपाठ करण्यात येणाऱ्या क्रियांनी करण्यात येते. प्रथम नेहमीच्या प्रकाशात अक्षरप्रक्षेपित केले जाते व त्याच्या प्रकाशित प्रतिमेशी ते जुळवून घेतले जाते. प्रकाशसंवेदी फिल्मवरील खास रसायनामुळे तिच्यावर या प्रकाशाचा परिणाम होत नाही. या जुळणीनंतर छायाचित्रण दृष्ट्या क्रियाशील असलेल्या प्रकाशात अक्षर प्रक्षेपित केले जाते आणि त्याची फिल्मवर योग्य ती क्रिया होते.
डायटिप, मोनोटाइप कंपनीचे फोटोहेडलायनर व व्हेरिटायपर ही यंत्रे वापरण्यास जास्त सोपी व वेगवान असतात. त्यांवर साधारणपणे सेकंदाला एक अक्षर या वेगाने अक्षरजुळणी होऊ शकते. या यंत्रामध्ये स्वयंचलित भाग पुष्कळ असतो व त्यासाठी पूर्वतयारीही अचूक करावी लागते. भिंगाचे समायोजन करून ४ पासून ८४ पॉईंट पर्यंतची अक्षरे फिल्मवर तयार करण्याची क्षमता डायटिप या यंत्रामध्ये आहे.
स्वयंचलित छायाक्षरजुळणी : या पद्धतीचे जे यंत्र प्रथम तयार झाले ते लायनोटाइप या यंत्राच्या मूळ रचनेवरूनच प्रथम हे यंत्र केले गेले. त्यामुळे या दोन्ही यंत्रांच्या आकारमानांत फारसा फरक पडला नाही. जुन्या पितळी मातृकाच नवीन यंत्रामध्ये वापरल्या गेल्या. मात्र जुन्या मातृकेच्या जाडीवर अक्षर उत्कीर्ण पद्धतीने उलटे कोरलेले असे त्याऐवजी नवीन मातृकेमध्ये पारदर्शक पृष्ठावर काळे अक्षर पारदर्शक स्वरूपात फिल्मवर तयार होते व सर्व अक्षरांची व्यस्त प्रत तयार होते. इतर सर्व क्रिया या लायनोटाइप यंत्रांप्रमाणे होतात. मात्र वितळलेली शिशाची धातू येथे लागत नाही. त्याऐवजी प्रकाशसंवेदी फिल्म लागते व तीवर प्रकाशक्रिया करण्याची यंत्रणा लागते. प्रत्येक पूर्ण केलेली ओळ एकदाच एका भिंगासमोरून नेऊन छायाचित्रित केली जाते.
फोटोसेटर हे यंत्र इंटरटाइप या यंत्राच्या रचनेप्रमाणे बनवलेले आहे. मात्र या यंत्रात मूळ यंत्रापेक्षा तांत्रिक फरक जास्त प्रमाणात आहेत. या यंत्रात ज्या मातृका वापरलेल्या असतात त्यांमध्ये प्रत्येक अक्षर व्यस्त रूपात मातृकेच्या सपाट पृष्ठावर बसवलेले असते. या मातृकांना फोटोमॅटस असे नाव आहे. दोन शब्दांमधील जागा सोडण्यासाठी वेगवेगळ्या जाडीच्या पट्ट्या वापरल्या जातात. या यंत्रात ११७ मातृकांचा संच असतो. २७ मातृका जास्त असल्याने अक्षरांच्या सोई जास्त प्रमाणात मिळतात. या यंत्रासाठी ११४ अक्षरांचा अक्षरफलक लागतो. या यंत्रामध्ये १४ वेगवेगळी भिंगे असतात व १२ पॉईंटच्या एका अक्षरसंचापासून ३ ते ७२ पॉईंटपर्यंत वरील भिंगाच्या साह्याने १४ वेगवेगळ्या आकारमानांचे अक्षरसंच तयार करता येतात.
मोनोफोटो हे मोनोटाइप या अक्षरजुळणाच्या पद्धतीवरच आधारित आहे. मोनोटाइप यंत्रामध्ये कागदाच्या विशिष्ट रुंदीच्या फितीवर अक्षराप्रमाणे भोके पाडली जातात. तीच पद्धत या प्रकारच्या छायाक्षरजुळणीमध्ये वापरली जाते. मात्र छायाक्षरजुळणीमध्ये अक्षरांच्या कागदाच्या फितीवरील विशिष्ट जागा वेगळ्या पद्धतीने ठरविलेल्या असतात. ही कागदी फीत नंतर पुढील तांत्रिक क्रियांसाठी दुसऱ्या यंत्रावर बसवून छायाक्षरजुळणी केली जाते. य पद्धतीमध्ये धातूच्या एका चौकटीमध्ये २० अक्षरांच्या १७ ओळींमध्ये सर्व अक्षरे व चिन्हे बसविलेली असतात. ही अक्षरे मातृकांच्या स्वरूपात पण सर्व चौकोन सारख्या आकारमानाचे करून बसविलेले असतात. प्रत्येक अक्षर किंवा चिन्ह व्यस्त पारदर्शिकेच्या रूपात असते. जे अक्षर जुळवायचे असते ते यांत्रिक पद्धतीने एका विशिष्ट ठिकाणी आणले जाते व त्यातून तीव्र प्रकाश झोत सोडला जातो. हा झोत प्रथम मातृकेमधून लोलकापुढे जातो व नंतर वेगवेगळ्या भिंगांमधून, वर्धकामधून व लोलकामधून पुढे जातो आणि शेवटी फिल्मवर प्रकाशक्रिया करतो. अक्षराचे आकारमान (लहान किंवा मोठे) अगोदर ठरवून नंतर भिंगे व वर्धक त्याप्रमाणे एकमेकांशी जुळवून प्रकाशाची क्रिया फिल्मवर केली जाते. फिल्मवर प्रकाशाची क्रिया होण्याअगोदर प्रत्येक अक्षर किंवा चिन्ह दोन आरशांच्या साह्याने फिल्मवर योग्य ठिकाणी प्रकाशित केले जाते. हे दोन आरसे त्यांच्या परावर्तक पृष्ठांमध्ये ९०° कोन होईल अशा प्रकारे बसविलेले असतात. फिल्मला समांतरपणे पुढे हे आरसे सरकत राहतात व ओळीने अक्षरे प्रकाशित करत जातात. एक ओळ प्रकाशित करून संपली की, दोन्ही आरसे परत पहिल्या स्थितीत येतात व फिल्म एका ओळी इतक्या जागेने पुढे सरकते. दोन शब्दांमधील जागा अगोदर निश्चित करूनच सर्व अक्षरजुळणी करता येते. एका ओळीत किती अक्षरे बसतील त्याचा हिशेब करूनच अक्षरजुळणीची आखणी केली जाते व त्याच हिशेबाने दोन शब्दांमधील अंतर ठरवले जाते. दोन ओळींमधील अंतरही अगोदर ठरवले जाते व त्या प्रमाणातच प्रत्येक ओळीनंतर पुढील ओळीच्या आधी फिल्म पुढे सरकते. वरील सर्व गोष्टी यांत्रिक रीतीने करण्याची सोय अगोदरच तयार असते. आठ पॉईंटच्या मातृकांचा एक संच वापरून मोनोफोटो यंत्रामध्ये ६ ते २४ पॉईंटच्या अक्षरांचा पूर्ण संच भिंगांच्या साह्याने तयार करून अक्षरजुळणी करण्याची सोय आहे. मात्र अक्षरजुळणीच्या परिपूर्णतेसाठी दोन किंवा तीन आकारमानांच्या मातृकांचा उपयोग केला जातो. त्यामुळे छायाक्षरजुळणी जास्त चांगल्या प्रकारे करता येते. छायाक्षरजुळणीची यंत्रे जसजशी प्रगत होत गेली व त्यांमध्ये सुधारणा होत गेली तशा त्यांच्या पिढ्या तयार झाल्या. या आधी ज्या यंत्रांचा उल्लेख आला आहे ती यंत्रे पहिल्या पिढीतील समजली जातात. यानंतरची यंत्रे दुसऱ्या पिढीतील आहेत. या पिढीतील यंत्रे पहिल्या पिढीतील यंत्रांसारखी दिसत नाहीत किंवा त्यांची कार्यपद्धती पहिल्या पिढीतील यंत्रांसारखी नाही. त्यामुळे त्यांमध्ये कुठलेही साम्य दिसत नाही. बाह्यतः ही यंत्रे धातूच्या पेट्यांसारखी दिसतात. मात्र अक्षरफलकामुळे त्यांच्यामध्ये यंत्राचा थोडासा भास होतो. मुख्यतः घर्षण, जडपणा व हलणाऱ्या भागांची संख्या शक्य तितकी किमान ठेवून या यंत्राची रचना केलेली असते. फक्त विजेचा अखंड, नियमित व नियंत्रित प्रवाह ही या यंत्रांची प्राथमिक गरज असते.
अक्षरफलक हा या यंत्रांचा एक आवश्यक भाग आहे पण त्याची जागा काही यंत्रांमध्ये छिद्रे पाडलेली कागदाची फीतही घेऊ शकते. या यंत्राचा अक्षरफलक वापरावयाचा नसेल त्या वेळी जुळणीच्या मजकुरासंबंधीची माहिती यंत्राला पुरविण्यासाठी कागदाची फीत जोडून पुढील अक्षरजुळणी करता येत. याशिवाय या यंत्राला संगणक जोडावयाचा असेल, तर त्या वेळी तोही जोडता येतो. त्याच्या साह्याने सर्व यंत्रही चालवता येते किंवा शब्दांच्या ओळीची परिपूर्णता, ओळीच्या शेवटी शब्द कुठे व कसे तोडायचे, चुकांची दुरुस्ती या सर्व गोष्टी साधता येतात. संगणकाच्या या कार्यासाठी अक्षरफलकाचा किंवा कागदाच्या अखंड छिद्रित फितीचा उपयोग करण्यात येतो. मातृकेवरील अक्षराच्या प्रतिमेची निवड करून तिचा उपयोग ओळीत कसा करावयाचा हे स्थिर अथवा चल प्रकाश शलाकेच्या साहाय्याने वरील यंत्र ठरविते.
अक्षराचे आकारमान लहान किंवा मोठे करण्याव्यतिरिक्त यातील भिंगे व वर्धक सरळ अक्षरांची तिरकी अक्षरे करणे किंवा ओळीची लांबी वाढवणे किंवा अक्षरे अभट, बसकी करणे वगैरे सर्व प्रकार करू शकतात. जुळवलेला मजकूर फिल्मवर किंवा कागदावर मिळविता येतो शिवाय तो पाहिजे असेल त्याप्रमाणे व्यस्त किंवा सम स्वरूपात मिळवता येतो. यासाठी जो प्रकाश वापरला जातो तो सामान्यतः इलेक्ट्रॉनीय चमकेच्या स्परूपाचा असतो. या प्रकाशाची तीव्रता अक्षर जसे लहान किंवा मोठे करावयाचे असेल त्याप्रमाणे कमी किंवा जास्त करता येते.
वेगवेगळ्या पद्धतीची यंत्रे सध्या अस्तित्वात आहेत. त्यांतील काही यंत्रांच्या खास वैशिष्ट्यांचा उल्लेख येथे केला आहे व त्यांच्या कार्यपद्धतीमधील फरक दाखवला आहे. नव्या पद्धतीच्या लायनोफिल्म या यंत्रामध्ये ८८ मातृकांच्या एक संच वापरला जातो. या संचातील सर्व अक्षरे एका काचेच्या पट्टीवर कोरलली असतात व ही पट्टी अक्षर जुळणी करताना स्थिर राहते. जे अक्षर हवे असेल ते अक्षर छायाचित्रणासाठी वापरल्या एका भिंगाच्या झडपेकडून निवडले जाते. ही झडप धातूच्या आठ पात्यांच्या साह्याने काम करते. ही पाती अतिशय पातळ व परस्परव्यापी असतात. फिल्मवर प्रकाशक्रिया करावयाच्या एका ठराविक क्षणी ही झडप नेहमी उघडण्याऐवजी जे अक्षर हवे असेल त्याच्या समोरच्या ती उघडते आणि यासाठी विद्युत् चुंबकाचा उपयोग केला जातो. प्रत्येक अक्षर विद्युत् चुंबकाशी अशा त-हेने जोडलेले असते की, अक्षरफलकावर जेव्हा अक्षरावर बोट ठेवले जाते त्या क्षणी त्या अक्षरावर विद्युत् चुंबकाचा परिणाम होतो व त्यासमोर झडप उघडली जाते आणि त्या अक्षरातून प्रकाश पलीकडे जातो. जेव्हा प्रकाश अक्षरातून मातृकेतून पलीकडे जातो तेव्हा तो खास भिंगातून एका विशिष्ट आरशावर पडतो. अशी ८८ छोटी भिंगे प्रत्येक अक्षर किंवा चिन्ह याच्यासाठी असतात व दर वेळी त्यांतील एकामधून प्रकाश पलीकडे जातो. भिंगातून आरशावर प्रकाश पडला की, त्यातून तो परावर्तीत होऊन फिल्मवर प्रकाशित होतो व अक्षर जुळणी होते.
या विद्युत् चुंबकीय यंत्रणेचा उपयोग करून हे यंत्र १ तासात ४३,००० अक्षरे किंवा चिन्हे (म्हणजे एका सेकंदात १२ अक्षरे या वेगाने) जुळून शकते. मातृकांच्या १८ काचेच्या पट्ट्या अशा त-हेने बसवलेल्या असतात व क्षणार्धात त्यांच्या उपयोग करता येतो. मातृकांच्या १८ पट्ट्यांमुळे एकंदर १,५८४ वेगवेगळ्या पद्धतीची अक्षरे किंवा चिन्हे यांचा उपयोग जरूरीप्रमाणे करता येतो. मातृकांच्या तीन पट्टया (अक्षरांच्या एका पद्धतीची अक्षरजुळणी करण्यासाठी) वापरल्यास ३ ते ३६ पॉईंटमध्ये वेगवेगळ्या १६ आकारमानांसाठी पुरेशा असतात.
जर्मनीमध्ये डायट्रॉनिक नावाचे यंत्र छायाक्षरजुळणीसाठी तयार केले आहे. त्यात मातृकांच्य एका पट्टीवर १२६ अक्षरे व चिन्हे असतात. या पट्टीमधून प्रकाश पलीकडे गेल्यावर जे अक्षर हवे असेल त्याच्यासमोरील लोलक अशा जागी येऊन थांबतो की, त्यातून एका वेळी एकाच अक्षरामधून प्रकाश पुढे जाऊन त्याची प्रकाशक्रिया फिल्मवर होते.
फोटॉन-ल्युमिटाइप या यंत्रामध्ये प्रथमच मातृकेची वर्तुळाकार पट्टी वापरून तिला अखंड गती दिली गेली. या वर्तुळाकार गतीमुळे अक्षर जुळणीचा वेग वाढायला पुष्कळच मदत झाली आहे. या अक्षरांची निवड व त्यांची फिल्मवरील प्रकाशक्रिया या दोन्ही गोष्टी इतर यंत्रापेक्षा जास्त वेगाने होतात. त्यात एका वर्तुळाकार पातळ चकतीवर अक्षरांच्या मातृका एककेंद्री वर्तुळाकार (केंद्र एकच पण त्रिज्या निरनिराळ्या असलेल्या वर्तुळांवर) कोरलेल्या असतात व ही चकती सेकंदाला १० वेळा या गतीने अखंड फिरत राहते. चकतीच्या मागे एक इलेक्ट्रॉनीय स्फुर दिवा (चमक दिवा) असतो व तो दिवा प्रत्येक अक्षरासाठी काही लक्षांश सेकंद प्रकाशित होऊन अक्षरामधून प्रकाश पुढे जातो व फिल्मवर त्याची क्रिया होते. या सर्व क्रिया अतिप्रचंड वेगाने होत असल्याने त्यासाठी इतर अनेक गोष्टींची मदत घेतली जाते. अक्षरफलकावरील बटण दाबून किंवा छिद्रे पाडलेली कागदी फीत वापरून हवे असलेले अक्षर जुळवण्यासाठी विजेच्या साह्याने प्रथम चकतीवरील अक्षर एका विशिष्ट जागी आणणे व त्यातून लगेच प्रकाश पुढे जाणे या सर्व क्रिया योग्य वेळी होण्यासाठी यंत्राचा अचूकपणा अतिशय महत्त्वाचा असतो.
अक्षरफलक किंवा छिद्रे पाडलेली कागदी फीत वापरून अक्षर जुळणीसाठी जो मजकूर तयार होतो त्यातील प्रत्येक अक्षर किंवा चिन्ह याचा साठा एका विशिष्ट स्मरण केंद्रात साठवला जातो. पूर्वी ही क्रिया नुसती यांत्रिक होती. आता चुंबकीय पद्धतीने ही साठवण केली जाते. त्याच वेळी दोन शब्दांमधील अंतर किंवा काही ठराविक चिन्हांची निवड अशा क्रिया ठराविक वेळी आपोआप व्हाव्यात अशी सोय वरील यंत्रामध्ये आहे. या पद्धतीने सेकंदाला १० अक्षरे (ताशी ३६,०००) या वेगाने तत्त्वतः अक्षरजुळणी जरी शक्य असली, तरी प्रत्यक्षात या जुळणीचा सरासरी वेग साधारणपणे ताशी २० ते २५ हजार अक्षरे एवढा पडतो. मातृकांच्या एका चकतीवर आठ वर्तुळांमध्ये ९० अक्षरे वा चिन्हे यांचे दोन पूर्ण संच असतात. हे संच १२ वेगवेगळ्या आकारमानांमध्ये ५ ते ७२ पॉईंट अक्षरांमध्ये वापरता येतात किंवा एकंदर १७,२८० अक्षरे कोणत्याही क्षणी वापरण्याकरिता उपलब्ध असण्याची क्षमता या यंत्रामध्ये आहे.
फोटॉन-ल्युनिटाइप या यंत्राच्या दुसऱ्या एका प्रकारामध्ये चकतीच्या ऐवजी एका दंडगोलाचा उपयोग केला जातो हा दंडगोल त्याच्या आसाभोवती सेकंदाला ३० वेळा फिरतो व हवे असलेले अक्षर समोर आले की, त्यातून प्रकाश जाऊन प्रकाशसंवेदी फिल्मवर अक्षर उमटते. अक्षरांच्या मातृका व्यस्त पद्धतीने दोन वेगळ्या फिल्मांवर तयार केलेल्या असतात. प्रत्येक फिल्मसाठी वेगळा स्फुर दिवा असतो. शिवाय भिंगे व लोलक यांच्या मदतीने प्रत्येक अक्षर प्रकाशसंवेदी फिल्मवर प्रकाशित करण्याची योजना या यंत्रात केली आहे. एकंदर अक्षरांची संख्या किंवा अक्षरे लहान-मोठी करण्याची क्षमता या दृष्टीने हे यंत्र आधीच्या यंत्राइतके सक्षम नाही पण तासाला ८०,००० अक्षरे वा चिन्हे जुळवण्याची याची क्षमता आहे व ही क्षमता आधी वर्णन केलेल्या यंत्राच्या सिपटीहून जास्त आहे.
