मिसिसिपी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक राज्य. क्षेत्रफळ १,२३,५१५ चौ. किमी. त्यांपैकी १,१८३ चौ. किमी. अंतर्गत जलाशयांनी व्यापले आहे. हे राज्य देशाच्या आग्नेय भागात असून त्याची लोकसंख्या २५,२०,६३८ (१९८०) होती. याच्या दक्षिणेस व पश्चिंमेस लुइझिॲना, आर्‌कॅन्सॉ, उत्तरेस टेनेसी, पूर्वेस ॲलाबॅमा ही राज्ये असून आग्नेयीस मेक्सिकोचे आखात आहे. राज्याची संपूर्ण पश्चिम सरहद्द मिसिसिपी नदीने बनली असून जॅक्सन (लोकसंख्या २,०२,८९५–१९८०) हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण व राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे.

भूवर्णन : मेक्सिकोच्या आखाताच्या किनारी प्रदेशात वसलेल्या या राज्याचा बहुतेक भूप्रदेश सस.पासून ९० मी. पर्यंत उंचीचा आढळतो. काही भाग लहानलहान टेकड्या व खडबडीत भूप्रदेशाने व्यापलेला आहे. भूप्रदेशाची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते. ईशान्य भागात वुडाल मौंटन हा सर्वांत उंच भाग असून याच भागात राज्यातील सर्वोच्च शिखर (२४६ मी.) आहे. याशिवाय ब्लॅक प्रेअरी पर्वतरांग, तसेच तिच्या पश्चिमेस पाँटटॉक रांग असून दक्षिण भागात फ्लॅटवुड नावाचा कमी उंचीचा रेतीमिश्रित गाळाचा पट्टा आहे. राज्याच्या पश्चिम भागात मिसिसिपी व यॅझू या नद्यांदरम्यान गाळयुक्त सुपीक प्रदेश आहे. हा सु. १०५ किमी. रुंदीचा असून याच्या पूर्व भागात लोम, लोएस मातीच्या लहानलहान टेकड्या आढळतात. कापूस उत्पादक प्रदेश म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडील सागरकिनारी प्रदेश विस्तृत पुळणी व कुरणांचा असून याच्या उत्तर भागात पिवळ्या पानांच्या पाइन वृक्षांचा पट्टा आहे. या भागात लाकूडकटाईचा व्यवसाय जोरात चालतो.

राज्यात उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या पश्चिमेकडील मिसिसिपी व पूर्वेकडील ॲलाबॅमा या दोनच प्रमुख नदीप्रणाली आहेत. त्या उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेल्या पाँटटॉक रांगेने एकमेकींपासून वेगळ्या झाल्या आहेत. मिसिसिपी ही पश्चिम सरद्दीवरून वाहणारी राज्यातील प्रमुख नदी असून, यॅझू व बिग ब्लॅक या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. त्या राज्याच्या पश्चिम व वायव्य भागांचे जलवाहन करतात. राज्याच्या ईशान्य कोपऱ्यातील सरहद्दीवरून टेनेसी नदी वाहत जाते. पर्ल नदी राज्याच्या मध्यपूर्व भागात उगम पावून प्रथम पश्चिमेस व नंतर जॅक्सन शहराजवळ दक्षिणेस वळते व पुढे लुइझिॲना आणि मिसिसिपी या राज्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन मेक्सिकोच्या आखाताला मिळते. या नदीमुळे राज्याच्या मध्यभागाचे जलवाहन होते. यांशिवाय टॅलाहॅची (यॅझूची उपनदी), दक्षिणेकडील पॅस्कगूला नदी, पूर्व भागातील टॉमबिग्बी इ. नद्या त्या त्या प्रदेशाचे जलवाहन करतात. राज्यात नैसर्गिक तलाव फार थोडे आहेत परंतु यॅझू, पर्ल, टेनेसी इ. नद्यांवर बंधारे बांधून अनेक लहानमोठे जलाशय निर्माण करण्यात आले आहेत.

