सेल्जुक तुर्क : पश्चिम आशियातील ओगूझनामक तुर्की भटक्या टोळ्या. त्यांच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही तथापि दहाव्या शतकात सेल्जुकनामक नेत्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी किरगीझ (कझाक) मधील सिरदर्या (जॅक सार्टिझ) नदीकाठी वसाहत केली. सुरुवातीस त्यांनी अब्बासी खिलाफतीकडे आश्रय घेतला आणि इस्लाम धर्मातील सुन्नी संप्रदायात प्रवेश केला (धर्मांतर केले). प्रारंभी भाडोत्री सैनिक म्हणून त्यांनी सेवा केली. सेल्जुकच्या दोन नातवांनी (शाघ्री बेग व तोग्रील बेग) अनुक्रमे कॉरसानच्या भागात राज्ये स्थापिली. तोग्रील बेग (९९०–१०६३) याने शाघ्री या भावाच्या मदतीने खोरासान जिंकले (१०४०). ते भावास देऊन पुढे कॅस्पिअन क्षेत्रात राज्याचा विस्तार केला. तसेच हमदान पादाक्रांत केले (१०४०–४४) आणि नैर्ऋत्य आशियात आक्रमणे करून करेझम व इराण काबीज केले. पुढे अनातोलिया घेऊन अब्बासी खिलाफतीची राजधानी बगदाद हस्तगत केली (१०६०). या विस्तृत साम्राज्यावर तुर्की सेल्जुक वंशाची सत्ता प्रस्थापित झाली. तोग्रीलने सुलतान हे बिरुद धारण केले. तोग्रीलच्या मृत्यूसमयी त्याच्या अंमलाखाली मेसोपोटेमिया, अनातोलिया आणि पश्चिम इराणचा मोठा भूप्रदेश होता. त्याला मुलगा नव्हता. त्याचा पुतण्या अल्प आर्सलान मुहम्मद (१०६३–७२) हा दुसरा सेल्जुक सुलतान झाला. तो पराक्रमी व कर्तबगार होता. त्याने जॉर्जिया, अर्मेनिया आणि बराच आशिया मायनरचा भूभाग पादाक्रांत करून बायझंटीन सम्राट रोमनस डायॅजिनीझ याचा १०७१ मध्ये मँझिकर्त येथे पराभव केला. त्यामुळे आशिया मायनरमध्ये तुर्की टोळ्यांचा प्रवेश सुकर झाला. अल्प आर्सलानचा मुलगा मलिक शाह (कार. १०७३–९२) हा अल्प आर्सलानच्या मृत्यूनंतर सुलतान झाला. त्याचा वझीर (मुख्य प्रधान) निझाम अल्-मुल्क हुशार व कार्यक्षम प्रशासक होता. त्याने या विस्तृत साम्राज्याची प्रशासकीय घडी नीट व व्यवस्थित बसविली. तो दोन्ही शाखांचा कारभार पाहात होता. मलिक शाहाने साम्राज्यात अनेक सुधारणा केल्या. अझरबैझान, सिरिया आणि पॅलेस्टाइन जिंकून त्यांचा साम्राज्यात अंतर्भाव केला. त्याच्या दरबारात उमर खय्याम हा ख्यातनाम फारसी कवी व विद्वान होता. त्याने सुलतानाच्या आज्ञेवरून पर्शियन कालगणना पद्धतीत सुधारणा करून दिनदर्शिका बनविली (१०७९). तसेच इस्पहान् या राजधानीत सुरेख वास्तू बांधून उद्यानांनी ती सुशोभित केली. निझाम्-अल्-मुल्क याने राज्यांतील प्रत्येक शहरात मदरसा स्थापन करून शिक्षणास प्रोत्साहन दिले. तसेच सियासत नामा हा प्रशासनविषयक ग्रंथ लिहिला. सुमारास हसन शब्बा या इराणियन धर्ममार्तंडाच्या नेतृत्वाखाली ईजिप्तमध्ये इस्माईली चळवळ उभी राहिली. त्यातून ॲसॅसीन हा अंतकवादी समूह फोफावला. त्यांनी इराणमधील काझविन जवळचा दुर्गम डोंगरी अलमूट किल्ला हस्तगत केला. वझीर निझाम अल्-मुल्कचा खून केला (१०९२). मलिक शाहच्या मृत्यूनंतर सुलतानाच्या वारसात साम्राज्याची विभागणी झाली आणि छोटी छोटी राज्ये उदयास आली. करेझमच्या शाहाने आक्रमण करून शेवटच्या सेल्जुक तुर्क सुलतानास ११५७ मध्ये हैराण केले. ॲसॅसिन यांना प्रतिकार करणे सुलतानांना अशक्य झाले. शेवटचा सेल्जुक सुलतान ११९४ मध्ये युद्धभूमीवरच मारला गेला. ॲनातोलिया वगळता १२०० मध्ये सुलतानांच्या अखत्यारीत कोणताच अन्य भूप्रदेश नव्हता. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक सेल्जुक तुर्की टोळ्यांच्या नेत्यांनी छोटी छोटी स्वतंत्र सत्तास्थाने स्थापन केली. ते केवळ त्यांच्या लष्करी बळावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यात आपापसांत संघर्ष होत. या अंदाधुंदीतूनच ऑटोमन साम्राज्याचा संस्थापक उस्मान (उथ्मान) याने आपली नवी सत्ता निर्माण केली. उस्मान हा ओगूझ तुर्कांपैकी कायीनामक जमातीचा होता, अशी परंपरागत समजूत आहे.

सेल्जुक तुर्कांच्या सत्ताकाळात अनेक भागात मदरसा स्थापन होऊन शिक्षणाबरोबरच इस्लाम धर्माचा प्रसार-प्रचार झाला. सुलतानांनी अनेक भव्य वास्तू बांधल्या. या वास्तूंपैकी अनेक मशिदी अवशिष्ट असून त्यांपैकी इस्फहान (जामे मशीद) प्रसिद्ध आहे. इराणी संस्कृती व कला यांना सुलतानांनी उत्तेजन दिले. त्यांच्या दरबारी उमर खय्यामसारखे श्रेष्ठ फारसी कवी होते. सुलतानांनी राज्यकारभारात फार्सी भाषेचाच वापर केला आणि इस्लामच्या शिकवणीत तिचाच चपलख वापर केला. त्यामुळे इराणमध्ये फारसीचा प्रसार-प्रचार झाला आणि अरबी भाषा इराणमधून धार्मिक समारंभ व कुराणाचे पठण वगळता जवळजवळ हद्दपार झाली होती.

देशपांडे, सु. र.