यूरोपा-लायनोफिल्म हे यंत्रही फोटॉन-ल्युमिटाइप या यंत्राप्रमाणेच चालते, पण त्यतील फरक असा की, त्यात अखंडपणे फिरणारा एक दंडगोल असतो व विजेवर काम करणारी यंत्रणा जादा असते. या मातृका म्हणजे प्रत्येक अक्षराची एक स्वतंत्र पट्टी व त्यावर अक्षराची जास्त प्रतिमा आणि त्याबरोबरच विशिष्ट मांडणी असलेल्या काही पारदर्शक खुणा त्यात समाविष्ट असतात. त्या मातृकेची ओळख पटविण्यासाठी या खुणा उपयोगी पडतात. अखंड फिरणाऱ्या दंडगोलासमोरून या अक्षरपट्ट्या (मातृका) सरकतात. पट्ट्यांवर ज्या सांकेतिक खुणा असतात त्या प्रकाशविद्युत घटाच्या साह्याने ओळखून त्यांची निवड केली जाते. ज्या वेळी अक्षरांची पट्टी क्रमविक्षकाच्या समोरून सरकते व त्या पट्टीवरील सांकेतिक खुणा एकमेकांशी जुळतात त्या वेळी क्रमवीक्षक प्रकाशाची झडप उघडण्याची आज्ञा देतो व त्या अक्षराचे प्रकाशन फिल्मवर होते. यूरोप-लायनोफिल्म यंत्रातील दंडगोलामध्ये चार स्तरांचे पडदे असतात व ते एकमेकांवर असतात. प्रत्येक स्तरामध्ये १२० द्विदलीय (दोन भाग असलेल्या) मातृकांचा संच असतो. अशा संचामध्ये एक साधे अक्षर व तेच तिरके (इटँलिक) अक्षर हे एकमेकांना जवळ असतात. कोणतेही अक्षर हवे तेव्हा चटकन वापरता येते. कारण त्यांचे भिन्नत्व त्यांच्या स्थानांवर अवलंबून नसते.
फोटॉन-ल्युमिझिप हे यंत्र वेगळ्या तत्त्वावर काम करते. दंडगोलाचा उपयोग ज्या छायाजुळणी यंत्रात केला जातो त्या यंत्राचा वेग एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे येत नाही. कारण जादा वेगामुळे दुसऱ्याच तांत्रिक अडचणी निर्माण होतात म्हणून फोटॉन-ल्युमिझिप यंत्रामध्ये अखंड चक्रीय गतीचा उपयोग केला जात नाही पण अक्षरजुळणीचा वेग मात्र वाढवला आहे. अक्षरांच्या मातृका स्थिर असतात व एक मोठ्या आकारमानाच्या पट्टीवर त्या जुळवलेल्या असतात. प्रत्येक अक्षराच्या मातृकेमागे एक स्वतंत्र इलेक्ट्रॉनीय स्फुर दिवा असतो. या स्फुर दिव्याचा उपयोग अक्षराच्या प्रकाशनासाठी स्वयंचलित रीतीने केला जातो व फिल्मवर त्याची क्रिया होते. या यंत्रामध्ये संगणकही वापरला जातो. जुळवावयाच्या अक्षराच्या एका ओळीचे सांकेतिक संदेश ज्या वेळी संगणकामध्ये पोहोचतात त्या वेळी कोणता स्फुर दिवा वापरायचा ते संगणक ठरवतो. दिव्याची ही उघडझाप यंत्रामध्ये जी भिंगे वापरली जातात त्यांच्या हालचालींशी निगडीत असते. प्रत्यक्षात या यंत्रातील हालचाली फार जटिल आहेत व संगणकामुळेच त्या शक्य होतात. तरीही यंत्रातील हालचाली या अगदी शक्य तितक्या कमी केलेल्या आहेत, कारण त्यातील एकमेव हलता भाग हा त्यात वापरल्या जाणाऱ्या भिंगाचा एक घटक असतो. त्या भिंगाच्या हालचालींची रचना अशी केलेली असते की, एका ओळीतील सर्व अक्षरे एकदम प्रकाशित होतात. या रचनेमुळे ल्युमिटाइप या यंत्राच्या २० पट जास्त कार्यक्षमता ल्युमिझिप या यंत्राची असते. तत्त्विक दृष्ट्या हे तासाला २० लाख अक्षरे जरी जुळवू शकत असले, तरी प्रत्यक्षात १० लाखाहून जास्त अक्षरे जुळवण्याची त्याची क्षमता अनुभवास आली आहे.
इलेक्ट्रॉनीय छायाक्षरजुळणी : छायाक्षरजुळणीच्या तिसऱ्या पिढीच्या यंत्रात प्रकाशकाच्या शलाकेची (झोताची) जागा इलेक्ट्रॉनांच्या प्रवाहाने घेतली आहे. याचा मुख्य फायदा असा की, भिंगे किंवा आरसे यांचा उपयोग न करता विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या साह्याने इलेक्ट्रॉनांचे विचलन करता येते. दूरचित्रवाणीची कार्यपद्धती याच सूत्रावर काही प्रमाणात आधारलेली आहे आणि सुरूवातीची छायाक्षरजुळणीची यंत्रे रचनेच्या दृष्टीने बंद-मंडल दूरचित्रवाणीच्या कार्याशी मिळतीजुळती आहेत [→ दूरचित्रवाणी]. एका वाचन प्रयुक्तीने मातृकेच्या अक्षराच्या रूपरेखेचे सूक्ष्म क्रमवीक्षणाने विश्लेषण केले जाते व त्यातून जी दीप्तिमानरूप माहिती मिळते, तिचे रूपांतर इलेक्ट्रॉनीय संदेशात केले जाते. या संदेशानुसार प्रदान प्रयुक्तीच्या ऋण किरण नलिका पडद्यावर वाचन प्रयुक्तीशी समकालीकरण केलेल्या सूक्ष्म क्रमवीक्षकाद्वारे अक्षरांची केलेली जुळणी दृश्य रूपांत डोळ्यांना दिसते व भिंगाच्या साह्याने प्रकाशसंवेदी फिल्मवर प्रकाशित करता येते. त्याच वेळी अक्षराचे आकारमान अगोदर ठरवून त्याप्रमाणे ते कमीजास्त करता येते. वाचन प्रयुक्तीतील क्रमवीक्षक व प्रदान प्रयुक्तीतील क्रमवीक्षक यांचे जुळवावयाच्या मजकुरानुसार योग्य समकालीकरण साधण्यासाठी संगणकाचा उपयोग करण्यात येतो. या तिसऱ्या पिढीतील काही यंत्रांमध्ये दूरचित्रवाणीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅमेरॅशी मिळताजुळता असणारा क्रमवीक्षक वापरला जातो. त्यातील इलेक्ट्रॉन शलाकेची दिशा जे अक्षर जुळवण्यासाठी निवडलेले असतो, त्याच्या मातृकेकडे वळवली जाते व तिच्यापासून मिळणाऱ्या दीप्तीमानुरूप माहितीचे विश्लेषण केले जाते. दुसऱ्या काही प्रकारच्या यंत्रामध्ये ऋण किरण नलिकेचा उपयोग करून एका पट्टीवरील पारदर्शिकेच्या स्वरूपातील मातृकांचे मागील बाजूने क्रमविक्षण केले जाते. अक्षरांच्या मातृकांमधून दुसऱ्या बाजूला जो प्रकाश जातो तो तेथील प्रकाशविद्युत घट ग्रहण करतात व त्याचे रूपांरत इलेक्ट्रॉनीय संदेशात करून ते प्रदान प्रयुक्तीला पुरवितात.
मातृकांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉन उत्सर्जन नलिकेच्या तोंडाचे १६ चौरस भाग केलेले असतात व क्रमवीक्षणाने योग्य निवड करून त्यांपैकी एका वेळी एकच चौरस प्रकाशित केला जातो. प्रत्येक चौरसात १६ प्रकाशविद्युत घट बसवलेले असतात व एक वेळे फक्त एकच घट कार्यन्वित होतो. त्यामुळे निवडलेल्या चौरसानुसार व निवडलेल्या घटानुसार २५६ प्रकारच्या अक्षरांच्या रचना शक्य होतात. मात्र प्रत्येक रचनेनुरूप पट्टीवरील एकाच मातृकेची अचूक निवड होते. प्रदान प्रयुक्तीच्या पडद्यावर सर्वसाधारण मुद्रणकामासाठी दर इंचाला (२·५४ सेंमी.ला) ६५० रेषांच्या साह्याने अक्षराची रचना करण्यात येते पण काही खास दर्जेदार मुद्रणकामासाठी इंचाला १,३०० रेषांच्या साह्यानेही अक्षरे तयार करता येतात. छायाचित्रीय पुनरूत्पादनासाठी अक्षरांचे आकारमान लहान केल्यावर रेषात्मक संरचना दिसेनाशी होते.
लायनोट्रोन या यंत्राच्या एका जास्त जटिल प्रकारामध्ये प्रदान प्रयुक्तीच्या पडद्यावरील मजकुराच्या सर्व पानांचे क्रमवीक्षण करून मजकुरात एखादे अक्षर (उदा., प) जेथे आले असेल तेथे तेथे ते अक्षर प्रकाशित होते व त्याची जुळणी होते. क्रमाक्रमाने इतर सर्व अक्षरे प्रकाशित होऊन त्यांचीही जुळणी होते. जेव्हा पानावरील सर्व अक्षरे या क्रमाने प्रकाशित होतात त्या वेळी अक्षरजुळणी पूर्ण होते. या यंत्रावर सेकंदाला १,१०० (ताशी ४० लक्ष) अक्षरे वा चिन्हे या वेगाने जुळणी होते. आल्फान्युमेरिक या प्रकारच्या इलेक्ट्रॉनीय छायाक्षरजुळणी यंत्रात इलेक्ट्रॉनीय रीतीने वारंवार विश्लेषण कराव्या लागणाऱ्या मातृकांच्या ऐवजी पूर्वी केलेल्या विश्लेषणांच्या व द्विमान रूपातील चुंबकीय शीघ्रप्राप्य (चटकन प्राप्त होणाऱ्या) स्मरण स्वरूपात परिरक्षित केलेल्या फलितांचा उपयोग करण्यात येतो. यात जुळणीसाठी निवडण्यात आलेल्या प्रत्येक अक्षराची प्रकाशित प्रतिमा ऋण किरण नलिकेच्या पडदयावर मिळण्यासाठी त्या त्या अक्षराकरिता प्रदान कार्यक्रम निश्चित केलेला असतो.
हेल-डिजिसेट हे यंत्र प्राथमिक विश्लेषणासाठी प्रत्येक अक्षराची रूपरेखा विचारात घेऊन एका दाट जाळीवजा पडद्यावर त्याची कोरल्यासारखी प्रतिकृती तयार करते. या जाळीवर ३,००० ते ६,००० छोटे चौरस असतात व अक्षराच्या इष्ट आकारमानाप्रमाणे या चौरसांचे आकारमान कमीजास्त असते. जे चौरस आक्षराच्या रूपरेखेने व्यापलेले असतात त्यांना द्विमान संकेतातील १ हे चिन्ह व इतर चौरसांना ० हे चिन्ह देण्यात येते. या विश्लेषणाचे फलित एका ८ परिवाहांच्या कागदी फितीवर छिद्रे पाडून नोंदविले जाते. दिलेल्या विशिष्ट वळणाच्या अक्षरांच्या संपूर्ण संचासाठी तयार केलेली छिद्रित फीत अक्षर उत्पादनासंबंधी चुंबकीय स्मरणाला सूचना देण्यासाठी खास डिजीसेट वाचक प्रयुक्तीत घालण्यात येते. अक्षरांचे वळण बदलावयाचे असल्यास इष्ट त्या अन्य वळणासाठी पूर्वीच तयार केलेल्या फितीचा उपयोग केला म्हणजे काम भागते.
डिजिसेट–५०-टी-२ या नावाचे अक्षरजुळणी यंत्र सेकंदाला ३,००० अक्षरे या वेगाने काम करू शकते. या प्रकारच्या एका यंत्रावर वर्तमानपत्राचे एक पूर्ण पान क्रमवीक्षणाच्या एकाच क्रियेमध्ये छायाचित्रणाच्या साह्याने जुळवून मिळते. यात अक्षरांप्रमाणेच चित्रांचेही विश्लेषण द्विमान संकेताच्या रूपात होते.
फोटोट्रॉनिक-सीआरटी (कॅथोड रे ट्यूब-ऋण किरण नलिकायुक्त) व एपीएस (आल्फान्यूमेरिक फोटोकाँपोझिशन सिस्टीम-आल्फान्युमेरिक छायाक्षरजुळणी पद्धत) या यंत्रामध्ये प्रत्येक अक्षराचे विश्लेषण एकमेकांच्या अगदी लगत असलेल्या उभ्या रेषांच्या रूपात करून सांकेतिक माहितीचे प्रमाण कमी करण्यात आलेले आहे. स्थान व उंची ही या रेषांचा विभेदक लक्षणे असतात. छायाचित्रीय प्रदान प्रयुक्ती उभ्या क्रमवीक्षणाद्वारे या रेषांचे त्यांच्या विभेदक लक्षणांनुसार पुनरूत्पादन करते. अक्षरांच्या रूंदीनुसार रेषांची संख्या सु. ५० ते ९० असते आणि उंचीच्या मापातील एककांची संख्या ८० पर्यंत जाते किंवा प्रदान यंत्रणेच्या पडद्यावरील द्विमितीत दर इंचास ८०० रेषांपर्यंत जाते.
मुद्रणक्रिया : मुद्रणाची क्रिया म्हणजे मुद्रणाची शाई (मुख्यतः तिच्यातील रंगद्रव्य) मुद्रणप्रतिमेवरून कागदावर किंवा इतर तत्सम पदार्थांवर स्थानांतरित करून पक्की करणे. या क्रियेला अक्षरे किंवा चित्रे यांची मर्यादा फारशी नसते.
एकरंगी मुद्रण एका रंगात होऊ शकते पण मुख्यतः काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर केलेले मुद्रण असे त्याचे स्वरूप असते. रंगीत कागदावरही दुसऱ्या कुठल्याही किंवा काळ्या रंगाने मुद्रण होते. कागदाव्यतिरिक्त प्लॅस्टिक किंवा तत्सम पृष्ठावरही मुद्रण केले जाते पण मुद्रण तंत्रामध्ये त्याला अनुरूप बदल करावा लागतो.
बहुरंगी मुद्रण : कागदावर अतिशय अचूकपणे चार रंग जर मुद्रित केले, तर त्याला रंगांचे अध्यारोपण करणे असे म्हणतात. ज्या बिंदूंनी रंगीत चित्र तयार होते, त्या बिंदूंचे मात्र निकटस्थितीकरण झाल्यामुळे रंग बरोबर छापले जातात. बिंदू जर एकमेकांवर छापले, तर त्याचा परिणाम फार विचित्र दिसतो. त्याला मोटरे संरचना म्हणतात व रंगीत मुद्रणामध्ये ती अजिबात चालत नाही. चार रंग पूर्णपणे मुद्रित झाल्यानंतरच चित्राला पूर्ण चित्राचे स्वरूप येते. एकच कागद चार वेळा मुद्रित करून बहुरंगी मुद्रण केले जाते. ज्या यंत्रावर चार रंग एकामागोमाग मुद्रित करण्याची सोय असते, तेथे कागद एकदाच यंत्रातून पाठवला की बहुरंगी मुद्रण पूर्ण होते. बहुरंगी मुद्रणासाठी चार वेगवेगळ्या मुद्रणप्रतिमा तयार कराव्या लागतात व प्रत्येक मुद्रणप्रतिमेवर एकच रंग लावला जातो. जर रंगीत चित्राचे मुद्रण करावयाचे असेल, तर मुद्रणप्रतिमा असंख्य अशा बिंदूंनी तयार होते. याकरिता कॅमेऱ्याची मदत घ्यावी लागते.
पांढऱ्या रंगाचे तीन घटक असतात व त्यांच्या मिश्रणाने पांढरा रंग तयार होतो. निळा, हिरवा व तांबडा हे तीन घटक होत. मात्र पांढऱ्या कागदावर जर बहुरंगी मुद्रण करावयाचे असेल, तर त्यासाठी जी रंगीत शाई वापरली जाते ती वेगळी असते. ते रंग म्हणजे पिवळा, मॅजेन्टा व सियान (सायन) आणि त्यांचे मिश्रण पूर्ण करण्यासाठी भर म्हणून काळा रंग छापला जातो. वर उल्लेखिलेल्या तीन रंग म्हणजे पांढऱ्या प्रकाशाच्या तीन घटक रंगांचे दुय्यम रंग होत. कागदावर जेव्हा पिवळा रंग छापला जातो त्या वेळी हिरवा व तांबडा हे प्रकाशाचे घटक रंग डोळ्यांकडे परावर्तीत होतात. त्याचप्रमाणे मॅजेन्टामुळे निळा व तांबडा आणि सियानमुळे निळा व हिरवा हे रंग परावर्तीत होतात. अर्थात दोन रंग परावर्तीत होतात व तिसरा रंग शोषला जातो. हे तीन रंग व काळा यांच्या मदतीने रंगांच्या असंख्य छटा आपोआप तयार होऊन डोळ्याला जाणवतात. मुद्रणाची जी रंगीत शाई वापरली जाते ती प्रकाशाच्या तीन घटकांपैकी एक रंग परावर्तीत करीत नाही. पांढऱ्या कागदावर जेव्हा तीनही रंग छापले जातात त्या वेळी तिन्ही रंगांचे मिश्रण काळ्या रंगाचा आभास निर्माण करते. त्याउलट प्रकाशाचे तीन घटक रंग जर एखाद्या काळ्या पडद्यावर रंगीत काचांचा साह्याने प्रक्षेपित केले, तर तीन रंगांचे मिश्रण मिळून पांढऱ्या रंगाचा आभास निर्माण होतो.
