मोर्याक, फ्रांस्वा: (११ ऑक्टोबर १८८५–१ सप्टेंबर १९७०). फ्रेंच कादंबरीकार आणि नाटककार. बॉर्दो (फ्रान्स) येथे एका मध्यमवर्गीय कॅथलिक कुटुंबात जन्मला. बॉर्दो विद्यापीठात आणि नंतर पॅरिसच्या एकॉल दे शार्त ह्या शिक्षणसंस्थेत त्याचे शिक्षण झाले. ले. मँ झ्वांत (१९०९, इं. शी. जॉइन्ड हँड्स) हा काव्यसंग्रह म्हणजे मोर्याकचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक. तथापि नंतर कादंबरीकार म्हणून त्याला लौकिक मिळाला. १९२२ साली प्रसिद्ध झालेल्या ल् बेझे ओ लेप्रे (इं. भा. द किस टू द लेपर १९२३) ह्या कादंबरीमुळे श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून मोर्याकची प्रतिमा प्रस्थापित झाली. त्यानंर त्याने लिहिलेल्या कादंबऱ्यांत ल देझॅर द् लामूर (१९२५, इं भा. द डेझर्ट ऑफ लव्ह, १९४९), तेरॅझ देस्केरू (१९२७, इं. भा. तेरॅझ, १९२८) आणि ल न द् व्हिपॅर (१९३२, इं. भा. द नॉट ऑफ व्हायपर्स, १९५१), ल मिस्तॅर फ्रांतनाक (१९३३, इं. भा. द फ्रांतनाक मिस्टरी, १९५१), ला फारिझियॅन (१९४१, इं. भा. ए वूमन ऑफ द फारिसीज, १९४६), ल् साग्वँ (१९५०) आणि त्याच्या मृत्यूपूर्वी प्रसिद्ध झालेली अँनादोलेसादोत्र फ्वा (१९६९) ह्यांचा समावेश होतो.
बॉर्दो शहर आणि तेथील मध्यमवर्गीयांचे कोंडमारलेले आयुष्य हा मोर्याकच्या कादंबऱ्यांचा प्रमुख विषय होय. एक प्रकारच्या ताणाचे वातावरण त्याच्या कादंबऱ्यांतून प्रत्ययास येते. प्रेमाला पारखी झालेली माणसे मोर्याकच्या कादंबऱ्यांत आढळतात. अनेकदा मानवी संबंधांतून प्रेम मिळविण्याची धडपड करणाऱ्या त्याच्या कादंबऱ्यांतील व्यक्तीरेखांना ईश्वरी प्रेमातून समाधान प्राप्त होते. मानवी हेतूंमागील विविध प्रेरणांचे सखोल विश्लेषण मोर्याक प्रभावीपणे करतो.
मोर्याक १९३८ पासून नाट्यलेखनाकडे वळला. आस्मोदे (१९३८, इं. भा. १९३९), ले माल एमे (१९४५, इं. शी. द पूअर्ली लव्हड) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके.
त्याने लिहिलेल्या जर्नलचे ४ खंड (१९३४–५१), त्याच्या संस्मरणिका (३ खंड, १९५९–६७) आणि ‘द नॉव्हेलिस्ट अँड हिज कॅरॅक्टर्स’ (१९३३, इं. शी.) सारख्या त्यांच्या लेखनातून त्याच्या लेखनामागील उद्दिष्टे, त्याची लिहिण्याची पद्धत आणि त्याचे अन्य विषयांवरील विचार त्याने व्यक्त केले आहेत.
सर्वंकष सत्तावादाचा आणि फॅसिझमचा त्याला तिटकारा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रान्समध्ये जर्मनांना प्रतिकार करणाऱ्या साहित्यिकांत मोर्याक होताच.
फ्रेंच अकादमीवर १९३३ मध्ये त्याची नेमणूक झाली. १९५२ साली साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान त्याला प्राप्त झाला. पॅरिस येथे तो निधन पावला.
कळमकर, य. शं.