मे : ग्रेगरीय कॅलेंडरमधील पाचवा महिना. मेय (मिअ) या उत्साह व अभिवृद्धीच्या रोमन देवतेवरून याचे नाव आले असावे. आरंभीच्या रोमन पंचांगात हा तिसरा महिना होता ज्यूलियस सीझरच्या काळात पंचांगात झालेल्या सुधारणांनुसार या महिन्याला पाचवा क्रमांक देण्यात आला. तथापि याचे दिवस नेहमीच ३१ राहिले आहेत. भरघोस पीक यावे म्हणून या महिन्यात मेय देवतेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण करीत, तसेच वसंत ऋतूच्या आनंदोत्सवाप्रीत्यर्थ १मे रोजी सण पाळीत. या महिन्याचे रत्न पाच (वा अकीक), रास वृषभ व मिथुन, तसेच फूल हॉथॉर्न व लिली आहेत असे मानतात. रोमन कॅथलिक चर्च हा पूर्ण महिना कुमारी मेरीचा मानीत. इंग्लंडमध्ये मे-पोल नावाचा उंच स्तंभ उभारून आणि तो पाने, फुले व रंगीत फितींनी सजवून त्याच्याभोवती मे राणी म्हणून निवडलेल्या सुंदर मुलीसह नाच करण्याची प्रथा आहे. रशिया व इतर विशेषतः साम्यवादी देशांत १ मे हा कामगार दिन म्हणून पाळतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये मेमधील दुसरा रविवार राष्ट्रातील मातांच्या गौरवार्थ मातृदिन म्हणून पाळतात. १ मे १९६० रोजी पूर्वीचे द्विभाषिक मुंबई राज्य बरखास्त होऊन महाराष्ट्र व गुजरात ही स्वतंत्र राज्ये स्थापन झाल्याने महाराष्ट्रात १ मे हा महाराष्ट्र-दिन म्हणून साजरा करतात. हिंदू पंचांगानुसार हा महिना सर्वसाधारणपणे चैत्र-वैशाख या चांद्रमासांत येतो.

इ.स. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा प्रारंभ, मौंट एव्हरेस्टवर माणसाचे प्रथम पदार्पण, जवाहरलाल नेहरू व कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती इ. घटना या महिन्यातील आहेत.

ठाकूर,अ.ना.