मुद्रणासाठी ज्या चार रंगांचा वापर केला जातो ते रंग छापण्यासाठी प्रत्येक रंगाचा एक ठसा किंवा पत्रा स्वतंत्र तयार केला जातो. मूळ चित्राचे चार रंगांमध्ये प्रथम विलगीकरण करावे लागते व हे विलगीकरण रंगीत प्रकाश-गाळण्यांच्या साह्याने करावे लागते. या गाळण्या तीन असतात (निळी, हिरवी व तांबडी) व त्यांचा रंग पांढऱ्या प्रकाशाच्या घटकांच्या असतो. निळी गाळणी वापरली म्हणजे पिवळा रंग छापण्यासाठी व्यस्त प्रत मिळते. तसेच हिरव्या व तांबड्या गाळण्यांमुळे अनुक्रमे मॅजेन्टा व सियान रंग छापण्यासाठी व्यस्त प्रती मिळतात. तिन्ही गाळण्या एकामागोमाग दुसरी अशा वापरून जी व्यस्त प्रत तयार होते ती काळा रंग छापण्यासाठी मिळते. काळा रंग चित्राला आकार व गडदपणा देतो त्यामुळे जरी तीन रंगी छपाई असे नाव असले, तरी प्रत्यक्षात काळा रंग आवश्यक असल्याने ती चार रंगी छपाई असे नाव असले, तरी प्रत्यक्षात काळा रंग वापरून जेव्हा ही रंगीत छपाई केली जाते त्या वेळी आधी छापलेल्या रंगावर पुढील रंग अतिशय अचूकपणे छापला जावा लागतो. प्रचलित पद्घतीप्रमाणे प्रथम पिवळा, नंतर मॅजेन्टा, सियान व काळा या क्रमाणे रंग छापले जातात. अलीकडे मुद्रणाच्या शाईचा पारदर्शकपणा जास्त सुधारलेला असल्याने प्रथम मॅजेन्टा किंवा सियान हेही रंग छापता येतात.
अक्षरदाब मुद्रण : हाताने जुळणी करण्यायोग्य अशी धातूची अक्षरे तयार झाल्यानंतर अक्षरदाब मुद्रणाला सुरुवात झाली व त्याला आता ५०० वर्षे होऊन गेली. अक्षरांच्या धातूच्या खिळ्यांवर किंवा चित्रांच्या ठशांवर रुळांच्या साह्याने शाई पसरून व नंतर त्या मुद्रणप्रतिमेवर यांत्रिक रीत्या कागद दाबून जे मुद्रण केले जाते त्याला साधारणपणे अक्षरदाब मुद्रण म्हटले जाते. या प्रकारच्या मुद्रणाला उठावाचे मुद्रण अशी सामान्य संज्ञा आहे.
उठावाच्या मुद्रणासाठी जी यंत्रे वापरली जातात त्या यंत्रांचे मुख्यतः दोन भाग होतात. एका भागामध्ये अक्षरांची व शब्दांची पाने मजकूर किंवा रेखाचित्रांचे वगैरे ठसे व दुसऱ्या भागाने कागद या सर्व पृष्ठावर सरळ दाबून त्यावर मुद्रण करणे. ही मुद्रणयंत्रे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची असून प्रत्येक यंत्राची रचना निराळी असू शकते. अगदी साधे यंत्र असले, तरीही त्यात अक्षरांच्या ओळी किंवा चित्रांचे ठसे बसविण्यासाठी एक सपाट पृष्ठभाग असतो व एका लोखंडी चौकटीमध्ये मुद्रणप्रतिमा पक्की बसवून ती चौकट या पृष्ठभागावर पक्की बसवता येते. दुसऱ्या काही यंत्रांवर कागदाला अर्ध किंवा पूर्ण दंडगोलाकार देऊन तो मुद्रणप्रतिमा बसविलेल्या सपाट पृष्ठभागावर दाबून मुद्रण कले जाते. तिसऱ्या प्रकारात मुद्रणप्रतिमा दंडगोलाकार असून कागदही दंडगोलाकार पद्धतीने त्या मुद्रणप्रतिमेवर दाबला जातो. आ. ७ दाखविलेल्या या तीन प्रकारंच्या कार्यतत्त्वांवरून त्यांतील हे सर्व फरक स्पष्ट होतील. सर्व प्रकारच्या यंत्रांमध्ये जी उठावाची मुद्रणप्रतिमा वापरली जाते तिच्यावर प्रथम रुळांच्या साह्याने शाई सर्व ठिकाणी सारखी लागेल याची काळजी घ्यावी लागते. ही शाई अक्षरांच्या खिळ्यांवर किंवा ठशांवर सारखी लावण्यासाठी जास्तीत जास्त २० रूळ असलेल्या यंत्रणेचा उपयोग केला जातो. शाईची मळणी अक्षरांवर किंवा ठशांवर लावण्यापूर्वी चांगली व्हावी म्हणून जास्त रुळांचा उपयोग केला जातो. प्रत्यक्ष मुद्रण प्रतिमेवर शाई लावायला तीन ते चार रुळांचाच उपयोग केला जातो व उरलेले रूळ शाईची मळणी व वितरण व्यवस्थित व्हावे म्हणून वापरले जातात.
आ. ७ मधील पहिल्या दोन यंत्रावर सुटे कागद लावून ते छापले जातात व तिसऱ्या प्रकारच्या यंत्रात सुटे कागद किंवा वेगवेगळ्या रुंदीची कागदाची रिळे लावून त्यावर छपाई करता येते. यंत्रावर कागद लावताना फार अचूकपणे लावावा लागतो. नाहीतर मुद्रित प्रतिमा एकाच जागी छापली जात नाही. जुन्या यंत्रांवर कागद माणसे हाताने लावीत असत पण त्यामुळे मुद्रणाच्या वेगावर बंधन पडते. हा वेग तासाला १,५०० ते २,००० कागद असा सरासरीत पडतो. अलीकडील यंत्रांचे वेग फार जास्त असल्याने त्यांवर हाताने कागद लावता येत नाही. कागद लावण्याची स्वयंचलित यांत्रिक योजना केलेली असते. त्यामुळे कागदाची चळत यंत्रावर योग्य जागी लावली की, कागद उचलला जातो व यंत्रावर प्रथम योग्य अचूक लावला जाऊन नंतर त्यावर मुद्रण होत.
यांत्रिकपणे व स्वयंचलित पद्धतीने कागद लावण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत एक घर्षणाने व दुसरी चोषणाने (अंशतः निर्वात निर्माण करण्याच्या क्रियेने). पहिल्या पद्धतीने कागदाची चळत एका उतार असलेल्या लाकडी फळीवर हाताने पसरून ठेवली जाते, त्यामुळे सर्व कागद एकमेकांपासून अलग अलग होतात. त्यानंतर एका दंडगोलाच्या साह्याने तो कागद घर्षणाने पुढे सरकतो. या प्रकारचे मुद्रण आता फारसे होत नाही. कारण हाताने कागद लावण्याची यंत्रे आता फारशी अस्तित्वात नाहीत. चोषण पद्धतीत कागदांच्या चळत उभीच ठेवण्यात येते. सर्वात वरच्या कागदाच्या एका कोपऱ्याला एक चाक हलकासा झटका देते व इतर कागदांपासून तो अलग करते. त्याच वेळी संपीडित (दाबाखालील) हवा सोडणारा एक भाता (ब्लोअर) या कागदाखाली हवेचा थर घुसवितो. एका चोषण नळीला जोडलेल्या निर्गम द्वारांमुळे हा कागद हलकेच उचलला जातो व यंत्राला छपाईसाठी पुरविला जातो. येथे माणसाच्या हातांची गरज लागत नाही. या पद्धतीने तासाला १०,००० कागद छापण्याची क्षमता यंत्रात आता आलेली आहे. इतक्या वेगाने यंत्रात कागद सोडले, तरी ते अगदी अचूकपणे छापले जातात. कागदाच्या चळतीची वरची पातळी कायम राखण्यासाठी चळत यांत्रिक पद्धतीने आपोआप वर सरकत ठेवण्याची योजना केलेली असते आणि कागदाच्या जाडीप्रमाणे ही पातळी राखण्यासाठी त्यात योग्य तो बदल करण्याची सोय असते. कागद छापून झाल्यावर जेथे तो साठवला जातो तेथेही त्याची वरची पातळी थोडी थोडी खाली नेण्याची सोय असते. चळतीमध्ये साधारणपणे ५ ते १० हजार कागद एकाच वेळी लावता येतात. कागद छापून झाल्यानंतर त्यावरील शाई लवकर वाळत नाही व नंतर छापलेल्या कागदाच्या मागच्या भागात ती लागून कागद खराब होतो. तो खराब होऊ नये म्हणून प्रत्येक कागद छापून झाल्यावर एक फवारा त्यावर उडवला जातो. हा फवारा कोरडा किंवा ओला अशा दोन्ही स्वरूपात असू शकतो. त्याच्यामुळे जो थर निर्माण होतो त्याने शाई वरील कागदावर लागण्याला प्रतिबंध होतो. या फवाऱ्यांच्या ऐवजी शाईमध्ये आळक (सुकविणारे खास द्रव्य) मिसळले म्हणजे शाई लवकर वाळते. कागद जर पुरेसा शोषक नसला तर फवाऱ्याची योजना करावी लागते. आळकाचे शाईतील प्रमाणही मर्यादित ठेवावे लागते. ते जर प्रमाणाबाहेर गेले, तर शाईच्या मुद्रणक्षमतेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. आळक हे मुख्यतः लवण किंवा धातूच्या चूर्णापासून तयार केले जातात. उकळून घट्ट केलेल्या जवसाच्या तेलाचा उपयोगही आळकासारखा होतो.
अक्षरदाब मुद्रणाची यंत्रे : कागद व मुद्रणप्रतिमा सपाट असलेली यंत्रे : (प्लॅटेन प्रेसेस). या यंत्रात दोन सपाट पृष्ठे यांत्रिकपणे एकमेकांना चिकटून कागदावर मुद्रण करतात व अशी पृष्ठे फक्त याच प्रकारच्या यंत्रामध्ये वापरली जातात. जुनी यंत्रे चालवायला अगदी साधी होती. कागद हाताने लावून हातानेच काढला जातो. मूळ यंत्रे पायाने चालवून वापरली जात होती. आता ती विद्युत् चलित्रांच्या (मोटरीच्या) साह्याने चालवली जातात. मजकुराच्या अक्षराचे पान किंवा ठसा प्रथम एका लोखंडी चौकटीत पक्का बसवून ही चौकट यंत्रावर उभी बसवली जाते. त्याच्या पृष्ठावर (मुद्रणप्रतिमा) दोन किंवा तीन रूळ वरून खाली जातात व शाई लावतात. नंतर रूळ पुन्हा खालून वर जातात आणि त्यानंतर कागद या मजकुरावर वा चित्रावर दाबला जातो व मुद्रण पूर्ण होते. दोन सपाट पृष्ठभाग एकमेकांवर दाबून कागदावर मुद्रण होते. यातील कागद दाबणारा भाग हलता असतो व मुद्रणप्रतिमेचा भाग स्थिर असतो. नवीन यंत्रांवर कागद यांत्रिकपणे उचलला जाऊन आपोआप मजकुरावर दाबला जातो व मुद्रण पूर्ण झाल्यावर तसाच यांत्रिक पद्धतीने उचलून बाजूला ठेवला जातो. कागदावर मुद्रण होताना जो दाब पडतो तो ४० किग्रॅ./चौ. सेंमी. एवढा असतो. स्वयंचलित यांत्रिक पद्धतीने मुद्रण करणाऱ्या अशा यंत्राचा मुद्रणाचा वेग ताशी ५००० कागद एवढा असू शकतो.
दंडगोल यंत्रे : ही यंत्रे आकारमानाने बरीच मोठी असतात. त्यांची लांबी साधारणपणे १·८–२·७ मी. व रूंदी १·२–१·८ मी. असते. अलीकडील काळात या यंत्राचे आकारमान लहान झाले असून मुद्रणाची क्षमता मात्र वेगाच्या दृष्टीने वाढली आहे. या यंत्रावर अक्षरांचा मजकूर वा चित्रे ही एका सपाट पृष्ठावर लोखंडी चौकटीत पक्की बसवतात व त्यावर रूळांच्या साह्याने शाई सर्व ठिकाणी सारखी लावली जाते. हा सपाट पृष्ठभाग यंत्राच्या लांबीमध्ये पुढे-मागे हलता ठेवला जातो. मजकुरावर शाई लागली की, हा भाग पुढे सरकू लागतो. यंत्राच्या साधारण मधोमध एक पोलादी दंडगोल फिरता ठेवलाला असतो व त्यावर मुद्रणासाठी कागद सोडता येतो. कागद अचूकपणे पकडण्यासाठी यांत्रिक सोय असते. कागद पकडल्यानंतर दंडगोल फिरतो व त्याच्या खाली येणाऱ्या मुद्रणप्रतिमेवर जोराने दाबला जातो. मुद्रण पूर्ण झाल्यावर तो कागद आपोआप लांब नेण्याची सोय केलेली असते. छपलेल्या कागदांची चळत यंत्राच्या दुसऱ्या बाजूला किंवा खालच्या बाजूला लावण्याची व्यवस्था केलेली असते. या पद्धतीच्या काही यंत्रावर दंडगोलाचा एक फेरा झाल्यावर एक कागद छापला जातो व दुसऱ्या काही यंत्रावर दंडगोलाचे दोन फेरे होतात. या दुसऱ्या यंत्रावर दंडगोल अखंड फिरतो व खालील सपाट पृष्टभाग एका बाजूकडील दुसऱ्या बाजूला जाऊन क्षणभर थांबतो व परत येतो. या क्रियेच्या वेळात दंडगोलाचे दोन फेरे पूर्ण होतात पण प्रत्यक्ष मुद्रणासाठी त्यातील एकच फेरा पुरेसा असतो. पहिल्या प्रकारच्या यंत्रात दंडगोल एकदाच फिरतो व थोडा वेळ (२–३ सेकंद) थांबतो आणि पुढचा कागद छापण्यासाठी पुन्हा फिरतो.
वर उल्लेखलेले पहिले यंत्र खंडित गती दंडगोल यंत्र या नावाने व दुसरे यंत्र अखंड गती दंडगोल यंत्र या नावाने ओळखले जाते. पहिल्या प्रकारात दंडगोल एकदा फिरून तात्पुरता थांबतो. कारण तो यांत्रिक रीतीने थोडासा वर उचलला जातो. मजकुर ठेवलेले सपाट पृष्ठ त्याच वेळी परत मागे फिरते व पूर्वस्थितीवर येते. या दंडगोलाचा व्यास दुसऱ्या प्रकारातील दंडगोलाच्या व्यासाच्या दुप्पट मोठा असतो पण त्याचा फक्त अर्धा भागच कागद दाबण्यासाठी वापरण्यात असतो व उरलेला अर्धा भाग पोकळ ठेवलेला असतो. ज्या मुद्रणप्रतिमेवर कागद दाबला जातो तेवढाच दंडगोलाचा भाग वापरला जातो. उरलेला अर्धा भाग मुद्रणप्रतिमेला टेकण्याची शक्यता नसते.
दुसऱ्या प्रकारात दंडगोल अखंडपणे एकाच दिशेने फ्रत राहतो पण त्यात थोडासा फरक केलेला असतो. दंडगोल जेव्हा अक्षरांच्या मजकुरावर कागद दाबतो त्या वेळी त्याची पातळी थोडी खालच्या बाजूला असते. जेव्हा मजकूर ठेवलेले हे सपाट पृष्ठ परत मागे यावयास लागते त्या वेळी हा दंडगोल थोडासा वर उचलला जातो व स्वतंत्रपणे फिरतो. पुढचा कागद छापण्याआगोदर जेव्हा मजकुराचा पृष्ठभाग परत फिरतो त्या वेळी हा दंडगोल पुन्हा थोडा खालच्या पातळी वर जातो व कागद घेऊन तो शाई लावलेल्या मजकुरावर दाबला जातो. म्हणजे प्रत्येक कागद छापण्यासाठी या दंडगोलाचे दोन फेरे पूर्ण होतात व पहिल्या फेऱ्याच्या वेळीच कागद छापला जातो. छपाईचा वेग हा दोन्ही प्रकारच्या यंत्रामध्ये साधारण सारखाच असतो पण दुसऱ्या प्रकारातील अखंड गतीने त्या यंत्राला वेग जास्त येऊ शकेल. जेथे कागद लावण्याची स्वयंचलित सोय असते. तेथे मुद्रणाचा वेग ताशी ४ ते ५ हजार कागद असू शकतो. पहिल्या प्रकारच्या दंडगोल यंत्रामध्ये थांबतो त्यामुळे गतीमध्ये खंड पडून किंचित धक्का बसतो. अखंड गती यंत्रामध्ये असा धक्का बसत नाही व त्यामुळे हे यंत्र जास्त शांतपणे, सफाईदारपणे व धक्के न देता काम करते.
कागदाच्या दोन्ही बाजू एकदम एकाच यंत्रावर छापण्याची नवी सोय उपलब्ध आहे. याला ‘पर्फेक्टिंग’ अशी संज्ञा आहे व त्यासाठी निराळी यंत्रे लागतात. अखंड गती यंत्रासारखी दोन यंत्रे एकत्र करून
या यंत्राची रचना केलेली असते. या यंत्रात दोन दंडगोल असतात, पण एकाच सपाट पाट्यावर कागदाच्या दोन्ही बाजूला छापावयाच्या मजकुराच्या चौकटी पक्क्या केलेल्या असतात. जेव्हा पाटा पुढे जातो त्या वेळी एका दंडगोलामुळे कागदाची एक बाजू छापली जाते व नंतर पाटा मागे येताना दुसऱ्या दंडगोलामुळे दुसरी बाजू छापली जाते. कागदाची बाजू बदलण्याची यांत्रिक सोय यामध्ये केलेली असते. य़शिवाय दुसऱ्या दंडगोलावर कागदाचे जे भरण असते ते अखंडपणे स्वच्छ करण्याची सोयही केलेली असते कारण या दंडगोलावर कागदाची छापलेली बाजू चिकटून त्यावरील मुद्रित भाग तेथेच राहून हे भरण काळपट होण्याची भीती असते. त्यामुळे हे दंडगोल कायम साफ राखणे महत्त्वाचे असते. दुसऱ्या दंडगोलावरून जे मुद्रण होते तेच जास्त चांगले होते, असा अनुभव आहे. त्यामुळे जी बाजू जास्त चांगल्या दर्जाची हवी असेल तिचे मुद्रण दुसऱ्या दंडगोलाच्या साह्याने केले जाते.
कागदाच्या एकाच बाजूवर दोन रंग छापण्यासाठी अक्षरदाब मुद्रण करणारी यंत्रे असतात. या यंत्रात एक जादा लहान दंडगोल दोन दंडगोलांच्यामध्ये बसववलेला असतो. त्याच्या साह्याने कागदाची एक बाजू मुद्रणासाठी पुढे यावी अशी योजना केली जाते. शिवाय साधारणपणे दोन वेगळे रंग छापले जात असल्याने त्यात वेगळेपणा असतोच. दंडगोलाच्या आडव्या यंत्रापेक्षा वेगळे असे उभे दंडगोल यंत्रही तयार करण्यात आलेले आहे. या आडवा पाटा उभा असतो व त्यावरच छापण्याचा मजकूर पोलादी चौकटीत पक्का केलेला असतो. हा पाटा वर जातो व उलट खालीही जातो. यातील दंडगोल कागद खिळ्यांवर दाबून मुद्रण करतो. मुद्रणाचा वेग २,००० चौ. सेंमी. पर्यंत क्षेत्रफळ असलेल्या कागदांकरिता ५,००० पेक्षा जास्त ठेवता येतो.