हवामान : समुद्रसान्निध्य व जलाशय यांमुळे राज्याच्या हवामानात स्थलपरत्वे फरक आढळतो. दक्षिण भागात हवामान उपोष्णकटिबंधीय आर्द्र असून उत्तर भागात ते उष्ण प्रकारचे आहे. येथे हिवाळे सौम्य, तर उन्हाळे कडक असतात. राज्याचे वार्षिक सरासरी तापमान उत्तर भागात १६° से., तर दक्षिणेस किनारी भागात २०° से. असते. उन्हाळ्यातील सरासरी तापमान २७° से. असते परंतु दिवसा ते ३५° से. पर्यंत जाते. येथे वार्षिक सरासरी पर्जन्य १२७ सेंमी. पडतो. दक्षिण भागात पर्जन्यमान थोडे जास्त असते. हिवाळ्यात उत्तर भागात क्वचित बर्फ पडते.

वनस्पती व प्राणी : राज्यातील सु. ६०% क्षेत्र जंगलांनी व्यापलेले असून त्यांत सु. १०० वनस्पतिप्रकार आढळतात. दक्षिण भागात पाइन वृक्षांचे प्रमाण जास्त आहे. इतर भागांत कठीण लाकडाचे वेगवेगळे वृक्षप्रकार असून रानफुले, लहान झुडुपे व गवत सर्वत्र आढळते. जंगलांतील बहुतेक मोठे प्राणी शिकारीमुळे नामशेष होत आहेत. हरणे, ससे, खारी इ. लहान प्राणी बरेच आहेत. तसेच इतर राज्यांतून येणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्रमाण बरेच आहे. जंगली टर्की सर्वत्र आढळतात. अंतर्गत जलाशयांत प्रामुख्याने बास, प्रोम, मार्जारमीन, कॅपी इ., तर किनारी भागात ऑयस्टर, कोळंबी इ. जलचर विपुल मिळतात.

चौंडे, मा. ल.

