कोटा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील राजस्थानमधील एक प्रसिध्द राजपूत संस्थान. क्षेत्रफळ १४,७२२ चौ.किमी. लोकसंख्या सु. आठ लाख (१९४१) व उत्पन्न सु. तीन कोटी दहा लाख रुपये. संस्थानची राजधानी कोटा येथे होती. कोटा संस्थान उत्तरेस जयपूर संस्थानातील अलिगढचा काही भाग व टोक, पश्चिमेस बूंदी-उदेपूर, दक्षिणेस खिल्चिपूर, राजगढ संस्थाने, नैर्ऋत्येस इंदूर-झालाबाड आणि ग्वाल्हेर संस्थानचा आगर तहशील आणि पूर्वेस ग्वाल्हेर संस्थान यांनी सीमित झाले होते.

माळव्याच्या पठाराच्या उतरणीवर हे संस्थान वसले आहे. त्यातून चंबळा, काली सिंध व पार्वती या तीन प्रमुख नद्या वाहतात. पार्वती नदीच्या धरणामुळे हा प्रदेश सुपीक बनला आहे. ह्याशिवाय विंध्य पर्वतांच्या रांगांत विविध प्रकारचे लाकूड मिळते आणि तेथील हिंस्त्र जनावरांमुळे शिकारीसाठी हे संस्थान पूर्वीपासून ख्यातनाम आहे.