चक्रीय गती यंत्रे : ज्या यंत्रावर विरुद्ध दिशांनी फिरणारे दोन दंडगोल बसवलेले असतात त्याला चक्रीय गती यंत्र म्हणतात. यातील एका दंडगोलावर अर्ध किंवा पूर्ण चक्राकार अशी अक्षर वा चित्रांची मुद्रणप्रतिमा बसवून त्यावर दुसऱ्या दंडगोलाने कागद दाबला जाऊन मुद्रण होते. सुटे कागदही अशा यंत्रावर छापले जातात व सर्वसाधारण दंडगोल यंत्रावर ज्या आकारमानाचा कागद छापला जातो तसाच याही यंत्रावर छापता येतो. या यंत्राचा छपाईचा वेग साध्या दंडगोल यंत्रापेक्षा तिप्पट असू शकतो कारण यांतील दंडगोलाची गती कायम असल्याने त्यांना वेग जास्त येऊ शकतो. यंत्राचा वेग जास्त असल्याने त्याला लागणारी शाई जास्त पातळ असावी लागते.
दोन रंग छापणारीही चक्रीय गती यंत्रे असतात. प्रत्येक रंगासाठी वक्राकृती मुद्रणप्रतिमा दंडगोलावर बसवून त्या प्रतिमेला वेगळ्या रंगाची शाई लावण्याची व्यवस्था असते व कागदावर एका मागोमाग दोन रंग छापले जातात. याच पद्धतीने कागदाच्या दोन्ही बाजूंना एक किंवा दोन रंग अशाच पद्धतीच्या यंत्रावर छापले जातात. फक्त कागदाची एक बाजू छापली गेल्यानंतर ती बदलून दुसरी बाजू छापण्यासाठी यंत्रामध्ये एक विशिष्ट योजना असते.
एकाच यंत्रावर एक मुद्रणप्रतिमा अर्ध किंवा पूर्ण वक्राकृती व दुसरी मुद्रणप्रतिमा सपाट पद्धतीची अशाही असतात व या दोन्ही मुद्रणप्रतिमांवरून कागदाच्या एका बाजूवर दोन रंग किंवा दोन वेगळ्या प्रतिमा एकत्र छापण्याची सोय असते. याच धर्तीवर तीन, चार किंवा जास्त रंग कागदाच्या एका बाजूला छापण्यासाठी यंत्रे उपलब्ध आहेत. कागद मुद्रणप्रतिमेवर दाबणारा दंडगोल एकच असतो व हा दंडगोल सर्व मुद्रणप्रतिमांवर कागद दाबून मुद्रण करील अशी यंत्राची रचना केलेली असते. दुसऱ्या एका प्रकारच्या यंत्रामध्ये एकेका रंगाचे मुद्रण करणारी रचना ओळीत जोडून अनेकरंगी मुद्रण करण्याची सोय केलेली असते. कागद एका रंगाच्या छपाईनंतर दुसऱ्या रंगाकडे नेण्यासाठी साखळीच्या न इतर वाहक साधनाच्या साह्याने रचना केलेली असते.
कागदाच्या रिळावर सलग छपाई करून पूर्ण झाल्यावर ते सुरीने कापून पुढे बांधणी करण्याचे योजनाही फार फायदेशीर ठरते. अशी यंत्रे फार मोठी असतात व मोठ्या कागदावर छपाई करू शकतात. अर्थात लहान आकारमानाची अशी यंत्रेही अस्तित्वात आहेत पण मोठ्या यंत्रावरील छपाई जास्त स्वस्त पडते. अशी यंत्रे मुख्यतः दैनिक वर्तमानपत्रे छापण्यासाठी वापरली जातात. या यंत्रावरील मुद्रणाची मुख्य रचना अगदी साधी असते. रिळाचा कागद मुद्रणप्रतिमेच्या दंडगोलाच्या व त्यावर कागद दाबणाऱ्या दंडगोलाच्या मधून पुढे जातो. मुद्रणप्रतिमेच्या दंडगोलाचा व्यास एवढा मोठा असतो की, वर्तमानपत्राची दोन पूर्ण पाने त्याच्या परिघामध्ये मावतात. अशी ४ किंवा ८ पाने या दंडगोलामध्ये मावतात. दुसऱ्या एका प्रकारच्या यंत्रामध्ये पानाची रुंदी दंडगोलाच्या परिघात बसेल व अशी चार पाने त्या दंडगोलावर बसतात. दंडगोलाच्या परिघात बसेल व अशी चार पाने त्या दंडगोलावर बसतात. दंडगोलांची रचना व संख्या एकाच फेरीत आठ प्रती छापून त्यांची घडी घालून पूर्णावस्थेत बाहेर येतीस अशा तऱ्हेने केलेली असते.
वर्तमानपत्राच्या पानांच्या संख्येप्रमाणे चक्रीय गती मुद्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग केलेला असतो. या यंत्रावर मुद्रणप्रतिमेचे निरनिराळे समूह असतात व प्रत्येक समूहात एकाच वर्तमानपत्राची निरनिराळी पाने छापून शेवटी ती पाने एकत्र आणून सर्व वर्तमानपत्र पूर्ण करता येते. प्रत्येक समूहाकडून वेगवेगळी पाने एकत्र आणून चार पानांच्या पटीत वर्तमानपत्राच्या दोन प्रती पूर्ण होऊन बाहेर पडतात. या दोन प्रती मधोमध कापल्यानंतर ही क्रिया पूर्ण होत. कागदाच्या इतर दोन प्रती मधोमध कापल्यानंतर ही क्रिया पूर्ण होते. कागदाच्या इतर रिळांच्या निम्मे आकारमान असलेले रीळ एका समूहामध्ये लावले, तर त्यावर दोन पाने छापून ती पाने इतर पानांच्या मध्ये घालण्याची सोयही या यंत्रात असते.
जेव्हा बहुरंगी छपाई करायची असेल त्या वेळी कागदाचे एकच रीळ मुद्रणप्रतिमांच्या बऱ्याच समूहांमधून छापून पुढे सरकत रहाते. प्रत्येक समूहामध्ये त्याच कागदावर वेगळा रंग छापला जातो. चक्रीय गती मुद्रणयंत्र दर ताशी ३५,००० फेरे या वेगाने फिरू शकते. मुद्रणप्रतिमेचे असे चार समूह एका यंत्रावर असू शकतात. म्हणजे अशा यंत्रावर एका तासात १,४०,००० प्रती छापता येतात. प्रत्यक्षात या वेगाचा पूर्ण उपयोग केला जात नाही. साधारणपणे तासाला ७० ते ८० हजार प्रती छापल्या जातात. इतक्या प्रचंड वेगाने जी यंत्रे चालतात त्यांचे चालन सुरक्षितपणे होण्यासाठी विद्युत् चुंबकीय साधनांचा उपयोग केलेला असतो. उदा., कागद पुढे सरकत असताना जर मध्येच फाटला, तर या साधनामुळे यंत्र आपोआप थांबते व त्याची खराबी होत नाही. बहुरंगी मुद्रण करताना प्रकाशविद्युत् घटांच्या साह्याने त्यावर नियंत्रण ठेवता येते. जर एखाद्या रंगाच्या प्रतीमध्ये किंवा त्या रंगाच्या ठरीव प्रमाणात यंत्राच्या चुकीमुळे काही कमीजास्त झाले, तर त्यात आपोआप सुधारणा केली जाते किंवा यंत्र थांबवले जाते व सुधारणा आवश्यक असल्याची सूचना कर्मचाऱ्यांना मिळते. रंगाच्या बाबतीत गुणवत्ता नियंत्रणही प्रकाशविद्युत् घटांच्या साह्याने केले जाते. या घटांमधून जो विद्युत् प्रवाह बाहेर पडतो त्याची शक्ती व मार्गदर्शक साधनांच्या रंगांची शक्ती यांची सांगड अशा पद्धतीने घातलेली असते की, मुद्रणाच्या शाईच्या रंगात थोडासा फरक पडला, तरी हे घट त्यावर योग् ते नियंत्रण ठेवून पडलेला फरक सुधारून घेतात. संगणकाच्या साह्याने हे काम सारखे चालू असते व दर मिनिटाला त्यातील तुलनात्मक फरक तपासून आवश्यक तो बदल आपोआप केला जातो, त्यासाठी यंत्र थांबविण्याची गरज पडत नाही.
स्टीरिओ तयार करणे : जेव्हा अत्यंत वेगाने अक्षरदाब मुद्रण करावे लागते त्या वेळी मुद्रणप्रतिमा ज्या दंडगोलावर बसविली जाते तेथे शिशाचे स्टीरिओ (साचे) करून बसवले जातात. मुख्यतः वर्तमानपत्राच्या मुद्रणासाठी अशा स्टीरिओचा उपयोग केला जातो. हे स्टिरिओ अर्ध किंवा पूर्ण वक्राकार असे करता येतात. त्यासाठी शिसे, कथिल व अँटिमनी यांच्या मिश्रधातूचा उपयोग केला जातो व तिच्यातील शिशाचे प्रमाण ८५% च्या आसपास असते. आधी सपाट पृष्ठाच्या अक्षरांच्या व ठशांच्या मुद्रणप्रतिमेवर एक खास प्रकारचा विशिष्ट कागद (फ्लाँज) दाबून त्यावर वाचता येण्याजोगी प्रतिमा तयार केली जाते. त्या प्रतिमेला गरजेप्रमाणे साच्यात घालून अर्ध किंवा पूर्ण वक्राकार देवून त्या साच्याप्रमाणे मिश्रधातू वितळवून वरून ओतली म्हणजे तिला हवा तो आकार येतो व मुद्रणप्रतिमा पुन्हा उजवीकडून डावीकडे वाचता येण्याजोगी होते (पार्श्विक प्रत्यावर्तन). मिश्रधातू थंड झाली म्हणजे तिला कागदावरील अक्षरांचा आकार बरोबर येतो व पूर्ण पानाचा किंवा अर्ध्या पानाचा एक वक्राकार साचा तयार होतो. याला स्टीरिओ असे म्हणतात. असा स्टीरिओ सपाट पृष्ठाचाही करता येतो. वर उल्लेख केलेल्या फ्लाँजचा कागद उष्णतारोधक व सहज आकार घेणारा असा खास तयार केलेला असतो. शिवाय अशा कागदावर द्रवीय दाबयंत्राने [→ दाबयंत्र] प्रचंड प्रमाणावर दाब देता येतो व हा कागद अशा दाबाखाली न फाटता टिकून राहतो. या कागदावर जी प्रतिमा उत्कीर्ण स्वरूपात तयार होते, त्या उत्कीर्ण बाजूकडून वितळलेल्या मिश्रधातू ओतली जाते.
हा साचा यांत्रिक रीतीने साफ करून तयार केला जातो व त्याची जाडी सर्व ठिकाणी सारखी केली जाते व त्याच्या कडा योग्य अशा पाचरीच्या आकाराच्या केल्या जातात. शिवाय विनप्रतिमेचा भाग खोदून आणखी खालच्या पातळीवर नेला जातो. तसे न केल्यास त्या भागावरही शाई लागण्याची शक्यता असते. शेवटी टिकाऊपणासाठी निकेलचा पातळ थर विद्युत् विलेपनाने दिला जातो. अशा प्रकारचे स्टीरिओ हे रंगीत मुद्रणासाठी मात्र फारसे खात्रीलायक नसतात कारण त्यासाठी ज्या खास कागदाचा उपयोग केला जातो त्याच्याबद्दल खात्री देता येत नाही. या कागदावर तापमान व हवेतील आर्द्रता यांचा परिणाम होतो आणि त्यांवर अगोदर नियंत्रण जर ठेवले नाही, तर कागदाचा आकार बदलू शकतो व मग त्याच्या कार्यमानाबद्दल खात्री देता येत नाही. म्हणून या पद्धतीने रंगीत मुद्रण चांगल्या प्रतीचे करणे जास्त अवघड ठरते.
वर उल्लेख केलेल्या स्टीरिओप्रमाणे इलेक्ट्रिक नावाचा एक मुद्रणप्रतिमा तयार करण्याचा प्रकार अस्तित्त्वात आहे. अक्षरे जुळवून व ठसे वापरून मुळात जी मुद्रणप्रतिमा एका पोलादी चौकटीत पक्की बसवली जाते ती सपाट असते. इलेक्ट्रोप्लेट मुद्रणप्रतिमा विद्युत संवाहक पदार्थाची किंवा शिशाचे संस्करण करून या चूर्णरूप धातू (उदा., चांदी) फवारून विद्युत संवाहक केलेल्या पदार्थाची बनविलेली असते. याकरिता घट्ट मेणाचा थर वा शिशाचा पत्रा किंवा टेनाप्लेटचा (गंधकाची क्रिया केलेल्या प्लॅस्टिकचा) पत्रा व त्यावर मेणाचा थर असे वेगवेगळे पदार्थ वापरता येतात. या सर्वांवर कमीअधिक प्रमाणात दाबयंत्राने योग्य दाब दिला जातो व अक्षरांची प्रतिमा त्या पृष्ठावर तयार केली जाते. हा अक्षरांचा साचा या पद्धतीने तयार झाल्यावर त्याची विद्युत संवाहकता खात्रीलायक करण्यासाठी त्यावर तांब्याचे विद्युत विलेपन केले जाते व मूळ जो अक्षरांचा साचा असेल तसाच हा साचा व त्याच्या आतील मेणाचा थर किंवा शिशाचा पत्रा हे प्रथम वेगळे केले जातात व त्याच्या आतील (पोकळ) बाजूमध्ये शिशाची एक खास तयार केलेली मिश्रधातू ओतून त्य़ाला टणकपणा किंवा कठीणपणा आणला जातो. शिवाय जास्त टिकाऊपणा आणण्यासाठी त्यावर निकेलचा थर विद्युत विलेपनाने देता येतो म्हणजे त्याच्या छपाईमुळे पत्र्याची झीज फारशी होत नाही. अशा इलेक्ट्रो पद्धतीच्या मुद्रणप्रतिमेला आधी किंवा नंतर कोणच्याही स्थितीत वक्राकार किंवा अर्धवक्राकार वेगवेगळ्या पद्धतीने दिला जातो.
असे अर्धवक्राकार किंवा वक्राकार इलेक्ट्रो तयार करणे हे फार खर्चाचे काम आहे पण त्याच्या छपाईचा दर्जा मात्र फार चांगला असतो. अशा मुद्रणप्रतिमेवर हवेचा किंवा आर्द्रतेचा परिणाम जवळजवळ मुळीच होत नाही व त्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढतो. यामुळे रंगीत मुद्रणासाठी त्या अतिशय उपयुक्त असतात. अशा प्रकारची मुद्रणप्रतिमा दंडगोलाकार बसवण्यासाठी यांत्रिक मदत घेतली जाते.
प्लॅस्टिकचे स्टीरिओ पत्रे दोन टप्प्यांनी केले जातातव त्यांचा उपयोग मुद्रणासाठी करता येतो. प्रथम एका विशिष्ट ऊष्मारूढ द्रव्य हे तापवल्यानंतर वितळून त्याला आकार देता येतो. त्यानंतर त्या आकार दिलेल्या वस्तूवर जास्त उष्मतेचा परिणाम होऊ शकत नाही. बेकेलाइट या द्रव्याचे साचे केल्यास त्यांचा उपयोग स्टीरिओ प्लॅस्टिक पत्रे तयार करण्यासाठी करता येतो. जो पहिला साचा केला जातो, त्यातच पत्रा करण्यासाठी जे द्रव्य वापरावयाचे असते ते वितळलेल्या स्वरूपात दाबले जाते. हे द्रव्य सामान्यतः सेल्युलोज अँसिटेट, व्हिनिल रेझीन (टिकाऊपणा येण्यासाठी प्लॅस्टिकीकारक-लवचिकपणा किंवा विस्तारणक्षमता वाढविणारे-द्रव्य मिसळलेल्या चूर्णाच्या वा पत्र्याच्या स्वरूपातील) किंवा दाब दिला असता गंधकाची क्रिया होणाऱ्या चिकट रबराचा थर यांपैकी असते. नवीन अशी पद्धत वापरून उपयोगात करता येतो.
या पत्र्यांची जाडी घासून सर्व ठिकाणी सारखी व ठराविक आवश्यक तेवढी केली जाते. हे पत्रे चक्रीय गती यंत्राच्या दंडगोलावर आसंजकाच्या (चिकटविणाऱ्या पदार्थांच्या) साह्याने चिकटविले जातात. प्लॅस्टिकचे स्टीरिओ पत्रे वजनाला हलके असल्याने हाताळण्यास सोपे असतात व लहान अखंड यंत्रावर लावण्यास जास्त उपयोगी पडतात. अक्षरदाब मुद्रणासाठी किंवा रेखाचित्रांच्या मुद्रणासाठी या पत्र्यांचा उपयोग चांगल होतो व त्या मुद्रणाचा दर्जा चांगला राखता येतो. मात्र बिंदूचित्रांच्या (काळ्या व पांढऱ्या छटांखेरीज त्यांच्या मधल्या करड्या छटाही असलेल्या चित्रांच्या हाफटोन) मुद्रणासाठी या प्रकारच्या पत्र्यांचा उपयोग फारसा होत नाही.
वर उल्लेख केलेले आवेष्टक पत्रे धातूचे असोत किंवा प्लॅस्टिकचे असोत, ते तयार करताना प्रकाशसंवेदी रसायनांचा उपयोग केला जातो. धातूच्या आवेष्टक पत्र्यांमध्ये तांबे, मॅग्नेशियम अथवा जस्त यांचा उपयोग केलेला असतो. साध्या जस्ताऐवजी सूक्ष्म जस्ताचा उपयोग पत्रा करताना केला जातो कारण त्यावरून चित्रांचे मुद्रण जास्त चांगले होऊ शकते. या प्रकारच्या पत्र्यावर प्रकाशसंवेदी रसायनाचा एक पातळ थर दिलेला असतो आणि चित्राचा ठसा ज्या पद्धतीने केला जातो त्याच पद्धतीने या पत्र्यावर रासायनिक क्रिया केली जाते. ठशावर बिनप्रतिमेच्या भागाला जेवढा खोलपणा येतो त्याच्या निम्म्याने या पत्र्यावर खोलगटपणा येतो. त्यामुळे या पत्र्यावर ज्या रूळांनी शाई लावली जाते त्यांचा व्यास नेहमीपेक्षा जास्त असतो. असे रूळ मुद्रणप्रतिमेवरच शाई पसरतात.