इतिहास व राज्यव्यवस्था : विद्यमान मिसिसिपी राज्याच्या प्रदेशात यूरोपीय वसाहतकारांच्या पूर्वी उत्तरेकडे चिकसॉ व मध्य विभागात चॉक्टॉ या इंडियन जमातींची वसती होती. विशेषतः नैर्ऋत्येकडील नॅचिझ ही मेक्सिकन इंडियनांशी संबंध असलेली जमात सांस्कृतिक दृष्ट्या विशेष प्रगत होती. डिसेंबर १५४० मध्ये एर्नांदो दे सोतो याने आपल्या संशोधन मोहिमेत येथे प्रवेश केला होता. मे १५४१ मध्ये मिसिसिपी नदीचा त्याला शोध लागला. त्याच्या मागोमाग झाक मार्केत आणि ल्वी झॉल्ये हे फ्रेंच धर्मोपदेशक आणि समन्वेषक येथे आले. मिसिसिपी नदीखोऱ्याचा प्रदेश पुढे लुइझिॲना नावाने फ्रेंचांच्या सत्तेखाली आणण्यात आला. १६९९ पर्यंत संशोधक या भागात येत राहिले परंतु कायमची अशी वसाहत तोपर्यंत स्थापन झाली नाही. पुढे बिलक्सी उपसागराजवळ किल्ला बांधून फ्रेंच वसाहतकार स्थायिक झाले. मिसिसिपी प्रदेश फ्रेंचांच्या लुइझिॲना वसाहतीचा एक भाग बनला. १७१६ मध्ये नैर्ऋत्य भागात रोझल्या नावाचा किल्ला बांधण्यात आला व त्याच्या आसपास वसाहत वाढू लागली. या प्रदेशात वसाहतकार आणण्यासाठी काही कंपन्याही स्थापन झाल्या. जॉन लॉ या स्कॉटिश माणसाची ‘फ्रेंच मिसिसिपी कंपनी’ त्यावेळी विशेष गाजली, परंतु तीनच वर्षात ती बंद पडली. ‘मिसिसिपी बबल्‌’ म्हणून तिचा निर्देश होतो. १७६३ च्या पॅरिसच्या तहानंतर हा मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील फ्रेंच प्रदेश तसेच स्पेनच्या ताब्यातील पूर्व व पश्चिम फ्लॉरिडा हे विभागही ब्रिटिशांच्या ताब्यात आले. अनेक अँग्लो-अमेरिका लोकांना त्यांच्या सैनिकी सेवेचा मोबदला म्हणून या प्रदेशात जमिनी देण्यात आल्या. त्यांनी नॅचिझ प्रदेशात तंबाखू, नीळ इत्यादींचे उत्पादन सुरू केले व या भागात कृषिविकास घडविला. अमेरिकेच्या राज्यक्रांतीच्या काळात नॅचिझ प्रदेश सापेक्षतः तटस्थच राहिला. या संधीचा फायदा स्पॅनिश वसाहतकारांनी घेतला व रोझल्या किल्ला घेऊन या भागात स्पॅनिश सत्ता पुन्हा स्थापन केली (१९७९). तेथील अमेरिकन वसाहतकारांनी स्पेनशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. १७८१–८२ मधील तेथील ब्रिटिश वसाहतकारांचा अल्पकालीन उठाव वगळता, हा प्रदेश १७९५ पर्यंत अधिकृतपणे व १७९८ पर्यंत प्रत्यक्षात स्पेनच्या ताब्यात राहिला. अमेरिकन क्रांतीनंतरच्या १७८३ मधील पॅरिस तहान्वये ग्रेट ब्रिटन ३१° अक्षांशाच्या उत्तरेकडील प्रदेश अमेरिकेकडे सुपूर्त केला असला, तरी हे सत्तांतर स्पेनने मान्य केले नाही. पुढे जॉर्जियाने बूर्‌बाँ परगणा स्थापून (१७८५–८८) या प्रदेशावर हक्क सांगितला आणि नंतर १७९५ मध्ये येथील जमिनीची विक्रीही केली. या प्रादेशिक वादाचा शेवट सॅन लोरेन्झो तहाने (१७९५) झाला व ३१° अक्षांशाच्या उत्तरेकडील प्रदेश स्पेनने अमरिकेला सुपूर्त केला तथापि प्रत्यक्ष ताबा मिळण्यास पुढे ३ वर्षे लागली.


संघशासनाने ७ एप्रिल १७९८ मध्ये मिसिसिपी प्रदेशाची स्थापना केली. त्याची राजधानी नॅचिझ ही होती. तथापि फ्रेच, ब्रिटिश, स्पॅनिश आणि जॉर्जियन यांचे जमिनीबाबतचे वादग्रस्त दावे व इंडियन लोकांचे उठाव यांमुळे हा प्रदेश अशांतच राहिला. जॉर्जियाच्या वादातूनच यॅझू जमीन अपहार प्रकरण उद्‌भवले होते. १८१४ पर्यंत इंडियनांचा उठाव मोडून काढण्यात आला. १८१२–१५ मध्ये पुन्हा ब्रिटिशांशी युद्ध सुरू झाले. अखेर १८१७ मध्ये या प्रदेशाला राज्याचा दर्जा लाभला. त्यावेळी पूर्वेकडील प्रदेश मात्र तत्कालीन ॲलाबॅमा राज्यात अंतर्भूत होता. राज्याचे पहिले संविधान त्याच वर्षी तयार करण्यात आले.

