मेट्स : फ्रान्समधील एक सांस्कृतिक तसेच औद्योगिक शहर लोकसंख्या १,१४,००० (१९८२). हे फ्रान्सच्या ईशान्य भागात मोझेल नदीवर वसले असून मोझेल विभागाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

रोमनपूर्व काळात या प्रदेशात गॉल लोकांची सत्ता होती. व्हँडॉल आणि हूण लोकांनी इ. स. पाचव्या शतकात ते उद्‌ध्वस्त केले, सहाव्या शतकात ती मेरोव्हिंजिअन साम्राज्याच्या पूर्वभागाची राजधानी होती. आठव्या शतकात येथे बिशपांचे महत्त्व वाढले. पुढील काही शतकांत सांस्कृतिक व व्यापारी क्षेत्रात या नगराची भरभराट झाली. बाराव्या शतकात एक अत्यंत समृद्ध आणि दाट वस्तीचे हे शहर होते. धर्मसुधारणा आंदोलनात या शहराने प्रॉटेस्टंट पंथाचे स्वागत केले. १५५२ मध्ये येथील बिशप केंद्र दुसऱ्या हेन्रीने फ्रेंचांच्या सत्तेखाली आणले. नंतर वेस्टफेलियाच्या तहाने (१६४८) त्यावरील फ्रेंच अंमलास मान्यता देण्यात आली. फ्रँको-प्रशियन युद्धात हे शहर जर्मनांनी वेढले होते. दुसऱ्या महायुद्धकाळात जर्मनांच्या ताब्यात असताना शहराचे अतोनात नुकसान झाले. शहरात गॉल, रोमन काळातील जलसेतू, सार्वजनिक स्नानगृहे, रंगमंडल इत्यादींचे अवशेष आढळतात. १२२१ ते १५१६ या काळात बांधण्यात आलेले येथील सां एत्येन कॅथीड्रल प्रसिद्ध आहे. शहरात अनेक इतर चर्चवास्तू आहेत. पॉल व्हेर्लेअन (१८४४–९६) या प्रसिद्ध फ्रेंच कवीचे हे जन्मगाव.

हे ख्रिस्ती धर्माचे केंद्र व मोठे रेल्वेप्रस्थानक आहे. येथे विद्यापीठ, धातूच्या ओतशाळा, यंत्रे, कापड, तंबाखू, अन्नपदार्थ इत्यादींचे उद्योग चालतात. धान्याचाही येथे मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो.

मिसार, म. व्यं.