पत्रा पूर्ण झाल्यावर त्याला वक्राकार देता येतो पण साधारणपणे मुद्रणप्रतिमेवर कुठलाही परिणाम होऊ नये व रंगीत मुद्रणाच्या वेळी सर्व रंगांच्या प्रतिमांचे आकार सारखे राहून रंग एकमेकांवर बरोबर छापले जावेत यासाठी पत्र्यावर मुद्रणप्रतिमा तयार करण्याच्या प्रक्रियेच्या अगोदरच पत्र्याला वक्राकार दिला जातो.
प्लॅस्टिकचे आवेष्टक पत्रे तयार करताना त्यांच्यामध्ये प्रकाश-बहुवारिकांचा (प्रकाशाला संवेदनशील असलेल्या बहुवारिकांचा लहान, साध्या रेणूंच्या संयोगाने बनणाऱ्या प्रचंड रेणूंच्या संयुगांना बहुवारिके म्हणतात) उपयोग केलेला असतो. अशा पत्र्यावर प्रकाशक्रिया केली की, काही विशिष्ट विद्रावकांचा (विरघळणाऱ्या पदार्थांचा) परिणाम त्यांच्यावर होत नाही. चित्राच्या किंवा अक्षरांच्या व्यस्त प्रतीतून या पत्र्यावर प्रकाशक्रिया केली की, मुद्रणप्रतिमेच्या भागातून प्रकाश खाली जाऊन बहुवारिक घट्ट झाल्याने त्यावर विद्रावकाचा परिणाम होत नाही व उरलेले भाग (प्रकाशक्रिया न झालेले) विद्रावकामुळे विरघळून नाहीसे होतात. त्यामुळे मुद्रणप्रतिमा ही थोडीशी उठावदार अशी तयार होते व अशा पत्र्याचा उपयोग अक्षरदाब मुद्रण पद्धतीच्या पत्र्याप्रमाणे केला जातो. वरील गुणधर्म व नवीन गुणवत्ता असलेली नवीन बहुवारिके शोधून काढण्याचे आणि ती परिपूर्ण करण्याचे कार्य सतत चालू आहे. नायलॉन, डायक्रिल व केआरपी (कोडॅक रिलिफ प्लेट) ही अशी बहुवारिकांची सुपरिचित उदाहरणे आहेत. नायलॉन प्रकाशसंवेदी करण्यासाठी त्याचे वेगवेगळ्या जाडींचे तक्ते एका खास विद्रावात खूप मोठ्या प्रमाणात बुडवून काढले जातात. हा विद्राव प्रकाशसंवेदी द्रवयुक्त अँसिटोनचा असतो. अशा तक्त्यावर जंबुपार (दृष्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांच्या दिव्याने प्रकाशक्रिया केली जाते व बिनप्रतिमेचे भाग एथिल व मिथिल अल्कोहोलच्या मिश्रणात बुडवून विरघळविले जातात. अशा पत्र्याला जास्तीत जास्त कडकपणा यावयासाठी २४ तासांचा वेळ लागतो. डायक्रिल पत्रा तयार करण्यासाठी तो कार्बन डाय-ऑक्साइडच्या वातावरणात प्रथम २४ तास ठेवल्यावर प्रकाशग्राही होतो. त्यावरील बिनप्रतिमेचे भाग सोडियम हायड्रॉक्साइडचा विद्राव शिंपून विरघळवले जातात. एका फिरत्या रूळावर बसवून या पत्र्यावर प्रज्योत दिव्याने प्रकाशक्रिया केली जाते. हा पत्रा पूर्णपणे तयार होण्यास साधारण ४५ मिनिटे लागतात. केआरपी पत्रा हा लीर सेल्युलोज अँसिटेटचा केलेला असतो व त्यावर प्रकाशसंवेदी रसायनाचा अतिशय पातळ थर दिलेला असतो. या पत्र्यावर प्रकाशक्रिया केल्यानंतर प्रकाशसंवेदी थर फक्त मुद्रणप्रतिमेच्या भागांवरच शिल्लक राहतो कारण विकाशकाच्या (दृश्य स्वरूपात प्रतिमा मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेच्या) विद्रावकाचा मुद्रणप्रतिमेवर काहीही परिणाम होऊ शकत नाही. अशा पत्र्याचे कोरण एका फिरत्या रूळावर पत्रा बसवून करता येते.
प्लॅस्टिकच्या आवेष्टक पत्र्यावर बहुवारिकाचा थर पक्का बसवता येतो. दंडगोलाच्या पृष्ठावर धातूचा पत्रा वेगळा बसवून नंतर त्यावर बहुवारिकाचा थर बसविला जातो. या बहुवारिकाचे अम्लकोरण केल्यानंतर त्याच्या जाडीहून किंचित कमी इतके खोल कोरण करता येते. त्यामुळे जी अक्षरे छापायची असतात त्यांना भरपूर उठाव मिळतो. आवेष्टक पत्रा हा धातूचा किंवा प्लॅस्टिकचा असला, तरी दंडगोलाभोवती तो चटकन बसवता येतो कारण तशी यांत्रिक योजना दंडगोलाकार केलेली असते. या पत्र्याला दंडगोलाभोवती पुरेसा ताण देण्याची सोय या यांत्रिक रचनेमध्ये असते.
ठसे तयार करण्याचे यंत्र व त्यांचे वेगवेगळे प्रकार : अक्षरदाब मुद्रणाच्या पद्धतीमध्ये अक्षराच्या बरोबरच रेखाचित्रांचे आणि साध्या व रंगीत छायाचित्रांचेही मुद्रण करावे लागते. त्यासाठी अक्षरांच्याच उंचीचे ठसे तयार करावे लागतात. अक्षराची उंची व ठशाची उंची सारखीच असावी लागते, त्याशिवाय मुद्रण होणार नाही, सध्याच्या काळात ठसे तयार करण्याचे तांत्रिक मार्ग उपयोगात आणतात पण पूर्वी जेव्हा छायाचित्राचा उपयोग अस्तित्त्वात नव्हता तेव्हाही चित्रे छापली जात मात्र ती चित्रे लाकड्च्या फळीच्या पृष्ठभागावर प्रथम
हाताने काढून नंतर तो पृष्ठभाग तीक्ष्ण टोकाने कोरला जात असे. चित्राचा भागच फक्त वरच्या पातळीत ठेवून उरलेला भाग कोरून काढल्यावर चित्राची मुद्रणप्रतिमा फक्त वरच्या पातळीत राहत असे. या ठशाला वुड-कट असे म्हणतात. असे लाकडी ठसे पूर्वी चीनमध्ये व नंतर यूरोपात करण्यात येत असत. मुद्रणाची सुरवात अशा लाकडी ठशांमुळे प्रथम चीनमध्ये झाली व नंतर धातूच्या खिळ्यांमुळे जर्मनीमध्ये झाली. फळीचा पृष्ठभाग तीक्ष्ण अशा पोलादी टोकांनी कोरला जात असे व हे कोरणे हातानेच करावे लागे. चीनमध्ये इ. स. दुसऱ्या शतकामध्ये लाकडाच्या फळीवर काही चिन्हे व खुणा कोरून त्यांचा उपयोग मेणावर किंवा चिनीमातीच्या पृष्ठावर उठवण्यासाठी करू लागले होते. इ. स. सहाव्या शतकात जपानमध्ये ही कला बौद्ध धर्माबरोबर प्रसारित झाली व तिची फार चांगली जोपासना तेथे झाली. यूरोपमध्ये चौदाव्या शतकाच्या सुरूवातीला या पद्धतीचा उपयोग कापडावर रंगीत ठसे छापण्याच्या कामासाठी प्रथम केला गेला पण कागदावरील मुद्रणासाठी या कलेचा खरा उपयोग चौदाव्या शतकाच्या शेवटी सुरू झाला व त्याचा उपयोग फ्रान्स व जर्मनमध्ये प्रथम केला गेला. या कलेला खरे प्रोत्साहन पंधराव्या शतकात खिळेजुळणीची छपाई जर्मनीमध्ये सुरू झाल्यानंतर मिळाले. खिळ्यांमुळे पुस्तकाची छपाई लहान प्रमाणात सुरू झाली व त्यासाठी जी चित्रे लागत त्यांची निर्मिती लाकडी ठशांच्या सहाय्याने सुरू झाली व ती एक कला म्हणून पुढे किती तरी शतके अस्तित्त्वात होती. या पद्धतीने छापलेली चित्रे काळ्या रेषेत व पांढऱ्या रेषेत (काळ्या पृष्ठावर) अशी दोन्ही त-हांनी छापली जात. त्यांना अनुक्रमे वुड-कट व वुड-एनग्रेव्हिंग अशी नावे आहेत.
सध्या ठसे करण्यासाठी प्रधम २–३ वेगवेगळ्या धातूंच्या पत्र्यांचा उपयोग केला जातो. जस्त, तांबे व मॅग्नेशियम या त्या धातू होत. जस्ताच्या पत्र्याचा उपयोग बऱ्याच जुन्या काळापासून होत आहे. त्यानंतर तांब्याचा पत्रा व अगदी अलीकडे मॅग्नेशियमच्या मिश्रधातूपासून बऱ्याच प्रकारचे पत्रे तयार केले गेले व त्यांचा उपयोग ठसे करण्याकडे केला जात आहे. या तंत्रामध्ये चित्राचा ठसा हा अम्ल क्रियेने कोरला जातो व हाताने कोरण्याची जरूरी फारशी पडत नाही. शिवाय छायाचित्राच्या साहाय्याने प्रथम चित्राची व्यस्त प्रत (फिल्म) घ्यावी लागते व तिचा उपयोग त्या चित्राचे स्थानांतर रासायनिक क्रियेने करण्यासाठी करावा लागतो.
व्यस्त प्रत घेण्यासाठी एका खास कॅमेऱ्याची जरूरी लागते. त्याचे आकारमान पुष्कळ मोठे असते आणि मोठ्या आकारमानाच्या चित्रांसाठी मोठ्या व्यस्त प्रती लागतात, त्या या कॅमेऱ्यावर घेतल्या जातात. मूळ चित्र जरी १·२ X १·२ मी. अशा आकारमानाचे असले, तरीही ते कॅमेऱ्यापुढे लावता येते व त्यावर विजेच्या प्रखर दिव्यांचा प्रकाश टाकता येतो. व्यस्त प्रत घेताना तिचे आकारमान हव्या त्या प्रमाणात बदलता येते. मोठे चित्र लहान व लहान चित्र मोठे करता येते. कॅमेऱ्याच्या मागे एक दुधी काच बसवलेली असते तिच्यावर चित्राचे आकारमान पक्के केले जाते. कॅमेरा मूळ चित्रापासून लांब नेऊन किंवा जवळ आणून चित्राचे हवे ते आकारमान मिळवता येते. कॅमेऱ्याच्या मागील बाजूस एका बंद पेटीत फिल्म उभ्या अवस्थेत ठेवली जाते व तिच्या पुढील रक्षक फळी (झडप) बाजूला केली जाते. चित्रावरून जो प्रकाश परावर्तित होतो तो कॅमेऱ्याच्या भिंगातून आत जाऊन फिल्म प्रकाशन करतो. या प्रकाशक्रियेमुळे फिल्मवरील थर काळा होऊन तेथे पक्का बसतो. थराच्या ज्या भागावर प्रकाशक्रिया होणार नाही तो भाग नंतरच्या रासायनिक विकाशनामुळे धुवून निघून जातो. फिल्मवरील प्रकाशक्रियेनंतर बंद पेटी एका अंधाऱ्या खोलात नेऊन तेथे फिल्म बाहेर काढली जाते. या खोलीत लाल रंगाचा दिवा लावलेला असतो. हा प्रकाश पुढील रासायनिक प्रक्रियेसाठी चालतो चालतो पण काही फिल्मांना फक्त अंधुक हिरवा प्रकाश किंवा पूर्ण अंधार असलेली खोली लागते. या खोलीतील हवेचे तापमान साधारण २०से. असेल, तर चांगली प्रक्रिया होते. या खोलीतील एका मोठ्या एनॅमलच्या थाळीत एक विशिष्ट रासायनिक मिश्रण ओतून घेऊन नंतर लाल रंगाच्या प्रकाशात किंवा पूर्ण अंधारात ही फिल्म या मिश्रणात बुडवली जाते. साधारणपणे ३-४ मिनिटांत प्रक्रिया पूर्ण होऊन फिल्मवर व्यस्त प्रतिमा दिसू लागते. ही प्रतिमा मूळ चित्राच्या बरोबर उलट स्वरूपात असते. म्हणजे चित्रातील काळ्या रेघा या पारदर्शक व कागदाचा पांढरा रंग काळा अपारदर्शक होतो, शिवाय ठशासाठी व्य़स्त प्रत थोडी वेगळी असावी लागते. तीत चित्राची डावी बाजू व उजवी बाजू जशी असेल तशीच रहावी लागते. त्यासाठी भिंगाबरोबर लोलक वापरावा लागतो.
विकाशन ही रासायनिक प्रक्रिया साधारणणे प्रतिमेचे दृश्य स्वरूप व्यक्त करते. प्रकाशक्रियेने फिल्मवर प्रतिमा अदृश्य स्वरूपात तयार होते व तिचे दृश्य स्वरूप रासायनिक प्रक्रियेने तयार होतेपण ही क्रिया येथे संपत नाही. प्रतिमेचे ( म्हणजेच व्यस्त प्रतीचे) स्थिरीकरण नंतर करावे लागते. त्यासाठी प्रथम फिल्म थोडा वेळ ठेवून प्रतिमेचे स्थिरीकरण केले जाते. या क्रियेला आणखी ५ ते १० मिनिटे वेळ लागतो. त्यानंतर फिल्म पुन्हा वाहत्या पाण्यात १० मिनिटे चांगली धुतल्यानंतर ती वाळवली जाते. पूर्ण कारडी फिल्मच उपयोगी पडते. छायाछटा असलेल्या चित्रचीही याच पद्धतीने पण थोड्या फरकाने व्यस्त प्रत घेतली जाते. अशा चित्रामध्ये पुष्कळ प्रकारच्या छायाछटा असतात व त्यांच्यामधील फरक व्यक्त करण्यासाठी एका काचेच्या जालपटातून प्रकाश टाकला जातो. या काचेच्या जालपटावर उभ्या व त्यांना काटकोन छेदणाऱ्या आडव्या रेषांची जाळी असते. या रेषा एका इंचामध्ये ५० ते २०० पर्यंत असू शकतात. या रेषांमुळे अति सूक्ष्म चौकोनी छिद्रे तयार होऊन त्यांतून प्रकाश पलिकडे जातो व फिल्मवर पडून त्याची क्रिया होते. ही क्रिया प्रकाशाच्या कमीजास्त परावर्तनामुळे त्या प्रमाणात होते. मूळ चित्रात जेथे खूप काळे भाग असतील तेथून सर्वात कमी प्रकाश परावर्तित होऊन तेथे कमी क्रिया होते व त्यामुळे तेथे एक लहान आकारमानाचा बिंदू तयार होतो. याउलट मूळ चित्रात जेथे पांढरे भाग जास्त प्रमाणात असतील तेथून जास्त प्रकाश परावर्तित होतो व तेथे फिल्मवर मोठा बिंदू तयार होतो. पांढऱ्या व काळ्या यांच्या मधल्या छायाछटावरून त्यांच्य़ा प्रमाणात बिंदूचे आकारमान लहानमोठे होते व अशा पद्धतीने मूळ चित्रावरून व्यस्त फिल्मवरील असंख्य बिंदूंची प्रतिमा तयार होते. हे बिंदू अतिसूक्ष्म असल्याने प्रतिमा एकसंघ आहे असा भास होतो पण प्रत्यक्षात ती एकसंघ नसून ती असंख्य बिंदूंची बनलेली असते. या बिंदूचा रंग काळा असतो पण बिंदूच्या मधील जागा पारदर्शक असते व त्यातून प्रकाश पार जाऊन नंतर जेव्हा धातूच्या पत्र्यावर मुद्रणप्रतिमा तयार होते तेव्हा ती मूळ चित्राप्रमाणेच पुष्कळशी असते. छायाचित्रातील कृष्णछटांची दुरुस्ती ही नंतर प्रत्यक्ष ठसा तयार करताना केली जाते.
ठसा तयार करताना रंगीत चित्रेही घ्यावी लागतात. हाताने काढलेली तैलरंगातील किंवा जलरंगातील वा अन्य रंगातील चित्रे, रंगीत छायचित्रे वगैरे चित्राचे ठसे नेहमीच करावे लागतात. हल्ली पडद्यावर मोठ्या आकारमानात दाखविता येणारी पारदर्शक रंगीत छायाचित्रे (पारदर्शक) प्रचारात आली आहेत या सर्वाचा विचार मुद्रणाच्या संबंधातही करावा लागतो. अशा चित्राचे मोठ्या संख्येने पुनरुत्पादन करण्यासाठी चार रंगांचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी या चित्रावरून चार व्यस्त प्रती तयार कराव्या लागतात व त्यांवरून चार वेगळे ठसे करावे लागतात. ठसे करण्याआधी प्रत्येक रंगासाठी एक व्यस्त प्रत घ्यावी लागते. मूळ चित्र अनेक रंगी असल्याने व त्यातील मुळ प्राथमिक रंग पांढऱ्या रंगाचे मूळ घटक असतात. ते रंग प्रकाशीत गाळण्यांच्या साहाय्याने वेगळे करून प्रत्येकाची व्यस्त प्रत घ्यावी लागते. निळा, हिरवा व तांबडा हे तीन रंग पांढऱ्या रंगाचे मूळ घटक असल्याने त्याच रंगांच्या गाळण्या वापरून चार व्यस्त प्रती घेतल्या जातात. काळ्या रंगाच्या व्यस्त प्रतीसाठी तिन्ही गाळण्या वापरून ती घेतली जाते. कॅमेऱ्याकरीता जो प्रमुख पांढरा प्रकाश वापरला जातो तो जवळजवळ सूर्यप्रकाशाइतका परिणामकारक असल्याने त्या प्रकाशाला चालतील अशा रंगाच्या गाळण्या नैसर्गिक वा कृत्रिम रंग वापरून तयार केल्या जातात व त्यांचा उपयोग मूळ चित्रातील रंगाचे विलगीकरण करण्यासाठी केला जातो मुद्रणाच्या वेळी जे रंग (किंवा शाई) वापरले जातात ते रंग पांढऱ्या कागदावर एकमेकांवर छापले असता त्याचा परिणाम काळा रंग मिळेल असा होतो. तरीही जास्त चांगला परिणाम साधण्यासाठी काळा रंग वेगळा छापला जातो. त्यामुळे इतर रंगांना कागदाच्या रंगाच्या संदर्भात जास्त उठाव मिळतो. निळ्या रंगाच्या गाळणाने मॅजेन्टा रंगासाठी लागणारी व तांबड्या रंगाच्या गाळणीने सियान रंगासाठी लागणारी व्यस्त प्रत घेतली जाते व काळ्या रंगाच्या व्यस्त प्रतीसाठी तिन्ही रंगांच्या गाळण्यांचा उपयोग केला जातो. अशा चार व्यस्त प्रती काचेच्या जालपटलातून घेऊन त्यांचा उपयोग धातूच्या पत्र्यावरील (स्थानांतरित) मुद्रणप्रतिमा मिळविण्यासाठी केला जातो. काचेच्या जलपटलातून व्यस्त प्रत घेतलेली असल्याने तिच्यातील प्रतिमा असंख्य सूक्ष्म बिंदूंची बनलेली असते. याच व्यस्त प्रतीची उपयोग धातूच्या पत्र्यावर प्रतिमा स्थानांतरित करण्यासाठी केला जातो. क्वचित प्रसंगी या व्यस्त प्रतीवरील बिंदूंचे आकारमान लहान करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. बिंदूंचे आकारमान लहान झाल्यास पत्र्यावरील बिंदूंचे आकारमान मोठे होते. जेथे रंगाचे प्रमाण जास्त हवे असेल तेथे ही दुरुस्ती करावी लागते. रंगांचा कमीजास्तपणा हा मूळ चित्रावरून ठरविला जातो. त्या प्रमाणात बिंदूंचे आकारमान बदलून घ्यावे लागते.