कोटा संस्थानचे राजघराणे मुळचे चौहान राजपूत घराण्याच्या हाडानामक शाखेचे आहे. १३४२ मध्ये बूंदीचा राजा राव देव याने प्रथम कोटी या एका भिल्लाच्या जमातीकडून हा प्रदेश जिंकून घेतला, त्यावरून त्यास कोटा हे नाव पडले. १५३० पर्यंत हा प्रदेश त्याच वंशजांच्या ताब्यात होता. पुढे बूंदीच्याच राव सुरजमल्लाने तो घेतला. पुढे सतराव्या शतकात बूंदीच्या रतनसिंहाने आपला दुसरा मुलगा माधवसिंह ह्यास तो जहागीर म्हणून दिली. रतनसिंह व माधवसिंह ह्या पितापुत्रांनी जहांगीरास शाहजहानच्या बंडाविरुध्द मदत केली, तेव्हा बादशाहाने माधवसिंहास कोटा शहर व ३६० खेडी असा सु. अडीच लाखांचा मुलूख जहागीर म्हणून वंशपरंपरागत तोडून दिला. मात्र शाहजहाननेही ती जहागीर पुढे तशीच चालू ठेवली, पण संस्थान बूंदीपासून वेगळे करण्यात आले. त्यावेळी खजूरी, अरंडखेडा, कैथून, आवा, कनवास, मधुकरगढ, दीगोद, रहल वगैरे काही महत्वाचे परगणे त्यात होते. माधवसिंहानंतर त्याचा मुलगा मुकुंदसिंह गादीवर आला. त्याने व त्याच्या चार मुलांनी मोगल साम्राज्यासाठी अनेक लढायांतून शौर्य गाजविले. या लढायांमधून फक्त किशोरसिंग हा एकच पुत्र वाचला. त्याचा मुलगा रामसिंग पुढे गादीवर आला. किशोरसिंग व रामसिंग यांनी औरंगजेबास अनेक लढायांत साहाय्य केले. रामसिंग जाजौ येथील लढाईत मारला गेला. त्यानंतर भीमसिंह (१७०८–२०) गादीवर आला. त्यास पाच हजारांची मनसबदारी व महाराव ही पदवी मिळाली. त्याने ३,४०० गावांपर्यत राज्यविस्तार केला आणि बूंदीवरही प्रभुत्व प्रस्थापिले. ह्यातूनच त्याचे पुढे जयपूरशी वैर येऊन लढाया उद्‌भवल्या. त्याच्या मागून त्याचा मुलगा अर्जुनसिंग व अर्जुनसिंगानंतर दुर्जनसिंग (१७२४–५६) हा गादीवर आला त्यानेही राज्य वाढविले. १७३५ मध्ये होळकर- पवारांनी दुर्जनसिंगाचा पराभव करून कोटा संस्थानाकडून चौथाई घेण्यास सुरुवात केली. यानंतर अजितसिंग (१७५६–५९) आणि नंतर पहिला छत्रसाल राज्यावर आला. १७६१ मध्ये जयपूर संस्थानच्या राजाने या संस्थानावर स्वारी केली, पण तीत जयपूरचा पराभव झाला. या लढाईत जालिमसिंह नावाच्या एका तरुण सरदाराने शौर्य दाखविले. त्याने पुढे गुमानसिगाच्या वेळीही मराठ्यांविरुध्द मध्यस्थी करून कोटाचे आर्थिक नुकसान थांबविले व मराठ्यांस कोटामधून आपले सैन्य मागे घेण्यास लावले. या त्याच्या कर्तृत्वामुळे त्यास दिवाणपद मिळाले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सु. पन्नास वर्षे जालिमसिंहानेच सर्व कारभार पाहिला. त्यावेळचे गुमानसिंह, उमेदसिंह हे राजे केवळ नामधारीच होते. जालिमसिंहाने कोटा संस्थानात उत्तम शासनपध्दती अंमलात आणली, सैन्यात कवायतीची पध्दत सुरू करून जमीनमहसुलाच्या पध्दतीत आमूलाग्र असे उपयुक्त फेरबदल केले. आधुनिक कोटाच्या भरभराटीचे सर्व श्रेय त्यास द्यावे लागेल. १८१७ मध्ये जालिमसिंहाच्या मध्यस्थीने तहनामा होऊन कोटा हे ब्रिटिशांचे मांडलिक संस्थान झाले. यावेळी होळकर-पेंढाऱ्यांचा संस्थानाला फार उपद्रव होत असे. ब्रिटिशांनी मराठ्यांची खंडणी बंद करून आपणाकडे घेतली व जालिमसिंहाच्या घराण्यात वंशपरंपरागत दिवाणपद देऊन राज्यकारभाराची सूत्रे त्याच्या हाती सुपूर्त केली. परिणामत: राजा व दिवाण यांचे वैर आले. दुसरा किशोरसिंग (१८१९–२८) याने जालिमसिंहाच्या वंशजास राज्यकारभारातून दूर केले. त्यामुळे ब्रिटिशांनी किशोरसिंगाविरुध्द युद्ध पुकारले. त्यात किशोरसिंगाचा पराभव झाला व ब्रिटिशांनी जालिमसिंहाच्या वंशजास पुन्हा हे सर्व अधिकार दिले. पुन्हा पुढे हा तंटा उद्‍भवला, तेव्हा ब्रिटिशांनी जालिमसिंहाच्या वंशजास झालावाडची स्वतंत्र जहागीर दिली. तथापि  ब्रिटिशांचे व संस्थानाधिपतींचे संबंध फारसे सुधारले नाहीत. ब्रिटिशांची कर्जाची बाकी थकली, १८१७ च्या सुमारास कोटाच्या एका लष्करी तुकडीने इंग्रजांविरुध्द बंड केले, त्यात पोलिटिकल एजंट व त्याची मुले यांचे खून झाले. रामसिंगास ह्यांमुळे १७ तोफांऐवजी १३ तोफांचा मान ठेवण्यात आला. १८६६ मध्ये दुसरा छत्रसाल गादीवर आला. त्यावेळी संस्थानातील अंदाधुंदी शिगेस पोहोचली. ब्रिटिश सरकारने संस्थानचा कारभार पाहण्यासाठी  १८७४ मध्ये सर फैजअलीखान यास प्रधान नेमले. त्याने कर्ज फेडून संस्थानात सुधारणा घडवून आणल्या. १८९९ मध्ये कोटा संस्थानास झालावाडपैकी पंधरा जिल्हे परत मिळाले. १९०० मध्ये महाराजा छगनसिंह ह्यास के.सी.एस्‌.आय्‌. हा किताब देण्यात आला. याशिवाय लेफ्टनंट कर्नल हा लष्करी हुद्दा देण्यात आला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मोफत शिक्षण व सार्वजनिक बांधकामे येथे सुरू करण्यात आली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस रेल्वे, डाक-तार, इंग्रजी नाणी आली. शासनाच्या सोयीसाठी संस्थानचे १९ निझामत व ६ तहसील असे भाग पाडण्यात आले. प्रत्येक निझामतीवर एक नाझीम नावाचा अधिकारी व तहशीलीवर एक तहशीलदार असे. त्यांच्या हाताखाली नायब निझाम व नायब तहशीलदार नेमलेले असत. महाराज सर्व कारभार आपल्या दिवाणाच्या साहाय्याने पाहत.

स्वातंत्र्योत्तर काळात राजस्थानातील संस्थानांचा एक संघ करावा, असे धोरण कोटा, डुंगरपूर व झालावाड या संस्थानाधिपतींनी अवलंबिले. त्यानुसार दहा संस्थानांचा राजस्थान संघ निर्माण करण्यात आला व त्याचे उद्‌घाटन २५ मार्च १९४८ रोजी. न. वि. गाडगीळ यांच्या हस्ते झाले आणि कोटा संस्थानचे महाराज राजप्रमुख झाले व कोटा संस्थान अशा प्रकारे विलिन झाले पुढे १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेच्या कायद्यानुसार कोटा हे राजस्थान राज्यात समाविष्ट करण्यात आले.  

संदर्भ : शर्मा, मथुरालाल, कोटा राज्य का इतिहास, कोटा , १९४०. 

कुलकर्णी, ना. ह.