जॅक्सन ही १८२२ पासून या राज्याची राजधानी होती. त्यावेळीही राज्यातील दोन-तृतीयांश जमीन प्रत्यक्षात इंडियन लोकांच्या ताब्यात होती पण हळूहळू १८२०, १८३० व १८३२ मधील तहांनुसार ती राज्यशासनाच्या ताब्यात आली. त्यावेळच्या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन जोसेफ टॉमसन हेअर, सॅम्युएल मेसन, जेम्झ मरेल व हार्प बंधू यांसारखे बंडखोर याच काळात उदयास आले. एकूण हा कालखंड अराजकाचाच होता. मेक्सिकन युद्ध, क्यूबातील उठाव, टेक्सस प्रदेशाचे स्वातंत्र्य यांसारख्या बाह्य गोष्टींत राज्याची बरीच शक्ती खर्च झाली. कापूस उत्पादन, त्यासाठी जमिनीची वाढती गरज व मजुरीसाठी गुलाम अशी वसाहतकारांची दृष्टी होती. १८४० नंतर तर येथे गुलामांची संख्या येथील यूरोपीय लोकांपेक्षा अधिक झाली. १८६१ मध्ये हे राज्य दक्षिणेकडील संस्थानांच्या गटातून बाहेर पडले. १८५० च्या सुमारास परिस्थिती काहीशी निवळली. जेफर्सन डेव्हीस हा या राज्याचा सीनेटर अमेरिकन संघराज्यीय संस्थानांचा अध्यक्ष झाला. यादवी युद्धकाळात हे राज्य जय-पराजयांच्या चक्रातून गेले. त्यानंतर राज्यात गुलामगिरीवर बंदी घालण्यात आली. तथापि या संदर्भातील बारावी व चौदावी संविधान दुरुस्ती मात्र राज्याने संमत केली नाही. परिणामतः अमेरिकन काँग्रेसच्या धोरणानुसार येथे आर्‌कॅन्सॉ व मिसिसिपी यांचा संयुक्त लष्करी विभाग स्थापून त्यावर जनरल ॲडेलबर्ट एम्झ या लष्करी गव्हर्नरची नेमणूक झाली (१८६८). निग्रोंना मूलभूत हक्क देणारे संविधान १८६९ मध्ये स्वीकारण्यात आले. त्यास प्रारंभी लोकांनी विरोध केला पण सवलती आणि दडपण या दोन्ही मार्गांचा अवलंब करून तो विरोध मोडून काढण्यात आला. तेराव्या व चौदाव्या संविधान दुरूस्त्यांच्या संमतीनंतर १८७० साली मिसिसिपी या राज्याला पुन्हा संघराज्यात प्रवेश देण्यात आला. १८७४ साली एम्झ पुन्हा गव्हर्नर झाला व त्याच्या कारकीर्दीत शासनयंत्रणेवरील निग्रो प्रभाव खूपच वाढला. नायब राज्यपाल व इतर महत्त्वाचे अधिकारी त्यावेळी निग्रोच होते. परिणामतः दंगेधोपेही काही शहरांतून उद्‌भवले. १८७५ ची प्रांतिक निवडणूक जवळजवळ क्रांतीकारक ठरली आणि डेमॉक्रॅटिक पक्षाला विधिमंडळात बहुमत लाभले. या सरकारने निग्रो नायब राज्यपालाला काढून टाकले. एम्झला राजीनामा द्यावा लागला. १८९० च्या संविधानानुसार या राज्यात पुन्हा गौरवर्णीय यूरोपीयांचे वर्चस्व प्रस्थापित झाले व कृष्णवर्णीयांना समान नागरी हक्कांपासून वंचित करण्यात आले. दक्षिण राज्यांनी त्या संविधानाचा आदर्श ठेवला. संविधानातील कोणताही भागवाचणे व स्पष्ट करणे ही मतदाराच्या पात्रतेची अट लादण्यात आली. कृष्णवर्णीयांना त्यामुळे मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. याचा प्रतिकूल परिणाम शेतीच्या उत्पादनावर झाला व प्रत्यक्ष शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी व बँकव्यवसायी यांचा शेतीवरील प्रभाव वाढला. तथापि १९०४ च्या सुमारास छोट्या शेतकऱ्यांचा राजकीय प्रभाव वाढला. जिम क्रो लॉज (१९०४), उत्क्रांतिवादाच्या शालेय अभ्यासास बंदी (१९२६), दारूबंदी (१९०८ ते १९५२) ह्या राज्याच्या प्रतिगामी धोरणांच्या काही निदर्शक बाबी होत.