यापुढील काम म्हणजे व्यस्त प्रतीवरून मुद्रणप्रतिमेचे स्थानांतर धातूच्या पत्रयावर करणे. यासाठी पत्र्याच्या पृष्ठावर योग्य असा प्रकाशसंवेदी रासायनिक थर द्यावा लागतो हा थर निरनिराळ्या कलिलांपासून [→ कलिल] तयार केला जातो. ठसे तयार करताना ३-४ वेगवेगळी कलिले वपरता येतात. अंड्याचा पांढरा बलक (श्वेतक), मत्स्य- सरस, पॉलिव्हिनिल अल्कोहॉल ( पीव्हीए) वगैरे कलिले व त्यांच्यात अमोनियम बायक्रोमेट ठराविक प्रमाणात मिसळून हा रासायनिक प्रकाशसंवेदी थर तयार करतात. उष्ण हवेत हे मिश्रण टिकावे म्हणून त्यात अंमोनियाचे काही थेंब टाकतात. जर तापमान १५° ते २०° से. असेल, तर हे मिश्रण टिकते पण भारतासारख्या देशात वातानुकुलित खोल्या तयार करणे सर्व ठिकाणी शक्य नसल्याने ही काळजा घ्यावी लागते. पत्रा नायट्रिक आम्लात थोडा वेळ बुडविल्याने त्याच्या पृष्ठभागावर थोडासा खाळपणा येतो आणि तो आवश्यक असतो. या रवाळपणामुळे प्रकाशसंवेदी रासायनिक मिश्रण या पत्र्याला पक्के धरून रहाते. प्रकाशक्रियेमुळे ते नंतर कडक होते पण मुळात ते पत्र्याला पक्के धरून राहिल्याने पुढिल क्रिया शक्य होतात. रासायनिक मिश्रण पत्र्यावर सारखे पसरण्यासाठी केंद्रोत्सारी यंत्राचा [→ केंद्रोत्सारण] उपयोग केला जातो. याच्या पृष्ठावर पत्रा बसवून तो ठराविक वेगात गोल फिरवला जातो. पत्र्यावर मधोमध जर मिश्रण ओतले, तर ते हळूहळू बाहेरच्या दिशेला पसरत जाऊन ते वाळण्याची क्रिया सुरू होते. गरम हवेने मुख्यतः पत्रा वाळवला जाऊन ते वाळलेला थरच फक्त प्रकाशसंवेदी असतो. ओल्या थरावर पांढऱ्या किंवा कुठल्याही प्रकाशाची क्रिया होऊ शकत नाही. पत्र्यावरील या थरावर व्यस्त प्रत ठेवून नंतर एका दाबपेटीत किंवा निर्वात पेटीत हे दोन्ही ठेवले जाते हवेच्य थर मधे ठेवून चालत नाही. पुष्कळ ठिकाणी उन्हामध्ये केली जाते पण जेथे ऊन मिळत नाही तेथे कृत्रिम प्रकाशात प्रकाशक्रिया केली जाते. व्यस्त प्रतीवरील बिंदूंच्या मधून प्रकाश जाऊन प्रतिमा कडक झाल्यावर पत्रा पेटीतून बाहेर काढला जातो व त्यावर प्रथम रुळाने शाई लावून घेतले जाते. जर मत्स्य-सरस कलिल म्हणून वापरलेला असेल, तर मात्र प्रकाशक्रियेनंतर प्रथम पत्रा पाण्याखाली धुतला जातो व त्यांवरील कडक न झालेला रासायनिक थर विरघळून निघून जातो. उरलेला भाग म्हणजे मुद्रणप्रतिमेचा ठसा होय. हा पत्रा नंतर जेन्शियन व्हायोलेट या जांभळ्या रंजकद्रव्याच्या पाण्यातील मिश्रणात थोडा वेळ बुडवून बाहेर काढला म्हणजे प्रतिमा जांभळ्या रंगाची दिसू लागते. ही प्रतिमा पत्र्यावर पक्की करण्यासाठी पत्रा काही ठराविक तापमानापर्यंत तापवावा लागतो. पत्रा तापवित असताना त्याच्यावरील जांभळा रंग कमी होत जातो व नंतर तो गडद तपकिरी होतो. त्याच्याहून जास्त बदलेला रंग चालत नाही. यानंतर पत्र्याच्या मागच्या बाजूला अम्लरेखन होऊ नये म्हणून एक रोगण लावावे लागते. हे रोगण एक विशिष्ट लाख किंवा राळ विरघळून तयार करता येते व त्यावर आम्लक्रिया होत नाही.
रेखाचित्राचा ठसा तयार करण्यासाठी वेगळे तंत्र किंवा पद्धत वापरण्यात येते. जस्ताच्या पत्र्याचा ठसा करण्यासाठी नायट्रिक अम्लाचे रेखन करावे लागते व तांब्याच्या पत्र्यावरील रेखन आर्यन परक्लोराइडने करावे लागते कारण तांब्यावर दुसऱ्या कोणत्याही अम्लाची क्रिया हेऊ शकत नाही. मॅग्नेशियम धातूच्या पत्र्यावरही काही खास मिश्रणाची प्रक्रियाच होऊ शकते. सर्वांत जास्त उपयोग जस्ताच्या पत्र्याचा केला जातो कारण रेखाचित्राचे ठसे ११० रेषांपर्यंतच्या जालपटलाची चित्रे या पत्र्यावर चांगली होतात.
रेखाचित्राच्या ठशाची कृती : रेखाचित्रामध्ये बारीक व जाड रेषा आणि काही ठिकाणी काळे मोठ्या आकारमानाचे भाग यांचा व अक्षरांचा समावेश होतो. अक्षरे पुष्कळदा ठशाचा एक भाग होऊ शकतात कारण ही अक्षरे खास त्या ठशापुतीच निर्माण केलेली असतात. या ठशाच्या रेखनाची सुरुवात एका विशिष्ट लांबट चौकोनी पौर्सेलिनाच्या थाळीत केली जाते. या थाळीत ३० X ३० सेंमी. आकारमानाचे पत्रेही रेखनासाठी घेता येतात. प्रथम नायट्रिक अम्ल पाण्यात मिसळून त्याचा ३% प्रमाण विद्राव तयार करण्यात येतो. त्यात हा पत्रा ठेवून थाळी दोन्ही बाजूंनी हलवली की, पत्र्यावरील ज्या भागावर प्रतिमा नसेल तो भाग अम्लरेखनाने कोरला जातो व प्रतिमा तशीच रहाते कारण ती अम्लरोधक शाईची असते. हे रेखन साधारण अर्धा ते एक मिनिटच केले जाते कारण तेवढ्या वेळात धातूचा पत्रा पुरेसा खालच्या पातळीत गेलेला असतो. यानंतर रेखन तसेच पुढे चालू ठेवता येत नाही कारण अम्लाची क्रिया प्रतिमेच्या बाजूच्या भागातून खाली होऊन चालत नाही. तसे झाल्यास प्रतिमेच्या खालील धातूचा आधारच नाहीसा होऊन प्रतिमाही निघून जाईल. तसे होऊ नये म्हणून रेखन झालेल्या प्रतिमेच्या बाजूचे रक्षण अम्लरोधक पदार्थ म्हणजे एक प्रकारचे रेझीन असते. त्याला ड्रॅगन्स ब्लड असे म्हणतात. मलेशियातील एका विशिष्ट तालवृक्षाच्या (पामच्या डिमोनॉरॉप्स ड्रॅको) फळांपासून जो रस निघतो त्याचा रंग गर्द लाल असतो. तो वाळल्यावर त्याची बारीक (वस्त्रगाळ) पूड करून तिचा उपयोग या कामासाठी केला जातो. याचप्रमाणे इतरही काही नैसर्गिक रेझिने वापरून हे काम करता येते. सध्या कृत्रिम रेझिने किंवा लाखेची पूड करून तिचा उपयोग जास्त केला जातो.
प्रथम ठशाचा पत्रा या पुडीमध्ये बुडवून काढून बाजूला ठेवला जातो व मऊ केसांच्या कुंचल्याने एकाच दिशेने ती पूड बाजूला केली जाते. पूड चिकट असल्याने रेखन झालेल्या प्रतिमेच्या कडांना ती चिकटून रहाते व जादा पूड निघून जाते. ही पूड तळाशी राहू नये व उताराच्या कडांना चिकटावी अशी काळजी घ्यावी लागते. नंतर पत्रा गरम केल्यावर पूड तेथे पक्की एकजीव होते व प्रतिमेची ती बाजू अम्लरोधक, जलरोधक व संरक्षित रहाते. याचप्रमाणे पत्र्याच्या उरलेल्या तीनही बाजू या पुडीच्या साह्याने संरक्षित कराव्या लागतात. हे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा अम्लरेखन करावे लागते. या वेळी नायट्रिक अम्लाचे प्रमाण थोडेसे वाढवून ४ ते ५% करता येते म्हणजे रेखन केलेल्या भागाचा खोलगटपणा वाढतो. रेखनाची वेळ एक ते दोन मिनिटे पुरेशी होते. रेखनानंतर प्रतिमेची उतार बाजू पुन्हा मोकळी पडते. त्यासाठी पुन्हा वर वर्णन केलेल्या पद्धतीने रेझिनाची पूड चारही बाजूने लावून गरम केल्यावर पुन्हा उताराची बाजू संरक्षित रहाते. अशा पद्धतीने वरील क्रिया साधारणपणे चार वेळा करावी लागते व चार वेळा अम्लरेखन केल्यानंतर प्रतिमार भागाचा खोलगटपणा पुरेसा तयार होतो. पत्र्याच्या जाडीच्या साधारण निम्म्यापर्यंत खोलगटपणा आवश्यक असतो कारण शाईच्या रुळांवरून या खोलगट भागावर शाई लागू नये हा हेतू असतो. यानंतर रेझिनाची पूड काढून टाकावी लागते. दाहक (कॉस्टिक) सोडा पाण्यात विरघळवून गरम करून त्यात पत्रा थोडा वेळ बुडवला म्हणजे रेझिनाची पूड पत्र्यावरून सुटते व पत्रा स्वच्छ होतो. त्यावर थोडे रॉकेल घालून कुंचल्याने पृष्ठभाग साफ केला जातो. रेखन झालेला भाग थोडासा खडबडीत किंवा उंचसखल असा राहण्याचा संभव असतो. त्यासाठी पत्र्याच्या पृष्ठावर शाईचा रूळ फिरविला जातो. ही शाईसुद्धा अम्लरोधक असते व ती मुद्रणप्रतिमेचे रक्षण करते. पत्रा थोडासा गरम केला की, शाई प्रतिमेला पक्की चिकटून राहते. नंतर पुन्हा एकदा नायट्रिक अम्लाच्या पाण्यातील विद्रावात रेखन केले जाते. या रेखनाने बिनप्रतिमेचा खडबडीतपणा व प्रतिमेच्या बाजूच्या उताराचा भाग हे सर्व गुळगुळीत होतात. येथे अम्लरेखनाचे काम संपते. तांब्याच्या पत्र्यावरही याच पद्धतीने ठसा केला जातो. फक्त रेखनाचे काम आर्यन परक्लोराइडाने करावे लागते.
बिंदुचित्राचा ठसा तयार करण्याची कृती : चित्रामधील छायाछटा जशाच्या तशा ठशाने छापणे शक्य असते पण त्याआधी ठशावर हाताने पुष्कळ काम करावे लागते. याला रीटचिंग असे म्हणतात. चित्रातील छायाछटांचे स्वरूप ठशात योग्य त-हेने येण्यासाठी त्यातील बिंदूंचे आकारमान हवे तसे ठेवणे हे काम महत्त्वाचे आहे. दोन बिंदूंच्या मधील जागा शाई न लागण्याइतकी खोल घालवण्याचे काम अम्लरेखनाने करावे लागते. अम्लरेखनाच्या वेळी दोन बिंदूंमधील जागा खोल जाते व बिंदूंचे आकारमानही लहान होत जाते. म्हणून ज्या बिंदूचे आकारमान लहान करण्याची जरूरी नसेल अशा बिंदूंच्या समूहावर लहानशा कुंचल्याने अम्लरोधक शाई पुरेशा प्रमाणात लावावी लागते. मूळ चित्रातील काळे भाग हे मोठ्या आकारमानाच्या बिंदूंनी बनलेले असतात. हे बिंदू आकारमानाने लहान होऊन चालत नाही, कारण मुद्रणाच्या वेळी त्या भागावर जास्त शाई यावी लागते. मोठ्या बिंदूंवर आपोआपच शाई जास्त रहाते. मूळ चित्रातील पांढरे भाग तसेच छापण्यासाठी बिंदूचे आकारमान फारतर ५ ते ७% किंवा कमी लागते. व्यस्त प्रतीत या भागातील बिंदू ५० ते ५५% असतात व ते पत्र्यावर स्थानांतर केल्यावर ४५ ते ५०% रहातात. या ४५% चे बिंदू ठसा पूर्ण झाल्यावर ५ ते ७% उरतात. त्यांचे आकारमान पुष्कळ प्रमाणात अम्लरेखनाने कमी केले जाते. गर्द छटांच्या बाबतीत मात्र बिंदूंचे आकारमान लहान करावे लागत नाही. या दोन्ही टोकांच्या छटांच्या मधील वेगवेगळ्या करड्या छटा त्या त्या प्रमाणातील बिंदूंच्या आकारमानावरून ठरतात. म्हणून प्रथम चित्रातील खूप गर्द छटा काळ्या अम्लरोधक झाकल्यावर (अर्धा ते एक मिनिट) नायट्रिक अम्लाने रेखन करावे लागते. उरलेले ८५% हून कमी आकारमानाचे बिंदू शाई न लावल्याने आकारमानाने कमी होत जातात. जे बिंदू ४०–४५% असतात तेही लहान होत जातात व सर्व बिंदू सारख्या प्रमाणात ठराविक वेळात लहान होत जातात. नंतर पहिल्यापेक्षा जे बिंदू लहान होत ते ७५ ते ८५% आकारमानाचे बिंदुसमूह काळ्या शाईने झाकले जातात. पुन्हा पत्रा थोडासा गरम करून शाई पक्की झाल्यावर नायट्रिक अम्लाने थाळीत रेखन केले जाते. या वेळी अम्लाचे प्रमाण वाढवून ५ ते ८% करता येते व रेखनाचा कालही थोडासा वाढवावा लागतो. याचप्रमाणे आणखी चार-पाच वेळा करून दर वेळी कमी आकारमानाचे बिंदूसमूह निवडूण त्यांवर काळी शाई लावून नंतर अम्लरेखन केले जाते. दर वेळी नायट्रिक अम्लाचे पाण्यातील प्रमाण व रेखनाची वेळ ही दोन्ही वाढवली जातात. ठसा पूर्ण झाल्यावर गर्द काळ्या भागात ९० ते ९५% बिंदू पांढऱ्या भागात ५ ते ७% बिंदू असे त्यांची आकारमाने उरतात. चित्रातील छायाछटा या पूर्णत्वाने ठशामध्ये मिळतात व तशाच प्रमाणात त्यांचे मुद्रणही होते. जरी मूळ चित्रात किंवा छायाचित्रात इतक्या मोठ्या पल्ल्यात छायाछटा नसल्या, तरीही त्या ठशामध्ये हव्या असल्यास आणता येतात. ठशात जर मोठ्या पल्ल्यात वैधर्म्य (भेद) असेल, तर चित्राचे मुद्रण जास्त चांगले दिसते. वैधर्म्य जर पुरेसे नसले, तर ते डोळ्याला सुखावह होत नाही व त्यात सपाटपणा वाटतो. पुरेशा वैधर्म्याशिवाय मुद्रित चित्र आकर्षक वाटत नाही.
अम्लरेखनाची क्रिया दोन पद्धतींनी करता येते. एका पद्धतीत पोर्सेलिनाच्या लांबट चौकोनी थाळीमध्ये अम्लाचा विद्राव दोन्ही बाजूंना हलवून रेखन केले जाते. दुसरी पद्धत यांत्रिक आहे. एका मोठ्या चौकोनी सु. अर्ध्या मीटर उंचीच्या भांड्यात तळाशी रेखनासाठी लागणारा विद्राव भरला जातो. या विद्रावात धातूची पाती एका लांब रुळाला जोडून लावलेली असतात. भांड्याचे वरील झाकण लावून घेतल्याबरोबर विद्युत् चलित्र (मोटर) सुरू केले की, पाती खूप वेगाने फिरतात व भांड्याच्या बाजूला आतील बाजूस प्रचतिमेचा पत्रा उभा टेकवून ठेवलेला असतो त्यावर जोरदार फवारा बसतो. विद्राव आपोआप खाली पडतो. साधारण दोन मिनिटांत चार ते पाच पट वेगाने काम होते. रेखाचित्रणाचा ठसा फार लवकर तयार होतो व जास्त चांगल्या पद्धतीने होतो. छायाछटांच्या चित्रांचे ठसेसुद्धा या यंत्रात लवकर होतात कारण दोन बिंदूंमधील जागा जास्त वेगाने खोलगट होते आणि बिंदूचे आकारमाव सावकाश लहान होतो. त्यामुळे छायाछटा जास्त सुबक व जास्त पायऱ्यांनी मिळतात. चित्रातील बारकावे परिणामकारकपणे दाखवता येतात.
