मिरिस्टिकेसी : (जातिफल कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दले असलेल्या वनस्पतींचा वर्ग) वनस्पतींचे एक लहान कुल. याचा समावेश ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांनी मोरवेल गणात [⟶ रॅनेलीझ] केला आहे व जे. हचिन्सन यांनी लॉरेलीझमध्ये [⟶ लॉरेसी] केला आहे. जायफळाला संस्कृत नाव ‘जातिफल’ असल्याने व लॅटिन नाव मिरिस्टिका फ्रॅग्रॅन्स (जायफळ) असल्याने या कुलाला ‘जातिफल’ कुल हे नाव आहे. यामध्ये एकूण प्रजाती अठरा व जाती सु. तीनशे (ए. बी. रेंडेल यांच्या मते प्रजाती अकरा आणि जाती अडीचशे तर व्हारबुर्ख यांच्या मते १५ प्रजाती व २६० जाती) असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधात व विशेषेकरून आशिया खंडात आहे. सीताफल कुल [⟶ ॲनोनेसी], चंपक कुल [⟶ मॅग्नोलिएसी], मोरवेल कुल [⟶ रॅनन्क्युलेसी] व गुडूची [⟶ मेनिस्पर्मेसी] आणि कमल [⟶ निंफिएसी] या कुलांशी या कुलाचे आप्तभाव आहेत. या कुलातील बहुतेक सर्व वनस्पती ⇨ वृक्ष असून त्यांना सतत हिरवी राहणारी साधी, चिवट, अखंड व उपपर्णहीन पाने असतात साध्या नरम ऊताकत (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहात) तैल प्रपिंडे (तेलाने भरलेल्या ग्रंथी) असतात, त्यामुळे झाडांना वास येतो आतील सालीतून लालसर द्रव बाहेर येतो. फुलोरे मंजरी, परिमंजरी, वल्लरी किंवा गुच्छ [⟶ पुष्पबंध] असून त्यांवर अचक्रीय, बहुधा तीन (त्रि) भागी, लहान, एकलिंगी व नियमित फुले भिन्न झाडांवर येतात. परिदलमंडल साधे, खाली नळीसारखे किंवा घंटेसारखे आणि वरच्या बाजूस पसरट व बहुधा तीन सुट्या दलांचे असते. नर फुलात केसरदले ३–१८ क्वचित ३० जुळलेली (एकसंघ) परागकोश बाहेरच्या बाजूस फुटणारे, उभे किंवा आडवे (स्तंभाला) चिकटलेले स्त्री-फुलात किंजदल एक, किंजल फार लहान ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्याच एकच अधोमुखी (तळाकडे बीजकाचे रंध्र असलेले) तलस्थ बीजक असते [⟶ फूल]. मृदूफळ मांसल पण तडकणारे व एकबीजी बी अध्यावरणयुक्त व पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) रेषाभेदित [अनेक रेषांनी विभागलेला ⟶ फळ बीज]. ⇨ जायफळाला औषधी व स्वयंपाकात महत्त्व आहे. मिरिस्टिका प्रजातीतील पाच जाती, ⇨ नीमाच्या चार जाती, हॉर्सफील्डियाच्या तीन किंवा चार जाती भारतात आढळतात. जातिफल कुल प्रारंभिक कुलांपैकी एक मानले जाते.
2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. 2, Cambridge, 1963.
परांडेकर, शं. आ.