गौतमीपुत्र सातकर्णि : (इ. स. ?–८६). सातवाहन वंशातील एक अत्यंत बलाढ्य आणि थोर राजा. हा इ. स. ६२ मध्ये गादीवर आला, तेव्हा सातवाहन वंशाला अवनत स्थिती प्राप्त झाली होती. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे प्रदेश शकवंशी क्षत्रपांनी बळकावले होते. तेव्हा सातवाहन राजांचा अंमल त्यांच्या प्रतिष्ठान (पैठण) राजधानी भोवतालच्या मूलक प्रदेशापुरताच मर्यादित होता.

त्याने प्रथम विदर्भावर चाल करून तेथील क्षत्रपाधिपतीचा पराभव केला आणि बेनाकटकस्वामी (वैनगंगा प्रदेशाचा अधिपती) अशी पदवी धारण केली. पुढे त्याने पश्चिम महाराष्ट्रावर स्वारी करून नहपान या महाक्षत्रपाचा पूर्ण पराभव करून त्याच्या क्षहरात वंशाचा समूळ उच्छेद केला. नंतर त्याने महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या शक, यवन वगैरेंचा निःपात करून त्यांचे प्रदेश आपल्या राज्यास जोडले, तसेच आपले राज्य उत्तरेस सौराष्ट्र (काठेवाड), अनूप (महेश्वराजवळचा प्रदेश) व माळवा पश्चिमेस कोंकण पूर्वेस आंध्र आणि दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत (कर्नाटक) पसरविले. कोरीव लेखांत त्याला ‘तिसमुदतोयपीतवाहन’ (ज्याचे घोडे अरबी समुद्र, दक्षिण महासागर आणि बंगालचा उपसागर या तीन समुद्रांचे पाणी प्याले आहेत) असे विशेषण लावले आहे. त्यावरून त्याच्या राज्यविस्ताराची कल्पना येते.

गौतमीपुत्राच्या नासिकच्या लेण्यांतील लेखात चोविसाव्या शासनवर्षाचा उल्लेख आहे. तेव्हा पुराणांत म्हटल्याप्रमाणे त्याची कारकीर्द एकवीस वर्षांची नसून ती निदान चोवीस वर्षे चालली होती, यात संशय नाही.

गौतमीपुत्र स्वतः श्रेष्ठ ब्राह्मण कुलात जन्मला असून त्याने क्षत्रियांच्या गर्वाचे दमन केले, असे कोरीव लेखांत वर्णन आहे. त्याने चातुर्वर्ण्यसंकर बंद केला. तो वैदिक धर्माभिमानी होता, तरीही त्याचा बौद्ध धर्मासही उदार आश्रय होता. त्याने बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमाकरिता दोन शेते दान दिल्याचा नासिकच्या लेण्यातील दोन लेखांत निर्देश आहे. यांशिवाय त्याने तेथील क्र. तीनचे लेणे भिक्षूंकरिता कोरविण्यात आरंभ केला होता. ते लेणे त्याचा पुत्र वासिष्ठीपुत्र पुळुमावि याच्या एकोणिसाव्या शासनवर्षी पुरे झाले. ते दान देताना गौतमीपुत्राची माता गोतमी बलश्री हिला आपल्या शूर व थोर पुत्राची आठवण होऊन तिने त्याचे वर्णन त्या लेण्यांतील लेखांत अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत केले आहे. प्राचीन भारतातील थोर राजर्षींमध्ये गौतमीपुत्राची गणना होते.

संदर्भ : Sastri, K. A. N. Ed. Comprehensive History of India, Vol. II, Calcutta, 1957.

मिराशी, वा. वि.