रंगीत चित्रांचे ठसे करावयाचे असतील तेथे प्रथम सर्व रंगाचे पत्रे तयार करून घ्यावे लागतात. या पत्र्यांच्या पृष्ठावर प्रत्येक रंगासाठी तयार करण्याची मुद्रणप्रतिमा प्रथम स्नानांतरित करून त्यांची एकमेकांशी तुलना करावी लागते. या मुद्रणाच्या वेळी पिवळा, मॅजेन्टा, सियान व काळा हे चार रंग वापरून सर्व दुय्यम व तिय्यम रंगांच्या छटा निर्माण कराव्या लागतात. त्यांतील काळा रंग हा पूरक असून इतर तीन रंग प्राथमिक असतात. प्राथमिक रंग एकमेकांवर छापल्या नंतर त्यातून जे रंग तयार होतात ते रंग छापण्यासाठी बिंदूचे
आकारमान केवढे लागते याचा अंदाज हे रीटचिंगाचे काम करणाऱ्या कलावंताला असावा लागतो. शिवाय रंगाच्या रंगाच्या छटा व मिश्ररंग यांचा संबंध बिंदूच्या आकारमानाशी कसा असतो याचे पूर्ण ज्ञान त्याला असावे लागते. त्यामुळे बिंदूचे आकारमान किती असतो याचे पूर्ण ज्ञान त्याला असावे लागते. त्यामुळे बिंदूचे आकारमान किती कमी करावे लागेल याची कल्पना तो मूळ चित्रावरून व रंगाच्या अंदाजाने ठरवतो. उदा., पिवळा रंग व सियान रंग यांच्या मिश्रणाने हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा मिळतात. त्यासाठी पिवळ्या रंगाचे बिंदू कोणच्या आकारमानाचे ठेवायचे व सियान रंगाचे बिंदू कोणच्या आकारमानाचे ठेवायचे हे अनुभवाने व कल्पनाशक्तीने कालावंत ठरवतो आणि त्याप्रमाणे पिवळ्या रंगाच्या पत्र्यावर काम करतो व नंतर सियान रंगाच्या पत्र्यावर काम करतो. जेथे चारही रंग एकमेकांवर येऊन एखादी तपकिरी रंगासारखी छटा मिळते तेथे प्रत्येक रंगाचे विश्लेषण करून बिंदूंचे आकारमान ठरवावे लागते. कोणत्या बिंदूच्या आकारमानावरून किती शाई छापली जाईल व इतर तीन रंगांच्या शाईबरोबर त्याचा संयुक्त परिणाम कसा दिसेल याची पूर्ण कल्पना कलावंताला असावी लागते. तशी कल्पना त्याला असली, तरच त्या ठशाचे रीटचिंग त्याला चांगले साधेल. अन्यथ चुकांची दुरुस्ती नंतर करावी लागेल. ज्याला मूळ रंगाची व त्यांच्या वेगवेगळ्या मिश्रणांतून बद्दल उत्स्फूर्त संवेदना असेल त्या कलावंताला हे काम करणे सोपे जाते. अनुभवाने पुष्कळ आडाखे बांधता येतात व त्यांचा उपयोग काम वेगाने करण्यासाठी होतो पण मुळात रंगांची संवेदना थोडीशी तरी व शुद्ध स्वरूपात असावी लागते तरच कलावंत यशस्वी होतो. रंगीत चित्राचे ठसे करणे ही क्रिया या क्षेत्रात सर्वांत वरच्या दर्जाची समजली जाते. प्रथम व्यस्त प्रती घेणे व नंतर त्यांच्यावरून ठसे तयार करणे या दोन्ही क्रिया पूरक आहेत. एकटा माणूस सर्व क्रिया करू शकणार नाही कारण त्यामुळे कामाच्या वेगावर फार बंधन पडेल. सांघिक कृतीवरच अवलंबून रहाणे अवलंबून रहाणे वेगाच्या दृष्टीने आवश्यक असते.
मॅग्नेशियम धातूच्या पत्र्यावरून हल्ली ठसे केले जातात. मुख्यतः रेखाचित्रांच् व काही प्रमाणात छायाछटांच्या चित्रांचे ठसे या धातूच्या पत्र्यावर केले जातात. या धातूचा एक विशेष असा की, अम्लरेखनानंतर रेखन झालेले भाग फारसे खडबडीत रहात नाहीत. शिवाय प्रतिमेच्या उतारावरही खडबडीपणा न रहाता सर्व भाग गुळगुळीत होऊन ठशाचे स्वरूप फार स्वच्छ रहाते. हा पत्रा मिश्रधातूचा केलेला असल्याने तीमध्ये जरूरीप्रमाणे कडकपणा निर्माण केलेला असतो. त्यामुळे या ठशावरून मुद्रण मोठ्या प्रमाणात करता येते व ठसा कमीतकमी झिजतो. या पत्र्याच्या ठशांचा उपयोग मुद्रणाच्या इतर शाखांमध्ये (नम्य मुद्रणासारखा) होतो. या ठशांवर पुष्कळ दाब दिला, तरी त्याच्यावर फारसा परिणाम होत नसल्याने रबराच्या ठशांवरून जे मुद्रण केले जाते त्याचा मूळ ठसा मॅग्नेशियमपासून केल्यास तो जास्त परिणामकारक व जलद होतो.
ठसे करण्याच्या एकंदर क्रियेमुळे शेवटी ठशाचा धातूचा पत्रा लाकडी फळीवर योग्य त-हेने ठोकून बसविणे व त्याची जाडी (उंची) अक्षराच्या खिळाच्या उंचीइतकी करणे हे महत्त्वाचे काम असते. त्यासाठी ठशाच्या मापाची फळी कापून दोन्ही बाजू व जाडीच्या बाजू रंधून गुळगुळीत कराव्या लागतात. रेखाचित्राचा ठसा असल्यास काही वेळा चित्राचा काही भाग कोरा असू शकतो. असा भाग रेखनानंतरही फारसा खोल जात नाही व तेथे रूळावरून शाई लागते म्हणून तो भाग यांत्रिक पद्धतीने आणखी खोल घालवावा लागतो. हे काम वेगाने यंत्राद्वारे केले जाते. दुसऱ्या एका यंत्राने पत्र्याची कड तासून कमी जाडीची केली जाते. या तासलेल्या कडेवर गिरमिटाने लहान छिद्रे पाडून हा पत्रा फळीवर लहान चुकांनी ठोकून बसवला जातो. चुकांच्या डोक्यांना शाई लागू नय़े म्हणून त्यांची पातळी ठसाच्या जाडीपेक्षा खालच्या बाजूला (पातळीत) असावी लागते म्हणून ही काळजी घ्यावी लागते. पत्रा मोठ्या आकारमानात मिळतो. त्याचे लहान तुकडे करावे लागतात. त्यासाठी एक धातूचे पत्रे कापण्याचे यंत्र लागते. या यंत्राची सुरी जास्त कठीण अशा पोलादाची केलेली अलते. या यंत्राने जस्त, तांबे वगैरे सर्व धातूंचे १/१६ इंच जाडीचे पत्रे कापले जातात. फळीवर पत्रे ठोकून बसवताना सुतारकामाची हत्यारे लागतात. हे काम करणारा माणूस ठसे करण्याची पद्धत माहीत असलेलाच असतो व तो ठशांतील काही दोष दूर करण्याचे कामही करतो.
इलेक्ट्रॉनीय पद्धतीने रंगांचे क्रमवीक्षण : १९५० सालापासून रंगीत मुद्रणासाठी लागणारे रंगाचे इलेक्ट्रॉनीय पद्धतीने क्रमवीक्षण करून त्याचा उपयोग चांगल्या दर्जेदार मुद्रणासाठी करण्यास सुरूवात झाली आहे. व्यापारी तत्त्वावर अशा क्रमवीक्षण करणाऱ्या यंत्राचा उपयोग फायदेशीर ठरला आहे. तेव्हापासून या यंत्रामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या सुधारणाही झाल्या आहेत. सध्याच्या काळातील सुविकसित क्रमवीक्षक यंत्रामध्ये रंगीत चित्रांचे चार रंगाचे क्रमविक्षण लहान-मोठ्या आकार मानात व पूर्णपणे रंगांच्या दुरुस्त्या होऊन व त्यातील त्रुटी काढून टाकून बिंदूंसहित चार व्यस्त किंवा समप्रती काही मिनिटांमध्ये मिळवणे शक्य झाले आहे. बहुतेक वेळा या सम किंवा व्यस्त प्रतींचा दर्जा साध्या गाळण्या वापरून रंगाचे विलगीकरण करण्याच्या व त्यांच्या आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याच्या पद्धतीपेक्षा जास्त चांगला मिळतो. क्रमवीक्षकाच्या या क्षमतेमुळे व त्याच्या कामाच्या प्रचंड वेगामुळे इलेक्ट्रॉनीय क्रमवीक्षकांचा उपयोग करणे आर्थिक दृष्ट्या तर फायद्याचे पडतेच पण वेळेचीही मोठी बचत होते. अशी यंत्रे चालवण्यासाठी मनुष्यबळ कमी लागत असल्याने त्या दृष्टीनेही फायदा होतो.
मूळ रंगीत चित्रावरून मुद्रण करण्यासाठी पिवळा, मॅजेन्टा, सियान व काळा या घटक रंगांच्या विलगीकरणानंतर कृष्ण धवल रंगात व्यस्त किंवा समप्रती तयार करणे हे इलेक्ट्रॉनिय क्रमविक्षकाचे मूळ काम आहे. आवश्यकतेनुसार मूळ रंगाच्या प्रतीमध्ये मुद्रणाच्या दृष्टीने सुधारणा करणे हे कामही या यंत्रामध्ये केले जाते. या सम किंवा व्यस्त प्रती अखंड किंवा बिंदूंसहित अशा स्वरूपात तयार करता येतात. त्यावरून मुद्रणासाठी जे पत्रे केले जातील त्यांच्या साह्याने मूळ चित्राबरहुकूम, रेखीव, वैधर्ग्यपूर्ण व रंगसाधर्म्यासहित मुद्रण करता यावे अशा क्षमतेची ही यंत्रे असतात. अशा सम किंवा व्यस्त प्रती मिळवण्यासाठी प्रकाशीय, यांत्रिक व इलेक्ट्रॉनीय अशा सर्व सुविधांचा या यंत्रामध्ये उपयोद करावा लागतो.
मूळ रंगीत चित्र हल्ली बऱ्याच वेळा रंगीत पारदर्शिकेच्या स्वरूपात असते व थोड्या प्रमाणात रंगीत छायाचित्रे किंवा हाताने काढलेली चित्रे वापरली जातात. रंगीत मुद्रणासाठी पारदर्शिका जास्त सोईची असते. अशी पारदर्शिका या यंत्रातील पारदर्शक रुळावर क्रमवीक्षणासाठी विशिष्ट जागी बसवली जाते. या आधी अशा पारदर्शिकेच्या काही गुणधर्माचे शास्त्रीय मोजमाप करावे लागते. पारदर्शिकेची सर्वात जास्त व सर्वात कमी प्रकाशीय घनता एका घनतादर्शक उपकरणावर मोजावी लागते. त्यामुळे त्यातील घनता क्षेत्राची व्याप्ती कळते. शिवाय चित्रातील अक्रिय भाग व त्यातील रंगांचा आवाका यांची निश्चितीही करता येते. वरील सर्व मोजमापांबरोबरच चित्रांच्या मुद्रणासाठी कोणती शाई आणि कागदाचा कोणता प्रकार व मुद्रणाची कोणती पद्घत वापरली जाईल या सर्व गोष्टींचा विचार करून प्रशिक्षित क्रमवीक्षकचालक त्यातील रंगाचा संगणक या कामासाठी सिद्ध करतो.
त्यानंतर क्रमवीक्षक-चालक मुद्रणासाठी लागणारे चित्राचे आकारमान लक्षात घेऊन त्याप्रमाणे यांत्रिक योजना करतो आणि व्यस्त किंवा सम प्रतीची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्याच्या प्रकाशनाची योजना कार्यान्वित करतो. त्यानंतर अप्रकाशित फिल्मचा एक तुकडा यंत्रातील प्रदान रूळावर बसवून त्याचे प्रकाशन सुरु करतो. हा तुकडा मुख्यतः चाचणीच्या स्वरूपाचा असल्याने लहान आकारमानाचा असतो. जर चाचणी बरोबर ठरली नाही, तर प्रकाशनामध्ये आवश्यक ते बदल करून आणि त्याबद्दल खात्री करून मग योग्य आकारमानाची फिल्म प्रदान रुळावर बसवून मग तिचे प्रकाशन सुरु केले जाते. चार रंगांसाठी चार वेळा नवीन फिल्म प्रदान रूळावर बसवून योग्य ते बदल करून त्यांचे प्रकाशन केले जाते. पिवळा, मॅजेन्टा, सियान व काळा या चार रंगांच्या मुद्रणासाठी चार वेगवेगळ्या फिल्म लागतात व त्यांचे स्वरूप अखंड किंवा बिंदूंसहित प्रतिमा असे असू शकते. काही यंत्रांवर एकाच वेळी चार रंगांसाठी फिल्मच्या प्रकाशनाची सोय असते. त्यामुळे फार थोड्या वेळात क्रमवीक्षणाचे चारही रंगांचे काम पूर्ण होते. हे चार रंग एकाच फिल्मच्या तुकड्यावर प्रकाशीत होतात व नंतर कापून ते वेगळे केले जातात.
एका विद्युत चलित्राच्या साह्याने क्रमवीक्षकाच्या पारदर्शक रूळाला व ज्या रूळावर व्यस्त किंवा सम प्रत प्रकाशीत होते त्या रूळाला गती दिली जाते. क्रमवीक्षणासाठी एक क्रमवीक्षक रंगशीर्ष असते आणि त्याला प्रकाशाचा पुरवठा करण्यासाठी कॉर्टझ हॅलोजन दिव्याचा उपयोग केला जातो. या दिव्याचा टिकाऊपणा, अखंड प्रकाश देण्याची क्षमता, स्थैर्य व उच्च तापमान या गुणधर्माकरिता वापर करण्यात येतो. या दिव्याचा प्रकाश रंगीत पारदर्शिकेच्या एका पूर्वानिर्धारित जागेवर केंद्रित केला जातो. पारदर्शिका तिच्यासाठी केलेल्या रळावर एका जागी बसवलेली असते.
क्रमवीक्षक रंगशीर्ष पारदर्शिकेमधून आलेल्या प्रकाशावरून त्याचे पृथःकरण करून नंतर फिल्मवर प्रत्येक रंगाचे प्रकाशन करते. संगणकाच्या साह्याने रंगाची अचूक दुरूस्ती होऊन नंतर फिल्मवर प्रकाशन होते.
क्रमवीक्षक प्रकाश पारदर्शिकेमधून पुढे जातो त्या वेळी ज्या बिंदूमधून तो पुढे जातो तेथून पारदर्शिकेमध्ये जे रंग असतील ते सर्वच प्रकाशमान होतात पण रंगशीर्शकामध्ये त्याचे पृथःकरण होऊन त्याचे मूळ तीन रंगामध्ये (निळा, हिरवा व तांबडा) विलगीकरण होते. याबाबतीत निरनिराळी तंत्रे वापरली जातात. सर्वांत लोकप्रिय तंत्र द्विरंगी गाळण्याचे आहे. यासाठी खास आरसे तयार केले जातात व ते एकच विशिष्ट रंग परावर्तित करतात आणि बाकीच्या रंगांना ते पारदर्शक असतात. त्याशिवाय बनावट गाळण्यांचाही उपयोग केला जातो. या बनावट गाळण्यांसाठी खास तंत्राने तयार केलेल्या रंगीत काचांचा उपयोग केला जातो. वर उल्लेख केलेल्या गाळण्यांमधून प्रकाश पुढे जातो व तो काही प्रकाशग्राहकांवर केंद्रित केला जातो. निळा, हिरवा, तांबडा या सर्व रंगांसाठी वेगवेगळे प्रकाशग्राहक योजलेले असतात. हे प्रकाशग्राहक म्हणजे प्रकाशगुणक नलिका असतात व काही वेळा प्रकाशद्विप्रस्थांचा उपयोग केला जातो [→ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति]. प्रकाशग्राहकांचे मुख्य काम म्हणजे त्यांच्यावर पडलेल्या प्रकाशाचे विद्युत संकेतांमध्ये रूपांतर करणे हे असते. हे प्रकाशग्राहक निळा, हिरवा व तांबडा या प्रकाशांच्या प्रमाणात त्यांचे विद्युत् संकेतांमध्ये रूपांतर करतात. क्रमवीक्षणामध्ये ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची असते.
रंगीत पारदर्शिकेचे विद्युत संकेतांमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यांचे सदृश व अंकीय संगणन तंत्रांनी [→ संगणक] पुन्हा रूपांतर केले जाते. रंगांचे अचूक विलगीकरण करण्याआधी ज्या विश्लेषणाची जरूरी असते त्या आधी काही इतर आवश्यक बाबींचा विचार करावा लागतो.
ज्या रंगीत पारदर्शिकेचे क्रमवीक्षण करावयाचे तिच्या सर्वांत गडद भागाचे सर्वात पांढऱ्या भागाशी जर उदा., १००० : १ असे प्रमाण असले, तरी त्या प्रमाणाचे रूपांतर २५ : १ अशा त-हेने करावे लागते. कारण मुद्रणाच्या ज्या पद्धती उपलब्ध आहेत त्यांच्या सह्याने २५ : १ यापेक्षा जास्त वैधर्म्य मिळण्याची शक्यता नसते. मुद्रणाची शाईही या दृष्टीने उपयोगी नसते. विद्युत् संकेत प्रथम निळा, हिरवा व तांबडा या रंगामध्ये प्रकाशाचे पृथःकरण करतात पण नंतर त्यांचे रूपांतर मुद्रणासाठी जे तीन मूळ रंग (पिवळा, मॅजेन्टा, सियान) लागतात त्यांच्या संकेतांमध्ये करावे लागते.
पारदर्शिकेमध्ये पांढऱ्या रंगाचे तीन मूळ घटक असतात कारण तिच्याकडे पहाताना पांढऱ्या प्रकाशचा उपयोग केला जातो व पांढऱ्या कागदावर जेव्हा पिवळा, मॅजेन्टा व सियान हे प्राथमिक रंग छापले जातात तेव्हा ते परावर्तन होऊन डोळ्याला जाणवतात. पारदर्शिकेच्या बाबतीत रंगांचे स्वरूप संयोगीकारक असते व मुद्रणाच्या वेळी त्या रंगांचे स्वरूप विलगीकारक (वजाबाकीच्या) स्वरूपाचे असते, म्हणून वर उल्लेख केलेले रूपांतर आवश्यक ठरते. हे रूपांतर फारसे अवघड नसते कारण संयोगीकरण आणि विलगीकरण यांचे रंगांच्या बाबतीतील संबंध परस्पर पूरक असतात.
