भाजणे : (भर्जन, कॅल्सिनेशन). उद्योगधंद्यांत वापरली जाणारी एक क्रिया. या क्रियेमध्ये घन पदार्थ (अवश्य तर त्यात इतर पदार्थ मिसळून) वितळणार नाही इतपत उच्च तापनात इष्ट काळ ठेवतात. भाजण्यामुळे पदार्थातील आर्द्रता व स्फटिकजल बाष्परूपाने निघून जाते किंवा पदार्थांचे ऊष्मीय अपघटन (उष्णतेमुळे घटकद्रव्ये अलग होण्याची क्रिया) होते. व निर्माण झालेले बाष्पनशील (बाष्परूपाने निघून जाणारे) पदार्थ बाहेर पडतात अथवा पदार्थांच्या भौतिक गुणधर्मात इष्ट तो बदल घडवून आणता येतो. या कारणामुळे काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये भाजणे हा एक प्राथमिक संस्कारही समजला जातो.
एकापेक्षा अधिक स्फटिकरूपांत अस्तित्वात राहण्याचा गुणधर्म असलेल्या खनिजांचे स्फटिक-रूपांतरण भाजल्याने घडविता येते. उदा.,⇨ ॲनॅटेज या टिटॅनियम डाय-ऑक्साइड खनिजाचे स्फटिक बसकट अष्टफलकासारखे असतात. ते ७००० से. तापमाना, भाजले असता त्याचे रूटाइल या चतुष्टकोणीयकरणीय स्फटिकात रुपांतर होते अस्फटिकी पदार्थाचे ऊष्मीय पुनःस्फटिकीकरणही भाजण्याच्या क्रियेने साधता येते. उदा., अस्फटिकी सक्रियित (अधिक क्रियाशील बनविलेले) मॅग्नेशिया १,१००० से. तापमानास भाजले म्हणजे त्याचे पेरिक्लेजाच्या घनीय स्फटिकात रूपांतर होते.
भाजण्याच्या क्रियेत जेव्हा पदार्थाचे ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] होते तेव्हा त्या भाजण्याच्या प्रकाराचा उल्लेख ‘रोस्टिंग’असाही केला जातो.
धातूकापासून (कच्चा धातुपासून) धातू वेगळी करण्याच्या प्रक्रियांत धातुकाबरोबर ⇨ अभिवाह मिसळतात व मिश्रण भाजतात. धातुकातील मूलद्रव्ये व अभिवाह यांपासून धातुमळी तयार होते आणि ती वितळलेल्या धातूच्या पृष्ठभागावर पसरते व धातूचे वातावरणापासून रक्षण करते. या भाजण्याच्या प्रकाराला ‘प्रगलन’ (स्मेल्टिंग) ही संज्ञा वापरतात.
औद्योगिक प्रमाणावर भाजण्याच्या क्रिया घूर्णी (फिरणाऱ्या) भट्टया, परावर्तन भट्टया अथवा अवगुंठन भट्टया यांमध्ये घडविल्या जातात. [⟶ भट्टी].
मृत्तिका उद्योगात चिनी मातीचे पात्रे, विटा, कौले इ. माल पक्का करण्यासाठी भाजण्याची क्रिया (फायरिंग) वापरतात. तसेच अनेक खाद्यपदार्थ उद्योगातील प्रक्रियांत भाजण्याचा (बेकिंगचा) समावेश असतो. [⟶ बेकरी तंत्र मृत्तिका उद्योग].
दीक्षित, व. चिं. केळकर, गो.रा.