भारहूत : बौद्ध अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले, मध्य प्रदेशातील एक प्राचीन स्थळ. ते बाघेलखंडात पूर्वीच्या नागोद संस्थानात सटना या रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस सु. ११ किमी. वर आहे. या ठिकाणी मौर्यकाळात (इ. स. पू. ३२२-१८५) एक स्तूप बांधण्यात आला. नंतर शुंगकाळात या स्तूपाभोवती प्राकार, कठडे व तोरण- दरवाजे बांधण्यात आले. सद्यस्थितीत तिथे फक्त काही तुरळक अवशेषच इतस्ततः विखुरलेले आढळतात. येथील स्तूपाचे अवशेष अलेक्झांडर कनिंगहॅम या संशोधकाच्या दृष्टीस पडले (१८७३). त्या वेळी त्याला येथील अनेक अवशेष घराच्या बांधकामासाठी नागरिंकांनी वापरलेले आढळले. त्यांतील महत्त्वाचे व उल्लेखनीय अवशेष गोळा करून त्याने ते कलकत्याच्या ‘ इंडियन म्यूझियम ‘ मध्ये पुरातत्वीय दालनात ठेवले (१८७५). त्यानंतर भारतीय पुरातत्वीय खात्याने उर्वरीत अवशेषांचा शोध घेऊन ते अलाहाबाद व मुंबई येथील वस्तुसंग्रहालयांत हलविले. अगदी अलीकडे उपलब्ध झालेले काही अवशेष दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.

भारहूतचा मूळ स्तूप विटांत बांधला असून कठडे (वेदिका) व तोरणे यांचे बांधकाम वालुकाश्मात केले आहे. स्तूपाचा व्यास सु.२१ मी. होता आणि त्याचा उंचीचा आकार अंडाकृती असून चारी बाजूंस भव्य द्वारे होती. द्वारांच्या बाजूंच्या स्तंभात रक्षक म्हणून (१.३३ मी. उंचीच्या) यक्ष-यक्षिणी व नागराज यांची अपोत्थित मूर्तिशिल्पे खोदली होती. प्रत्येक वेदिकेला १६ स्तंभ असून या एकूण ६४ स्तंभावर, तारणांवर व वेदिकांवर विपुल शिल्पांकन आहे. त्यात बुद्धजीवन व जातककथा यांतीत विविध प्रसंगाचे प्रतीकात्मक शिल्पन केले असून बुद्धाची मुर्ती न घडविता त्याचे प्रतीकारत्मक दर्शन घङवावे या हेतूने हत्ती, घोडा, वृषभ व कमळ ही गौतमाच्या जन्माची बद्ध अशी प्रतीके खोदला आहेत. धर्मचक्र, त्रिरत्‍न, बोधिवृक्ष, स्तूप, पदयुग्म इ. प्रतीकांची पूजा आणि बुद्धपूर्ण अवतार व त्यांची लांच्छने असलेले वृक्ष दाखविलेले आहेत. बोधिवृक्ष हे ज्ञानप्रातीचे, धर्मचक्र हे पहिल्या उपदेशाचे व स्तूप हे महानिर्वाणाचे प्रतीक होय. या प्रतीकांबरोबर इतर पशुपक्षी फळे, फुले, पाने, वेलबुट्ट्या, झाड यांचेही शिल्पांकन आहे. येथे जातककथांतील प्रसंगांबरोबरच तीरशिल्पांत व स्तंभांवर यक्ष, यक्षी, नागराज, शालभंजिका, पूजा करणारे भक्त यांच्या मुर्ती आढळतात. काही शिल्पांतून तत्कालीन राजांच्या भेटीची द्दश्ये आहेत. या विविध शिल्पांतील मायादेवीचे स्वप्‍न, बोधिवृक्षाची पूजा, कुरंग मृग व सरू जातक, राजा अजातशत्रू व प्रसेनजित यांची बुद्धाबरोबर भेट, धर्मचक्र-पुजा, कुलकोक, सुदर्शना, चंद्रा या यक्षींच्या मुर्ती, मयुर-पदक, फेटाधारी पुरूषाचे पदक अशी काही शिल्पे असून ती सुरेख आहेत.