काळा रंग छापण्यासाठी जो रंग विलग करावा लागतो त्याचे संगणन करावे लागते कारण तो पिवळा, मॅजेन्टा व सियान यांच्या मिश्रणाने साधावा लागतो व त्याच्या अचूकपणासाठी संगणन आवश्यक असते. क्रमवीक्षकामध्ये जो संगणन समाविष्ट असतो त्यामुळे या सर्व गोष्टी शक्य होतात. काळ्या रंगाचे संगणन करणे ही बाब क्रमवीक्षकाच्या बाबतीत फार महत्त्वाची असते व अचूक काळा रंग साधणे हे त्याला सहजसाध्य असते.
रंगाचे सुधारीकरण करणे हेही संगणकाचे काम असते. मात्र त्यासाठी त्याला प्राथमिक माहिती बरोबर पुरविणे हे काम क्रमवीक्षकावर काम करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते.
विद्युत संकेतांचे रूपांतर मूळ प्रकाशात करण्यासाठी पुनरूत्पादन शीर्षाची योजना केलेली असते. या शीर्षामध्ये सामान्यतः मंदतेज दिवा, ⇨ लेसर व झेनॉन प्रज्योत दिवा यांचा प्रकाश उद्गम म्हणून उपयोग करण्यात येतो. या शीर्षाच्या साहाय्याने फिल्मचे प्रकाशन करून तिच्यावर योग्य ते संस्कारण केल्यावर क्रमवीक्षणाची प्रक्रिया पूर्ण होते.
अक्षरदाब मुद्रणाच्या मर्यादा : अक्षरांच्या रेखीवपणा व त्यांचे वळण यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मुद्रणामुळे अक्षरदाब मुद्रण वेगळे ओळखू येते. ज्या यंत्रावर सुटे कागद लावून मुद्रण केले जाते त्यांच्यावर उत्तम प्रकारचे मुद्रण होऊ शकते. त्यात जालपलटाचा उपयोग आवश्यक असल्याने एकदम पांढरा रंग चित्रात छापता येत नाही आणि चार रंगहून अधिक रंगांचा वापर करता येत नाही कारण त्यात ‘ मोएरे ‘ पद्धतीचे आकृतिबंध (लहान मोठे काळे डाग) येण्याची भिती असते व रंगीत मुद्रण चांगले होत नाही. ज्या यंत्रावर कागदाचे लहान-मोठे रीळ लावून मुद्रण केले जाते त्यावरही अक्षराचा रेखीवपणा लक्षात येण्याजोग असतो पण त्यावर छापली जाणारी चित्रे मात्र सामान्य दर्जाची किंवा त्याहून किंचित चांगली अशी असतात. अर्थात कागदाच्या दर्जावरती चित्रांचा दर्जा अवलंबून असतो. कागदाच्या रिळावरती चक्रीय गती यंत्राने जे रंगीत मुद्रण केले जाते त्याचा दर्जा सर्वसामान्यच असतो. रंगीत मुद्रणासाठी जी खास चक्रीय गती यंत्रे केलेली असतात त्या यंत्रावरसुद्धा रंगीत मुद्रण फार उच्च दर्जाचे होऊ शकत नाही.
अखंड किंवा चक्रीय गतीचे उत्कीर्ण मुद्रण : (रोटोग्रॅव्हुअर). उत्कीर्ण मुद्रणप्रतिमा म्हणजे पृष्ठभाग कोरून तयार केलेली मुद्रणप्रतिमा व तिच्यात अत्यंत पातळ अशी शाई भरून नंतर मुद्रणप्रतिमेवर कागद दाबला जाऊन मुद्रण होते. मुद्रणाचा दंडगोल हा तांब्याच्या पृष्ठाचा असतो व त्याच्या सूक्ष्म छिद्रांमध्ये शाई भरली जाते आणि वरील पृष्ठावरील शाई एका धारदार पात्याने काढून पुसली जाते. या सर्व क्रिया प्रत्येक कागदाच्या मुद्रणाअगोदर होतात व नंतर मुद्रण कागदावर किंवा इतर कुठल्याही पृष्ठावर होऊ शकते. तांब्याच्या पृष्ठावर अम्लकोरण केल्यानंतर जी चौकोनी छिद्रे तयार होतात त्यांच्या खोलगटपणावर त्यांत किती शाई मावते हे ठरते. अक्षरदाब मुद्रणाप्रमाणे या पद्धतीत कागदाच्या दर्जावर मुद्रणाचा दर्जा मुख्यतः अवलंबून राहत नाही. उत्कीर्ण मुद्रणामध्ये ज्या जालकपटलाचा उपयोग केला जातो त्याचा मुख्य हेतू सर्व बिंदू एकमेकांपासून अलग रहावेत व मुद्रणप्रतिमेची उंची सारखी ठेवावी हा असतो. या जालकपटलामुळे बिंदूचे आकारमान लहानमोठे होत नाही व त्यातून जो दृष्टीभ्रम होतो तो होत नाही. मात्र प्रत्येक उत्कीर्ण बिंदूची खोली वेगवेगळी असते व त्यामुळे छायाछटांची तीव्रता कमीजास्त ठरते. या वेगवेगळ्या खोलगट बिंदूंमध्ये शाई भरली जाते व ही शाई अचूकपणे ठरविता येते. रंगांची छटा या शाईच्या परिमाणामुळे ठरते. वर उल्लेखिलेल्या जालकपटलामुळे तांब्याच्या पृष्ठावर तयार होणाऱ्या जाळीमुळे शाई पुसणाऱ्या पात्याचा छिद्रात शिरकाव होऊ शकत नाही आणि खोलगट बिंदूंमधील शाई तशीच राहून तिचे प्रमाण कमी होत नाही. त्यासाठी उत्कीर्ण मुद्रणामध्ये अक्षरे, रेखाचित्रे किंवा छायाचित्रे या सर्व गोष्टींचे जालकपटलाच्या साह्यानेच मुद्रण करावे लागते, नाही तर जेथे जाळी नसेल तेथे खोलगट बिंदू तयार होणार नाहीत व तेथे शाई रहाणार नाही.
चक्रीय गती उत्कीर्ण मुद्रण यंत्रावर मुख्यतः दोन भाग असतात. मुद्रणप्रतिमेचा तांब्याचा दंडगोल व त्यावर कागद दाबणारा लहान दंडगोल या दोन्हींमधून कागद पुढे जातो व त्यावर मुद्रण होते. सुटे कागद किंवा रीळ या दोन्हीवर एकाच पद्धतीने मुद्रण होते. उत्कीर्ण मुद्रण पद्धतीसाठी जी शाई वापरली जाते ती अतिशय पातळ असते. मुद्रणप्रतिमेच्या दंडगोलावर रूळाच्या साह्याने शाई न लावता सरळ शाई त्या मुद्रणप्रतिमेमध्ये भरली जाते. अक्षरदाब मुद्रण किंवा प्रतिरूप मुद्रणाच्या पद्धतीत शाई बऱ्याच रूळांच्या साहाय्याने पसरली जाते पण उत्कीर्ण मुद्रणाची शाई पातळ असल्याने रूळांनी पसरवण्याची गरज भासत नाही. तांब्याच्या दंडगोलावर एका बाजूला कागद मुद्रणप्रतिमेवर दाबला जातो व त्याच वेळी दुसऱ्या बाजूला दंडगोल शाईमध्ये बुडून पुढे जातो आणि पोलादी पात्याने त्याच्या पृष्ठावरील शाई पुसून टाकण्याची क्रिया चालू असते. ज्या यंत्रांचा वेग जास्त असतो तेथे शाई लावण्याची क्रिया थो़डी वेगळ्या पद्धतीने असते. ही शाई फवारा मारल्यासारखी दंडगोलावर पसरली जाते किंवा एका नळाने दंडगोलावर सोडली जाते व नंतर पोलादी पात्याने पुसली जीते. ज्या यंत्रावर दंडगोलाएवजी सपाट पृष्ठाची तांब्याची मुद्रणप्रतिमा लावली जाते, तिच्यावर मात्र रूळांच्या साह्याने शाई लावावी लागते.
वर उल्लेख केलेले पोलादी पाते टोकाला अगदी पातळ व धारदार असते आणि दंडगोलाशी एका विशिष्ट कोनात बसवून त्यावरील जादा शाई हे पाते काढून टाकते. ही शाई त्याच शाईच्या भांड्यात परत पडण्याची व्यवस्था केलेली असते. हे पोलादी पाते विशिष्ट दाब देऊ शकते व तो जरूरीप्रमाणे कमीजास्त करता येतो. पात्याचा दंडगोलाशी कोन व त्याचा दाब यांच्यावर नियंत्रण ठेवल्यामुळे रंगाचा कमीजास्तपणा व चित्रांमधील रंगांच्या छटांचे वैधर्म्य ज्याप्रमाणे हवे असेल तसे करण्याची सोय असते. सुटे कागद छापण्याची व्यवस्था ज्या यंत्रावर असते त्यांची रचना बरीचशी अक्षरदाब मुद्रण यंत्राप्रमाणे असते. कागद दंडगोलाभोवती पकडला जातो व सपाट पृष्ठाच्या तांब्याच्या मुद्रणप्रतिमेवर दाबला जातो. छपाईचा वेग जास्तीत जास्त ताशी ६,००० कागद इतका असतो.
कागदाचे रीळ ज्या चक्रीय गती यंत्रावर लावून छपाई केली जाते अशा यंत्रावर एका क्रमाने (ओळीत) जास्तीत जास्त १८ मुद्रणघटक असतात. प्रत्येक घटकामध्ये एक दंडगोलाकार मुद्रणप्रतिमा, त्याला शाई लावण्याची यंत्रणा व कागद मुद्रणप्रतिमेवर दाबण्यासाठी रबराचा कडक रूळ अशी योजना असते. प्रत्येक घटकामध्ये मुद्रणप्रतिमेचा दंडगोल दोन्ही दिशांना फिरण्याची व्यवस्था केलेली असते कारण पानांची रचना वेगवेगळ्या प्रकारांनी करता येते. मासिकातील किंवा साप्ताहिकातील पानांची संख्या वेगवेगळी असल्याने वरील सोय आवश्यक असते. जेव्हा कागदाच्या दोन्ही बाजूंना छपाई करायची असते तेव्हा रिळाचा कागद दोन मुद्रण घटकांमधून जातो आणि रंगीत छपाईसाठी प्रत्येक बाजूला कमीतकमी चार रंग छापले जातात. त्या वेळी कागदाच्या अनेक रिळांचा उपयोग केला जातो व त्या सर्व रिळांचा कागद मुद्रणानंतर एके ठिकाणी आणला जातो. त्यानंतर पाने एकमेकांत जाऊन मासिक वा साप्ताहिक तयार होते. या सर्व कागदांच्या घड्या घालणे व योग्य ठिकाणी कापणे या क्रिया अक्षरदाब मुद्रण किंवा प्रतिरूप मुद्रणाच्या यंत्राप्रमाणे होतात. या सर्वांवर इलेक्ट्रॉनीय पद्धतीने नियंत्रण ठेवता येते व त्यामुळे त्या सर्वांचा वेग जास्त ठेवता येतो आणि त्यात सुलभता आणता येते. उत्कीर्ण मुद्रणासाठी लागणारी शाई अतिशय पातळ असल्याने ती कागदावर चटकन वाळावी लागते. त्यासाठी कागद तापवून गरम केलेल्या रुळावरून नेला जातो किंवा शाई अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश) प्रकाशाच्या साह्याने वाळवाला जात. अर्थात शाईत मोठ्या प्रमाणात आळकांचा उपयोग करावा लागतो. काही यंत्रांवर छापलेला कागद एका पेटीतून पुढे नेला जातो व या पेटीत गरज किंवा थंड हवा खेळण्याची व्यवस्था केलेली असते.
चक्रीय गती उत्कीर्ण मुद्रणासाठी दंडगोल किंवा पत्रा तयार करण्याची क्रिया : मुद्रणासाठी दंडगोल किंवा पत्र्यावर मुद्रणप्रतिमा तयार करण्यासाठी बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात. छापण्यासाठी मजकूर व चित्रे यांच्या सम प्रती वापरल्या जातात. पानांची मांडणी करून ती एका पारदर्शक फिल्मवर चिकटवून तयार केली जाते. तांब्याच्या पृष्ठावर मुद्रणप्रतिमेचे प्रथम चिकटवून तयार केली जाते. तांब्याच्या पृष्ठावर मुद्रणप्रतिमेचे प्रथम स्थानांतर करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या प्रकाशसंवेदी कार्बन कागदाचा उपयोग केला जातो. सुटे कागद किंवा रिळाच्या स्वरूपात हा कागद केलेला असतो. त्यावर जिलेटिनाचा पातळ थर दिलेला असतो. या थराचे प्रकाशसंवेदीकरण करण्यासाठी पोटॅशियम बायक्रोमेटाच्या विद्रावात हा कागद बुडवून काढून प्रथम वाळवला जातो व नंतर त्यावर प्रकाशक्रिया केली जाते. या कागदावर प्रथम एका जालकपटलामधून प्रकाशक्रिया केली जाते. हे जालकपटल समपद्धतीचे असते. त्यानंतर मजकूर व चित्रांची मांडणी असलेल्या सम प्रती याच कागदावर प्रकाशित केल्या जातात. या दोन्ही प्रकाशक्रियांच्या वेळी जिलेटिनाचा थर कडक होतो, फक्त जेथ सम प्रतीचा काळेपणा जास्त असेल तेथे तो थर कडक होत नाही. पांढऱ्या भागामधून प्रकाश पूर्ण गेल्यामुळे तेथील जिलेटीन पूर्ण कडक होते. मधल्या छायाछटांमधून ज्या प्रमाणात प्रकाश जाईल त्या प्रमाणात जिलेटीन कडक होते व काळ्या छटांमधून प्रकाश न गेल्यामुळे तेथ् जिलेटीन कडक होत नाही. यानंतर हा कागद तांब्यांच्या दंडगोलावर किंवा सपाट पत्र्यावर ठेवला जातो व तो कोमट पाण्यात बुडविला जातो. कागदावरील जिलेटिनाचा थर तांब्याच्या पत्र्यावर चिकटतो व खालील कागद निघून जातो. कोमट पाण्यामुळे जिलेटिनाचा थर ज्या प्रमाणात कडक झाला नसेल त्या प्रमाणात विरघळून जातो. पूर्णपणे कडक झालेला थर (सम प्रतीतील पांढरे भाग) विरघळत नाही.
त्यानंतर एका खोल भांड्यात फेरिक क्लोराइडाचा (अम्लीय) विद्राव तयार करून दंडगोल त्यात अधांतरी फिरवला जातो किंवा विद्रावाचा फवारा त्यावर उडविला जातो. जेथील जिलेटिनाचा थर विरघळलेला असतो तेथे अम्लक्रिया अगोदर सुरू होऊन तो भाग जास्त खोल जातो. त्यानंतर जेथे जिलेटिनाचा कमीजास्त थर शिल्लक असेल तेथेही अम्लक्रिया सुरू होते व तेथेही कमीजास्त थर शिल्लक असेल तेथेही अम्लक्रिया सुरू होते व तेथेही कमीजास्त प्रमाणात खोलगट भाग तयार होतात. जेथे जिलेटिनाचा थर पूर्ण कडक झालेला असेल तेथे मात्र अम्लीकरण होत नाही व जालकपटलाची जाळी वरच्या भागात शिल्लक रहाते. अशा रीतीने अम्लकोरण करण्यासाठी साधारण ३० ते ४५ मिनिटे लागतात. या पृष्ठावर नंतर क्रोमियम धातूचा थर विद्युत् विलेपन करून देता येतो. त्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढून मुद्रणक्षमताही वाढते.
वर दिलेली अम्लकोरणाची पद्धत बरीच वर्षे चालू आहे. अलीकडे त्यात बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत व नवीन संशोधन सतत चालू आहे. पूर्वीच्या कार्बन कागद वापरण्याच्या पद्धतीऐवजी हल्ली प्लॅस्टिकच्या थरावर प्रकाशसंवेदी रसायन वापरले जाते किंवा दंडगोलाच्या पृष्ठावर प्रकाशसंवेदी रसायनाचा फवारा मारून त्यावर मुद्रणप्रतिमेचे प्रकाशीय साधनाने प्रक्षेपण करून नंतर त्याचे कोरण इलेक्ट्रॉनीय पद्धतीने केले जाते. ते शक्य नसल्यास वर वर्णन केल्याप्रमाणे अम्लकोरणही करता येत,. अखंड गती उत्कीर्ण मुद्रणासाठी जे तांब्याचे दंडगोल वापरले जातात, त्यांत आतील बाजूला पोलादी आवरण असते व त्यावर तांब्याचे आवरण विद्युत् विल्पनाने दिलेले असते. जर सपाट पत्र्यावर मुद्रणप्रतिमा असली, तर हा तांब्याचा जाड पत्रा असतो. एकदा वापरून झाल्यानंतर हा पत्रा वितळवून पुन्हा नवा करता येतो किंवा पुन्हा वापरता येतो. दंडगोल वापरून झाल्यावर त्यावरील मुद्रणुप्रतिमा घासून साफ केली जाते व त्यावर पुन्हा तांब्याचा थर विद्युत् विलेपनाने देऊन त्याचा व्यास पूर्ववत केला जातो. तांब्याचा थर दंडगोलाला संलग्न होण्याचे टाळता आल्यास हा थर मुद्रण झाल्यानंतर उचकटून काढता येतो व दंडगोल पूर्ववत करण्याचे काम सोपे होते. हे साध्य करण्यासाठी विद्युत विलेपन करण्यापूर्वी दंडगोलावर बे-पारा मिश्रधातूचा थर देण्यात येतो. दंडगोलावरील तांब्याचे आवरण पूर्णपणे काढून नवीन मुद्रणप्रतिमा त्यावर आवेष्टक पद्धतीनेही बसवता येते. तांब्यावर चकाकी आणण्यासाठी पृष्ठभाग घासून घ्यावा लागतो किंवा विद्युत् विलेपनानंतर आपोआप चकाकी आणता येते.
चक्रीय गती उत्कीर्ण मुद्रणामध्ये चित्रांचे मुद्रण फार चांगले करता येते कारण त्यातील रंग अतिशय वास्तव व आकर्षक दिसतात. मात्र अक्षरे फारशी चांगली दिसत नाहीत कारण त्यांच्या कडा (जालकपटलाच्या वापरामुळे) कात्रे असल्यासारख्या दिसतात व अक्षरांना रेखीवपणा रहात नाही.
यापुढील भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
“