मिनिट : काळ अथवा अवकाश (कोन) मोजण्याचे एक लहान एकक. मिनिटाचा कालावधी तासाच्या साठाव्या भागाइतका असतो आणि मिनिटाच्या ६० व्या भागास सेकंद म्हणतात. सध्या वापरात असलेल्या कालमापनाच्या प्रमाणभूत पद्धतीमध्ये माध्य सौर दिनाचा (पृथ्वीला स्वतःच्या अक्षाभोवती सूर्याच्या संदर्भात एक फेरी पूर्ण करण्यास लागणाऱ्या सरासरी काळाचा) १,४४० वा भाग [६० X २४ (दिवसाचे तास) = १,४४०] म्हणजे मिनिट मानतात. नाक्षत्र कालाचे (ताऱ्यांच्या संदर्भात मोजण्यात येणाऱ्या कालाचे) मिनिट माध्य सौर मिनिटापेक्षा सेकंदाचा काही भाग इतके लहान असते. विशिष्ट परिस्थितीत सिझियम (१३३) या मूलद्रव्यांच्या अणूंतून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणाच्या (तरंगरुपी ऊर्जेच्या) साहाय्याने मोजलेल्या ६० सेकंदाच्या कालावधीला आणवीय मिनिट म्हणतात [⟶ आणवीय कालमापक]. आणवीय मिनिटाचा कालावधी जवळजवळ माध्य सौर मिनिटाएवढा असतो.

कोनाचे मापन करण्यासाठी वर्तुळाचे सारखे ३६० भाग पाडून त्यांना अंश म्हणतात. अंशाचा साठावा किंवा वर्तुळाचा २१,६०० वा भाग म्हणजे मिनिट (कला) होय. मिनिटाचे सारखे साठ भाग पाडतात व त्यांना सेकंद (विकला) म्हणतात [⟶ कोन]. अशा प्रकारे मिनिटाचे मूल्य वर्तुळाच्या आकारमानावर अवलंबून नसते म्हणून कोणत्याही वर्तुळाचा जो कंस वर्तुळ मध्याशी एक मिनिटाचा कोन करतो, त्यास त्या वर्तुळाचा एक मिनिट कंस म्हणतात. पृथ्वीच्या बृहद्‌वृत्ताचे एक मिनिट भौगोलिक किंवा नाविक (सागरी) मैलाबरोबर असते. १ नाविक (नॉटिकल) मैल १,८५२ मी. इतका येतो. अंश, मिनिट व सेकंद दर्शविण्यासाठी त्या त्या आकड्यांच्या डोक्यावर अनुक्रमे °, , या चिन्हांचा वापर करतात.

मिनिट हे एकक इ. स. पू. २००० च्या आधीपासून वापरात असावे कारण त्या काळी वर्ष ३६० दिवसांचे मानले जात असल्याने बॅबिलोनियन, ईजिप्शियन आणि खाल्डियन संस्कृतींच्या काळी वर्तुळाचे सारखे ३६० भाग करण्याची पद्धती रुढ होती. जेव्हा अंशापेक्षा लहान एककाची गरज निर्माण झाली तेव्हा तासाप्रमाणेच अंशाचेही सारखे ६० भाग करण्यात आले व पुढे या लहान भागाचेही सारखे ६० भाग करण्यात येऊ लागले (बॅबिलोनियन लोक एककांची विभागणी १० व ६०–१०० च्या नव्हे – यांच्या भागात करीत) आणि या भागांना अनुक्रमे Partes minutae Primae (पहिले लहान भाग) व Partes minuate secondae (दुसरे लहान भाग) असे संबोधण्यात येई. यावरूनच पुढे मिनिट व सेकंद ही सुटसुटीत नावे रुढ झाली.

चोवीस तासांमध्ये पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती सूर्यसापेक्ष एक वलन पूर्ण करते यामुळे २४ तास = ३६०° असे म्हणता येते. यावरुन १ तास १५° , ४ मिनिटे = १°, कालाचे १ मिनिट = अवकाशीय (आर्क) १५ मिनिटे आणि काळाचा १ सेकंद = अवकाशीय (आर्क) १५ सेकंद असे म्हणता येते.

ठाकूर, अ. ना.