मोझेस : (इ. स. पू. सु. चौदावे-तेरावे शतक). ज्यू राष्ट्रसंस्थापक, सर्वश्रेष्ठ ज्यू प्रेषित व ज्यूंना त्यांची धार्मिक-नैतिक सामाजिक संहिता देणारा एक श्रेष्ठ नेता. मोझेस (हिब्रू मोशे) हा शब्द ईजिप्शियन भाषेत ‘मोसे’ म्हणजे मुलगा या अर्थाचा आहे. त्याचा जन्म ईजिप्तमध्ये झाला. मोझेसचा पिता अम्राम व आई जोशेबेद. हे दोघेही लेव्ही जमातीचे ज्यू होते. परंतु ज्या दुसरा रॅमसीझ (कार. इ. स. पू. सु. १३०४–१२३७) ह्या ईजिप्ती राजाच्या (फेअरो) राज्यात ते गुलाम म्हणून राहत होते, त्याने ज्यूंच्या मुलांना नाईल नदीत बुडवून मारावे असा हुकूम काढला होता. मोझेसला त्याच्या आई-वडिलांनी तीन महिने कसेतरी गुप्तपणे सांभाळले परंतु शेवटी त्यांनी त्याला गवताच्या पेटाऱ्यात ठेवून नाईल नदीत सोडून दिले. सुदैवाने फेअरीची राजकन्या नदीवर आंघोळीस आली असता तिला हे मूल आढळले व ते तिला इतके आवडले, का तिने त्याचे पोटच्या मुलाप्रमाणे पालनपोषण केले व त्याचे नाव ‘मोझेस’ असे ठेवले. मोझेस मोठा झाल्यावर एकदा त्याने एक ईजिप्शियन माणूस एका ज्यूचा छळ करीत असताना पाहिले. लगेच त्याने त्या माणसास ठार केले. मोझेसच्या रक्तातला हा गुण उत्तरोत्तर अधिक प्रगट होऊ लागला. फेअरोच्या हाती सापडण्यापूर्वीच तो तेथून पळाला व जेथ्रो ह्या मीडियनच्या धर्मगुरूकडे आला. तिथे त्याने त्या धर्मगुरूची मुलगी झिप्पोरा हिच्याशी लग्न केले. मोझेसपासून जेरशोम व एलिएझर हे दोन पुत्रही झाले. तिथेच मोझेसने चाळीस वर्षे मेंढपाळाचा व्यवसाय केला. एकदा होरेब पर्वतावर मेंढ्या चारीत असता मोझेसला एका झुडपात अग्निज्वाला दिसली आणि तरीही ते झुडूप जळत नव्हते. तो जवळ गेला तेव्हा त्याला ईश्वराचा साक्षात्कार झाला व ईजिप्तला परत जाऊन आपल्या भाऊबंदांना सोडवून आणण्याचा परमेश्वरी आदेश मिळाला. त्याप्रमाणे तो ईजिप्तला आला. तिथे त्याला त्याचा भाऊ ⇨ एअरन  भेटला. ज्यूंना सोडून देण्यासाठी फेअरोचे मन वळविणे कठीण आहे असे दोघा भावांना पटले. मग मोझेसच्या दैवी शक्तीमुळे येहोवाने ईजिप्तवर दहा वेळा प्लेगच्या साथी आणल्या. शेवटी ईजिप्शियन लोकांनी ज्यूंचा छळ थांबवून त्यांना सोडून दिले. मग सारे ज्यू आपली मेंढरे घेऊन सुएझच्या दक्षिणेकडे वसाहत करण्यासाठी निघाले. त्यांचे नेतृत्व मोझेसने केले. हा प्रसंग ‘एक्झोडस’ म्हणून बायबलमध्ये व इतिहासातही प्रख्यात आहे. त्यांच्यावर अनेक संकटे आली पणे त्यांना ईश्वराने-येहोवाने सांभाळले. सिनाई येथे सारे आले तेव्हा त्यांचे मोठे स्वागत झाले. इथेच या पर्वताच्या शिखरावर (जेबेल मूसा) मोझेसला ईश्वरी साक्षात्कार झाला व ईश्वराने त्याला आपल्या ‘दशाज्ञा’ वा दहा नीतिनियम दिले. सिनाई पर्वतावर मोझेस ४० दिवस ईश्वराच्या सान्निध्यात होता. नंतर खाली येऊन त्याने आपल्या भाईबंदांना कादेश येथे नेले. तेथून ३८ वर्षांनंतर ते पूर्वेकडे निघाले. एसौ व मोआब याच्या प्रदेशातून त्यांना सुखरूपाणे जाता आले परंतु पुढे त्यांच्या मार्गात प्रतिबंध आला. जॉर्डन नदी ओलांडून पलीकडे कॅनन प्रदेशात जाता येणार नाही व आपला अंत काळही जवळ येऊन ठेपला आहे असे पाहून मोझेसने आपल्या साऱ्या बांधवांना बोलावून त्यांना शेवटचा संदेश दिला (‘ड्यूटेरोनॉमी’ वा ‘पेंटाट्यूक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बायबलमधील पहिल्या पाच पुस्तकांत हा संदेश ग्रथित आहे) नंतर सर्वांना आशीर्वाद देऊन तसेच जोशुआस आपला वारस नियुक्त करून मोझेस नेबो पर्वतावरील पिसगाह शिखरावर गेला व तिथे त्याने वयाच्या एकशेविसाव्या वर्षी देह ठेवला. इ. स. पू. सु. १३९२ ते सु. १२७२ असा त्याचा आयुकाल अभ्यासक मानतात.