दुसऱ्या महायुद्धकाळात सैन्यभरतीचे फार मोठे काम या राज्याने केले. हॅटिसबर्गजवळील शेल्बी छावणी या दृष्टीने उल्लेखनीय आहे. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात राज्यात आर्थिक–सामाजिक विकास घडून आला. शेतीचे यांत्रिकीकरण त्यांपैकी महत्त्वाचे होते. औद्योगिककरणाच्या क्षेत्रात, विशेषतः नैसर्गिक साधनसंपत्ती व श्रमशक्ती यांच्या विकासावर, भर देण्यात आला.

१९२७ मधील भीषण पुराच्या आपत्तीनंतर राज्यातील पूरनियंत्रणाचे काम संघराज्याने स्वतःकडे घेतले आहे. राज्याकडील साक्षरतेचे व प्रतिव्यक्ती उत्पन्नाचे प्रमाणही सापेक्षतः अत्यंत कमी आहे. वांशिक संघर्ष ही राज्यातील कायमची समस्या आहे. १८७५ नंतर प्रथमच १९४८ मध्ये राज्याने डेमॉक्रॅटिक पक्षाला बाजूला सारून स्टेट्‌स राइट्स्‌ पक्षाच्या उमेदवाराला राष्ट्राध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला. १९५४ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या वांशिक पृथक्करणाविरुद्ध दिलेल्या निर्णयास राज्यातील गौरवर्णीयांनी संघटितपणे विरोध केला. १९६० व १९६४ सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत राज्याने प्रतिगामी उमेदवारांनाच पाठिंबा दिला. १९६१ मधील ‘फ्रीडम रायडर्स’ संघटनेच्या वांशिक एकात्मतेच्या चळवळीमुळे पुन्हा हिसांचार उद्‌भवला. १९६२ साली एका निग्रो विद्यार्थाच्या विद्यापीठ प्रवेशाला रोखण्याचा प्रयत्न झाला पण संघशासनाने कारवाई करून तो अयशस्वी ठरविला. परिणामी पुन्हा दंगली उसळल्या. वांशिक दंगलीमुळे अनेक हत्याही घडून आल्या. १९६५ च्या संघशासनाच्या मतदान अधिनियमानुसार कृष्णवर्णीयांना मतदानाचा हक्क दिलेला आहे. हळूहळू वांशिक तणावाची परिस्थिती निवळत चालली आहे.

जाधव, रा. ग.

आर्थिक स्थिती : देशातील महत्त्वाच्या ग्रामीण राज्यांमध्ये मिसिसिपी राज्याचा समावेश होतो. पूर्वीपासून कापूस उत्पादनात हे राज्य अग्रेसर होते, परंतु दुसऱ्या महायुद्धापासून इतर नगदी पिकांचे उत्पादन वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनचा समावेश होतो. इतर राज्यांप्रमाणे याही राज्यात कृषिक्षेत्र खूप मोठे असल्याचे दिसून येते. कापूस व सोयाबीन यांचे पीक प्रामुख्याने सुपीक त्रिभुज प्रदेशात व नद्यांच्या दुआबात घेतले जाते. यांशिवाय भात, गहू, ओट, ज्वारी, रताळी, भाजीपाला, पेकन, विविध प्रकारचे गवत इ. उत्पादने घेतली जातात. जंगलउत्पादने तसेच रोपवाटिकाही बऱ्याच आहेत. शेतीबरोबरच पशुपालन हाही येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. जॅक्सनच्या परिसरात मांसोत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. राज्याच्या दक्षिण भागात प्रामुख्याने कुक्कुटपालन व्यवसाय चालतो. याच भागात मांसल कुक्कुटपालनाचा उद्योग विकसित झाला आहे. १९८३ मध्ये राज्यात १८ लक्ष गुरे होती. याच वर्षी राज्यात दुभत्या गाई व वासरे ९६,००० मांस उत्पादनासाठी गाई व वासरे ८,७४,००० व डुकरे २,८०,००० होती. शेतीबरोबरच लाकूडतोड हाही व्यवसाय येथे चालतो. १९८३ मध्ये राज्यात लगद्यासाठी लाकडाचे ४७,६४,१३२ कॉर्ड, १६,८६२ टन ओंडके, टर्पेंटाइन गम ४,३५५ पिंपे इतके उत्पादन झाले. याच वर्षी राज्यात १,७६,१०२ हे. क्षेत्रात राष्ट्रीय जंगले होती.