येथील बुद्धजीवनाचे कथानक सुसंगत असून चित्रपटाप्रमाणे ते सलग दर्शविले आहे. बुद्धाचे गमन त्याच्या पावलांच्या प्रतीमांतून उमटते तर कंथक घोड्याच्या एकसारख्या प्रतिमांतून त्याच्या पुढील भरारीची प्रगती द्दष्टोत्पत्तीस येते. या कथानकाच्या प्रसंगांखाली शिलालेख असून त्यांत त्या त्या प्रसंगाचे चित्रवर्णन दिले आहे आणि ते शिल्प दान देणाऱ्याचे नावही खोदले आहे. बौद्ध साहित्यातील, विशेषतः जातककथांतील प्रसंगाचे चित्रवर्णनांसह शिल्पांकन असलेले भारहूप स्तूप हे भारतीय वस्तुशैलीच्या इतिहासातील एकमेक उदा. हरण आहे. अशी वर्णनात्मक लेख असलेली शंभर शिल्पे आतापर्यंल येथे उपलब्ध झाली आहेत.


भारहूतची शिल्पशैली बौद्ध कलेच्या इतिहासातील संक्रमणावस्था दर्शविते. येथे आर्ष शैलीतील शिल्पापर्यंतच्या सर्व अवस्थांतील विकासाची स्थित्यंतरे स्पष्टपणे द्दग्योचर होतात. शुंगकाळातील शिल्पे रेखीव, धारदार व उठावदार आहेत. सिरिमा देवता व कुलकोक देवता (यक्षी) ही यांची उत्कृष्ट उदाहरणे होत. दोन्ही मुर्तीच्या घडणीत वर्तूलन म्हणजे वाटोळेपणा असला तरी पहिली मुर्ती उदास संथ व रूक्ष वाटते. इथे उत्तान स्तन व विशाल नितंब यांवर अवास्तव भर दिला आहे मुर्तीची लय साधणारी वक्ररेषा कुठेच दिसत नाही. मात्र कुलकोल यक्षीची दुसरी मुर्ती अत्यंत कमनीय असून शरीर घाटदार आहे. ती त्रिभंग अवस्थेत वृक्षाच्या सानिध्यात असून उजव्या हाताने तिने फांदी पकडली आहे व डाव्या हाताने ती खोडाला कवटाळीत आहे. सांची येथील यक्षींप्रमाणे तिची वक्षस्थळे पुष्ट व नितंब विशाल असूनही तिच्यात उत्तानपणा व मादकता यांचा अंश आढळत नाही. घाटदार, शरीर, रेखीवपणा आणि वक्ररेषांमुळे आलेली गतिमानता यामुंळे ती आकर्षक वाटते. येथील मुळ स्तूपाचे बांधकाम मौर्यकाळात सम्राट अशोकाच्या वेळी (इ. स. पू. २७३-२३२) झाले आणि तोरण-दरवाजे, कठडे आदींचे बांधकाम शुंगकाळात (इ. स. पू. १८५-७५) पूर्ण झाले. येथील एका तोरणावर ब्राह्मी लिपित एक कोरीव लेख आहे. त्यात हे तोरण शुंग वंशातील धनभूती राजाने बांधल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. याशिवाय इतर तोरणांवरही लेख असून तिचे दान देणाऱ्यांची नावे आहेत. मौर्यकाळापासून शुंगकाळाच्या अखेरीपर्यंत याचे बांधकाम चालू होते. त्यावरून भारहूत शिल्पशैलीचा काळ सर्वसाधारणतः इ. स. पू. २५०-१०० या दरम्यान मानण्यात येतो.

भारहूतची शिल्पकला ही पूर्णतः एकद्देशीय व अभिजात आहे. शिल्पांत त्रिमितिदर्शक उठावदार शिल्पे तुलनात्मक द्दष्टया फार नाहीत. बहुतेक शिल्पांकन अपोत्थित असून मौर्य-शुंगकाळातील ओबडधोबडपणाची छटाही अधूनमधून त्यांत स्पष्टपणे दिसते. लाकडावरील कोरीवकामाची शैली ह्या शिल्पांत प्रत्ययास येते.

संदर्भ : 1. Burgess, James Spiers, R. P. Ed. History of Indian and Eastern Architecture, Vol. 1, Delhi, 1967.

            2. Ray. Niharranjan, The Art of Barhut, The Times of India Annual, 1970. Bombay.

            3. Sivaramamurti, C. Art of India, New Delhi, 1979.

            4. Sivaramamurti, C. Sri Lakshmi in Indian Art and Thought, New Delhi, 1982.

देशपांडे, सु. र. 

६. यक्षांचा राजा कुबेर, भारहूतच्या कठडयावरील शिल्प, शुंगकाळ (इ.स.पू. १८५ ते ७५). ७. भारहूत येथील स्वगॅलोकाचे उत्थित शिल्प, शुंगकाळ. ८. भारहूत येथील प्रवेशद्वार आणि कठडा, शुंगकाळ.