मीडिया : मीड लोकांची मूळ भूमी आणि वायव्य इराणच्या भूप्रदेशाचे प्राचीन नाव. वायव्य इराण आणि रशियाचा कॅस्पियन समुद्राजवळचा नैर्ऋत्य भाग मिळून जो भूप्रदेश होतो, तो प्राचीन काळी मीडिया या नावाने ओळखला जाई. उत्तरेला उर्मिया सरोवर, पश्चिमेला झॅग्रॉस पर्वतरांगा आणि पूर्वेला एल्‌बूर्झ पर्वत यांनी तो सीमांकित होता. या प्रदेशात आधुनिक अझरबैजान, कुर्दिस्तान आणि केरमानशाहनचा काही भाग अंतर्भूत होतो. मीडियाचा पहिला उल्लेख ॲसिरियन राजा तिसरा शॅल्मानीझर (इ. स. पू. ८५८–८२४) याच्या मुद्रांवरील लेखांत आढळतो. याशिवाय हीरॉडोटस (इ. स. पू. ४८४ ?–४२५ ?) या ग्रीक इतिहासकाराने मिडियन साम्राज्य आणि त्याची राजधानी एकबॅटना (विद्यमान हामादान) यांचा उल्लेख केला आहे. इ. स. पू. १२०० पर्यंत येथे स्थायिक वस्ती नव्हती. पुढे येथे भटके आर्यवंशीय-आर्यभाषिक ‘मीड’ नावाचे लोक स्थायिक झाले. त्यांच्या नावावरून मीडिया हे नाव या प्रदेशाला मिळाले असावे, असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे. त्यानंतर त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती येथे उत्पन्न झाली. भाषा व संस्कृती यांमध्ये हे लोक इराणी व भारतीय आर्यांच्या जवळचे असले, तरी पश्चिम आशियाच्या राजकारणात मीड लोकांचा उल्लेख इ. स. पू. नवव्या शतकाच्या आगेमागे होऊ लागला. ॲसिरियन लेखांत ‘जित शत्रू’ म्हणून त्यांचा निर्देश आढळतो. येथून पुढे दोन शतके मीडियाचे राजे ॲसिरियाचे मांडलिक होते. निमरूद येथे सापडलेल्या इ. स. पू. ६७२ च्या लेखातील तहान्वये त्यांचे परस्परसंबंध कसे असावे, हे नव्याने ठरविण्यात आले. फ्रेएटीझ हा पहिला ज्ञात राजा. त्याने ॲसिरियातील अंतस्थ यादवीचा फायदा घेऊन आपले बळ वाढविले. त्याचा मुलगा डायोसीझ याने एकबॅटना ही राजधानी केली व त्यानंतर सत्ताघीश झालेला त्याचा नातू सायॲक्सरीझ याने इराणी भाषा बोलणाऱ्या मीड जमातींना एकत्र आणून विस्तृत साम्राज्याची स्थापना केली. इ. स. पू. ६१२ मध्ये त्याने असुर काबीज केले आणि बॅबिलनचा राजा नेबोपोलॅस्सर याच्या मदतीने ॲसिरियावर आक्रमण करून त्यांची निनेव्ह ही खुद्द राजधानी उद्‌ध्वस्त केली. मुख्य शत्रूचा मोड झाल्यावर त्यांनी ॲसिरियन साम्राज्याचा भूप्रदेश आपापसांत वाटून घेतला. मीडियाच्या आधिपत्याखाली उत्तर ॲसिरिया, इराण व अर्मेनियाचा काही भाग आला. आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पश्चिमेस मध्य-तुर्कस्तान, पूर्वेस मध्य-इराण, उत्तरेस कॅस्पियन समुद्र व दक्षिणेस ॲसिरियन साम्राज्याचा प्रदेश एवढे साम्राज्य उभे केले. त्याचा वारसा ॲस्टायजीझ याला हा पसारा आवरता आला नाही. इराणचा सम्राट दुसरा सायरस द ग्रेट ह्याच्याशी झालेल्या इ. स. पू. ५५० च्या युद्धात ॲस्टायजीझचे सैन्यही त्याच्याशी एकनिष्ठ राहिले नाही. एकेकाळी मीडियाच्या मांडलिक असलेल्या इराणच्या राजघराण्याने आता ‘सह-सम्राट’ असा अधिकार धारण केला व फुटून निघू पहाणाऱ्या मीडियाची राजसत्ता कालांतराने नष्ट करण्यात आली. पुढे अलेक्झांडरने काही काळ या भूप्रदेशावर अधिसत्ता गाजविली (इ. स. पू. ३३०). पुढे अनेक स्थित्यंतरानंतर ते सिल्युसिडी साम्राज्यात विलीन झाले. त्यावेळी मीड लोकांचे स्वतंत्र अस्तित्वही संपुष्टात आले होते. पश्चिम आशियाच्या राजकारणात धूमकेतूसारखे उगवलेले हे साम्राज्य तितक्याच अकस्मात लुप्त झाले. ऐतिहासिक दृष्ट्या विनाशाच्या मार्गावरील ॲसिरियन साम्राज्य व नव्याने उदयास येऊ पाहणारे पण पुरेसे बल नसणारे इराणी साम्राज्य यांना सांधणारा दुवा म्हणूनच मीडियाचे स्थान इतिहासात उरले. मिडियाची संस्कृती प्रथमपासून ॲसिरियन संस्कृतीने प्रभावित झालेली दिसते. एकबँटनी या राजधानीत अथवा झिविएसारख्या प्रांतिक केंद्रात आढळलेल्या अवशेषांवरून, विशेषतः शिल्पांवर व कलाकुसरीच्या काही वस्तूंवर ॲसिरियन शैलीची छाप स्पष्टपणे दिसून येते. त्यांचे लिखित वा वैशिष्ट्यपूर्ण अवशेष उपलब्ध नाहीत तथापि मीड लोकांनी आपली आर्यन भाषा, मूळाक्षरे, मुद्रांऐवजी भूर्जपत्रे आणि लेखणी हे साहित्य इराणला दिले. एवढेच नव्हे तर त्यांच्या बांधकामातील स्तंभाची रचना आणि शांततेच्या वेळी आर्थिक बाबतीतील काटकसरीची विधिसंहिता ह्यांची देणगी मीड लोकांचीच आहे.

संदर्भ : 1. Cameron G. History of Early Iran, London, 1936.

2. Durant, Will, Our Oriental Heritage, New York, 1956.

माटे, म. श्री.