देवडांगिरी : (देवदाली, कुकरवेल, कुकडवेल हिं. बिडाली क. देवलाली, देवडांगर गु. कुकडवेल सं. कोशफला, देवदलिका, जीमूत लॅ. लुफा एकिनेटा कुल–कुकर्बिटेसी). ही आधारावर चढत जाणारी वेल दोडका व घोसाळे यांच्या लुफा  ह्या वंशातील असून ती उष्ण कटिबंधीय आफ्रिकेत आणि भारतात (उ. प्रदेश, बंगाल, बिहार, गुजरात येथे व क्वचित महाराष्ट्रात) आढळते पाकिस्तानात सिंधमध्ये आढळते. लुफा वंशात एकूण सहा जाती असून त्यांपैकी पाच भारतात आढळतात. ही वेल बारीक, काहीशी केसाळ असून खोड खोबणीदार व तणावे (ताणे) दुभंगलेले असतात. पाने साधी, गोलसर व मूत्रपिंडाकृती, काहीशी पंचकोनी किंवा कमीअधिक विभागल्याने त्यांचे पाच खंड झालेले आढळतात. पुं–पुष्पबंधाक्ष (फुलोऱ्याचा दांडा) सामान्यपणे दुहेरी असून त्यातील एकावर एकच पांढरे नर–फूल असते व दुसऱ्यावर लांब मंजिरीवर ५–१२ पांढरी नर–फुले टोकास येतात मादी–फुलेही पांढरी असून एकेकटी असतात. सप्टेंबरात फुले येतात. मृदुफळ आयत किंवा लांबट गोलसर (सु. २·५–३·८ X १·५–२ सेंमी.), लहान जायफळाएवढे, उदी रंगाचे व बिनधारी असून त्यावर राठ केस असतात त्यात पुष्कळ (सु. १८) काळ्या, गुळगुळीत, चकचकीत, पंखहीन, अंडाकृती, चपट्या, सु. ५ मिमी. लांबीच्या बिया असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कुकर्बिटेसी  कुलात (कर्कटी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळाच्या टोकास असलेले झाकण पक्कावस्थेत उघडते व बिया बाहेर पडतात. ह्या वेलीचा लुफा एकिनेटा  प्रकार लाँगिस्टायला (लुफा लाँगिस्टायला) बांदा येथे आढळतो त्याच्या नर–फुलांच्या मंजिऱ्या देवडांगरीपेक्षा आखूड असून फळावरील केस कमी राठ असतात.

देवडांगरीचे सर्व भाग अतिशय कडू असून फळ धाग्यांनी आणि बियांनी भरलेले असते. ते तीव्र रेचक असून जलसंचय (जलोदर), मूत्रपिंडाचा शोथ (दाहयुक्त सूज), जुनाट (हट्टी) श्वासनलिकाशोथ, फुप्फुसांच्या तक्रारी इत्यादींवर देतात. फळांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला रस) पित्तविकारांवर व आंत्रशूलावर (तीव्र पोटदुखीवर) देतात. मूळव्याधीत पंचांगांचा (मूळ, खोड, पाने, फुले व फळे यांचा) काढा ती धुण्यास वापरतात तसेच पंचांग–काढा ज्वरात अंग धुण्यास वापरतात त्यामुळे अंगाची दुर्गंधी कमी होते व ज्वर कमी होतो भ्रमही कमी होतो काविळीत मगज (गर) ताकातून देतात व पंचांगांच्या काढ्याने अंग धुतात. फळात एकिनेटीन हे स्फटिकी कटुद्रव्य व सॅपोनीन असते. बियांतून ११·१% पिवळे किंवा तपकिरी लाल तेल मिळते व ते कडू नसते त्यात २५% संतृप्त (ज्यांच्या संरचनेत कार्बन अणूचा एकही बंध मोकळा नाही अशी) व ७५% असंतृप्त (शृंखलेतील कार्बन अणू एकमेकांना एकापेक्षा जास्त बंधांनी जोडलेले आहेत अशी) अम्ले असतात.

संदर्भ : 1. Kirtikar, K. R.  Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. II,  New Delhi, 1975.

           २. देसाई, वा. गो. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

जमदाडे, ज. वि.