ज्यू धर्माप्रमाणे येहोवाने इझ्राएल राष्ट्र निर्माण करण्यासाठी मोझेसला प्रेषित बनविले होते व त्याच्या द्वारा ईश्वर आपल्या साऱ्या आज्ञा ज्यू जनतेला कळवीत राहिला. मोझेस हा स्वभावाने अत्यंत शांत होता, असे त्याचे वर्णन आढळते. ‘ज्याने ईश्वराला समोरासमोर पाहिले असा धर्मप्रेषित एकटा मोझेसच होय’, अशी त्याची थोरवी गायिली जाते. ज्या काळात मोझेसने आपल्या बांधवांची एकी घडवून आणली त्या काळात येहोवा या देवाचा नाममहिमा नुकताच सुरू झाला होता. अशा काळात मोझेसच्या प्रयत्नांमुळे ज्यू जनतेने ईश्वरावर श्रद्धा ठेवली. ‘सिनाई पर्वतावरून जे वादळ आले त्यामुळे साऱ्या वाळवंटावर पावसाचा वर्षाव झाला व जिकडे तिकडे पिके डवरून आली’, या त्यांच्या उद्‌गारावरून मोझेसने ज्या ईश्वरावर त्यांना श्रद्धा ठेवायला सांगितले, त्याने अनेक चमत्कार केल्याच्या कथा आहेत. मोझेस खरोखरच त्यांना मदत करणारा ठरला. मोझेसची खरी कीर्ती त्याने घालून दिलेल्या नियमामुळे विशेष झाली आहे. मोझेसच्या ड्यूटेरोनॉमीतल्या नियमांमुळे ज्यू लोकांची एकी झाली, त्यांच्यात राष्ट्रीय भावना निर्माण झाली इतकेच नव्हे, तर धर्माची खरी कसोटी विधी आणि पूजा यांवर अवलंबून नसून नैतिक आचारणावर आहे, हा दृष्टिकोन त्यांना प्रथम मोझेसकडून मिळाला.

मायकेलअँजेलो या प्रसिद्ध कलावंताने तयार केलेल्या मोझेसच्या पुतळ्यात मोझेसच्या कपळातून शिंगे बाहेर आलेली दाखविली आहेत. मोझेसच्या कपाळावरील शिंगाची कल्पना मूळ हिब्रूवरून लॅटिनमध्ये झालेल्या चुकीच्या भाषांतरामुळे आली आहे. ’जेव्हा मोझेस सिनाई पर्वतावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावरील कातडी चमकत होती’ या बायबलच्या वाक्यातील मूळ हिब्रूतील ‘चमकत होती’ या अर्थाचा शब्दप्रयोग ‘(तिच्यातून) किरणे निघत होती’ असा आहे. लॅटिनमध्ये ‘किरण’ व ‘शिंग’ यांचा घोटाळा केला गेला. मोझेसच्या जीवनातील प्रसंगांवर अनेक प्रख्यात चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी आपल्या चित्र-शिल्पाकृती तयार केल्या आहेत.

(पहा : मराठी विश्वकोश : ९, पुरानकथेतील चित्रपत्रे ).

पहा : ज्यू धर्म बायबल.

संदर्भ :  1. Auerbach, Elias Trans. Barclay, R. A. Lehman, I. O. Moses, Detroit, Mich., 1975.

             2. Buber, Martin, Moses, New York 1958.

             3. Daiches, David, Moses: The Man and His Vision, New York, 1975.

             4. Freud, Sigmund Trans. Jones, Katherine, Moses and Monotheism, London, 1951.

              5. Roshwald, Mordecal Roshwald, Miriam, Moses: Leader, Prophet, Man, Cranbury, N.J., 1969.

माहुलकर, दि. द.