निर्मिती उद्योग हा मिसिसिपीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. १९३६ पासूनच या भागात लहानलहान उद्योग सुरू झाले. राज्यात फार मोठ्या कारखान्यांची गर्दी मात्र आढळत नाही. १९५० मध्ये कापड उद्योगापेक्षा लाकूड उत्पादनाकडे कामगारांचा ओघ सुरू झाला. १९७० च्या मध्याला जहाज बांधणी, तसेच वाहतूक साधने तयार करण्याच्या उद्योगात प्रगती घडून आली. त्याबरोबरच अन्नप्रक्रिया व तत्सम उद्योगांत वाढ झाली. राज्याच्या ईशान्य भागात कापड उद्योग, तर किनारी प्रदेशात जहाज बांधणी उद्योग एकटवलेले आहेत. राज्यात खाण उद्योग फारसा महत्त्वाचा नाही. खनिज तेल व वायू यांचे उत्पादन थोड्याफार प्रमाणात होते. याशिवाय बारीक वाळू व रेतीची निर्यात तसेच सिमेंट उत्पादन इ. व्यवसाय चालतात. १९८१ मध्ये राज्यात खनिज तेलाचे ३,४३,८१,०९३ पिंपे व नैसर्गिक वायूचे सु. ६,४९,६०१ कोटी घ. मी. इतके उत्पादन घेण्यात आले. याच वर्षी राज्यात ६ खनिज तेलशुद्धीकरण कारखाने होते. १९८२ साली निर्मितीउद्योगांत २,२०,४६९ लोक गुंतलेले होते.

राज्यात १९८३ साली १६,३७५ किमी. लांबीचे महामार्ग होते, त्यांपैकी १६,२४६ किमी. लांबीचे पक्के होते. १९८२ मध्ये राज्यात १५,९०,४७२ मोटारी नोंदविलेल्या होत्या. १९८३ मध्ये येथे ४,९९० किमी. लांबीचे लोहमार्ग, तर १०१ विमानतळ होते. यांशिवाय ७२ खाजगी धावपट्‌ट्या होत्या. मिसिसिपी व इतर मोठ्या नद्यांतून तसेच सागरी बंदरांतून जलवाहतूक मोठ्या प्रमाणात चालते.

लोक व समाजजीवन : राज्यात गोऱ्या लोकांची संख्या जास्त असून तीत प्रामुख्याने ब्रिटिश, आयरिश व उत्तर यूरोपीय लोकांचा समावेश आहे. त्यांपैकी सु. ९८% लोक येथेच जन्मलेले आहेत. १९४० पर्यंत राज्यात कृष्णवर्णीयांचे प्रमाण जास्त होते परंतु १९८० च्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे एकूण लोकसंख्येपैकी फक्त ३५% कृष्णवर्णीय आहेत. राज्याच्या काही भागांत अमेरिकन इंडियन राहतात. त्यांत मुख्यत्वे चॉक्टॉ जमातीचा समावेश आहे. १९८० साली राज्यात १६,१५,१९० गोरे ८,८७,२०६ निग्रो व १८,२४२ इतर जमातींचे लोक होते. येथील बव्हंशी लोक प्रॉटेस्टंट पंथीय आहेत. राज्याच्या अगदी दक्षिणेकडील भागात, प्रामुख्याने किनारी प्रदेशात, तसेच काही शहरांतच कॅथलिक पंथाचे लोक दिसून येतात. ज्यू लोक मुख्यत्वे शहरांत आहेत. १९८३ मध्ये २,००,३३६ मेथडिस्ट, ९५, २७६ रोमन कॅथलिक होते. या राज्यात अनेक चर्च आहेत.

मिसिसिपीमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा उपलब्ध आहेत. १९८३ साली राज्यात १२,९६८ खाटांची व इतर सर्व सुविधा असलेली एकूण १२० रुग्णालये तसेच २,५९९ खाटांची सोय असलेली १४ वेड्यांची इस्पितळे होती.

राज्यात उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. गोऱ्या लोकांच्या मानाने निग्रो लोकांत शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी आहे. येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांत १९८२–८३ मध्ये एकूण ४,७१,६६३ विद्यार्थी व २५,५५६ शिक्षक होते तसेच कनिष्ठ महाविद्यालयात ५३,६८२ विद्यार्थी व २,१५४ निदेशक होते. येथे एकूण २१ विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालये असून त्यांपैकी ८ संस्थांना राज्य शासन मदत देते.

यादवी युद्धपूर्वकाळात समाजातील अभिजात वर्गाने सभ्यता, शिष्टाचार, कलाभिरूची, कलावस्तुसंग्रह यांसारख्या सांस्कृतिक गोष्टीचे संवर्धन केले. मात्र ग्रामीण भागात लोकजीवनातील मिथ्यकथा, गाणी, न्यृत्ये हीच परंपरा टिकून होती. विसाव्या शतकात या दोन्ही परंपरांची एकजिनसी सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महत्त्वाची स्थळे : पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील काही ऐतिहासिक स्थळे प्रसिद्ध आहेत. त्यांत पॅस्कगूला येथील जुना स्पॅनिश किल्ला(१७१८), मिसिसिपी नदीकाठावरील सर्वांत जुने घर, व्हिक्सबर्ग राष्ट्रीय उद्यान, तुपलो नॅशनल बॅटल्‌फील्ड साइट इत्यादींचा अंतर्भाव होतो. मिसिसिपी नदीतून जलविहार व त्याबरोबरच लावा पक्षी, बदके यांची शिकार करणे, सागरकिनारी मासेमारी हे पर्यटकांचे आवडते खेळ आहेत. राज्यात, विशेषतः सागरकिनारी, अनेकपर्यटन केंद्रे आहेत. नॅचिझ व बिलक्सी शहरांतील युद्धपूर्व भव्य वास्तू प्रसिद्ध आहेत. जॅक्सन हे राजधानीचे ठिकाण व औद्योगिक केंद्र असून बिलक्सी (लोकसंख्या ४९,३११–१९८०), मरिडीअन (४६,५७७), हॅटिसबर्ग (४०,८२९), ग्रीनव्हिल (४०,६१३), गल्फपोर्ट (३९,६७६), पॅस्कगूला, (२९,३१८), कोलंबस (२७,३८३), व्हिक्सबर्ग (२५,४३४), तूपलो (२३,९०५) इ. शहरे ऐतिहासिक, औद्योगिक व व्यापारी केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत.

संदर्भ : 1. Loewen, James W. and Sallis, Charles, Ed., Mississippi: Conflict and Change, New York, 1974.

           2. Mclemore, Richard A. Ed. A History of Mississippi, 2. Vols., Mississippi, 1973.

           3. Morris, Willie, Yazoo: Integration in a Deep Southern Town, New York, 1971.

चौंडे, मा. ल.